|| भासाची रामकथा ||

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2018   
Total Views |


१ ल्या शतकातील कुशाण राजा कनिष्कचा भग्न पुतळा. मथुरा येथील देवकुलातील कुशाण वंशीय राजांच्या पुतळ्यातील एक. अशाच प्रकारचे सातवाहन वंशातील राजांचे पुतळे नाणेघाटातील गुहेत होते.

भास नावाचा एक मोठा नाटकर होऊन गेला असे कालिदासाने लिहून ठेवले आणि पंचाईत झाली. या कवीचे एकही नाटक मिळत नव्हते. नाटक जाऊ दे, नाटकाचा एखादा अंक तरी मिळावा, तर तेही नाही. इकडे तिकडे कोणी उद्घृत केलेले काही श्लोक होते हाताशी. पण तेवढ्या भांडवलावर अख्खा कवी कसा काय उभा करायचा? याला आभास म्हणावे तर, कालिदास खोटं लिहिणार नाही. कोण होता हा नाटककार? कुठला? कधी होऊन गेला? त्याने कोणती नाटके लिहिली? त्याच्या नाटकांचे काय झाले? शेकडो वर्ष गेली तरी हा प्रश्न काही सुटत नव्हता. गणितातील न सुटणाऱ्या प्रश्नांना जसे स्वत:चे नाव असते तसे या प्रश्नाला पण स्वत:चे नाव मिळाले – भासप्रश्न.

एकीकडे १३ व्या शतकापर्यंत अनेक कवींनी भासाच्या नाटकांचा उल्लेख केला होता. तर दुसरीकडे, केरळ मध्ये – भासाच्या नाटकातील निवडक अंक, च्याकार नावाचे लोककलाकार सादर करत होते. १० व्या शतकात कुलशेखर या राजाने च्याकारांच्या नाट्यप्रयोगांना चालना दिली होती. शेकडो वर्षा त्यांनी ती परंपरा जपून उत्सवात मंदिरांमधून नाट्यप्रयोग सदर करत. त्यांच्या संहितांमध्ये कवीचे नाव लिहिले नसल्याने, ती नाटके भासाची होती याबद्दल कुणालाही कल्पना नव्हती.

१९१२ मध्ये या प्रश्नाला अचानक एक कलाटणी मिळाली ...

झाले असे की – केरळच्या टी. गणपतीशास्त्री यांना १३ नाटकांच्या हस्तलिखित संहिता मिळाल्या. मल्याळम लिपी मधून लिहिलेले, संस्कृत भाषेतील, १०५ पानी ताडपत्रे. हा खजाना ३०० वर्ष जुना होता. त्या सर्व ताडपत्रांचा अभ्यास करून, त्यामधील भाषेचा अभ्यास करून शास्त्रींच्या लक्षात आले की ही सर्व नाटके एकाच कवीची होती. यातील एक नाटक होते – स्वप्नवासवदत्त. ९ व्या शतकातील कवी राजशेखरने ते नाटक भासाचे होते असे लिहिले होते. त्या व इतर उपलब्ध माहितीवरून शास्त्रींनी ती सर्व नाटके भासाची होती हे सिद्ध केले. त्यावर त्यांनी ती सर्व नाटके प्रकाशित केली. हे कार्य इतके मोलाचे होते की, त्या कामासाठी तुबिंगेन जर्मन विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल केली, प्रिन्स ऑफ वेल्सने त्यांना सुवर्ण पदक दिले, व भारतात त्यांना ‘महामहोपाध्याय’ या पदवीने सम्मानित केले गेले!

इतके दिवस लुप्त झालेला भास आणि त्याची १३ नाटके प्रकाशात आली. आता पुढचा प्रश्न उपस्थित झाला - भास कधी होऊन गेला? कालिदासाच्या आधी होऊन गेला हे निश्चित. भासाच्या प्रतिज्ञायौगंधरायण या नाटकातील मधील एक श्लोक कौटिल्य अर्थात चाणक्यने अर्थशास्त्रात उद्घृत केला आहे. त्यामुळे भास कौटिल्यच्या आधी होऊन गेला हे कळते. भास भरताच्या नाट्य शास्त्राचे नियम पळत नाही. त्यामुळे तो भरताच्या आधी होऊन गेला हे पण मान्य केले जाते. भासाने उदयनच्या कथा लिहिल्या आहेत. उदयन इस. पूर्व ६ व्या शतकातला असल्याने भासाचा काळ त्यानंतरचा आहे हे निश्चित. भासचा काळ इस. पूर्व ४ थे शतक ते इस. १ ले शतक असा सांगितला जातो.

