‘अभिजात’ नृत्य विद्येची जोपासना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018
Total Views |


नाशिक ही कलानगरी. साहित्य, संगीत, नृत्य, नाट्य यात आघाडीवर असलेल्या नाशिकमध्ये नृत्य शिक्षण आणि सादरीकरण यात आघाडीवर असलेल्या कलाकारांमध्ये विद्या देशपांडे यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. त्यांची ‘अभिजात नृत्य, नाट्य, संगीत अकादमी’ म्हणजे नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रात मानाने घेतले जाणारे नाव. कला अभिजात असते, पण ही कला जोपासण्यासाठीची आकलन शक्ती कलेवर असलेली भक्ती तेवढीच महत्त्वाची असते.


विद्या देशपांडे पूर्वाश्रमीच्या विद्या दांडेकर. मूळच्या नाशिककरच. घरात पाच बहिणी. त्यांचे शालांत शिक्षण स्वामी विवेकानंद हायस्कूलमध्ये झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण बीवायके महाविद्यालयात. पणजोबा कीर्तनकार. आईवडिलांना कलेविषयी आवड, परंतु नोकरीनिमित्त पालघरसारख्या अन्य गावात राहिल्यामुळे सांस्कृतिक जगताशी संबंध दुरावलेला पण, नाशिकमध्ये स्थायिक झाल्यानंतर कलाक्षेत्रात माझ्या मुलींनी जावे आणि जे स्वतःला करता आले नाही, त्या कलाक्षेत्रात पारंगत व्हावे, म्हणून सर्व मुलींना त्यांनी प्रोत्साहन दिले. विद्याताईंची मोठी बहीण विद्युल्लता त्यावेळी नृत्याच्या क्लासला जात असे. त्यावेळी विद्याताईही बरोबर जायच्या. गुरू उस्ताद हैदर शेख हे विद्याताईंचे पहिले गुरू. नृत्याचे प्राथमिक शिक्षण ताईंनी उस्ताद हैदर शेख यांच्याकडेच पूर्ण केले.


नृत्याचे शिक्षण सुरू असताना १९८३ साली हरी देशपांडेंशी त्यांची ओळख झाली. निमित्त होते एका एकांकिकेसाठी ‘हरी’ म्हणजे आपले सुनील देशपांडे यांना ‘अभिनेत्री’ पाहिजे होती. त्यावेळी विद्याताईंनी एकांकिकेत कामकरण्यास होकार दिला आणि या दोघांची पहिली एकांकिका ‘चिमणीचे मत कोणाला’ या एकांकिकेच्या दोन वर्षांनंतर १९८५ साली त्यांनी लग्नासाठी आपले मत निश्चित केले आणि सुनील-विद्याचा कलेचा संसार सुरू झाला.


लग्नानंतर आपण याच क्षेत्रात करिअर करणार असल्याचे विद्याताईंनी ठरविले. सुनीलची भक्कमसाथ होतीच, बरोबरच सासर्‍यांनीही सुनेला भरभरून पाठिंबा दिला. याबाबतीत विद्याताई नशीबवान ठरल्या, असे म्हणावे लागेल. ताईंची गुरूवर भक्ती आणि प्रचंड आकलन शक्ती. परंतु, एकदिवस गुरूंनी सांगितले, ‘‘जा बेटा अब मै इतना ही सिखा सकता हूँ. जा अब दुसरा गुरू देख... ’’ हे सर्व ऐकून विद्याताई अचंबित झाली.आजचे गुरू शिष्यांना दूर करत नाही, हे नक्की आहे.


पुढे सुनीलच्या साथीने विद्याताई पंडिता रोहिणी भाटे यांच्याकडे जाऊन शिक्षण घेऊ लागल्या. त्या वेळी नृत्यक्षेत्रातील लय-तालाचे शिक्षण तालयोगी सुरेश तळवलकर यांच्याकडे घेतले. त्याचप्रमाणे तबल्यातील समज ताईंनी जयंत नाईक यांच्याकडून आत्मसात केली.


त्याचवेळी पुण्यात पंडित बिरजू महाराजजी यांच्या वर्कशॉपला जाण्याची संधी ताईला मिळाली आणि ताईने त्या संधीचे सोने केले.


