वसुंधरा को मिलकर स्वर्ग बनायेंगे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2018
Total Views |


“भैय्या आपकी कितनी खेती है? जमीन कितनी है?” एका अत्यंत झोपडीवजा घरात राहणाऱ्या कासोली जवळच्या वस्तीतल्या एका माणसाला आम्ही प्रश्न विचारला.



“होगी कोई चार पाच एकड!” त्याचे हे उत्तर ऐकून आम्ही गडबडलो! चार पाच एकर जमीन असलेला माणूस असा का राहतोय? मस्त शेती, जोडधंदे वगैरे का करत नाहीये? त्याच्याशी बोलताना अनेक कोडी उलगडत गेली. त्याला स्वतः चा विकास करायचा म्हणजे काय हेच माहित नाहीये. आरोग्यापासून शिक्षण आणि एकूण राहणीमानासारखी महत्त्वाची गरजसुद्धा सरकारच भागवेल अशी त्याची अपेक्षा होती!



‘बचपन बनाओ’ च्या कार्यालयात परत आल्यावर प्रणित दादाने आम्हाला ‘छत्तीसगड’ राज्याची निर्मिती, दक्षिण बस्तर भागातली भौगोलिक, सामाजिक परिस्थिती, ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी सविस्तर माहिती दिली. गरिबी, अशिक्षित – अकुशल तरुण पिढी, आरोग्याच्या विशेषतः महिला आरोग्याच्या समस्या, अंधश्रद्धा, आर्थिक शोषण आणि भ्रष्टाचार, शासकीय यंत्रणेसमोरची अगणित आव्हाने...... अशी प्रश्नांची जणू न संपणारी शेपटी दिसू लागली. निसर्गाने भरभरून दिलेल्या या समृद्ध भागातलं भयाण दारिद्र्य समोर आलं.



कधीतरी एकदा इथल्या मुलांचे विज्ञान शिबीर घ्यायला आलेल्या प्रणितला इथले प्रश्न आणि त्या प्रश्नांच्या मुळाशी असलेला ‘शिक्षणाचा’ प्रश्न महत्वाचा वाटला. ४/५ दिवसांचे विज्ञान शिबीर संपताना प्रणितने मनाशी ठरवलं की इथे येऊन राहून काम केलं पाहिजे. आयसर सारख्या शिक्षण संस्थेत चालू असलेले उच्च शिक्षण मधेच सोडून देऊन तो दंतेवाडात आला इथल्या लोकांसाठी! त्याच्याच वयाच्या युवक युवतींना सोबत घेऊन ‘विज्ञान एक्स्प्रेस’, ‘अपना स्कूल’ अशा प्रकल्पांच्या माध्यमातून स्थनिक मुलांना शिक्षण मिळावे यासाठी धडपड करतो आहे. “इसी जनम में परिवर्तन देखना है|” असा दुर्दम्य विश्वास त्याच्या बोलण्यातून दिसत होता. त्याच्या या विश्वासावर आणखी ७-८ युवक युवती घरदार सोडून इथे ३ ते ५ वर्षांसाठी आले आहेत. स्थानिक शाळांमध्ये काही अभिनव उपक्रम घडवणे, तिथल्या शिक्षकांचे आणि पालकांचे प्रशिक्षण आणि प्रबोधन करणे यासाठी ‘बचपन बनाओ’चे प्रयत्न सुरु आहेत.



या आदिवासी भागात हलबी, गोंडी, माडिया आणि छत्तीसगडी अशा चार वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. सरकारी शिक्षक प्रामुख्याने हिंदी फारफार तर छत्तीसगडी बोलणारा असतो. त्यामुळे एकाच वर्गात हलबी आणि गोंडी भाषेची मुले असतील तर सगळा आनंदी आनंद असतो! काय शिकवणार आणि कसा शिकवणार ? पण या बाहेरून आलेल्या प्रणितने हलबी, गोंडी भाषा स्वतः शिकायचा खटाटोप केला, दोन्ही भाषेतले शब्दकोश तयार करण्याचा खटाटोप चालू आहे. मुलांना आणि शिक्षकांना ‘संवाद’ करण्याचे माध्यम या सगळ्यातून मिळेल.



भाषेचा अडसर हा शिकण्याच्या प्रक्रियेतला केवढा मोठा अडसर असे मला वाटेपर्यंत त्यापेक्षा मोठा अडसर तिथे ऐकायला मिळाला. अनेक गावांमध्ये शाळा होत्या, शिक्षक होते, तास होत होते, मुले पास होत होती पण केवळ कागदोपत्री! मग प्रत्यक्षात काही होत होते की नाही? तर एक गोष्ट मात्र नीट होत होती ती म्हणजे शिक्षकांचे पगार व्यवस्थित ‘सरकारी स्केल’ प्रमाणे होत होते!