भासाची दोन नाटके रामायणावर आधारित आहेत – प्रतिमा नाटक व अभिषेक. प्रतिमा नाटक रामाच्या वनवासापासून राज्याभिषेकापर्यंत तर अभिषेक हे नाटक वालीवधापासून रामराज्याभिषेकापर्यंत आहे. प्रतिमा नाटकात राम वनवासात गेल्यावर अयोध्येत काय घडले यावर भर आहे. रुढार्थाने या नाटकाचा नायक राम असला तरी, या मध्ये भरत सुद्धा रामाची उंची गाठतांना दिसतो. अभिषेक नाटकात अरण्यात काय घडते यावर भर आहे.

प्रतिमा नाटकात वाल्मिकी रामायणातील मुळ प्रसंगांना बगल देऊन भासाने आपल्या कल्पनाशक्तीने रामकथेतील प्रसंग रंगवले आहेत. या नाटकात ७ अंक आहेत.

पहिल्या अंकात दशरथ रामाला राज्याभिषेक करायचे ठरवतो. त्याप्रमाणे कार्याची तयारी सुरु होते. इतक्यात मंथरा कैकयी क्रोधागारात असल्याची बातमी दशरथाला देते. त्यावर दशरथ कैकेयीची समजूत काढायला जातो, तेंव्हा कैकयी दशराथाकडे दोन वर मागते – रामाला १४ वर्ष वनवास आणि भरताला राज्य. दशरथाचा तिच्यापुढे नाईलाज होतो. रामाला बोलावणे पाठवतो. राम मात्र शांत चित्ताने वडिलांची आज्ञा पालन करण्यासाठी वनात जाण्याची तयारी करतो.

लक्ष्मणाला वनवासात जाणे पटत नाही, तो म्हणतो – हा दु:खाचा नाही तर तलवार उचलण्याचा प्रसंग आहे! राम लक्ष्मणाला शांत करून सांगतो, “मी राजा झालो काय किंवा भरत राजा झाला काय, एकच आहे.” त्यावर राम, लक्षमण व सीता वल्कले धारण करून वनवासाकडे प्रस्थान करतात.

दुसऱ्या अंकात – राम वनवासात गेल्याने एकीकडे अयोध्येतील नागरिक शोकाकुल आहेत, तर दुसरीकडे राजप्रसादात रामाच्या भेटीसाठी दशरथ तळमळत, तडफडत आहे. दशरथ कैकयीला दोष देतो. दशरथाला त्याचे पूर्वज – दिलीप, रघु व अज न्यायला आले आहेत असा भास होतो. आणि रामाचे नाव घेत दशरथ मृत्यू पावतो. नाट्यशास्त्राच्या नियमानुसार रंगमंचावर मृत्यू दाखवणे उचित नाही. पण अर्थातच हे नियम भासाच्या नंतरचे असल्याने तो त्या नियमांना बांधील नाही.

तिसऱ्या अंकात – अयोध्येतील घटनांची माहिती नसलेला, व स्वजनांच्या भेटीसाठी आतुर असलेला भरत आजोळहून परतत असतो. वाटेत अयोध्येच्या बाहेर विश्रांती करिता एका प्रतिमागृहात थांबतो. इथे रघु वंशातील राजांचे सुंदर दगडी पुतळे असतात. भरत एक एक पुतळा पाहू लागतो. तेथील पुजारी त्या त्या राजाची महती भरताला सांगतो. आपले पूर्वज दिलीप, रघु व अज यांचे गुणगान ऐकून भरताला अभिमान वाटतो. त्यांच्या प्रतिमांना नमन करून भरत पुढे येतो तर समोर दशरथाचा पुतळा दिसतो. त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. सजीव राजाची प्रतिमा करत नाहीत! दशरथाच्या मृत्यूची वार्ता त्याला पुजाऱ्याकडून कळते. त्या धक्क्याने भरत मूर्च्छा येऊन कोसळतो. शुद्धीवर आल्यावर त्याला पुजाऱ्याकडून कैकयीचे वर, रामाचा वनवास व पुत्रवियोगाने झालेला दशरथाचा मृत्यू कळतो. शोक ओसरल्यावर, त्याला अयोध्येची निराधार अवस्था लक्षात येते. कैकयी विषयी संताप होतो.

