आणखी एक बँक घोटाळा उघडकीस, तीन संचालक अटकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2018
Total Views |
 
चुकीची माहिती देऊन मिळविले लेटर ऑफ क्रेडिट
गोल्डमन सॅक्सने ०.४ टक्क्यांनी घटविला जीडीपी वाढीचा दर
महागाईमुळे रिझर्व बँकेकडून व्याजदरवाढ शक्य?
साखरेचे निर्यात शुल्क रद्द केल्याने शेतकर्‍यांना दिलासा

 
 
पंजाब नॅशनल बॅकंतील १२ ते १३ हजार कोटी रुपयांच्या एलओयु घोटाळा गेल्याच महिन्यात उघड झालेला असून त्यामुळे संपूर्ण बँकिंग क्षेत्र हादरुन गेलेले असतांनाच आणखी एक बँक घोटाळा उघडकीत आलेला आहे. या प्रकरणी पारेख ऍल्युमिनेक्स कंपनीच्या तीन संचालकांना अटक करण्यात आली आहे. या कंपनीच्या घेणेदार कंपन्यात ऍक्सिस बँक, भारतीय स्टेट बँक व इंडियन ओव्हरसीज बँक यांचा समावेश आहे. कंपनीने लेटर ऑफ क्रेडिट मिळविण्यासाठी चुकीची माहिती दिल्याचा आरोप आहे.
 
ऍक्सिस बँकेने आपल्या तक्रारीत म्हटल्यानुसार बँके च्या मुंबईतील फोर्ट शाखेने या कंपनीला २०११ मध्ये १२७ कोटी ५० लाख रुपयांचे लेटर ऑफ क्रेडिट दिले होते. हे लेटर मिळविण्यासाठी बोगस वाहतूक पावत्या(ट्रान्पोर्ट बिल्स) व पुरवठा पावत्या (सप्लाय बिल्स) कंपनीकडून सादर करण्यात आल्या होत्या. ही कंपनी ऍल्युमिनियम शीट्स तयार करणारी आहे. ती केंद्रीय अन्वेषण यंत्रणे(सीबीआय)च्या चौकशी स्कॅनर खाली असून तिने एनसीएलटीमध्ये नादारी(इन्सॉल्व्हन्सी)साठी याचिकाही दाखल केली आहे.
 
 
पंजाब नॅशनल बँकेतील अभूतपूर्व घोटाळ्यानंतर एका पाठोपाठ एक प्रकरणे उघडकीस येत असल्याने सरकारी बँकांची प्रतिमा डागाळली आहे. त्यामुळे वाढीच्या इंजिनाची गतीही थंडावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विख्यात ब्रोकिंग फर्म गोल्डमन सॅक्सने पुढील वर्षासाठी भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचे अनुमान घटविले आहे. ही घट देशांतर्गत सकल उत्पन्ना(जीडीपी)त केली आहे. गोल्डमन सॅक्सचे २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीच्या अनुमानात आधीच्या आठ टक्क्यांवरुन ७.६ टक्क्यांपर्यंत घट करण्यात आली आहे.
 
 
गोल्डमन सॅक्सच्या म्हणण्या नुसार या आर्थिक वर्षभरात महागाईचा दर ५.३ टक्के राहणार आहे. त्यामुळे भारतीय रिझर्व बँक आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत व्याजदरात वाढ करु शकते. संपूर्ण वर्षभरात ही व्याजदरवाढ ०.५ टक्क्यांनी होण्याची शक्यताही गोल्डमनने व्यक्त केली आहे.
 
 
शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकार कृषी बाजारव्यवस्थेत बदल करणार आहे. तसेच यादृष्टिने बाजारपेठां मधील कामकाजाबरोबरच व्यापार धोरणावरही सरकार लक्ष केंद्रित करीत आहे. केंद्र सरकारने कृषी व्यापारविषयक धोरणाचा कच्चा मसुदा (ऍग्रो ट्रेड ड्राफ्ट पॉलिसी) तयार केला आहे. त्याअंतर्गत येत्या चार वर्षात कृषी निर्यात ६ हजार कोटी डॉलर्स(३ लाख ९० हजार कोटी रुपये)पर्यंत वाढविली जाणार आहे. तिचा लाभ शेतकर्‍यांना विशेषत्वाने होणार आहे.
 
