जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांसाठी एकनाथराव खडसे आक्रमक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2018
Total Views |
 
नुसत्या आरोग्य शिबिरांनी काय होणार ?
डॉक्टर्स नसतील तर दवाखान्याला कुलूप लावा

 
मुंबई :
जळगाव जिल्ह्यातील बंद पडलेल्या आरोग्य केंद्रांच्या प्रश्नावर माजीमंत्री, ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी आक्रमक होत आरोग्यमंत्र्यांना जाब विचारला तेव्हा त्यावर उत्तर देतांना डॉ. दीपक सावंत घसरल्याने दोघांमध्ये खडाजंगी झाली. अखेर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हस्तक्षेप करीत डॉ.सावंत यांना निर्देश दिल्यानंतर खडसे यांचे समाधान झाले. येत्या महिनाभरात बंद पडलेल्या आरोग्य केंद्रांवर डॉक्टरांची नियुक्ती केली जाईल असे डॉ. सावंत यांनी सांगितले.
 
 
अर्थसंकल्पातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मागण्यांवर विधानसभेत झालेल्या चर्चेत ते बोलत होते. यावेळी खडसे म्हणाले की, निव्वळ मोठी आरोग्य शिबिरे घेऊन भागणार नाही, तर आरोग्य केंद्रांवरच्या सुविधांचे व्यवस्थापन चांगले हवे, सुविधा चांगल्या हव्यात आणि डॉक्टर उपलब्ध हवेत. डॉक्टर उपलब्ध करायचे नसतील तर ही आरोग्य केंद्रे बंद करा असेही ते संतप्त होऊन म्हणाले. गेली अनेक वर्षे जळगाव आणि मुक्ताईनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर डॉक्टर उपलब्ध नाहीत. त्यासंदर्भात वारंवार आरोग्यांत्र्यांना पत्रे लिहिली, प्रत्यक्ष भेटून प्रश्न मांडले असेही खडसे म्हणाले.
 

आ. एकनाथराव खडसे आणि डॉ.दीपक सावंत यांच्यात खडाजंगी - डॉ. दीपक सावंत यांच्या उत्तरावर समाधान न झाल्याने पुन्हा हस्तक्षेप करीत खडसे यांनी बंद पडलेल्या आरोग्य केंद्रांचा विषय रेटला. डॉ. नसतील तर आरोग्य केंद्र बंद करा, असे ते म्हणाले. जनतेच्या दरवाजात आरोग्य केंद्रे बांधून ठेवलीत, पण त्याला डॉक्टर आणि निधीची व्यवस्थाच ठेवली नाही, असे ते पुन्हा म्हणाले. त्यावर दीपक सावंत यांनी बंद करतो, मला काय करायचंय असे म्हटल्याचे ऐकू आले. त्यावर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी असे उत्तर कसे देता असे विचारत डॉ. सावंत यांना थांबवले. जळगाव येथे प्रतिनियुक्तीवर डॉक्टर द्या, महिनाभरात काहीतरी करतो असे आश्वासन द्या, असे निर्देशही बागडे यांनी दिले. डॉ. सावंत यांनी त्याप्रमाणे उत्तर दिल्यानंतर खडसे शांत झाले. उत्तर देताना डॉ. सावंत यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यात एकही डॉक्टर टिकत नाही, तो का ? हा संशोधनाचा विषय आहे. आम्ही १ लक्ष ७० हजार पगार द्यायलाही तयार आहोत, पण तिथे यायला डॉक्टर तयार नसतात आणि आले तरी ते टिकत नाहीत, असे ते म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@