हिंदुपणाच्या जिवंतपणाचे दर्शन घडविणार्‍या नववर्ष स्वागतयात्रा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2018   
Total Views |
 
 
 
 
दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील हिंदू नववर्ष स्वागतयात्रा वेगवेगळ्या शहरांतून निघाल्या. डोंबिवली, पुणे, नाशिक, सांगली, ठाणे, गोरेगाव, दादर, मुलुंड, बोरीवली तसेच महाराष्ट्रातील अनेक भागात पारंपरिक वेशात आणि ढोल-ताशांच्या गजरात समाजातील सर्व वर्गाचे प्रतिनिधी या यात्रांतून सामील झाल्याचे दृश्य आपण पाहिले. सर्वच वर्तमानपत्रांनी रंगीत फोटोंसहित यात्रांना भरपूर प्रसिद्धी दिली. अनेक यात्रांतील देखावे तर डोळ्याचे पारणे फेडणारे होते. कुठेही कोणतेही राजकारण झालेले नाही.
 
वीस वर्षांपूर्वी नववर्ष स्वागतयात्रेची सुरूवात डोंबिवली शहरात झाली. डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या गणेश मंदिर संस्थानने त्यात पुढाकार घेतला. विश्वस्तांना तेव्हा कल्पनाही नसेल की आपण ज्या यात्रेचे आयोजन करीत आहोत, ही संकल्पना सर्वदूर जाईल. (सोशल मीडियाच्या भाषेत सांगायचे तर व्हायरल होईल.) आज ही संकल्पना वर दिलेल्या सर्व शहरांतून मूर्त रूपात पाहता येते. एका शहरात निघालेली यात्रा हळूहळू महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व प्रमुख शहरांत का गेली? या प्रश्नाचे उत्तर आहे हिंदू समाज. हिंदू समाजमन समजल्याशिवाय यात्रांचा सर्वदूर विस्तार का झाला, हे समजणार नाही. नववर्षाला अशा प्रकारच्या यात्रा काढाव्यात, असा सरकारी आदेश नाही. सरकारी कार्यक्रम कसे होतात, हे आपल्या सर्वांना माहित आहे. या कार्यक्रमात जनतेचा उत्साह नसतो आणि त्यात सहभागाची भावनादेखील नसते. अशा यात्रा काढाव्यात, असा धार्मिक आदेश कोणत्याही धर्मपीठाने दिलेला नाही. समजा, एखाद्या धर्मपीठाने दिला असता, तर त्या धर्मपीठाचे अनुयायी यात्रेत सहभागी झाले असते. अन्य हिंदूंना वाटले असते की ही यात्रा इस्कॉनची आहे, शंकराचार्यांच्या मठाची आहे, किंवा कुठल्यातरी बुवा-महाराज यांच्या मठाची आहे. सगळा हिंदू समाज अशा यात्रांत सहभागी होत नाही. झालेल्या सर्व नववर्षयात्रांत हिंदू समाजातील सर्व पंथ, सर्व मठ, सर्व संप्रदाय, सर्व जाती, सामील झाल्याचे दृश्य दिसते. म्हटले तर हे अदूत दृश्य आहे आणि म्हटले तर हा एक चमत्कार आहे.
 
चमत्कार म्हटला की, त्यात कार्यकारण भाव नसतो. मनुष्य शक्तीच्या पलीकडे कोणती तरी शक्ती काम करते आणि मग चमत्कार होतो. या यात्रा असा चमत्कार नाहीत. या सर्व यात्रांच्या मागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नव्वद वर्षाची पुण्याई आहे. यात्रेची संकल्पना काढणारे आणि यात्रांचे आयोजन करणारे बहुसंख्येने संघ स्वयंसेवक आहेत. हे स्वयंसेवक मठकेंद्रित, संप्रदायकेंद्रित, पंथकेंद्रित, बुवा-महाराज केंद्रित विचार करीत नाहीत. ते यापैकी कुणालाही नाकारत नाहीत, उलट मनापासून या सर्वांचा सन्मान आणि आदर करतात. हे स्वयंसेवक समाजकेंद्रित आणि राष्ट्रकेंद्रित विचार करतात. तो संस्कार त्यांच्यावर झालेला असतो. संघ म्हणजे समाज आणि संघ म्हणजे राष्ट्र. जे समाजाच्या आणि राष्ट्राच्या हिताचे, ते संघाचे असे समीकरण असल्यामुळे या यात्रेची संकल्पना जन्माला आली.
 
