यात्रेकरी कल्पकतेचे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018   
Total Views |
 

 
माध्यमांची बेसुमार वाढ, मध्यमवर्गीय समाजाचा उदय आणि त्यातून सांस्कृतिक कार्यक्रमांचीही प्रचंड रेलचेल निर्माण झालेल्या काळात सरधोपट, एकमार्गी आणि निव्वळ व्यावसायिक, उथळ कार्यक्रमांचा मारा आपल्यावर सातत्याने होत असतो. मात्र, या काळातही कल्पकता आणि नाविन्याचा अखंड ध्यास घेऊन, व्यावसायिकता म्हणून नव्हे, तर रसिकांना निखळ आनंद देण्याच्या हेतूने आणि या सगळ्यातून समाजाला काहीतरी सकारात्मक दिशा देण्याच्या हेतूने सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी माणसं आज अभावानेच आढळतात. विनोद पवार हे अशा माणसांमधील अग्रगण्य नाव.
 
 
मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे गेली १४ वर्षे अखंडपणे होत असलेली व मुंबईकरांची प्रचंड दाद मिळवलेली दिवाळी पहाट, तसंच ‘चैत्रचाहूल’ आणि ‘विठू पालवीत आहे...’ असे असंख्य उत्कृष्ट कार्यक्रम आदींचं जनकत्व विनोद पवारांकडे जातं. नीटनेटकी व विषयानुरूप मांडणी, नव्या संकल्पना, सौंदर्यशास्त्राचा उत्तम अभ्यास आणि या सर्वांतून एक सकारात्मक संदेश हे विनोद पवारांच्या कार्यक्रमांचं वैशिष्ट्य. कोकणातील एका छोट्याशा खेड्यातून मुंबईत येऊन, डिलाईल रोड-परळसारख्या भागात चाळीत बालपण घालवून, आवडीचं क्षेत्र गवसेपर्यंत अनेक नोकर्‍या-व्यवसाय करून सोडून आणि या सगळ्यात कमालीची गरिबी भोगून तावून-सुलाखून निघालेले विनोद पवार आज मुंबईतील व महाराष्ट्रातील सांस्कृतिक क्षेत्रातील एक दिग्गज नाव म्हणून परिचित आहेत. त्यांचा हा साराच प्रवास फार रंजक आहे.
 
 
विनोद पवार यांचा जन्म १९६२ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात खोपड या छोट्याशा गावी झाला, तर प्राथमिक शिक्षण गुहागर तालुक्यातील पवार साखरी या गावात झालं. त्यानंतर कुटुंबातील इतरांप्रमाणेच आणि सर्वसाधारण कोकणी माणसाप्रमाणेच पवार मुंबईत दाखल झाले. वडील रेल्वेमध्ये बाइंडर होते, तर आई गृहिणी. डिलाईल रोड-परळ भागात दहा बाय दहाच्या चाळीतील खोलीत त्यांचं वास्तव्य होतं. या काळात विनोद पवारांनी बाहेरची दुनिया पाहिली. रात्रीच्या वेळी फिरणं, गुंडगिरी, खून-मारामार्‍या पहिल्या, दारूडे पाहिले. ती सारी कामगार वस्ती असल्याने त्या काळातील डाव्या चळवळीचा प्रभाव वस्तीत मोठ्या प्रमाणावर होता, तर दुसरीकडे तरुण वर्ग शिवसेनेकडे आकर्षित होऊ लागला होता. पवारांच्या वडिलांवर पांडुरंग शास्त्री आठवलेंच्या स्वाध्याय परिवाराचा प्रभाव होता. त्यामुळे घरी पुस्तके असायची, त्यामुळे वाचनाची आवड लागली, काहीसं हळवेपणही आलं. त्या वस्तीतील प्रकृतीपेक्षा वेगळी जडणघडण होत गेली.
 
 
वाचनातून, आसपासचं वेगळं जग पाहण्यातून शाळेत नाटकांत काम करण्याची आवड निर्माण झाली, काव्यवाचनाची आवड निर्माण झाली. विनोद पवारांचं महाविद्यालयीन शिक्षण रुपारेल महाविद्यालयात झालं (बीएस्सी-रसायनशास्त्र). त्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला, परंतु नंतर त्यात रस वाटेना. त्यावेळची चांगली डिग्री मिळाली खरी, त्या काळात बीएस्सीला किंमत होतीच, परंतु त्यात पुढे करिअर करण्याची त्यांची इच्छा नव्हती. महाविद्यालयीन शिक्षणाच्या तीन वर्षांच्या काळात दुर्गभ्रमंती, चित्रकला, नाटक, असे अनेक उपक्रम करत त्यांनी स्वतःला आजमावून पाहिलं. पुढे नोकरी करण्याचा प्रयत्न केला. एका औषध कंपनीत विक्री व्यवस्थापक म्हणून पवार रुजू झाले पण, त्यातही त्यांना रस वाटेना. मग दीड-दोन वर्षांत तीही नोकरी त्यांनी सोडली.
 
