गाळेधारकांचा अभूतपूर्व मोर्चा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2018
Total Views |

 

एकजुटीचे दर्शन, प्रशासन थक्क

 
 
जळगाव, २० मार्च :
महापालिकेच्या २० मार्केटमधील गाळेधारक, त्यांचे कुटुंबीय आणि दुकानात काम करणारे कर्मचारी यांच्या अभूतपूर्व एकजुटीचे दर्शन घडवत काढण्यात आलेल्या महा मूकमोर्चाने आज इतिहास घडवत प्रशासनाची अक्षरशः झोप उडविली. या मोर्चाने गाळेधारकांबद्दल सहानुभूतीची जशी सर्वसामान्यांमध्ये भावना दिसून आली तसेच प्रशासनाच्या निर्ढावलेपणाचा मूक धिक्कारही जाणवला.
 
 
गाळेधारकांना अवाजवी भाडे आणि दंडाची आकारणी, लिलावाची अन्यायकारक प्रक्रिया, प्रीमियमचे धोरण या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. कोअर कमिटीचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांच्या अंदानुसार, ५ ते ६ हजार जण यात सहभागी झाले होते. अत्यंत शिस्तबध्द रचना आणि पिण्याच्या पाण्यापासून ते स्टेजपर्यंत प्रत्येक बारीक-सारीक वस्तूंचे काटेकोर नियोजन कोअर कमिटीच्या वतीने करण्यात आले होते. पण काहींच्या अतिउत्साहामुळे कोर्ट चौकापासून ते नवीन बस स्टॅण्डपर्यंत यावर पाणी फिरले.
 
 
मोर्चाला सकाळी ११ वाजता टॉवर चौकापासून सुरुवात झाली. कोणत्याही घोषणा द्यायच्या नाहीत, हुल्लडबाजी व एकमेकांमध्ये चर्चा करायची नाही अशा सूचना स्वयंसेवकांकडून दिल्या जात होत्या. मोर्चेकर्‍यांच्या हातात अनेक मागण्यांचे, प्रशासनाच्या निषेधाचे फलक ठळकपणे दिसत होते. अनेकांनी काळ्या रंगाचे कपडे, टोप्या परिधान केले होते, तर काहींनी याच रंगाच्या फिती बांधल्या होत्या. मोर्चाच्या सुरुवातीला सेंट्रल फुले मार्केटमधील अपंग गाळेधारक शंकर कारडा आपल्या तीनचाकीत बसून सहभागी झाले होते. त्यांच्या मागे महिला, कोअर कमिटीचे सदस्य, लोकप्रतिनिधी आणि सर्वात शेवटी गाळेधारक अशी रचना होती. महापालिकेसमोर मोर्चा आला तेव्हा त्याचे दुसरे टोक टॉवरच्याही मागे लांबवर असल्याचे दिसत होते.
 
 
जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चाचे सभेत रुपांतर,
आ. एकनाथराव खडसे यांचा मोर्चेकर्‍यांशी मुंबईतून संवाद
नेहरू चौक, कोर्ट चौक, नवीन बसस्टॅण्ड, स्वातंत्र्य चौकमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचला. या ठिकाणी छोटी सभा झाली. माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी मोबाईलवरून संवाद साधला. आजच मुख्यमंत्र्यांकडे गाळेधारकांचा प्रश्‍न मांडणार असून, आ. भोळे यांनी देखील हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला आहे. गाळेधारकांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. गाळेधारक, शासन, मनपा अशा एकत्रित चर्चेतून मार्ग निघेल अशी अपेक्षा व्यक्त करतानाच हा प्रश्‍न सुटेपर्यंत गाळेधारकांच्या सोबत असल्याचेही आ. खडसे यांनी सांगितले.
 
