मनातले पुतळे पाडणारा विजय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2018
Total Views |



 

 
 
सेंट पिटरबर्गला नव्वदीच्या दशकात साधे कॉफी शॉपही उघडता येत नव्हते किंवा तिथे लोकांना असे काही करायला एकत्र येताही येत नव्हते त्याचे मुख्य कारण म्हणजे सोव्हियत विचारांची चौकट याला मान्यता देत नव्हती. पुतीन यांचा विजय समजावून घ्यायचा असेल तर त्यांच्यावरचा वर्चस्ववादाचा आरोप जरा बाजूला ठेवून बदलत्या रशियाचा विचार करावा लागेल.
 

पुतीन रशियामध्ये निवडून आले आहेत. विरोधकांपेक्षाही कितीतरी दणदणीत मताधिक्याने निवडून आले आहेत. पुढील सहा वर्षे पुतीन सोव्हिएत रशियाचे राष्ट्रप्रमुख असतील. पुतीन यांना हुकूमशहा मानणारे आणि त्यांच्या विरोधात सातत्याने लिहिणारे अनेक आहेत, आपल्याकडेही त्यांची कमी नाही. जागतिक मूल्यांची पोपटपंची करायची आणि आपल्या चौकटीत न बसणार्‍या राजकीय नेत्यांना लाखोली वाहायची ही अलीकडच्या काळातली नव्याने सुरू झालेली प्रतिक्रिया आहे. अमेरिकेच्या निवडणुकीत ट्रम्प वाईट म्हणून हिलरींच्या बाजूने बोलणारे असेच अनेक लोक निर्माण झाले होते. वस्तुत: हिलरींनी जे उद्योग केले ते नंतर उघडे पडले. आधीही त्याची चुणूक लागलीच होती, मात्र ट्रम्प यांना विरोध हा अशा स्तरावर गेला होता. पुतीन यांच्या बाबतीतही हेच झाले. पुतीन धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत असे मुळीच नाही. मात्र त्यांची वाटचाल आणि राजकारण यांच्याकडे केवळ इतक्याच मर्यादित दृष्टीकोनातून पाहता येणार नाही. एखाद्या राजकीय नेत्यावर जेव्हा अशा प्रकारे मतांचा पाऊस पडतो तेव्हा तो जोडजुगाड नसून लोकमताचा स्पष्ट संकेत मानला पाहिजे. आपल्याला पटो अथवा न पटो, त्यांचे योग्य ते मूल्यमापन केले पाहिजे. पुतीन जे बोलत आहेत त्याच्याकडे कुत्सितपणे पाहून त्यांचे राजकारण कधीच समजणार नाही. निवडून आल्याबरोबर त्यांनी म्हटले की त्यांना आता शस्त्रस्पर्धेत रस नाही. आपल्या शेजार्‍यांशी असलेले आपले मतभेद राजकीय व कूटनैतिक मार्गांनी सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू. रशियाचे अन्य शेजारी राष्ट्रांशी असलेले संबंध ताणले आहेत यात शंका नाही. ते आज ताणले गेले नाहीत हेही तितकेच खरे.

 

स्टॅलिनच्या काळापासून ही वर्चस्वाची लढाई चालू आहे. वर्चस्वाच्या लढाईत, मग ती भौगोलिक असो किंवा राजकीय, दोन पावले मागे येणे हा पुतीन यांचा स्वभाव नाही. तरीसुद्धा ते अशी विधाने का करीत आहेत याचा विचार करायला हवा. गेल्या वर्षी पुतीन यांचे एक विधान गाजले होते. ते म्हणजे ‘डेटा हे नवे पेट्रोल आहे.’ याचा अर्थ मुळातच एकेकाळी तेलाने जगाचे राजकारण व अर्थकारण घडवून आणले, परंतु येत्या काळात माहिती व तंत्रज्ञान हे परवलीचे शब्द असतील. आजच्या घडीला या क्षेत्रात इस्त्रायलचे ज्ञान व त्यांचा दबदबा सर्वश्रुत होता, मात्र ट्रम्प यांच्या निवडणुकीदरम्यान अमेरिकन संगणकांवरचा राजकीय दृष्टीने संवेदनशील असलेला डेटा रशियात कसा पोहोचला याच्या सुरस कथा नंतर बाहेर आल्या. महासत्ता बनण्याच्या पुतीन यांच्या महत्त्वाकांक्षा दडलेल्या नाहीत, मात्र शी जिनपिंग यांच्याप्रमाणे आक्रस्ताळेपणा करणे त्यांच्या स्वभावात बसत नाही. अत्यंत कमी बोलणारे व मनातील गोष्टींचा थांग लागू न देणारे पुतीन बोरिस येल्त्सीन यांच्याकडून सत्ता ताब्यात घेतल्यापासून रशियाच्या राज्यशकटावर आपली मांड पक्की ठोकून बसले आहेत.