 
मधल्या काळात नोकरी नाही, आर्थिक स्थैर्य नाही, त्यामुळे गरिबीही पाहावी लागली परंतु, पवारांनी आजतागायत त्याचं कधीही भांडवल केलं नाही. मधल्या काळात त्यांनी अनेक कामं केली. इंजिनिअरिंग क्षेत्रातील कंपन्यांमध्येही काम केलं, पाण्याच्या टाक्यांचं वॉटरप्रूफिंग करण्याचं कामही केलं. मग अगदीच कंटाळून इस्त्री विकत आणली आणि चाळीत इस्त्रीचा व्यवसाय सुरू केला. मात्र, वडिलांचा भयंकर ओरडा खावा लागल्याचं ते सांगतात. विनोद पवारांना खरंतर जाहिरात व्यवसायात जायची इच्छा होती. पण, त्या काळात ते क्षेत्र फारसं विस्तारलेलं नव्हतं आणि बाहेरच्या क्षेत्रातील लोकांना चटकन प्रवेशही मिळत नसे. बर्‍याच प्रयत्नानंतर १९८२ मध्ये ‘संकल्प ऍडर्व्हटायझिंग’ एजन्सी नामक जाहिरात कंपनीत ट्रेनी म्हणून त्यांना नोकरी मिळाली. तोपर्यंत त्यांच्या अनेक नोकर्‍या करून-सोडून झाल्या होत्या. कोणत्याच नोकरीत मन रमलं नाही. मग जाहिरात कंपनीत मात्र त्यांनी चार वर्षं प्रचंड काम केलं. त्याचदरम्यान प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे यांच्याशी त्यांची मैत्री झाली. त्या काळात त्यांना पुन्हा वाटू लागलं की, नाट्यक्षेत्रात काम करावं. काही काळ प्रयत्न केला, पण ते जमलं नाही. घरच्या आर्थिक समस्यांमुळे वेळ देता न येणे, थिएटरचा सखोल अभ्यास करायला वेळ न मिळणे यामुळे ते होऊ शकलं नाही. मात्र, त्या काळात ते क्षेत्र जवळून पाहता आलं, तेथील दिग्गज व्यक्तींशी परिचय-मैत्री झाली, क्षेत्रातील उणिवा लक्षात आल्या. त्यानंतर नाट्यक्षेत्र त्यांनी सोडलं ते कायमचंच!
 
 
मग पुन्हा विनोद पवारांनी जाहिरात क्षेत्रावर लक्ष केंद्रित केलं. ‘पँटलून’ या प्रसिद्ध ब्रॅण्डसोबत त्यांनी काम केलं. अनेक नामांकित कंपन्यांसोबत काम केलं. यात त्यांच्या कल्पकतेलाही भरपूर वाव मिळत गेला. यानंतर अशाच कल्पकतेच्या आणि नाविन्याच्या शोधात असलेला समविचारी गट : अजित परब, महेंद्र पवार आणि विनोद पवार एकत्र आले. शिवाजी पार्क मैदानावर दिवाळी पहाट कार्यक्रम घेण्याची कल्पना तिथूनच पुढे आली. ही गोष्ट २००३ मधील. त्यानंतर त्या कल्पनेवर काम सुरू झालं. शिवाजी पार्कवर जागा बुक करणं, स्टेज बुक करणं वगैरे कामं सुरू झाली. कार्यक्रमासाठी सकाळी ६ वाजताची वेळ ठरवली होती. घोडपदेववरून नंदीबैलवाले बोलावले होते. वासुदेवही बोलावले होते. हे सर्व वासुदेव दिवाळीच्या दिवशी पहाटे ५ वाजल्यापासून आजूबाजूच्या भागात लोकांना उठवायला फिरले. ही कल्पनाच सर्व लोकांना फार आवडली. दादरकर मंडळी या सगळ्यावर फारच खुश. प्रत्यक्ष कार्यक्रमात अभिनेते अतुल परचुरे यांनी पु. ल. देशपांडे बनून ‘बटाट्याची चाळ’चं अभिवाचन केलं. फक्त त्यात कल्पना अशी केली की, ‘बटाट्याची चाळ’ आता ‘आलू की चाल’ बनली आहे. चाळीतील मराठी लोक डोंबिवलीत राहायला गेले आणि आता इथे ‘सिंग’, ‘शर्मा’ वगैरे राहायला आले आहेत वगैरे. सिद्धार्थ जाधव, उमेश कामत आदी अनेकांनी या प्रयोगात काम केलं. सकारात्मक संदेश देत प्रयोगाची अखेर झाली. श्रीनिवास खळे, सुरेश वाडकर यांनी गायन केलं. खुल्या मैदानात तीन-साडेतीन हजार रसिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. ‘खातू मसाले’कडून लोकांना फराळ दिला. कार्यक्रम जबरदस्तच झाला, पण नंतर जसजशी सकाळ होऊ लागली, सूर्य वर येऊ लागला, ऊन पडू लागलं आणि लोकांच्या डोळ्यात जाऊ लागलं. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात सुरेश वाडकर गाऊच शकले नाहीत. एक-दोन गाणी गायल्यावर त्यांनी आटोपतं घेतलं! अभ्यास न करता आमच्या डोक्यात केवळ कविकल्पनाच होत्या. त्यामुळे जशी सकाळ होईल तशी दिवाळी पहाटची अखेर ‘गगन सदन तेजोमय’ने करायची अशी मूळ कल्पना होती. पण आमचं तेजोमय जरा लवकर आणि जास्तच झालं!’’ अशा शब्दांत पहिल्या ‘दिवाळी पहाट’च्या आठवणी ते सांगतात. पण, यातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्याचं ते आवर्जून नमूद करतात. मग नंतर या सगळ्या अनुभवांनंतर पुढील वर्षी कार्यक्रम रवींद्र नाट्यमंदिरमध्ये घेण्याचा निर्णय या तिघांनी घेतला. पहिल्या ‘दिवाळी पहाट’मधून त्यांना आर्थिक फायदा काहीच झाला नाही, उलट १५ हजारांचं नुकसानच झालं. दुसर्‍या कार्यक्रमाला मात्र, उत्तम नियोजन करून उत्कृष्ट कार्यक्रम सादर झाला. त्यावेळेस नवीच कल्पना पुढे आली. यातून रवी बापट, निळू दामले आणि गिरीश प्रभुणे या तिघा विविध क्षेत्रातील नामवंतांचा ऋणसत्कार केला. भेट म्हणून सोनचाफ्याची परडी दिली गेली. त्यानंतर वृत्तपत्रांमध्ये मथळे आले, ‘रवींद्रमध्ये रंगली सोनचाफ्याची दिवाळी पहाट!’ ही सोनचाफ्याची परडी पुढे लोकांना फारच भावली. यानंतरच्या विनोद पवारांच्या प्रत्येक कार्यक्रमात बुके इ. ऐवजी सोनचाफ्याची परडी दिली जाते.
 