 
या धोरणाच्या कच्च्या मसुद्यात संपूर्ण देशभरात एकच बाजार शुल्क(मार्केट फी) लागू करणे, जमीन भाडेपट्ट्याने(लीजवर) देण्या च्या नियमांमध्ये बदल आणि व्यापार धोरण वारंवार न बदलण्याचाही समावेश आहे.
 
 
ऊस उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी सरकार किंमत स्थिरीकरण निधीचा वापर करणार आहे. यासाठी ग्राहक व्यवहार मंत्रालयाने किंमत स्थिरीकरण निधी समितीचा प्रस्ताव मांडलेला आहे. साखरेचे विक्रमी उत्पादन पाहता साखर कारखान्यांची शेतकर्‍यांना देणे असलेली रक्कम १४ हजार कोटी रुपयांवर गेली आहे. या निधीचा विनियोग राज्यांना साखरेवर मिळणारी सबसिडी वाढविण्यासाठी केला जाणार आहे. साखरेची अतिरिक्त खरेदी झाल्यास ती राज्य सरकारे रास्त भावांच्या (रेशनिंग) दुकानांमध्ये विकू शकतात.
 
 
तशातच जानेवारीपर्यंतची शेतकर्‍यांची देणी रक्कम मार्च अखेरीस १७ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढू शकते. यादरम्यान सरकारने साखर क्षेत्राला मोठा दिलासा दिलेला आहे. साखरेच्या निर्यातीवरील २० टक्क्यांचे निर्यात शुल्क सरकारने रद्द केले आहे. त्यामुळे साखरेची निर्यात वाढू शकते.
 
 
अमेरिकन फेडरल बँकेच्या सध्या सुरु असलेल्या बैठकीत व्याजदर वाढीची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. ही या वर्षातील पहिली व्याजदर वाढ असून गोल्डमन सॅक्सच्या अनुमानानुसार या वर्षभरात फेडरल बँक चार वेळा व्याजदर वाढ करण्याची शक्यता आहे.
 
 
व्याजदर वाढीमुळे डॉलरची किंमत वाढणार असल्याने सोने व चांदी या मौल्यवान धातूंच्या किंमतींवर दबाव येणार आहे. त्याच्या परिणामी आज सोने व चांदी या मौल्यवान धातूंच्या किंमती घसरल्या आहेत. सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅममागे शंभर पेक्षा जास्त रुपयांनी तर चांदीची प्रति किलो किंमतही ८० रुपयांनी घटली आहे.
 

३३ हजारांना स्पर्शून सेन्सेक्स पुन्हा खाली, निफ्टी १० हजार १०० बिंदूंच्या वर - शेअर बाजारावरील मंदीच्या अस्वलांची पकड थोडी सैल झाली असल्याचे आज मंगळवारी २० रोजी दिसून आले. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक (सेन्सेक्स) सोमवारच्या बंद ३२ हजार ९२३.१२ वरुन आज सकाळी ३२ हजार ८७६.४८ बिंदूंवर उघडून ३३ हजार १०२ बिंदूंच्या उच्च पातळीला स्पर्श करुन ३२ हजार ८१० बिंदूंच्या खालच्या पातळीवरही जाऊन आला. दिवसअखेरीस तो ७३.६४ बिंदूंनी वाढून ३२ हजार ९९६.७६ बिंदूंवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)ही ३०.१० बिंदूंनी वाढून १० हजार १०० पेक्षा जास्त म्हणजे १० हजार १२४.३५ बिंदूंवर बंद झाला.

@@AUTHORINFO_V1@@