माफीवीर केजरीवाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018
Total Views |



 

केजरीवालांचा असा विदूषक होण्याला ते स्वतःच कारणीभूत आहेत. पदोपदी आपल्या वक्तव्यांपासून घूमजाव करणे हे फक्त केजरीवालांनाच जमू शकते आणि त्यामुळेच त्यांचा विनोदवीर झाल्याचे पाहायला मिळते.

खादे बिनबुडाचे विधान करून, ‘मी असे बोललोच नव्हतो,’ ची टेप वाजवत स्वतःचेच शब्द झटकणारे अनेक राजकारणी देशाने पाहिले. अरविंद केजरीवाल हे त्यातले एक आघाडीचे नाव. वादग्रस्त विधाने करून नंतर ती मागे घेण्यात वा त्या विधानांच्या नेमके विपरित वागण्यात त्यांचाही मोठाच हातखंडा. आताही विक्रमसिंह मजिठिया यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे केजरीवालांवर नुसते शब्दच मागे घेण्याची नव्हे तर माफी मागण्याचीही वेळ आली. चार-पाच वर्षांपूर्वी अण्णा हजारेंच्या आंदोलनातून देशाला एका नव्याच राजकारण्याची ओळख झाली. माध्यमांकडून सुरुवातीला ती ओळख एक स्वच्छ चारित्र्याचा, भ्रष्टाचाराचा नायनाट करणारा, लोकांना अन्याय-अत्याचारापासून मुक्ती देणारा मसिहा अशी निर्माण केली गेली. अरविंद केजरीवाल हे त्या मसिहाचे नाव. नंतर माध्यमांनी उभ्या केलेल्या या मसिहाने आपल्या अल्पशा राजकीय कारकिर्दीत अशी काही थेरं केली की, त्यांचे नाव ‘राजकारणातला विदूषक’ म्हणूनच घेतले जाऊ लागले. भल्या भल्या लोकांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत ज्या गोष्टी करायला मागे-पुढे पाहिले असते, त्या गोष्टी त्यांनी चार-पाच वर्षातच करून दाखवल्या. आताही केजरीवालांच्या एका विधानावरून गदारोळ माजला आणि त्या गदारोळामुळे आपल्या मानगुटीवर एखाद्या कारवाईचे भूत बसू नये म्हणून त्यांनी कातडी बचावू धोरण स्वीकारत सरळ माफीही मागून टाकली.

२०१४ च्या निवडणुकीने देशाला राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल या दोन विनोदवीरांचा नजराणा मिळाला. त्यानंतर या दोघांच्याही विधानांची, वर्तणुकीची खिल्ली उडवली गेली नाही, असा एकही दिवस गेला नाही. आताही केजरीवालांच्या माफीनाम्यानंतर सोशल मीडियावर विनोदांचा पाऊस पडायला सुरुवात झाली. ज्या गोष्टीची माफी मागायला हवी, त्याची कधी माफी मागितली नाही आणि ज्या गोष्टीची माफी मागायला नको त्याची माफी मागणारा नेता म्हणून त्यांची खिल्ली उडवली जातेय. केजरीवालांचा असा विदूषक होण्याला ते स्वतःच कारणीभूत आहेत. पदोपदी आपल्या वक्तव्यांपासून घूमजाव करणे हे फक्त केजरीवालांनाच जमू शकते आणि त्यामुळेच त्यांचा विनोदवीर झाल्याचे पाहायला मिळते.

