विकास कामे घेऊन जनतेसमोर जा; कामाला लागा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2018
Total Views |

 

आ.एकनाथराव खडसेंचे कार्यकर्त्यांना आवाहन


 
मुक्ताईनगर :
शहरात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाली. त्यासोबतच आमदार आणि खासदार निधीतूनही मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत. पुढेही विकास कामे होणारच आहेत. नगरपंचायत निवडणूक प्रथमच होत आहे. हीच विकास कामे घेऊन कार्यकर्त्यांनी जनतसमोर जावे. कामाला लागावे, असे आवाहन माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी केले.
 
 
येथील जे.ई. स्कूलमध्ये १८ रोजी भाजपा कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार रक्षाताई खडसे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ऍड. रोहिणीताई खडसे-खेवलकर, जिल्हा सरचिटणीस प्रा.डॉ. सुनील नेवे, अमीर साहेब, तालुका अध्यक्ष दशरथ कांडेलकर, स्वीय सहाय्यक योगेश कोलते, विलास धायडे, राजू माळी, जि.प. सदस्य जयपाल बोदडे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शकील खाटीक, सरचिटणीस सतीश चौधरी, शहर अध्यक्ष मनोज तळेले, योगेश कोलते, मोहम्मद हुसेन खान, माजी सरपंच ललित महाजन आदी उपस्थित होते.
 
 
आमदार खडसे पुढे म्हणाले की, मुक्ताईनगरसाठी कोट्यवधींचा निधी आणून विकास कामे करण्याची हिंमत फक्त आपल्यातच आहे. शहरासाठी ५० कोटी रुपयांचा निधी नुकताच मिळाला. तसेच या आठवड्यात पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. आता १९ कोटी रुपये निधी मिळणार आहे. शहरात सर्वच ठिकाणी सिमेंट कॉंक्रिटचे रस्ते तयार करण्याचे काम सुरू आहे. पुढील काळात विविध समाजासाठी मंगल कार्यालय करणे प्रस्तावित आहे. अल्पसंख्याकांसाठी ७० लाख रुपयांचा निधी विकास कामांसाठी मिळाला आहे. दरम्यान, शहरातील अडीच हजार अतिक्रमण धारकांना नगरपंचायत प्रशासनाकडून नोटिसा मिळाल्या आहेत. त्यांना नियमाप्रमाणे रक्कम भरून कायम करण्यासाठी मदत करू, असेही आश्‍वासन याप्रसंगी आमदार खडसेंनी दिले.
 

२३ मार्चपासून प्रभागनिहाय बैठक - या बैठकीत जिल्हा सरचिटणीस प्रा. सुनील नेवे आणि आमदार एकनाथराव खडसे यांनी प्रभाग क्रमांक १ ते १७ मधील कार्यकर्त्यांकडून तेथील राजकीय परिस्थिती, ग्रा.पं. तसेच भाजपाकडून झालेली कामे, करावयाची कामे, याचा आढावा घेतला. जयपाल बोदडे, सुनील श्रीखंडे, पवन खुरपडे, आरिफ आझाद, जाफर खान, मनोज तळेले, योगेश कोलते, जितेंद्र पाटील, सचिन पाटील, शकील खाटीक आदींनी चर्चेत भाग घेवून मते मांडली. प्रमुख पदाधिकारी व नेत्यांच्या उपस्थितीत २३ मार्चपासून प्रभागनिहाय बैठकीचे भाजपाने नियोजन केले आहे, असे शहराध्यक्ष मनोज तळेले यांनी बैठकीत जाहीर केले.

@@AUTHORINFO_V1@@