 

जागतिक राजकारणाचा पुरेपुर अंदाज घेणारी त्यांच्याइतकीच तिखट टीम त्यांच्यापाशी आहे. जगभरातील अनेक मोठ्या शिक्षणसंस्था, धोरणविषयक काम करणारी विद्यापीठे, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातल्या ट्रेण्डसेटर मानल्या जाणार्‍या संस्था, या ना त्या मार्गाने पुतीन यांच्या प्रभावाखाली आहेत. हे नव्या दमाचे जागतिक राजकारण मानावे लागेल. भली मोठी सैन्य दले, प्रहारक क्षमता असलेली शस्त्रास्त्रे ही कधीकाळी जागतिक राजकारणावर वर्चस्व ठेवण्यासाठी लागणारी आयुधे होती. अमेरिका, चीन आणि रशिया यांच्यातील जागतिक महासत्ता म्हणून जगाचे अर्थकारण नियंत्रित करण्याची स्पर्धा जगजाहीर आहे. अमेरिका सध्या स्वत:च्या आकार मानानुसार स्वत:ला संतुलित करण्याचा प्रयत्न करीत आहे. चीनची हुकुमशाही वृत्ती जग स्वीकारू शकत नाही. आर्थिक नाड्या चीनने कितीही आवळल्या तरीही राज्यकर्ता आणि सावकार यांच्यातील फरक कायमच राहील.

 

पुतीन यांना मिळालेला लोकांचा पाठिंबा विचार करायला लावणारा आहे. चेचन्या बंडखोरांच्या वेळी लोकांच्या राष्ट्रभक्तीला त्यांनी हाक दिली होती, मात्र यावेळी त्यांचा मुद्दा निराळा आहे. सोव्हिएत रशियात, २००० साली त्यांना ५३ टक्क्यांहून अधिक मते मिळाली होती. चार निवडणुकांमध्ये त्यांनी हे प्रमाण वाढवतच नेले आहे. यावेळी त्यांना ७६ टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. चेचन्या भागातून त्यांना ३५ टक्के मते मिळाली आहेत. कॉकेशियस वगैरे भागात हे प्रमाण ९२ टक्क्यांपर्यंत गेले आहे. लोक त्यांच्यावर खुश आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत. सोव्हिएत रशियाचा सारा इतिहास यासाठी तपासून पाहावा लागेल. लेनिनचे पुतळे जगभर लावून त्याखाली जे ढोंग जगभर खेळले गेले, तसे ते रशियातही झाले. त्रिपुरातला एक पुतळा पाडल्यावर आपल्याकडे जो लेनिन प्रेमाचा महापूर आला तो तिथे आला नाही याचे मुख्य कारण ढोंगी समाजवादाचा पोकळपणा तिथल्या लोकांच्या लक्षात आला आहे.

 

पुतीन स्वत:बद्दल काहीही म्हणाले तरी ते पक्के वर्चस्ववादी आहेत. नव्वदीच्या दशकात सेंट पीटर्सबर्गमध्ये साधे कॉफी शॉपदेखील नव्हते, जिथे लोकांना एकत्र येता येईल, कारण कॉफीशॉपची संकल्पना सोव्हिएत विचारांत बसत नव्हती. सत्ताकारणासाठी पुतीन काहीही करीत असले तरी त्याची झळ सर्वसामान्य लोकांना बसणार नाही याची ते काळजी घेत असतात. किमान तसा समज निर्माण करण्यात तरी ते यशस्वी ठरले आहेत. पुतीन यांच्यासारख्या भांडवलशाही व वर्चस्ववादी व्यक्तीचे अशा प्रकारे पुन्हा पुन्हा सत्तेत येणे ही रशियन जनतेच्या मनातली, लेनिनचे पुतळे फुटण्याची प्रक्रिया म्हणून पाहावी लागेल. पुतळे मागे पुढे झिजून जातील, मात्र लोकांच्या मनातून हे बेगडी विचार पुसले जात असल्याचे प्रतीक म्हणून याकडे पहावे लागेल.

@@AUTHORINFO_V1@@