अमेरिकन मूलनिवासींमध्ये स्त्रीचे स्थान

    20-Mar-2018
Total Views |
 
 
एसडी यंगवोल्फ हे अमेरिकेच्या मूळ निवासींपैकी एक असून स्वत: कलाकार, कथाकथनकार आणि शिक्षक आहेत. अमेरिकेच्या मूळनिवासी वंशाचा इतिहास, परंपरा जतन करणार्यांपैकी ते एक आहेत. उत्तर कॅरोलिना आणि टेनेसी येथील पर्वतीय प्रदेशात ते वाढले असून, चेरोकी जमातीचे आहेत. आयरोक्विस हे ईशान्य अमेरिकेतील प्रभावशाली मूलनिवासी आहेत. फ्रेंच वसाहती असताना त्यांना आयरोक्विस लीग म्हणत. नंतर हे नाव बदलून त्याचे आयरोक्विस कॉन्फडेरसी झाले आणि इंग्रज आले त्यानंतर या लोकांना फाईव्ह नेशन्स (1722 पर्यंत) व नंतर सिक्स नेशन्स असे नामाभिधान मिळाले. या सिक्स नेशन्समध्ये मोहॉक, सेनेका, ओनोंडोगा, ऑनिडा, कायुगा व टुस्कारोरा या सहा मूळनिवासी देशांचा समावेश होतो.
आयरोक्विस जमातीत महिलांना पुरुषांइतकाच मान आहे आणि आपल्या भारताप्रमाणे, (आणि युरोपाच्या उलट) पुरुषांएवढेच अधिकारही आहेत. आयरोक्विस परंपरा मौखिक आहे. लिखित शब्दांवर जसे आपण विश्वास ठेवतो, तितकाच या लोकांमध्ये मौखिक शब्दांवर विश्वास असतो. त्यामुळे त्यांचे संविधान लिखित स्वरूपात नव्हते.
आयरोक्विस समाजात महिलांना त्यांच्या संस्कृतीचे जतन करण्याचे कार्य असल्याने त्यांना संस्कृतीचे अग्रेसर मानण्यात येते. परंतु, ही संस्कृती आता आधुनिक अमेरिकनांनी नष्ट केली आहे. इतिहासातील या महिलांची ही धाडसाची भूमिका होती, त्यावरून त्यांचे शौर्य आणि त्याग सिद्ध झाला आहे. या जमातीची माहिती मिळविताना आपल्या लक्षात येईल की, अमेरिकेतील या मूळ महिला आता अधिकाधिक संख्येत, स्वत:ला त्यांच्या मूळ परंपरांशी जोडून घेत आहेत आणि त्यांची स्वत:ची संस्कृती पुन्हा स्थापन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावीत आहेत. याचे प्रत्यंतर गेल्या वर्षी (2017) डाकोटा राज्यात ‘स्टॅण्डिंग रॉक’ येथील निदर्शनाच्या वेळी आले. या निदर्शनात अमेरिकेच्या बर्याच राज्यांतून हजारो मूलनिवासी एकत्र आले होते.
एसडी यंगवोल्फ यांचे हे प्रतिपादन वाचताना आपल्या लक्षात येईल की, आयरोक्विस आणि भारतीय परंपरांमध्ये विलक्षण साम्य आहे. अमेरिकेतील मूलनिवासींना युरोपीय लोकांनी ‘इंडियन्स’ म्हटले ते अगदीच निरर्थक नव्हते तर!
एसडी यंगवोल्फ यांनी आयसीसीएसच्या मुंबईतील परिषदेत आपल्या जमातीची तसेच तिच्या वैशिष्ट्यांची माहिती देणारे भाषण दिले होते. त्यातील काही महत्त्वाचे अंश देत आहे.
21 ऑक्टोबर 1988 ला अमेरिकेच्या सिनेटमध्ये ‘एक स्वतंत्र देश म्हणून युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिकेच्या निर्मितीत, विकासत आणि संविधान तयार करण्यात आयरोक्विस कॉन्फडेरसीच्या योगदानाला अधोरेखित करणारा’ एक प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच अमेरिकेच्या अधिकृत इंडियन (नेटिव्ह अमेरिकन इंडियन) धोरणाची आधारशिला असलेल्या दोन सरकारांमधील संबंधांनाही मान्य करण्यात आले. 20 मार्च 1751ला, बेंजामिन फ्रँकलिन यांनी आयरोक्विस कॉन्फडेरसीच्या सहा देशांचे (सिक्स नेशन्स) मॉडेल लोकांसमोर ठेवले होते. त्या आधारावर मूळ 13 वसाहतींना एकत्र करून 4 जुलै 1776 रोजी युनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिका तयार करण्यात आली. अमेरिकेचे संस्थापक फ्रँकलिन यांनी नमूद केले होते की, ज्या पद्धतीने आयरोक्विस नागरिक सरकार चालवितात, तसेच त्यात ते जी बुद्धी वापरतात, याचा अभ्यास करायला हवा.