गेल्या ४ वर्षात १२७ गावांमधल्या घरोघरी आणि ग्राम पंचायतीत जाऊन पालकांचे आणि पंचायत सदस्यांचे प्रबोधन या युवकांनी केले, आज त्यातल्या सुमारे १०० गावांमध्ये कागदोपत्री असलेली शाळा प्रत्यक्षात सुरु झाली आहे.


नक्षलवादी आणि पोलीस यंत्रणा यात २००० सालापासून चकमकी सुरु आहेत. आत जंगलात पोलिसांना लपून राहायला आणि मुक्कामाला हक्काची जागा म्हणजे सरकारी शाळा! या नक्षलवाद्यांनी या परिसरातील लपण्याच्या सर्व हक्काच्या जागा रात्रीच्या वेळी बॉम्बस्फोट घडवून मोकळ्या केल्या, त्यामुळे २००० नंतर सुमारे पुढच्या १० वर्षात तिथल्या सगळ्या शाळा जमीनदोस्त झाल्या होत्या. यावर सरकारने ‘पोटा केबिन स्कूल’ म्हणजे पोर्टेबल शाळा सुरु केल्या. या निवासी शाळांमध्ये सुमारे ३०० ते ५०० मुले निवासी असतात. मुला मुलींसाठी वेगवेगळ्या ‘पोटा केबिन स्कूल्सची व्यवस्था सरकारने केली आहे. या शाळांमध्ये शिक्षण चालू आहे, ही शिक्षणाची प्रक्रिया अधिक आनंददायक आणि अधिक उपयुक्त होण्यासाठीही ‘बचपन’ ची टीम काम करते आहे.


सरकारी यंत्रणाही ‘येती, शिकती आणि टिकती’ यासाठी चांगले काम करीत आहे. राज्य सरकारकडून चालविलेल्या निवासी शाळांना तिथे ‘पोटा केबिन स्कूल’ म्हणजे पोर्टेबल शाळा म्हटले जाते. ही पोर्टेबल शाळा म्हणजे काय भानगड आहे ते बघायची आम्हाला जाम उत्सुकता होती. अर्थांतच आमचा एक मुक्काम ‘पोटा केबिन’ मध्ये होता...


बांबूपासून बनविलेल्या ‘पोटा केबिन स्कूल’ ला आमची भेट योजली होती. प्रणित भैय्या परिसरातील अनेक पोटा केबिन्समध्ये ‘पेहचान’वाला होता. त्यामुळे प्रणितने आमची तीन वेगवेगळ्या पोटा केबिन स्कूल्सच्या भेटीची योजना केली होती.

 
२००८ साली मा. सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना शाळेत कुठल्याही परिस्थितीत न जाण्याचे आदेश दिलेत म्हणूनही आणि ही आदिवासी मुले मुक्कामी असल्यामुळेही या शाळा आता तशा सुरक्षित आहेत.



“अंदरवाले भी अब स्कूल मी नही जाते और पुलिसभी !” तिथल्या एकाने सांगितले. ‘अंदरवाले म्हणजे’ हा आमच्या चेहऱ्यावरचा प्रश्न लक्षात येऊन त्यानेच आम्हाला ही अंदर की बात सांगितली. “यहां अंदरवाला मतलब ‘वो’ जिसको आप नक्सली बोलते हो! माने जो जंगलके अंदर रहता है वो!”



“मतलब अभी हम जिस स्कूल मे जा रहे है क्या वहा अंदरवाले नही आयेंगे?” आमच्यातल्या एकाला ‘त्या अंदरवाल्यांना ’ बघायचंच होतं. पण “नही नही इतना कुछ खतरा नही है वहां, वहां वो नही आयेंगे!” असं स्थानिकाकडून ऐकल्यावर अंदरवाले नाही येणार म्हणून आमच्यातला विचारणारा जरा नाराज झाला आणि मला मनातून बरं वाटलं.


आम्ही पुण्यातून जाणार म्हणजे ‘या आदिवासी मुलांना काहीतरी शिकवून येऊ’ असा विचार मनात होता. त्याप्रमाणे दुर्बीण आणि काही साहित्य बरोबर आणले होते. शिवाय सकाळी सकाळी यांचे गट करून थोडे खेळ आणि व्यायाम घेऊ, व्यायामाचे महत्त्व वगैरे सांगू असेही आमचे नियोजन होते. मुलींचा एक गट आणि २ ताई असा एक गट एकीकडे तर मुलांचा एक गट कासोलीला, आणि दुसरा गट गुमडाला! अशा तीन गटात आम्ही जायचे ठरवले. त्यातल्या गुमडा गटाबरोबर कोणीच दादा नव्हता. त्यांच्या गटात ९ वीतली ‘नेते’ मंडळी असल्याने तशी काही गरज वाटली नाही. कासोली या पोटा केबिन स्कूलमध्ये मी आणि माझ्यासोबत ५ जण असे गेलो.


