गुळ चाटण्याचा तमाशा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018
Total Views |


 

 वस्तुत : पुण्यातल्या मुलाखतीत, ‘तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत,’ असे सांगून पवारांनी राज ठाकरेंच्या कोपराला गुळ लावला होता. आता फक्त तो चाटण्याची कसरत सुरू झाली आहे. ती कसरत फक्त राज ठाकरेंचीच नाही. मोदीमुक्त देशाच्या नावाखाली अनेक लोक हे उद्योग करीत आहेत.

पुण्यातल्या मुलाखतीत, ‘तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत,’ असे सांगून पवारांनी राज ठाकरेंच्या कोपराला गुळ लावला होता. आता फक्त तो चाटण्याची कसरत सुरू झाली आहे. ती कसरत फक्त राज ठाकरेंचीच नाही. ‘मोदीमुक्त’ देशाच्या नावाखाली अनेक लोक हे उद्योग करीत आहेत.

गोरखपूर आणि फुलपूर येथे झालेल्या पराभवानंतर भाजपला पराभूत करता येऊ शकते, असे मानणार्‍यांचा एक मोठा वर्ग आपल्या देशात निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात राज ठाकरे, शरद पवार, इथली का तिथली माहीत नसलेली शिवसेना, आंध्र-तेलंगणात चंद्राबाबू आणि अखेर दिल्लीत काँग्रेस आणि तिचे नूतन अध्यक्ष राहुल गांधी. नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या मेळाव्यात राहुल गांधींनी जे तारे तोडायचे ते तोडलेच, पण त्याचवेळी महाराष्ट्रात संध्याकाळी तारे तोडण्याचे घाऊक कंत्राट राज ठाकरेंनी घेतले होते. यापूर्वी हे कंत्राट मराठी माणसाला चुना लावण्याचे होते, मात्र आता मोदींच्या विरोधात गरळ ओकण्याचे काम मिळविण्यासाठी त्यांची धडपड चालू आहे.

वस्तुत: राज ठाकरेंचा ओसरलेला प्रभाव आणि त्यांना सोडून गेलेले त्यांच्याच पक्षाचे लोक यात मोदींचा कुठलाही दोष नाही. मात्र, तिकडे फसलेल्या चंद्राबाबूंनी जसा मोदींच्या नावाने कांगावा करायला सुरुवात केली आहे तशीच ती इथे केली जात आहे. राहुल गांधींचीही तीच गत. उत्तर प्रदेशात ‘बबुआ’ आणि ‘बुवा’ यांनी युती केली. ‘सायकल’वर ‘हत्ती’ बसला आणि आता हे असले प्रयोग सर्वत्र यशस्वी होऊ शकतात, असे सगळ्यांना वाटू लागले आहे. वस्तुत: मोदींचा राजकीय उदय हा काही पारंपरिक राजकारणातून झालेला नाही. ते आले आणि त्यांनी देशाचे राजकारण ताब्यात घेतले. लोकांना जो खमका नेता दिसावा लागतो, तो लोकांना त्यांच्यात सापडला आणि लोक त्यांच्यामागे उभे राहिले. लोक केवळ मोदी आणि भाजपच्याच मागे उभे राहिले असे नाही. आज सत्तेविना घुसमटलेल्या सगळ्यांच्याच मागे लोक कधी ना कधी उभे राहिले होते. या सगळ्यांना लोकांनी संधी दिली होती.

राज ठाकरेंविषयीच बोलायचे तर मराठी माणसाने त्यांच्यावर केवढा प्रचंड विश्वास टाकला होता. या विश्वासाचे विश्वासघातात रूपांतर करण्याचे काम खुद्द राज ठाकरेंनीच केले. ज्या गुढीपाडव्याला लोक चांगल्या कामाची सुरुवात करतात तिथे राज ठाकरे शिमगा करत होते. राज ठाकरेंचे कर्तृत्व असे की, मोदी किंवा भाजपला त्यांच्या राजकीय अस्तासाठी काही वेगळे करावे लागले नाही. राजनी शरद पवारांची पुण्यात मुलाखत घेतली. ही मुलाखत राजकीय नव्हती, असा दावा आयोजकांनी केला असला तरी गलितगात्र मनसेत शरद पवारांना उद्याची आशा दिसली. आता शरद पवारांनी हा गुळ राज ठाकरेंच्या कोपराला का लावला, हे खुद्द पवारच सांगू शकतात. कोपराचा गुळ चाटण्याचा तमाशा तेव्हापासून सुरू झाला आहे. स्वत: शरद पवारांकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद अत्यंत तरुण वयात आले. दीर्घकाळ त्यांच्याकडे देशाचे कृषिमंत्री पद होते. कृषिमंत्री म्हणून पवारांची भाषणे ऐकली तर या माणसाने काय कमाल केली असेल, असे वाटायला लागते. मात्र, सर्वाधिक शेतकर्‍यांच्या आत्महत्या पवारांच्या कारकिर्दीतच झाल्यात. संधी मिळाली होती, मात्र जातीय राजकारणाचे उद्योग करण्यात पवारांनी ती संधी घालविली. महाराष्ट्रातले कितीतरी प्रश्न पवारांनी तुंबवून ठेवले. त्यांच्या राजकारणाच्या उत्तरकाळात त्यांचे नाव इतके खराब झाले की, आज महाराष्ट्रात कुठेही काही वावगे झाले तरी त्यामागे शरद पवारांचा हात असल्याचे बोलले जाते. यातले खरे-खोटे किती हा भाग अलहिदा मात्र याला खुद्द पवाराच जबाबदार आहेत.