 
 
तिसर्‍या वर्षीच्या ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाला एका व्यक्तीने स्वतःहून पवारांना एक लाख रुपये देऊ केले. वर ते परत न करण्याची आणि कुठेही नाव न येऊ देण्याची अटही घातली. मग हे पैसे परत कसे करायचे? या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधातून, मुंबईबाहेरील अज्ञात समाजसेवकांचा सत्कार करून त्यांना रुपये १ लाख एवढी रक्कम भेट म्हणून देण्याचा उपक्रम सुरू झाला. तो आजतागायत सुरू आहे. भापकर गुरुजी, संजीवनी केळकर, संजय कांबळे अशा अनेक समाजसेवकांचा या कार्यक्रमात सत्कार झाला आहे. या पहिल्या दोन-चार वर्षांच्या अनुभवांतून अनेक गोष्टी शिकत शिकत, पुढे उत्तमोत्तम कार्यक्रम पवारांनी साकारले. त्यांनी उभारलेल्या व्यासपीठावर अनेक दिग्गज कलाकारांनी कला सादर केली, ज्याला रसिकांची दाद मिळाली. मात्र, या कार्यक्रमाचे पैसे कधी घरी न्यायचे नाहीत हे विनोद पवारांनी मनाशी ठरवलं होतं. मग त्या पैशातून ‘विठू पालवीत आहे’, ‘चैत्र चाहूल’सारखे आणि असे असंख्य वेगवेगळे कार्यक्रम सुचत गेले. यातून झालं काय? या प्रश्नावर पवार म्हणतात, ‘‘जो पांढरपेशा वर्ग ‘दिवाळी पहाट’सारख्या कार्यक्रमांना येतो, त्यातील अनेक लोक समाजात तळागाळात काम करणार्‍या व्यक्ती आणि संस्थांशी जोडले गेले. सांस्कृतिक क्षेत्रात ही अशी कल्पकतेची आणि आनंदाची यात्रा सुरू असतानाच दुसरीकडे विनोद पवार आज कॉर्पोरेट क्षेत्रातही कार्यरत असून त्यातही त्यांची यशस्वी कारकीर्द घडली आहे. चौगुले उद्योग समूहात मुख्य व्यवस्थापक म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. मात्र, हे एवढं सगळं होऊनही, हे करण्याची तुमची प्रेरणा काय? असं विचारल्यावर विनोद पवार म्हणतात, ‘‘हे सगळं करत राहण्याची प्रेरणा इतकीच की, त्या माणसाचे एक लाख रुपये मला परत करायचे आहेत!’’
 
 
 
 
- निमेश वहाळकर
 
@@AUTHORINFO_V1@@