विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - ५६

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Mar-2018
Total Views |




मेधाकाकू : अवंती... या चार-आठ दिवसात, भाषा या संदर्भात फार महत्वाचे काही साजरे झाले आहेत. २१ फेब्रुवारीला ‘जागतिक मातृभाषा दिन’ साजरा झाला आणि त्यापुढील आठवडयात तर फारच महत्वाचे दोन दिवस योजलेले होते. २६ फेब्रुवारीला, आपल्या मराठी भाषेचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मार्पणदिन - स्मृतिदिन साजरा झाला. लगेचच दुसऱ्या दिवशी आपण मराठी राजभाषा दिन साजरा केला. मराठी भाषेचे दुसरे भूषणरत्न आदरणीय कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा हा जन्मदिन. भाषेविषयीचे प्रेम आणि अस्मिता प्रत्येकाला असतेच मात्र आपल्या मातृभाषेसंदर्भात आपण पूर्ण साक्षरसुद्धा असायलाच हवे. आपल्या प्रत्येक मातृभाषा बांधवाचे हे प्रथम कर्तव्य आहे, हे तुलाही माहित हवे.

अवंती : मेधाकाकू... आज नेमका तू हा छान संदर्भ दिलास. बऱ्याच दिवसांपासून मला एक प्रश्न पडलाय... त्याचे समाधान करशील...? मी शाळेत जायला निघाले की, आधी मोहिनीला हाक मारते. तेंव्हा तिचे बेटगिरी आजोबा बागेत बसलेले असतात. ते नेहमी गोड गोड भाषेत आम्हाला काही तरी सांगतात. अलीकडे मला समजले की, ते त्यांच्या कारवारकडच्या कोंकणी भाषेत आमचे कौतुक करतात. मला त्यातले थोडे थोडे शब्द समजतात. माझा प्रश्न आहे की ही सुद्धा मराठी भाषाच असेल का ?


मेधाकाकू : अरेच्या अवंती मोठा योग्य प्रश्न विचारलास. अगदी पटकन वर्णन करायचे तर नाटकांच्या माध्यमातून तुला मालवणी बोली निश्चितच परिचयाची आहे. परंतु त्यापलीकडे मायबोली मराठीच्या अंदाजे पांचशे बोलींची नोंद अभ्यासाने झालेली आहे. आता बघ यातल्या काही बोली आपल्या जवळपासच ऐकायला मिळतात. बेटगिरी आजोबांची बोली आहे महाराष्ट्रीयन कोंकणी. या बरोबरच गोवानीज कोंकणी, वसई परिसरात प्रचलित फुगडी-वडवली, सामवेदी-कडोदी, रायगड जिल्ह्यातील ठाकरी-कोळी-वारली, खानदेशातील अहिराणी-बागलाणी अशा असंख्य बोलींमुळे मराठी भाषा समृद्ध आहे. यातली गंमत अशी की या सगळ्या बोलींमधे म्हणी आणि वाकप्रचार प्रचलित आहेत. थोडे जड वाटेल ऐकायला पण याच लोकश्रुतीतून लोकरंजन आणि समाज प्रबोधन असे दोन्ही उद्देश, काही शतकांपासून साध्य झालेले आहेत. आता गोव्यातील नागर समाजात प्रचलित असलेल्या कोंकणी बोलीतील हा वाकप्रचार ऐकायला किती गोड आहे बघ.



कोळशांक्‌दर आइल्‍ली म्‍हण्‌घरा उजॉ लायिल्‍लॉ खीं कॉणँ.

मेधाकाकू : कोळशाला बाजारात चांगला भाव मिळायला लागला म्हणून कोणी आपल्या घराला आग लाऊन त्याचा कोळसा करून विकणार नाही. हा सामान्य विवेकाचा सल्ला आहे. मात्र यातील अतिशयोक्ती अलंकाराच्या प्रभावामुळे, मूर्खपणावर जालीम इलाज म्हणून हा वाकप्रचार नियमित वापरला जातो. साधारण अशाच अर्थाचा दुसरा वाकप्रचार असाच लोकप्रिय आहे.


उंदरां रागान खीं कॉणें घरा उजॉ लायिल्लॉ.

मेधाकाकू : उंदीर-घुशींनी घरांत उच्छाद मांडलाय म्हणून कोणी घराला आग लावत नाही. कुठल्याही त्रासावर उपाय करताना अतिरेक टाळावा, असा हा सहज-सोपा सल्ला.

अवंती : सही मेधाकाकू सही.. यातील कानावर येणारा नाद खूप छान वाटतो...!!..

मेधाकाकू : अशीच गंमत या दोन बहिणींची.. बागलाणी आणि अहिराणी या बोलींची. ऐकायला अनेकदा सारख्या वाटल्या तरी या दोन बोलीत खूप फरक आहे. अहिराणी बोली इतकी गोड आहे की त्यातील शिव्या सुद्धा गोड वाटतात. खानदेशात पुजल्या जाणाऱ्या देवदेवतांचा उल्लेख असणाऱ्या जानपदातील लोकश्रुक्ती सुद्धा खूप छान आहेत.

आईबाई नाडनी, कानबाई घडनी.
गवराई सजनी, शंकरले पावनी.
म्हसोबाल न बायको
अन मुऱ्हईले न नवरा.
सांगा सेंदूर तं उखली आना मरोती.

मेधाकाकू : या म्हणीतून गौराई, कानबाई, शंकर, म्हसोबा, मारोती अशा देवतांचा उल्लेख आहे. प्रत्येक देवतेचे वैशिष्ट्य दोन-चार शब्दांत मांडणाऱ्या याच म्हणींच्या आधारे अहिर लोकांच्या सामाजिक जीवनाचा आणि खानदेशातील देवदेवतांचा इतिहास मांडता येतो.


अवंती : आहा मेधाकाकू ही भाषा सफर फारच मजेदार आणि गमतीची आहे. फक्त शहराच्या भिंतीमधे राहिलो की याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येत नाही असे सारखे वाटत रहाते.


मेधाकाकू : अवंती इथे मी तुझ्याशी पूर्ण पणे सहमत आहे बरे का. अहिराणी-बागलाणी बोली जशा ऐकायला गोड तशी वऱ्हाडी बोली मात्र एकदम तिखट असे म्हणायला हरकत नाही. ही एक खूपशी रंजक वऱ्हाडी लोकश्रूती याला अपवाद असी.


इकडे झाळे, तिकडे झाळे (येथे ‘ड’चा ‘ळ’ झाला.)
इकडे फडे, तिकडे फडे (येथे ‘ळ’चा ‘ड’ झाला.)
मेधाकाकू : येऊ घातलेल्या चैत्र महिन्यातील सुगीच्या दिवसात निसर्गाबरोबर गाणी गाताना, बागेत नाचत नाचत झाडाभोवती फेर धरणारी किशोर-किशोरी, मग ड चा ळ आणि ळ चा ड करून या झाडा-फाळांशी मैत्र जमवतात, तेंव्हा होणारी अशी गंमत, आपल्यापर्यंत पोहोचते. होलीकोत्सावातील उल्हास असा साजरा करावा प्रसन्नतेने आनंदात...!


अवंती : मेधाकाकू... पुरणपोळ्या आणि ताज्या तुपाचा खमंग सुवास आणि या लज्जतदार लोकश्रुती आज शिमग्यातील रंग असे शब्दातून समजले मस्त मस्त मस्त...!
 
- अरुण फडके
@@AUTHORINFO_V1@@