जी बाब पवारांची तीच बाब तिकडे चंद्राबाबूंची. खरंतर राज्य वेगळे करून मुख्यमंत्रिपद पटकाविण्याची त्यांची मनिषा आंध्र-तेलंगण वेगळा झाला तेव्हाच पूर्ण झाली. मात्र, पुढे त्यांना राज्य चालविता आलेले नाही. रायलसीमा भागातील अनंतापूर, कर्नूल, कडप्पा इथले उद्योग आणि शेती या दोन्ही क्षेत्रांसमोरचे प्रश्न आज गंभीर आहेत. चंद्राबाबूंचा डोळा नेहमी कर्नाटकातल्या बंगळुरूवर होता. त्यांना आयटीच्या माध्यमातून आपल्या राज्यात नवी क्रांती घडवायची होती. मात्र, यापैकी काहीच झाले नाही. हेच चंद्राबाबू कधीकाळी एनडीएत असूनही तिसर्‍या आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवारही होते. त्यावळचे भाजपद्वेष्टे आणि तिसर्‍या आघाडीचा पाळणा हलविण्यासाठी धावपळ करणारे चंद्राबाबूंना प्रमोद महाजनांचे स्पर्धक वगैरेही मानत असत. अर्थात चंद्राबाबूंची या सगळ्याला मूक संमती होती. हा झाला इतिहास. मात्र, वर्तमानात येणार्‍या निवडणुकीत आपण राज्यातल्या जनतेला काय तोंड दाखवायचे, हा चंद्राबाबूंसमोरचा मोठा प्रश्न आहे. आता ते खापर त्यांना मोदींच्या माथी फोडायचे आहे.

शिवसेना आज या सगळ्यात या मंडळींच्या बरोबर नसली तरीही मनातल्या मनात शिवसेनेलाही मोदी नकोच आहेत. उद्धव ठाकरेंचे बहुचर्चित सत्तेचे सोन्याचे ताट त्यांना आजच्या परिस्थितीमुळे उचलून घरी नेता येत नाही. या सगळ्यांसाठी राज ठाकरे म्हणतात, त्याप्रमाणे या देशात आणीबाणीसारखी परिस्थिती उद्भवली आहे. नोटाबंदीनंतर या सगळ्या पक्षांना ती परिस्थिती आणीबाणीसारखीच होती. कर रचनांचे भलेबुरे परिणाम तर आहेतच, मात्र या सगळ्याचा परिणाम या प्रादेशिक पक्षांना नक्कीच भोगावा लागला आहे. कालपर्यंत केंद्रातील सत्तेला पाठिंबा द्यायचा आणि आपल्या तुंबड्या भरत राहायच्या, या हा या सगळ्या घटक पक्षांचा शिरस्ता होता. मात्र, आता सगळीच कुचंबणा झाली आहे.

एनडीएत असलेल्या शिवसेनेने प्रतिभाताई पाटलांना पाठिंबा दिला, त्यावेळी त्या मराठी असल्याचे कारण सेनेने दिले होते. मात्र, प्रणव मुखर्जींसाठी कोणत्या कारणाने पाठिंबा दिला गेला हे मात्र गुलदस्त्यातच राहिले. असे पाठिंबे मोठ्या मनाने दिले घेतले जात नाही, हे वेगळे सांगायला नको. या सगळ्यांचीच मोठी अडचण ही की, पूर्वी ज्या प्रकारचे राजकारण व्हायचे तसे आता होत नाही. राजकारणात सलोखा असला पाहिजे. प्रश्नांव्यतिरिक्त मतभेद असता कामा नये वगैरे अशी पोपटपंची खूप चालायची आणि त्यामागे साट्यालोट्याचे उद्योग चालायचे. ते सगळेच आता बंद झाले आहेत. राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्रींनी परवा दिल्लीत जे भाषण केले ते त्याच्या एकंदरीत वकूबाला शोभणारेच होते. जवळजवळ सगळ्याच राज्यातून जनाधार गमावलेली काँग्रेस देश ‘मोदीमुक्त’ कसा करते, हे पाहाणे रंजक ठरेल.

@@AUTHORINFO_V1@@