आजही महाराजजींच्या शिष्यवर्तुळात ताईचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ही नाशिककरांच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे. ताईंच्या अनेक कार्यक्रमाला महाराजजी अनेक वेळा उपस्थित राहिले आहेत. हेही मोठे सौभाग्य म्हणावे लागेल. मागे एका कार्यक्रमात महाराजजींनी वाजवलेला तबला नाशिककरांनी अनुभवला आहे आणि हा सुवर्णक्षण आठवणीत जपून ठेवला आहे. हे साध्य झाले विद्याताईंमुळेच. काही वर्षांपूर्वी कमल हसन याच्या ‘विश्वरूपम’ या चित्रपटासाठी महाराजजींनी ताईंवर टाकलेली जबाबदारी तिने समर्थपणे पूर्ण केली आणि या चित्रपटाला नृत्यासाठी राष्ट्रीय पारितोषिकही मिळाले.नृत्य हा आता माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला असून त्यातील समर्पण, सातत्य आणि कल्पनाशक्ती यातून नवी ऊर्जा मिळत आहे, असे विद्या देशपांडे सांगतात.


विद्याताईंचा प्रत्येक आविष्कार लक्षवेधी ठरला आहे. पायाला घुंगरू बांधून नृत्य करणारे असंख्य असतात पण, पायाचे घुंगरू जगण्याला बांधून नृत्यमय होण्याची संख्या दुर्मीळ असते. कला हेच जीवन मानणारी नाशिकमधील थोडी घराणी असतील, त्यात विद्याताईंच्या परिवाराचे नाव घ्यावे लागेल. केवळ देशातच नव्हे, तर परदेशातदेखील विद्याताईंच्या शिष्यांनी आपली कला सादर केली असून ती प्रशंसेस पात्र ठरली आहे. नाशिकच्या सांस्कृतिक वाटचालीत कथक नृत्य क्षेत्रात सातत्याने भरीव योगदान देणारी अग्रगण्य संस्था म्हणजे अभिजात नृत्य नाट्य संगीत अकादमी. या अकादमीतील नृत्यांगनांनी बार्सिलोना, स्पेन येथे कथक नृत्यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करीत नाशिकचे नाव उज्ज्वल केले. गेली २० वर्षे कथक नृत्याचे विधीवत प्रशिक्षण देणारी ही संस्था असून तिच्या संस्थापक-संचालिका विद्याताई देशपांडे या आहेत. त्यांनी उस्ताद हैदर शेख, पंडिता रोहिणी भाटे, पं. सुरेश तळवलकर, पं. बिरजू महाराज या दिग्गजांकडून नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. भारत आणि भारताबाहेर सातत्याने नृत्यप्रस्तुती आणि कार्यशाळा यातून त्यांनी कथक नृत्यकलेचा प्रसार केलेला आहे. याचाच भाग म्हणून स्पेनमध्ये झालेल्या जागतिक नृत्य स्पर्धेमध्ये अभिजात संस्थेच्या नृत्यांगनांनी फ्यूजन प्रकारामध्ये प्रथमक्रमांक, तर रीधून नृत्यासाठी द्वितीय क्रमांक, आणि होरीसाठी तिसरा क्रमांक मिळविला. तसेच प्राग स्पर्धेसाठी विशेष निमंत्रण या संस्थेस मिळाले. या स्पर्धेमध्ये १३ विविध देशांतील स्पर्धकांनी नृत्य प्रकार सादर केले. या सर्वांमधून ‘अभिजात’च्या नृत्यांगनांनी विशेष यश संपादन केले. ‘अभिजात’च्या सर्व उदयोन्मुख कलाकारांनी या स्पर्धेत, भारताचे प्रतिनिधित्व केले. या कलाकारांच्या यशाबद्दल नृत्य व कलाक्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले व नाशिकमध्ये परतताच ढोलपथकाच्या गजरात या सर्वांचे स्वागत करण्यात आले. हा एक अभूतपूर्व सोहळाच अनुभवायला मिळाला. जनस्थान मंडळ तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून विद्याताईंचे कार्य सतत सुरूच असून त्यांच्या आविष्कारामुळे नृत्य रसिकांना सातत्याने नवीन काही मिळते. इतकेच नव्हे, तर काही कार्यक्रमअसला आणि त्यात काही नृत्य सादर करायचे असले की सर्वांना हमखास विद्याताईंची आठवण होते. विविध कार्यक्रमातदेखील त्यांनी नृत्य सादर करून आपण अनेक संस्थांना उपकृत केले आहे. कोणत्याही ज्ञानाचे जेव्हा माहितीत परावर्तन होते, त्या ज्ञानाला प्रतिभेचा स्पर्श होतो, तेव्हा कलावंतांची कला प्रत्येक ठिकाणी नवे रूप धारण करते. तशी नाट्य, नृत्य, कला प्रकारात आपला स्वतंत्र ठसा उमटविणारी प्रतिभावान कलावंत म्हणून आपण ज्यांना ओळखतो त्या विद्या हरी देशपांडे यांचे नाव आज जगभर झाले आहे.




- अभय ओझरकर
@@AUTHORINFO_V1@@