म्हटले तर ही यात्रा धार्मिक आहे, कारण या यात्रेत सर्व संप्रदायाचे लोक सामील असतात. आणि म्हटले तर ही यात्रा राष्ट्रीय आहे, कारण आपला संप्रदाय कोणता का असेना आपण सर्वजण एका राष्ट्राचे घटक आहोत, नव्हे अंग आहोत, ही भावना या यात्रांच्या मागे असते आणि म्हटले तर ही यात्रा सांस्कृतिक आहे. गुढीपाडवा हा सांस्कृतिक उत्सवाचा दिवस आहे. हिंदू नववर्षाची तेव्हा सुरूवात होते. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा नववर्षाचा पहिला दिवस आहे आणि येणारे नवे वर्ष आणि त्यातील प्रत्येक दिवस आपल्या सर्वांसाठी आरोग्य, सुख-समृद्धीचा जावो, अशी अपेक्षा यावर्षी करायची असते.
 
 
या नववर्ष स्वागत यात्रांनी हा आशय कायम ठेवून त्याला आणखी नवीन आशय जोडला, तो आहे समरसतेचा. आपण हिंदू म्हणून वेगवेगळ्या जातींचे असतो, वेगवेगळ्या संप्रदयांचे असतो, वेगवेगळ्या पंथांचे असतो, या वेगळेपणातील चांगला भाव जपायचा आणि आपण सर्वजण एक आहोत, याची जाणीव ठेवायची. आपण परस्परांचे बंधू आणि भगिनी आहोत. आपला देश एक, भारत ही आपली मातृभूमी, म्हणजे आपण सर्व भारतमातेचे पुत्र आहोत, ही जाणीव जागृत ठेवायची. ही जाणीव नित्य ठेवायची आणि ही जाणीव ठेवून नंतर समाजकारण, राजकारण, अर्थकारण सर्व काही करायचे. त्यात सर्व प्रकारची विविधता राहील. या विविधतेने काही बिघडत नाही, परंतु आंतरिक एकता मात्र कायमराहिली पाहिजे. हा एकतेचा भाव म्हणजे बंधुभाव, त्याला समरसता म्हणायचे. या सर्व यात्रांची ही वैचारिक संकल्पना आहे. तिचे विस्मरण ढोल-ताशाच्या गजरात, लेझीम पथकाच्या ठेक्यात, किंवा पारंपारिक पोशाखात होणार नाही, याची काळजी घ्यायला पाहिजे.
 
उत्सवप्रियता ही हिंदू मानसिकता आहे. हिंदू समाज वेगवेगळ्या उत्सवांशिवाय राहू शकत नाही. हे उत्सव त्याचे हिंदूपण जपतात आणि टिकवून ठेवतात. हे उत्सव नसते, तर भारताचा केव्हाच इराण झाला असता. इराणमध्ये अरबांचे आक्रमण होण्यापूर्वी पारशी संस्कृती अस्तित्वात होती. आक्रमणानंतर साठ वर्षांत ही संस्कृती बेचिराख झाली. इस्लामला भारतात सातशे वर्ष संघर्ष करूनही हिंदूंचे हिंदूपण घालविता आलेले नाही. याची अनेक कारणे आहेत. त्यातील एक कारण हिंदूंची उत्सवप्रियता आहे.
 
इस्लामनंतर इंग्रज भारतात आले. इंग्रजांच्या रुपाने पाश्र्चात्य भोगवादी संस्कृती भारतात आली. हिंदू समाजाने इस्लामी आक्रमण जसे पचविले तसे हे भोगवादी आक्रमणही पचविले. सातशे वर्षांत हिंदूंनी इस्लामला हिंदूपणात आणण्याचा कसोशीने प्रयत्न केला. गुरूनानक देव, संत कबीर, यांचे या संदर्भातील योगदान फारच मोठे आहे. इस्लामच्या एकेश्र्वरवाद आणि निर्गुणवादाला भक्ती संप्रदायाने जोड दिली. हा प्रयोग पूर्णपणे यशस्वी जरी झाला नाही, तरी त्याने अरबी इस्लामची कट्टरता प्रचंड प्रमाणात कमी केली. अरबी संस्कृतीच्या अनेक गोष्टी स्वीकारल्या, पण त्यांचे हिंदूकरण करून घेतले. शिवून पोशाख घालण्याची कला आपण त्यांच्याकडून शिकलो. अनेक खाद्यपदार्थ त्यांच्याकडून आपण उचलले, काही रीतीरिवाज उचलले, आणि त्यांचे हिंदूकरण केले. भाषेतील अनेक शब्द उचलले आणि ते आपल्या भाषेत बसविले. इंग्रजांच्या बाबतीतही हिंदू समाजाने तेच केले. त्यांचा सूट-बूट स्वीकारला. त्यांचे पदार्थ स्वीकारले, वाढदिवसाचा त्यांचा केक स्वीकारला, त्यांची भाषा स्वीकारली, परंतु हे सर्व करीत असताना आपल्या हिंदूपणाला थोडासाही धक्का पोहोचणार नाही, याची सर्व समाजाने काळजी घेतली.
 