 
 
गाळेधारकांनी एकजुटीचे दर्शन घडविले
- गुलाबराव देवकर, माजी पालकमंत्री
माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी गाळेधारकांनी एकजुटीचे दर्शन घडवित शासन व प्रशासनावर जो दबाव निर्माण केला त्याचे कौतुक केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस व्यापार्‍यांच्या सोबत आहे. गाळेधारकांच्या प्रश्‍नाबाबत आ. अजित पवार व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
 
पाच रुपयाची वस्तू विकणारा एक कोटीचे बिल कसे भरेल?
- युसूफ मकरा, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महामंडळ
जिल्हा व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष युसूफ मकरा यांनी पाच रुपयांची वस्तू विकणारा व्यापारी १ कोटी रुपयांचे बिल कसे भरेल? असा रोखठोक प्रश्‍न उपस्थित केला. आजी-माजी लोकप्रतिनिधींनी गाळेधारकांना मदत केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी ‘व्यापारी एकता जिंदाबाद’ची जोरदार घोषणाबाजी झाली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीज या संघटनेचे गव्हर्निंग कौन्सिल मेंबर पुरुषोत्तम टावरी यांनी २००८ च्या ठरावाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली.
 
 
मुख्यमंत्र्यांकडून आदेश मिळेपर्यंत विश्‍वास ठेवता येत नाही
- डॉ. शांतराम सोनवणे, अध्यक्ष, कोअर कमिटी
गाळेधारकांच्या कोअर कमिटीचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांनी आजच्या मोर्चात गाळेधारकांसह त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले असून, याची दखल शासनाला घ्यावीच लागेल असा विश्‍वास व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांकडून जोपर्यंत अधिकृत आदेश मिळत नाही तोपर्यंत कुणावरही विश्‍वास ठेवता येत नाही. जुन्या शाहू मार्केटमधील रईस शेख या आत्महत्या केलेल्या पित्याचे दुःख त्यांनी सभेत सांगितले. गाळेधारकांना निष्कासित केल्यास प्रत्येकावर हीच स्थिती येईल, असा इशाराही दिला. गाळेधारक व त्यांच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्‍न आहे. लोकप्रतिनिधींना स्वखर्चाने मुंबईला विमानाने घेऊन जाऊ या प्रस्तावाचा पुनरूच्चार करीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांनी तातडीने हा प्रश्‍न सोडवावा, अशी मागणी केली.
 

व्यापारी पाकिस्तानातून आलेले नाहीत, ते जळगावचेच ! - १०० टक्के न्याय मिळवून देणार : आ. सुरेश भोळे जळगावचा व्यापारी हा पाकिस्तानमधून आलेला नाही. तो इथलाच रहिवासी आहे. त्याला १०० टक्के न्याय मिळेपर्यंत आपण त्याच्या सोबत राहू. यासंदर्भात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी बोलणे झाले असून, त्यांनीही प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन दिले आहे. विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाही खास गाळेधारकांच्या मोर्चासाठी आलो आहे. जनतेने मला निवडून दिले आहे. त्यांच्यासाठी आमदारकी गेली काय किंवा राहिली काय, फरक पडत नसल्याचे त्यांनी निक्षून सांगितले. व्यापारी सेवा देणारा घटक आहे. त्याचे प्रश्‍न सुटले तर जळगाव मनपाचे हुडकोची कर्जफेड व विकासाशी संबंधित प्रलंबित विषय मार्गी लागतील. परंतु या प्रकरणात व्यापार्‍यांची दिशाभूल कुणीही करू नये, असा इशारा त्यांनी दिला.

 
 शासनाची झोप उडविणारा अभूतपूर्व मोर्चा
- हिरानंद मंधवाणी, सदस्य, कोअर कमिटी
हिरानंद मंधवाणी यांनी आजच्या मोर्चाचे वर्णन अभूतपूर्व असे केले. लोकप्रतिनिधी गाळेधारकांसोबत असल्याबद्दल त्यांनी आभार मानले. गाळेधारकांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत नेतेमंडळींची झोप उडेल. गाळेधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाशी दोन हात करण्याची तयारी त्यांनी ठेवावी. ‘उद्या दुकानच हातातून गेलं तर काय करायचं?’ असा प्रश्‍न त्यांनी केला. महापालिका नियम पाळायला तयार नाही. ४० नंबरच्या ठरावाचा मुद्दा मांडत या प्रकरणात शासन कशी मदत करू शकते? हे पटवून देण्यास गाळेधारकांचा वकील तयार असल्याचे मंधवाणी यांनी सांगितले. सभेनंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
 
@@AUTHORINFO_V1@@