इतक्यात सुमंत्र तीनही मातांना घेऊन प्रतीमागृहात येतो. तेंव्हा भरत कैकयीचा धिक्कार करतो. कैकयी त्याला म्हणते, “मला विवाहशुल्कात मिळालेले राज्य माझ्या पुत्राला देण्यास सांगितले इतकेच. वेळ आली की तुला सविस्तर सांगेन.”

आपल्यासाठी आपल्या आईने रामाला वनात धाडले या विचाराने भारताच्या मनातील अपराधीपणा, आईबद्दल तिटकारा, पितृछत्र हरवल्याचे दु:ख, आणि रामावरचे गाढ प्रेम अशा भावनांमध्ये चिंब भिजलेला भरत थेट रामाला परत आणायला निघतो!

चौथ्या अंकात – भरत रामाला शोधत वनात येतो. राम व भरताची भेट होते. राम परत येण्यास नकार देतो. भरत सिंहासनावर बसण्यास नकार देतो. शेवटी, १४ वर्ष राज्य करायचे काबुल करून, भरत रामाच्या पादुका घेऊन अयोध्येला परत जातो.

पाचवा अंक – दर वर्षी प्रमाणे राम दशरथाचे श्राद्ध करतो. यावेळी पौरोहित्य करायला रावण वेष बदलून येतो. दशरथाच्या आवडीचे सुवर्ण मृग आणायला राम वनात जातो. इकडे रावण सीतेला पळवून नेतो.

सहावा अंक – भरताला सीतेचे अपहरण झाल्याची बातमी मिळते. यावेळी पुनश्च संतापून भरत कैकयीची निर्भत्सना करतो. कैकयी भरताला दशरथाला पूर्वी मिळालेल्या शापाची कथा सांगते. पुढे म्हणते, “दशरथाचा मृत्यू जवळ आला होता. जर पुत्र दूर गेल्याने त्याला पुत्रवियोग झाला नसता, तर पुत्राच्या अकाली मृत्यूमुळे त्याला पुत्रवियोग झाला असता. प्रिय रामाला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून मी त्याला वनात पाठवले. मला खरेतर १४ दिवसच म्हणायचे होते, पण चुकून वर्ष म्हणून गेले. वशिष्ठ मुनींशी चर्चा करून मी हा निर्णय घेतला होता!” हे ऐकल्यावर भरत कैकयीला क्षमा करतो. इतकी वर्ष भरताने केलेल्या रागाला, कैकयी क्षमा करते.

लवकरच भरताला रामाने सुग्रीवाशी मैत्री केली व त्याने वालीचा वध केल्याची बातमी पण मिळते. रावणाशी युद्ध करण्यासाठी भरत सैन्याची जमवा जमव करतो.

अंक सात – रावण वध करून, राम सीतेला सोडवतो. राम, लक्षमण व सीता पुष्पक विमानातून जनस्थानात परत येतात. इथे त्यांची भेट भरत व त्याच्या सैन्याशी होते. भरत अत्यंत आनंदाने त्यांचे स्वागत करतो. रामाला राज्याभिषेक होतो. व नाटक संपते.

संदर्भ -

१. History of Indian Theatre: Classical theatre - Manohar Laxman Varadpande
२. A Critical Study of The Plays of Bhasa – Rajagopalan K.
३. रामकथा – उत्पत्ती और विकास – फादर कमिल बुल्के
४. प्रतिमा नाटकम् – मंगला मिरासदार

- दिपाली पाटवदकर 
@@AUTHORINFO_V1@@