या दोन आक्रमणांनंतर तिसरे महत्त्वाचे आक्रमण विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आहे. या विज्ञान आणि तंत्रज्ञानाने जीवन अतिशय गतीमान केले. राहत्या घरात दहा-पंधरा तास आणि इतर वेळ प्रवास आणि कामासाठी असे आपले जीवन झाले आहे. हे तंत्रज्ञानाचे आक्रमण हिंदू समाजाने आपल्या पद्धतीने पचविले. मोबाईल आला, व्हॉटस्‌अॅपचे ग्रुप्स सुरू झाले. बहुसंख्य ग्रुप्स मित्र आणि नातेवाईकांचे असतात. म्हणजे आपल्या परिवाराशी आणि कुटुंबाशी तंत्रज्ञानाच्या मदतीने कनेक्टेड राहण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करताना दिसतो. याला मोबाईलचे हिंदूकरण असे म्हणायला पाहिजे. मुंबईत लोकलने प्रवास करावा लागतो. तास-दीड तासात प्रवास कसा घालवायचा? भजनाचे ग्रुप्स तयार झाले आणि परमेश्र्वराच्या नामसंकीर्तनात कामाचा प्रवास सुरू झाला. म्हणजे प्रवासाचे हिंदूकरण झाले. महिलांच्या डब्यात महिलांचे ग्रुप्स तयार झाले. मकरसंक्रांतीचे हळदी-कुंकू, चैत्रातील हळदी-कुंकू, एवढेच काय वटसावित्रीची पूजादेखील प्रवासी डब्यात होऊ लागली. म्हणजे लोकलच्या डब्याचेदेखील हिंदूकरण झाले. हिंदू माणूस जिथे जाईल तिथे आपली परंपरा घेऊन जातो, संस्कृती घेऊन जातो, सण-उत्सव घेऊन जातो, त्याच्या तारखा तो विसरत नाही आणि तो ज्या परिस्थितीत असेल, त्या परिस्थितीत सण-उत्सव साजरे करतो.
 
हिंदू माणूस पोशाखांनी बदलतो, खान-पानाच्या सवयींनी बदलतो, जसे आज झाले आहे. आज शेजवान राईस, नूडल्स, पिझ्झा, बर्गर, मोमोज् हे त्याचे आवडीचे पदार्थ झाले आहेत. महिला साडीतून वेगवेगळ्या ड्रेसेसमध्ये आल्या, हीच स्थिती पुरुष वर्गाची आहे, परंतु आतला हिंदू बदलत नाही. तो दोनशे वर्षांपूर्वी जसा होता किंवा दोन हजार वर्षांपूर्वी जसा होता, तसाच असतो. बाह्य परिस्थितीच्या बदलाने त्याच्यात सांस्कृतिक बदल होत नाहीत. ते होणार नाहीत याची तो प्रचंड काळजी घेतो.
 
या काळजीचे आजचे दृश्य स्वरूप म्हणजे नववर्ष स्वागतयात्रा होय. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी सर्व ठिकाणी भोगवादी पार्ट्या असतात. त्याचा रसास्वाद हिंदू माणूस घेतो, परंतु हे आपले नाही, हे तो विसरत नाही. आपले नववर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होते आणि त्या दिवशी मिष्टान्न खायचे असते. कोणत्या सणाला कोणते मिष्टान्न हे त्याने ठरवून टाकले आहे. पाडव्याला जिलेबी किंवा श्रीखंड खायचे, दारू प्यायची नाही. शुद्ध राहायचे, कारण हा पवित्र दिवस आहे. इतका पवित्र आहे की या दिवशी कोणतेही काम करायचे असेल तर म्हणजे घर घ्यायचे असेल, चार चाकी गाडी घ्यायची असेल तर मुहूर्त शोधायची गरज नाही. हिंदू माणूस दिवसालाही असे काही पावित्र्य देतो की त्या दिवशी सगळेच काही पवित्र असते. काळ बदलत चालला आणि बदलत्या काळाचे आघात हिंदू समाज वेगवेगळ्या कल्पना लढवून आपल्या परीने पचवित निघालेला दिसतो. हिंदू नववर्षाची स्वागतयात्रा हे त्याचे नेत्रसुखद स्वरूप आहे.
 
 
- रमेश पतंगे
 
@@AUTHORINFO_V1@@