संध्याकाळी आम्ही तिथे पोहचलो तेंव्हा खेळाची वेळ झाली होती. त्या निवासी शाळेत सुमारे ३०० मुले होती. आम्ही ८ वी च्या आणि ९ वी च्या मुलांशी खेळलो. मैदानात उतरल्यामुळे ती सारी आमच्याशी बोलायला लागली. त्यांच्यातली काही बराच वेळ आमचा अंदाज घेत होती. साधारण ५ वाजता एक शिट्टी वाजली. ३०० विद्यार्थी त्या एका शिट्टीवर खेळ थांबवून हात पाय धुवून, कपडे बदलून आली. या मुलांची शिस्त आणि त्यांनी परिसरात राखलेली स्वच्छता आश्चर्यचकित करणारी होती. त्यानंतर एकदाही ३०० मुलांना ‘ए गप्प बसा, लक्ष इकडे द्या, आपल्याकडे पाहुणे आलेत नीट वागा, रांगेत जा, अमुक करा’ अशा सूचना देताना आम्ही ऐकल्या नाहीत. केवळ एका शिट्टीवर ही मुलं नेमून दिलेली कामं करीत होती. या ३०० मुलांसोबत ‘रेक्टर्स’ किती असावेत? शिस्त लावायला आणि पोरं सांभाळायला किमान २० जण असावेत असा माझा अंदाज होता. तिथे सगळे मिळून ४ जण होते!


रात्री दुर्बीण काढली तेंव्हा एरवी आमच्यापासून दूर पळणारी सगळी मुलं आमच्याभोवती - खरंतर दुर्बिणीभोवती - गोळा झाली. त्या दुर्बिणीतून आम्ही त्यांना दूरवरच्या भविष्यातलं काही दाखवू शकू अस वाटत होत की काय कुणास ठाऊक! पण दंतेवाडाच्या त्या पोटा केबिन्समध्ये अंधारात उभं राहून तिथल्या ‘उद्या’सोबत दूरवरचे लकाकणारे तारे बघताना मन भरून आलं.


आमच्या पोरांना मी कंपल्सरी झोपायला लावलं कारण दुसऱ्या दिवशी तिथल्या मुलांचा पहाटे व्यायाम घ्यायचा होता. त्यांना आरोग्य, व्यायाम, लवकर उठण्याच महत्त्व वगेरे सांगायचं होतं. रात्री आडवा होण्यापूर्वी माझ्या खोलीतल्या पोटा केबिनच्या एका विद्यार्थ्याला त्यांचा दिनक्रम विचारला. उद्या किती वाजता उठणार? मग काय वेळापत्रक असते वगैरे चौकशी केली.


“सर, रोज ४.३० को रेडी हो जाते है! और फिर दौड लगाकर वापस आते है! सर, आप सब चलो न हमारे साथ बहोत मजा आयेगा...”


“कितना दौडते हो रोज?” मी पहाटे ४.३० ला ‘रेडी’ होण्याच्या कल्पनेनेच गार झालो होतो! त्यात हा दौड लगाने जाणार आणि मलाही घेऊन जायचं म्हणतोय!


“रोज तो ५ किलोमीटर कमसे कम दौडते है सब !” आता मात्र मी खरच ‘आडवा’ झालो.


सकाळी त्या मुलांनी ३.३० वाजता आम्हा सर्वाना उठवलं, आम्हला सुमारे ३ किलोमीटर पळवल आणि सुमारे २ किलोमीटर चालवलं! चालत परत येताना तिथल्या उंचच उंच झाडांशी, विविध आवाजाच्या पक्ष्यांशी, तिथल्या मातीशी ही मुलं नातं सांगत होती. मधेच एखाद्या झाडाजवळ थांबून त्या झाडाबद्दल काहीतरी सांगायची. कसलातरी आवाज काढून तिथल्या पक्ष्यांना बोलतं करायची. त्यांच्याशी गप्पा मारत, जंगलातली निसर्गाची अनेक आश्चर्य पहात आणि ऐकत आम्ही परत पोटा केबिनमध्ये आलो.


आम्ही व्यायाम आणि आरोग्य असे काही ‘शिकवू’ असे म्हणत होतो पण आमच्यापेक्षा कितीतरी सुदृढ शरीर आणि मन असलेली ही मंडळी अस काही ‘शिकवण्याचा’ अविर्भाव न आणताच आम्हाला बरच काही शिकवून गेली.



सकाळच्या प्रार्थनेला छान आवरून सारी मुलं रांगांमध्ये उभी राहिली.



