गोंधळी खासदारांना क्रॉमवेलची प्रतीक्षा?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2018
Total Views |
 

 
संसदेतला गदारोळ आता नित्याचाच झाला आहे. गेली कित्येक वर्षे संसदेत काम कमी आणि गोंधळच जास्त होत आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसने गोंधळाचे तंत्र अवलंबत सरकारला त्रास देण्याचेच ठरविले आहे की काय, असे वाटावे एवढी नकारात्मक भूमिका घेऊन कॉंग्रेस वागत आहे. कॉंग्रेससोबतच अन्य विरोधी पक्षांचे सदस्यही गोंधळ घालूनच स्वत:च्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहेत. कॉंग्रेसला गोंधळाविषयी टोकले असता, कॉंग्रेसकडून भाजपाकडे बोट दाखविले जाते. आम्ही जेव्हा सत्तेत होतो, तेव्हा भाजपाचे लोक गोंधळ घालून कामकाज हाणून पाडत होते, याची आठवण करून देत, आपण घालत असलेल्या गोंधळाचे कॉंग्रेसकडून निर्लज्जपणे समर्थन केले जात आहे. भाजपाने गोंधळ केला म्हणून आम्हीही गोंधळ करू, ही कॉंग्रेसची भूमिका मान्य केलीही, तरी कॉंग्रेसने आतापर्यंत भाजपापेक्षा दुप्पट गोंधळ घातला आहे. त्यामुळे गोंधळ घालण्याचा कॉंग्रेसचा कोटा कधीच संपला आहे. देशातला सगळ्यात जुना म्हणविला जाणारा कॉंग्रेस पक्ष भाजपाशी तुलना करीत गोंधळच घालण्याचा पोरकटपणा करणार असेल, तर राहुल गांधी यांनी कितीही आवेश आणून पक्ष कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरी या पक्षाला पुढल्या निवडणुकांमध्ये यश मिळेलच, याची खात्री देता येत नाही.
 
लोकसभेत सरकारचे बहुमत असतानाही केवळ गोंधळामुळे कुठलेही कामकाज होऊ शकत नाही. संसदेच्या अधिवेशनावर प्रचंड पैसा खर्च होत असताना कामकाज होणार नसेल, जनतेच्या हिताचे निर्णय होणार नसतील, तर एक दिवस असा येईल की, जनता गोंधळ्यांना शंभर टक्के घरी बसवेल. जे काही सुरू आहे, ते अतिशय चिंताजनक आहे. केवळ संसदेतच नव्हे, तर राज्यांच्या विधानसभांमध्येही गोंधळाचे प्रमाण वाढले आहे. अनेक राज्यांच्या विधानसभांमध्ये तर हाणामार्‍याही होऊ लागल्या आहेत. गुजरात विधानसभेतील हाणामारीचे उदाहरण ताजे आहे. कॉंग्रेसच्या एका आमदाराने भाजपाच्या एका आमदाराला विधानसभेत चक्क पट्ट्याने मारहाण केल्याची लाजिरवाणी घटना गेल्या आठवड्यात घडली. मागे उत्तरप्रदेशच्या विधानसभेतही एकमेकांना मारण्याची, माईक उपटून फेकण्याची, खुर्च्या फेकण्याची, कपडे फाडण्याची घटना घडली. जम्मू-काश्मीर विधानसभेतही अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. लोकांनी अतिशय विश्वासाने निवडून दिलेले प्रतिनिधी जर असे एकमेकांना मारणार असतील आणि विधानसभांचा आखाडा बनविणार असतील, तर देशात लोकशाही नव्हे, ठोकशाही काम करीत आहे, असेच म्हणावे लागेल.
 
आमदार-खासदार हे मारहाण करायला काय रस्त्यावरचे गुंड आहेत काय? जनतेने मोठ्या अपेक्षांनी आपल्याला निवडून दिले आहे याचा विसर या मंडळींना पडतोच कसा? आपल्याला जनतेच्या हिताची कामे करायची आहेत, सभागृहांत आपण जनहिताचे प्रश्न मांडले पाहिजेत, सत्ताधार्‍यांच्या मागे लागून जनतेच्या समस्या मार्गी लावल्या पाहिजेत, सतत पाठपुरावा करून सरकारला सळो की पळो करून सोडले पाहिजे, संसदीय आयुधांचा वापर करून सरकारला धाकात ठेवले पाहिजे, हे सगळे करायचे सोडून जर सन्माननीय सदस्य हाणामार्‍या करणार असतील, चावडीवर होतो तसला गोंधळ घालणार असतील, तर संसद आणि विधिमंडळांची प्रतिष्ठा तर धोक्यात येईलच, जगातली सगळ्यात मोठी लोकशाहीसुद्धा अपयशी ठरल्याशिवाय राहणार नाही. मोठ्या अभिमानाने आम्ही सांगत असतो की, भारतात जगातली सगळ्यात मोठी लोकशाही नांदते आहे. विविध धर्म, पंथ, भाषा, प्रांत असलेला आणि विविधतेने नटलेला आमचा भारत देश लोकशाही मार्गाने विकासाच्या मार्गावर अग्रेसर आहे, हे सांगताना यापुढे आमची जीभ अडखळायला नको म्हणजे झाले! ब्रिटन, अमेरिका आणि आयर्लंड या देशांच्या मदतीने आम्ही आपल्या देशाची सगळ्यात मोठी लिखित घटना तयार केली आहे. त्या घटनेत जे नियम आहेत, ज्या तरतुदी आहेत, त्यानुसार आमचे वर्तन का असू शकत नाही, हा फार गंभीर प्रश्न आहे. ब्रिटनला आधुनिक लोकशाहीचा जनक समजले जाते. याच ब्रिटनमध्ये संसदेतील सदस्यांचा भ्रष्टाचार प्रचंड वाढला होता. लोकप्रतिनिधींच्या भ्रष्ट आचरणाला ब्रिटनमधील जनता कंटाळली होती. परंतु, जनतेच्या सुदैवाने ऑलिव्हर क्रॉमवेल नावाचे सद्‌गृहस्थ त्या काळी ब्रिटनच्या राजकारणात सक्रिय झाले.
 
