आजपासून मार्केट बेमुदत बंद, गाळेधारकांचा महामोर्चा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2018
Total Views |
 

भाडे आकारणी, लिलावप्रक्रियेत अन्याय होत असल्याचा दावा


 
जळगाव :
गाळेधारकांना अवाजवी भाडे व दंडाची आकारणी, दुकानांच्या लिलावासाठी ई-लिलावाची अन्यायकारक अंमलबजावणी होत असल्याच्या निषेधार्थ मनपाच्या २० मार्केटमधील २ हजार ८१८ गाळेधारक मंगळवार, २० मार्चपासून बेमुदत बंद पाळणार आहेत. याच दिवशी ते महामोर्चा काढणार आहेत.
 
 
महापालिकेच्या १८ मार्केटमधील भाडेकराराची मुदत संपलेल्या गाळ्यांचा लिलाव होऊ घातला आहे. पण ही प्रक्रिया गाळेधारकांवर अन्याय करणारी असल्याने त्याला गाळेधारक विरोध करीत आहेत. यासंदर्भात कोअर कमिटी गठित करण्यात आली असून, यात अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव युवराज वाघ, समन्वयक रमेश मताणी, हिरानंद मंधवाणी यांचा समावेश आहे. महापालिकेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आणि आता कोणताच मार्ग शिल्लक नसल्याचा दावा करीत गाळेधारकांनी लिलावाच्या प्रक्रियेविरोधात प्रखर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रसंगी लिलाव होऊ द्यायचे नाही या निर्णयाप्रत ते आले आहेत. आंदोलनात बेमुदत व्यवसाय बंद, मोर्चा, धरणे, मानवी साखळी आणि आमरण उपोषण अशा विविध टप्प्यांचा समावेश आहे.
 
 
मंगळवार, २० रोजीपासून गाळेधारक बेमुदत बंद पाळणार आहेत. याच दिवशी सकाळी १० वाजता शास्त्री टॉवरपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ते महामोर्चा काढणार आहेत. याचा मार्ग नेहरू चौक, गोविंदा रिक्षा स्टॉप, नवीन बस स्टॅण्ड, स्वातंत्र्य चौक असा राहणार असून, या आंदोलनात गाळेधारक व त्यांचे कुटुंबीय, तसेच जिल्ह्यातील इतर प्रमुख संघटनाही सहभागी होणार आहेत. या सर्वांची संख्या पाच हजार किंवा त्यापेक्षा अधिक राहील यासाठी आयोजक जोरदार प्रयत्न करीत आहेत. वेगवेगळ्या संघटनांकडून पाठिंबा मिळत असल्याची माहिती गाळाधारक तेजस देपुरा यांनी दिली.
 
 
दरम्यान, गाळ्यांची लिलाव करून कर्मचार्‍यांचे एक महिन्याचे थकीत वेतन व चार महागाई भत्त्याची फरकाची रक्कम व इतर देणी न दिल्यास आंदोलनाचा इशारा सफाई मजदूर संघातर्फे देण्यात आला आहे तर गाळेधारकांना विश्‍वास घेऊन तोडगा काढण्याची मागणी जितेंद्र जैन यांनी केली आहे.
 

गाळे सकाळी १० वाजेपासून बंद - महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीज या संघटनेने गाळेधारकांच्या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. गाळेधारकांच्या प्रश्‍नावर सहानुभूतीपूर्वक तोडगा काढावा. मनपाचेही आर्थिक नुकसान होऊ नये, असा सुवर्णमध्य यात असावा, अशी संघटनेची भूमिका असल्याचे गव्हर्निंग कौन्सिल मेंबर पुरुषोत्तम टावरी यांनी सांगितले. शासनाने रोजगार देणार्‍यांना बेरोजगार करू नये, असे आवाहन त्यांनी केले. तसेच जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे सदस्य आंदोलनाच्या सर्वच टप्प्यात सहभागी होणार असून, मंगळवारी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ते आपली दुकाने बंद ठेवणार असल्याचेही टावरी यांनी सांगितले

 
आ. भोळे यांच्याकडून गाळ्यांचा मुद्दा विधानसभेत
आंदोलनामुळे बिघडू शकते कायदा-सुव्यवस्था
मुख्यमंत्री व नगरविकासमंत्री यांना तोडग्याची विनंती
 
महापालिकेकडून होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात गाळेधारकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मंगळवारपासून ते बेमुदत बंद पाळणार आहेत. तसेच महामोर्चाही काढणार आहेत. यामुळे गाळेधारकांवर उपसमारीची वेळ येईल, शहरातील नागरिकांची गैरसोय होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकत असल्याचा मुद्दा आ. सुरेश भोळे यांनी विधानसभेत उपस्थित करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
 
 
गाळेधारकांच्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन आ. सुरेश भोळे यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन अंतर्गत सोमवार, १९ मार्च रोजी विधीमंडळ अध्यक्षांच्या माध्यमातून मुख्यमंत्री व नगरविकासमंत्री यांना विनंती केली आहे की, ‘जळगाव शहरातील गाळेधारकांच्या आंदोलनाने कायदा-सुव्यवस्था बिघडू नये आणि गाळेधारकांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा. तसेच गाळेधारकांच्या येणार्‍या रकमेतून मनपाचे हुडको कर्ज अदा होऊ शकते. यासाठी जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त, संबंधित अधिकारी व गाळेधारकांचे प्रतिनिधी यांच्यासोबत तातडीची बैठक घेण्यात यावी.’ विधीमंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी उत्तर देतांना प्रशासनाने यात लक्ष घालण्यासाठी आदेश दिले.
 
@@AUTHORINFO_V1@@