अरविंद केजरीवालांना पहिल्यांदा दिल्लीची सत्ता मिळाल्यानंतर त्यांनी पुढचा पंतप्रधान म्हणून स्वतःला पेश केले, पण त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दारुण पराभवाला सामोर जावे लागले. त्यानंतर गोवा आणि पंजाबमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी नशीब आजमावले. पण जनतेला आधीच केजरीवालांच्या करतुती ठाऊक असल्याने लोकांनी त्यांना सपशेल नाकारले. त्यापैकी पंजाब विधानसभा निवडणूक प्रचारावेळी केजरीवालांनी शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि माजी मंत्री विक्रमसिंह मजिठिया यांच्यावर मादक पदार्थांच्या व्यवसायात हात असल्याचा आरोप केला, पण आता गेल्या आठवड्यातच केजरीवालांना उपरती झाली आणि त्यांनी मजिठियांची माफी मागितली. हुकूमशहाच्या तोर्‍यात वावरणार्‍या केजरीवालांच्या माफीनाम्यानंतर आमआदमी पक्षातील नेत्यांनी मात्र त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. केजरीवालांचा माफीनामा दुर्भाग्यपूर्ण असून त्यांनी मजिठियांसमोर गपगुमान आत्मसमर्पण केल्याचे पंजाबमधील नेतृत्वाने म्हटले तर अध्यक्ष भगवंत मान यांनी मान न तुकवता आपल्या पदाचा राजीनामाही दिला. त्यांनी ‘आप’शी नाते तोडत स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचालीही सुरू केल्या. शिवाय मित्रपक्ष लोक इन्साफ पक्षाने आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केली. हे सगळे कोणत्याही गोष्टीचा विचार न करता कोणाहीबद्दल काहीही बरळण्याच्या उद्योगाचेच फळ म्हटले पाहिजे.

उचलली जीभ आणि लावली टाळ्याला याचा प्रत्यय केजरीवाल वेळोवेळी देत असतात. याआधीही त्यांनी आपल्या बेताल बडबडीने बरेच वाद ओढवून घेतले होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर त्रिशंकू स्थिती निर्माण झाली तर कोणाचाच पाठिंबा घेणार नसल्याचे त्यांनी स्वतःच्या मुलांच्या डोक्यावर हात ठेऊन म्हटले होते, पण सत्तेच्या मोहापुढे पुत्रमोह फिका पडला आणि केजरींनी कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले. सत्तेत आल्यावर शासकीय बंगल्यात राहणार नाही, सरकारी गाड्या वापरणार नाही, असेही केजरीवालांनी म्हटले होते, पण ती घोषणाही नंतर हवेत विरली. भाजपनेते आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही केजरीवालांनी बेताल आरोप केले होते. त्यामुळे त्यांना तुरुंगवारीही घडली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींवरही त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यानंतर या प्रकरणात त्यांच्यावर खटलाही चालला. केजरीवालांना अधेमधे हुक्की आली की, ते पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही असेच आरोप करत सुटतात आणि अंगाशी आले की, बिळात लपूनही बसतात. पण आता त्यांच्या याच बरळण्यामुळे, त्यानंतरच्या माफीनाम्यामुळे त्यांचा पक्षच फुटीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

पंजाब नेतृत्वाच्या बंडानंतर आता दिल्लीतआपनेत्यांची बैठकही बोलावण्यात आली आहे, पण त्यालाही कित्येक नेत्यांनी जाणार नसल्याचे सांगितले. यावरून दिल्ली आणि पंजाबमधीलआपमध्ये नवीनच गट उदयाला येण्याची शक्यता वर्तवली जाते. आम आदमी पक्षातील फुटीने राष्ट्रीय राजकारणात फार मोठे वादळ येईल, असे नाही. पण त्यामुळे दिल्ली सरकारवर त्याचा नक्कीच परिणामहोऊ शकतो. दुसरीकडे केजरीवालांचे राजकारण काही एखाद्या विचाराने प्रेरित झालेले नाही तर फक्त राजकीय महत्त्वाकांक्षेने पछाडलेले आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून राजकीय हेतूने प्रेरित असलेली विधाने नेहमीच ऐकायला मिळतात. एखाद्या नेत्यावर बिनबुडाचे आरोप करायचे, बदनामीकारक विधाने करायची आणि ती विधाने-आरोप अंगाशी यायला लागले की, स्वतःचेच शब्द मागे घ्यायचे, हा केजरीवालांचा आवडता खेळ बनलेला आहे. आणि आता तर मजिठियांची माफी मागून त्यांनी माफीवीर ही पदवीही स्वतःपुढे लावून घेतली आहे. इथून पुढेही सत्तेत आहेत तोपर्यंत केजरीवाल आणखी कोणकोणते खेळ दाखवतात, हेही पाहावे लागेल.

@@AUTHORINFO_V1@@