“तुम मुझको विश्वास दो, मै तुमको विश्वास दूं,
शंकाओंके सागर हम लांघ जायेंगे
वसुंधराको मिलकर स्वर्ग बनायेंगे|”


त्यांच्या प्रार्थनेतला प्रामाणिकपणा आणि आर्तता अतिशय मनाला भिडणारी होती. एकएक शब्द कानावर जिवंत होऊन ऐकू येत होता. या खडतर भविष्य असणाऱ्या मुलांचा वसुंधरेला स्वर्ग बनविण्याचा संकल्प माझ्या मनाला खूप प्रेरणा देणारा, उर्जा देणारा ठरला. मुलांच्या डोळ्यातला विश्वास आणि स्वप्न यांना या प्रार्थनेतल्या शब्दसुरांनी जणू ताकद मिळत होती.


त्या मुलांशी आदल्या दिवशीच्या संध्याकाळच्या खेळापासून ते प्रार्थना होईपर्यंत छान गट्टी जमली होती. न्याहारी झाली, सकाळी खूप छान गप्पा झाल्या. निघताना दोघे तिघे आम्हाला काहीतरी सांगू पाहतायत असं वाटलं म्हणून मी जवळ जाऊन मुद्दाम विचारल. तसा एकजण धीर करून म्हणाला, “भैय्या आज के दिन रुको ना !”


मला काय बोलावे कळेना. खरंच आमचा कोणाचाही पाय निघत नव्हता पण मी आधी माझ्या मनाची आणि मग त्याची समजूत काढली. आपण पुन्हा भेटूच अस काहीतरी म्हणालो. “कब मिलेंगे? कहां मिलेंगे?” या प्रश्नांना माझ्याकडे उत्तर नसल्याने मी काहीतरी करण्याच्या बहाण्याने तिथून निघालो.

एकीकडे मला वेध लागले होते ते आमच्या दुसऱ्या गटाचे, त्या गटासोबत कुणी दादा नव्हता. रात्री काही झालं नसेल ना? ती मुलं सुरक्षित असतील ना? असे अनेक प्रश्न नि कसकसल्या शंका मनात येत होत्या. थोडा प्रवास करून भेटलो आणि मग तो गट समोर आला. त्यातला एकजण अक्षरशः गळ्यातच पडला. मला समजेना काय झालं? मी पटकन मुलं मोजली, सगळी होती आणि कुणाला काही झाल नव्हतं! मग हा का अस्वस्थ झालाय ते कळेना. हळूहळू मुलांनी तिथली ‘गंमत’ सांगितली!


आदल्या रात्री त्या गटाच्या ठिकाणी ‘अंदरवाले’ आले होते. त्यांनी पोटा केबिनच्या बाहेर गोळीबार केला. आमच्या मुलांना त्याचा आवाज ऐकून भीती वाटली. त्यांनी तिथल्या एका सरांना उठवलं. त्या सरांनी अगदीच ‘कॅज्युअली’ “हां हां, ठीक है, सो जाव !” अशी प्रतिक्रिया दिली. आमच्या पोरांनी रात्र जागून काढली. सकाळी काय झाल म्हणून सरांना विचारलं तर ते सांगत होते “अरे वो कुछ नही वो गाव मैं आय था, बस २ लोग ही मर गये !”



रात्रीच्या गोळीबाराच्या आवाजापेक्षा ही थंड प्रतिक्रिया जास्त भीतीदायक आणि वेदना देणारी होती. आमच्या मुलांना या थंड प्रतिक्रियेचा जास्त त्रास झाला होता. मुलं मला पुन्हा पुन्हा विचारत होती “दादा यांना काहीच का वाटत नाहीये.”



“रोज मरे को मरने का डर नही लगता” हा हिंदी पिक्चरला साजेसा ‘डायलॉग’ होता. पण तिथल्या एका स्थानिक मित्राने त्याची कहाणी सांगितली. ती सगळी कहाणी ‘बाहेर’ न सांगण्याच्या अटीवर आम्ही ऐकली होती. यानिमित्ताने त्या प्रसंगातील पात्रे, घटना यापेक्षा मला ती संवेदना सर्वांशी शेअर करणं उचित वाटतं. दुर्गम भाग, शिक्षण नसल्याने आलेले मागासलेपण या मागासलेपणामुळे आर्थिक, सामाजिक शोषण त्यातून आलेलं अठरा विश्व दारिद्र्य, दारिद्र्यामुळे आलेली अगतिकता, अगतिकतेतून झालेले कायद्याला धरून नसलेले वर्तन, त्यामुळे कुटुंबावर उभा राहिलेला संकटाचा पहाड आणि त्यातून निर्माण झालेली अगतिकता असं न संपणारं चक्र फिरतंय असं मला वाटत राहिलं....



- आदित्य शिंदे 
@@AUTHORINFO_V1@@