मुस्लिम समाज भाजपशी संवादातून जोडला जाईल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2018
Total Views |

विनोद तावडे यांचे प्रतिपादन
अल्पसंख्याक संवाद यात्रेचे प्रदेश भाजपतर्फे स्वागत
 

 
 
मुंबई : राज्याच्या प्रत्येक भागात अल्पसंख्याक समाजाशी संवाद साधून केंद्र व राज्य सरकारने त्यांच्यासाठी तयार केलेल्या योजना पोहचवण्याचे काम भाजपच्या अल्पसंख्य मोर्चाचे आहे. अशा संवादातून देशातील मुस्लिम भारतीय जनता पक्षाशी जोडला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री विनोद तावडे यांनी केले.
 
भाजपा प्रदेश अल्पसंख्य मोर्चातर्फे राज्यातील अल्पसंख्य समाजाशी संवाद साधून त्यांना केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या संवाद यात्रेचे स्वागत करण्यासाठी प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात विनोद तावडे बोलत होते. यावेळी भाजप अल्पसंख्य मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष जमाल सिद्दीकी, सरचिटणीस मोहंमद सिकंदर शेख व एजाज देशमुख, मोर्चाच्या महिला प्रमुख रिदा रशिद, प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी व प्रवक्त्या श्वेता शालिनी, प्रदेश कोषाध्यक्ष शायना एन. सी. आदी उपस्थित होते.
 
विनोद तावडे यावेळी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने अल्पसंख्य समाजासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. राज्याच्या प्रत्येक भागात अल्पसंख्य समाजाशी संवाद साधून सरकारने त्यांच्यासाठी तयार केलेल्या योजना पोहचवण्याचे काम भाजपच्या अल्पसंख्य मोर्चाचे आहे. अशा संवादातूनच देशातील मुस्लिम समाज भाजपाशी जोडला जाईल, असे प्रतिपादन त्यांनी केले. भाजपविषयी अल्पसंख्य समाजामध्ये गैरसमज पसरवणाऱ्या विरोधी पक्षांना या संवाद यात्रेने चोख उत्तर दिले असल्याचेही विनोद तावडे यांनी यावेळी सांगितले.
 
अल्पसंख्य मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष जमाल सिद्दिकी म्हणाले की, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लिम समाजाला 'वोटबँक'सारखे वापरले व त्यासाठी मुस्लिम समाजात भाजपबद्दल विषारी प्रचार केला. हा प्रचार दूर करण्याचे काम भाजप अल्पसंख्य मोर्चाचे आहे. त्यासाठी संवाद साधावा लागेल. मुस्लिम समाजाला भाजपच्या जवळ आणण्याचे काम आपल्याला करायचे आहे, असे जमाल सिद्दीकी यांनी यावेळी सांगितले.
 
भाजपची 'अल्पसंख्य संवाद यात्रा'
 
औरंगाबाद येथे दि. ४ मार्च रोजी सुरू झालेली ही यात्रा सोमवारी मुंबईत पोहोचली. जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व मुंबई अशा विविध ठिकाणी यात्रेचे अल्पसंख्य समाजाकडून स्वागत करण्यात आले. आता ही यात्रा ठाणे, मालेगाव, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारामार्गे जाणार असून नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी तसेच केंद्रीय अल्पसंख्य विकासमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या उपस्थितीत यात्रेचा समारोप होणार आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@