१० संसारांची राखरांगोळी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2018
Total Views |

कासोदा येथे शॉर्टसर्किटमुळे भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही

 
 
कासोदा, ता.एरंडोल :
शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत १० घरे जळून खाक झाली. ही दुर्घटना कासोदा येथील मन्यार मशिदीच्या मागे असलेल्या समाशेठ प्लॉट जीन झोपडपट्टीत १८ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आली. परंतु, आगीत १० घरातील संसारोपयोगी वस्तू व इतर साहित्य जळाल्याने कुटुंब उघड्यावर आले आहेत.
 
 
मन्यार मशिदीच्या मागे असलेल्या समाशेठ प्लॉट जीन झोपडपट्टीतील नागरिक नेहमीप्रमाणे १८ रोजी झोपले होते. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास या झोपडपट्टीतील एका घराला शॉर्टसर्किटने आग लागली. ही आग क्षणातच भडकल्याने आगीने रौद्ररूप धारण करून इतर घरांनाही कवेत घेतले. आग लागल्याची वार्ता क्षणातच पसरल्याने नागरिक घरांमधून बाहेर पडले. ज्या घरात आग लागली त्यातील काही नागरिक प्रसंगावधान राखून बाहेर पडल्याने जीवितहानी झाली नाही. आगीची घटना घडल्याची वार्ता गावात पसरल्याने नागरिकांनी मदतीसाठी जीन झोपडपट्टीत धाव घेतली. ग्रामपंचायतीचे टँकर त्वरित पाचारण करण्यात आले. नागरिकांनीही शक्य तेवढ्या पाण्याचा आगीवर मारा करून नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर उशिरा आगीवर नियंत्रण मिळाले. परंतु, तोपर्यंत दहाही घरातील संपूर्ण सामान जळून गेला होता.
 
 
या आगीची तेथे असलेल्या पिंपळाच्या झाडालादेखील झळ बसली. झाडाचा बुंधा जळाला आहे. त्याचप्रमाणे घरांमधील टी.व्ही, भांडी, कपडे, धान्य व रोख रक्कमदेखील जळून गेली आहे.सर्वच कुटुंब उघड्यावर आले आहेत. या घटनेचा पंचनामा कासोदा तलाठी वाय.एम. पाटील यांनी केला. या ठिकाणी तहसीलदार सुनीता जर्‍हाड यांनी भेट देऊन पाहणी केली. आगग्रस्तांना शासकीय स्तरावरून मदत मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे
 
 

यांच्या घरांचे झाले नुकसान - या आगीत सुभाष नथ्थू सोनार, वंदनाबाई नाना भालसिंगे (मराठे), सुनंदाबाई विठ्ठल पाटील, रतन श्रावण सोनवणे, सोनजी श्रावण सोनवणे, इंदूबाई उत्तम भालसिंगे, द्वारकाबाई हिलाल पाटील, युवराज किसन पाटील, सुमनबाई राजू केदार व देवीदास रामदास ठाकूर यांची घरे जळून खाक झाली. त्यांच्या घरातील कोणतेही साहित्य शिल्लक राहिलेले नाही.

@@AUTHORINFO_V1@@