अमेरिकेच्या सिनेटने आयरोक्विसचे योगदान, तसेच अमेरिकेच्या मूलनिवासींना सन्मान फार पूर्वीच मान्य करायला हवा होता. परंतु, दुर्दैवाने तसे झाले नाही. आयरोक्विसच्या अलिखित संविधानावर अमेरिकेचे संविधान बर्याच अंशी आधारित असले, तरी त्यातील अतिशय महत्त्वाचा भाग मात्र घेण्यात आला नव्हता. जसे, अमेरिकेच्या संविधानाचा थोडा फार लोकतांत्रिक पायवा असला तरी, अधिकार मात्र केवळ श्वेत पुरुष संपत्तीमालकांनाच देण्यात आले होते. महिलांना, तसेच इतर रंगाच्या नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी अनेक वर्षे वाट बघावी लागली. या उलट, आयरोक्विस संविधानात जीवनाची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेणार्या व त्यासाठी मेहनत करणार्या महिलांना बरेच अधिकार देण्यात आले होते. परंतु, अमेरिकेच्या संस्थापकांना मात्र, समाजातील या कमकुवत महिलावर्गाला असे अधिकार देण्यात काही अर्थ वाटला नाही.
आयरोक्विस हा शब्द सहा देशांच्या कॉन्फडेरसीकडे निर्देश करतो : मोहॉक, सेनेका, ओनोंडोगा, ऑनिडा, कायुगा व टुस्कारोरा. चेरोकीदेखील आयरोक्विस देशांचाच एक भाग होता. कारण त्यांची भाषा आयरोकोइन आहे आणि त्यांच्यातील सांस्कृतिक समानता एकाच प्राचीन मूलस्थानातून आलेली आहे. तसे पाहिले तर, मूळ अमेरिकन देशांसाठी वापरण्यात येणारा आयरोक्विस हा शब्द अपमानास्पद आहे. याचा अर्थ काळा साप असा आहे. आयरोक्विस समाज मात्र ‘हाउडेनोसौनी’ या शब्दाचा वापर करणे पसंत करतात. त्याचा अर्थ आहे, ‘प्रदीर्घ सभागृहातील नागरिक.’
एक समान केंद्रीय सरकारच्या रूपात हे ‘सिक्स नेशन्स’, विविध जनजातींचे फेडरेशन म्हणून अस्तित्वात आले. हे सर्व घडवून आणणारे जे शांतिदूत होते, त्यांचे नाव आज कुणीच घेत नाहीत. परंतु, त्यांनी एकमेकांशी वैरत्व असलेल्या या सर्व जमातींना एक नागरिक म्हणून राहण्यासाठी एकत्र केले होते. या शांतिदूताच्या शिकवणीनुसार, महिलांना राजकीय तसेच धार्मिक अधिकार बर्याच प्रमाणात देण्यात आले होते. युरोपीयन लोकांच्या आक्रमणाच्या शेकडो वर्षे आधीपासून येथे लोकशाही नांदत होती. ज्या काळी युरोपमध्ये ‘स्वतंत्र व्यक्ती’ नावाची संकल्पनादेखील नव्हती, त्याकाळी या ‘सिक्स नेशन्स’चे नागरिक फार मोठ्या प्रमाणात स्वनिर्णय, स्वातंत्र्य आणि शांतता यांचे अधिकार अनुभवीत होते. हा समाज मातृसत्ताक होता आणि महिलांना नेहमीच आध्यात्मिक, धार्मिक बाबतीत प्राधान्य होते. एवढेच नव्हे, तर जमातीच्या आणि ग्रामपंचायतीच्या कारभारातही त्यांना महत्त्वाचे राजकीय अधिकार होते.
दुर्दैवाने युरोपीय संस्कृतीचा प्रभाव पडल्याने हे सर्व बदलून गेले. जमातीच्या कारभारात महिलांना अधिकार देण्यासाठी शांतिदूतांनी एक व्यवस्था निर्माण केली होती. परंपरेनुसार,जिंगोनसासी नामाभिधान असलेली महिला, महत्त्वाची मदतनीस असायची. तसेच शांततेचा संदेश ती प्रथम स्वीकारायची.जिंगोनसासी महिलांच्या अनेक कथा या समाजात प्रचलित आहेत. शांतिदूताच्या शिकवणीला ‘गायनोशगोवा’ (शांततेचा महान कायदा) या नावाने संबोधले जायचे. त्याला अमेरिकेचे खरे आध्यात्मिक पिता म्हणून समजायला हवे. अमेरिकेच्या बोधचिन्हात 13 बाण पकडून असलेला गरुड दिसतो. हे 13 बाण म्हणजे 13 वसाहतींचे प्रतीक आहेत. हे बोधचिन्ह गायनोशगोवाच्या बोधचिन्हापासून तयार करण्यात आले आहे. गायनोशगोवाच्या चिन्हात पाच बाण (नंतर सहा) पकडून असलेला तसेच पाईन वृक्षाच्या टोकावर बसलेला गरुड दाखविलेला आहे. हाउडेनोसौनीच्या परंपरेत, मुले आईचे कुळ लावतात, महिला संपत्तीच्या मालक असतात. जमीन सामूहिक असते आणि लोक तिची सामूहिक देखभाल करतात. नेत्याचे नाव प्रस्तावित करणे तसेच त्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार महिलांकडे असतात. महिला त्यांची साक्षदेखील काढू शकतात. जीवनाचा भार खांद्यावर असल्यामुळे, तसेच त्या युद्धावर जाण्याची आणि जीवन नष्ट करण्याची फार कमी शक्यता असल्यामुळे, महिलांकडे योग्य नेता निवडण्याची दृष्टी असते असे इथे मानले जाते. यांच्या पारंपरिक पुराणांनुसार, आकाशातून खाली पडलेली पहिली व्यक्ती ही महिला होती आणि ती या पृथ्वीवरील सर्व जीवनाची स्रोत मानली गेली आहे.
(क्रमश:)
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.