भ्रष्टाचार्‍यांविरुद्ध जनतेचा जो आक्रोश होता, त्याला योग्य दिशा देण्याचे फार मोठे काम या क्रॉमवेल महाशयांनी केले. क्रॉमवेल यांना भ्रष्ट खासदारांना अंकुश घालण्यात यश मिळाले. क्रॉमवेल महाशय आताच्या काळात नव्हे, सतराव्या शतकात होऊन गेले. 1653 साली त्यांनी ब्रिटनच्या संसदेत जोरदार भाषण केले. भ्रष्ट खासदारांना उद्देशून ते म्हणाले होते की, ‘‘तुम्हाला या सभागृहात का म्हणून बसू दिले पाहिजे? या स्थानाचे माहात्म्य आपल्या लक्षात येईल एवढी समज असलेले परिपक्व नेते तुम्ही नाहीत, या स्थानाची प्रतिष्ठा समजून घेण्याची तुमची योग्यताच नाही. चांगल्या गुणांचा त्याग करत वाईट गुणांचा अंगीकार केल्याने तुम्ही लोकांनी संसदेचे पावित्र्य भंग केले आहे, संसदेला बदनाम केले आहे, एका न्यायप्रिय शासनव्यवस्थेचे तुम्ही सगळ्यात मोठे शत्रू आहात, जनतेने मोठ्या परिश्रमाने आणि विश्वासाने तुम्हाला निवडून पाठविले होते, पण तुम्हाला तर तुमच्याच स्वार्थाची पडली आहे, कृपा करा आणि तुम्ही इथून चालते व्हा.’’ अशा कठोर शब्दांत क्रॉमवेल यांनी भ्रष्ट संसद सदस्यांना झापले होते. क्रॉमवेल यांनी ब्रिटनच्या संसदेत भ्रष्ट खासदारांना अतिशय तिखट भाषेत फटकारल्याचा सकारात्मक परिणाम झाला. पुढे ब्रिटनच्या लोकशाहीला एक दिशा मिळाली आणि तिथल्या लोकशाहीची गाडीही रुळावर आली.
 
आज भारतीय संसद आणि विधानमंडळांची अवस्था पाहिली, तर आपल्यालाही एका क्रॉमवेलची आवश्यकता आहे, असे प्रकर्षाने वाटते. भारतात नैसर्गिक साधनसंपत्ती एवढ्या विपुल प्रमाणात आहे की, जगातले एक सगळ्यात संपन्न राष्ट्र आपण बनू शकतो! संपन्न होण्याची क्षमता असतानाही आपली गणना आज एक गरीब आणि मागासलेला देश अशी होत असेल, तर याला जबाबदार कोण? या देशातील जनता की जनतेने निवडून दिलेले गोंधळी लोकप्रतिनिधी? जगातल्या दोनशे देशांमधील मानवीय विकास दराचा विचार केला, तर भारताचा क्रमांक 131 वा लागतो. जगातल्या प्रत्येक तीन कुपोषित बालकांमध्ये एक भारतीय आहे. सरकारी शाळांची काय दुर्गती झाली आहे, विचारता सोय नाही. उदारीकरणानंतर या देशात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. 2013 पासून दरवर्षी सरासरी बारा हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. असा अहवाल 2017 साली सरकारनेच सुप्रीम कोर्टाला सादर केला आहे. एकेकाळी ज्या देशात सोन्याचा धूर निघत होता, त्या देशात आज ही अशी दयनीय अवस्था व्हावी, याला जबाबदार कोण? गोंधळी खासदारांची आणि आमदारांची काहीच जबाबदारी नाही? ज्यांनी देशात सर्वाधिक काळ सत्ता गाजवली, त्या कॉंग्रेस पक्षाला या दुर्दशेशी काहीच देणेघेणे नाही? सत्तेतून बाहेर जाऊन चारही वर्षे झाली नाहीत, या पक्षाने सत्तेत परत येण्यासाठी एवढा गोंधळ घालावा? विरोधी पक्षाने खरेतर सत्ताधार्‍यांवर अंकुश ठेवत जनहिताची कामे मार्गी लावायला हवीत. पण, आम्ही सत्तेत असताना भाजपाच्या खासदारांनी गोंधळ घातला होता, आता आम्ही घातला तर बिघडले कुठे, असा निर्लज्ज सवाल कॉंग्रेसवालेच विचारणार असतील, तर ते लोकशाहीचे वैरीच म्हटले पाहिजे! अजूनही वेळ गेलेली नाही. एखादा क्रॉमवेल भारताच्याही संसदेत यावा आणि त्याने आपल्याला मार मार मारावे, याची प्रतीक्षा जर आपले गोंधळी लोकप्रतिनिधी करणार असतील, तर कुणाचाच काही इलाज नाही...
@@AUTHORINFO_V1@@