कळवण शहराच्या विकासासाठी दोन कोटींचा निधी प्राप्त : नगराध्यक्षा सुनीता पगार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2018
Total Views |

कळवणकरांनी केले निधीचे स्वागत

 
 
 
 
 
नाशिक : राज्यात नव्यानेच स्थापन झालेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरविणे सुलभ व्हावे, म्हणून सहाव्या योजने अंतर्गत दोन कोटी रुपयांचा निधी देण्याचा मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला आहे. त्यानुसार कळवण नगरपंचायतीला दोन कोटी रुपये विशेष अनुदान प्राप्त झाल्याची माहिती कळवण शहराच्या लोकप्रिय नगराध्यक्षा सुनीता पगार यांनी दिली.
 
शासनाने कळवण नगरपंचायत अस्तित्वात आणल्यानंतर सार्वजनिक विकासकामे व नागरी सुविधा जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी विकासाचे दरवाजे आपोआप खुले झाले आहेत. त्यामुळे कळवण शहराची नागरीकरणाकडे वाटचाल होताना दिसत असल्याचे नगराध्यक्षा सुनीता पगार यांनी सांगितले. कळवण गावाचे गावपण कायम ठेऊन गावपण हरवणार नाही, याची खबरदारी घेऊनच गेल्या दोन वर्षांत कळवण शहरात जिल्हा पालकमंत्री ना. गिरीश महाजन, आ. डॉ. राहुल आहेर, जि.प. सदस्य नितीन पवार आदींच्या मार्गदर्शनाखाली विविध विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत तर कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.
 
कळवण नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना, भाजप आदी पक्षांचे सदस्य असून सार्वजनिक विकासकामांसाठी आम्ही एकत्र असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. विकासकामांचा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात येऊन महत्त्वाकांक्षी विकास आराखड्याला दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कौशल्य पणास लावून स्वच्छ, सुंदर आणि निसर्गरम्य कळवण शहर बनविण्याचे आपले स्वप्न आहे, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
 
नवीन नगरपंचायतींना शासनाकडून विशेष निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, आ. डॉ. राहुल (दादा) आहेर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा नाना आहेर, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, नगर पंचायत गटनेते कौतिक (महाराज) पगार यांच्या नेतृत्वाखाली शिष्ट मंडळाने नाशिक जिल्ह्यातील कळवण, देवळा या नगरपंचायतींना विशेष निधी मिळावा, म्हणून मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन साकडे घातले होते. कळवण-देवळा नगरपंचायतींना प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा निधी त्यामुळेच प्राप्त झाला आहे. कळवण शहरातील उर्वरित विकासकामे पूर्ण करण्यात येणार आहेत. शहर विकासाचे नियोजन करून कृती आराखडा व प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारचा निधी मिळविण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू असल्याचे पगार यांनी सांगितले.
 
या प्रसंगी उपनगराध्यक्ष व शिवसेना नेते साहेबराव पगार, जयेश पगार, अतुल पगार, भाग्यश्री पगार, रंजना पगार, अनुराधा पगार, बाळासाहेब जाधव, रोहीणी महाले, मयुर बहिरम, अनिता जैन, अनिता महाजन, सुरेखा जगताप, दिलीप मोरे, रंजना जगताप आदी उपस्थित होते. कळवणकरांनी नागरी सुविधांसाठी शासनाने दिलेल्या दोन कोटी निधीचे स्वागत केले असून भाजप - शिवसेना युती सरकारचे अभिनंदन केले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@