मुंबईत उभे राहणार 'बॉलिवूड संग्रहालय' !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2018
Total Views |

राजेश खन्ना, अमिताभपासून अनेकांच्या स्मृतींना मिळणार उजाळा
पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची विधानसभेत घोषणा
 


 
 
मुंबई : 'बॉलीवूड' या नावाने ओळखली जाणारी मुंबईतील चित्रपटसृष्टी देशभरासह जगातील चित्रपटप्रेमी आणि पर्यटकांचे मोठे आकर्षण आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबईत पर्यटक मोठ्या प्रमाणावर आकर्षित होण्यासाठी मुंबईतील वांद्रे-जुहू परिसरात 'बॉलिवूड संग्रहालय' उभारण्यात येणार आहे. अगदी सुरुवातीच्या अभिनेत्यांपासून राजेश खन्ना, अमिताभ बच्चन ते आजपर्यंतच्या अभिनेते, अभिनेत्री, लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार आदींसह अनेक दिग्गज कलाकारांच्या स्मृतींना या संग्रहालयाद्वारे उजाळा दिला जाणार आहे.
 
राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत याबाबत घोषणा केली. राज्यातील पर्यटन विकासाबाबत विधानसभा नियम २९३ अन्वये सभागृहात उपस्थित झालेल्या चर्चेला उत्तर देताना रावल बोलत होते. ते म्हणाले की, मुंबईत असलेल्या 'बॉलिवूड'ला मोठा इतिहास आहे. या इतिहासाला उजाळा देण्यासाठी तसेच देश - विदेशातील पर्यटकांना मुंबईत आकर्षित करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत हे 'बॉलीवूड संग्रहालय' उभारणार असल्याचे रावल म्हणाले.
 
कसे असेल 'बॉलीवूड संग्रहालय'?
महाराष्ट्र राज्य सरकारच्या पर्यटन विभागाद्वारे उभारण्यात येत असलेल्या या संग्रहालयात चित्रपटसृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या सुवर्णकाळापर्यंतचा सर्व कालावधी दर्शवण्यात येईल. अगदी सुरुवातीच्या अभिनेत्यांपासून राजेश खन्ना, अमिताभ बच्चन ते आजपर्यंतच्या अभिनेते, अभिनेत्री, लता, रफी, किशोर यांच्यापासून चित्रपटसृष्टीला वैभवशाली बनवण्यात योगदान दिलेल्या सर्व कलाकार, तंत्रज्ञांचा इतिहास या संग्रहालयात दाखवण्यात येईल. तसेच, जुन्या काळातील वेशभूषा, पोस्टर्स, चित्रीकरणाचे साहित्य, कलासेट, फोटोगॅलरी, कॅमेरे आदिंचाही या संग्रहालयात समावेश करण्यात येईल.
 
राज्याचे स्वतंत्र पर्यटन धोरण लवकरच
पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी राज्याच्या पर्यटन धोरणाबाबत भूमिका स्पष्ट केली. राज्याचे स्वतंत्र पर्यटन धोरण बनवण्यात येत असून आंतरराष्ट्रीय, भारतीय आणि राज्यातील पर्यटक अशी पर्यटकांची वर्गवारी राज्याने केली असून सर्वसामान्य माणसानेही पर्यटन करावे यासाठी पर्यटन विभाग प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. याशिवाय राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्रपणे 'वारसास्थळे धोरण' तयार करण्यात येत असून खासदार छत्रपती संभाजीराजे यांचाही या धोरण समितीत समावेश करण्यात आला असल्याचे रावल म्हणाले. तसेच पर्यटनाशी संबंधित पायाभूत सुविधांच्या विकासासाठी खाजगी कंपन्यांना मुद्रांक शुल्क, जीएसटी आणि वीजदरात सूट दिली जाणार असून त्यांना सवलतीच्या दरात जमीन आणि मुंबईसारख्या शहरात एफएसआय देण्याचा प्रस्ताव धोरणात समाविष्ट करण्यात येणार असल्याचेही रावल यांनी यावेळी स्पष्ट केले.
@@AUTHORINFO_V1@@