सहकारातील अर्थसाक्षरतेचा वसा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018
Total Views |




एकविसावे शतक हे ‘महिलांचे शतक’ म्हटले तरी वावगे ठरणार नाही. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात महिला देदीप्यमान कामगिरी बजावत आहेत. डोंबिवलीतील कांचनगौरी पतसंस्थेनेही आजच्या घडीला विश्वासार्हता संपादित करून सहकार क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली आहे. या पतसंस्थेचे सलग पाच वर्षे अध्यक्षपद भूषविणार्‍या उर्मिला प्रभूघाटे यांचे व्यक्तिमत्त्व हे निश्चितच उद्योजक तसेच नोकरदार युवती आणि महिलांसाठी प्रेरणादायी असे आहे.

 
प्रभूघाटे या मूळच्या कोकणातील. चिपळूण तालुक्यातील खेरडी या गावचा त्यांचा जन्म. त्यांचं शिक्षणही चिपळूण तालुक्यात झालं. वाणिज्य शाखेची पदवीही त्यांनी चिपळूणमधूनच घेतली. तसेच हायर डिप्लोमा इन कॉपरेटिव्ह मॅनेजमेंटची पदवीही त्यांनी संपादित केली. बँकिंग क्षेत्राची आवड असल्याने शासनाचा ‘कमर्शियल डिप्लोमा’ ही त्यांनी पूर्ण केला.


पुढे नोकरीच्या शोधात त्यांनी मुंबई गाठली आणि मुलुंड येथील एका शाळेत नोकरी पत्करली. तब्बल ३६ वर्षं त्यांची या शाळेत सेवा झाली. पुढे रा. स्व. संघाचे अनंतराव कुलकर्णी यांच्या ओळखीने त्यांचे नाते ‘कांचनगौरी पतपेढी’ शी जोडले गेले व त्यानंतर त्या या संस्थेत रुजू झाल्या. गेली २४ वर्षे संचालिका म्हणून प्रभूघाटे अगदी जबाबदारीने कांचनगौरी पतपेढीचे काम पाहात आहेत आणि आता तर संस्थेच्या अध्यक्षपदाची धुराही त्यांनी समर्थपणे हाती घेतली आहे.


महिलांसाठी महिलांद्वारे चालवलेल्या आणि डोंबिवली ग्राहक कल्याणकारी संस्थेच्या १६ शाखांमधील कार्यरत महिला कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘कांचनगौरी’ या डोंबिवलीतील महिला सहकारी पतपेढीने आपल्या कर्तृत्वाने एक विशेष स्थान निर्माण केले आहे. या पतपेढीचे अध्यक्षपद समर्थपणे सांभाळणार्‍या उर्मिला प्रभूघाटे यांनी सहकाराच्या माध्यमातून कामकरताना आपल्या कामाची, संस्थेची एक विशेष छाप पाडली आहे. महिला पतसंस्था स्थापन करून तिच्या कोट्यवधींच्या ठेवी उभं करण्याचं कामकांचनगौरी पतसंस्थेने केले आहे. यातूनच सहकाराच्या अर्थाची आणि महिला सक्षमीकरणाची मुद्रा जनमानसात उमटविण्यात संस्थेला यश मिळवून देण्यात त्यांचा आणि सहकारी महिला पदाधिकार्‍यांचा मोलाचा वाटा आहे. प्रभूघाटे यांनी आजवरची पतपेढीची सांगितलेली यशोगाथा खरोखरच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. १९८२ साली अनंतराव कुलकर्णी, मधुकरराव भागवत यांच्यासह काही मंडळी ‘सहकार भारती’ च्या सांगली येथील संमेलनाला गेली होती. तेथून परतताना झालेल्या चर्चेदरम्यान डोंबिवली ग्राहक संघाच्या महिलांना एकत्रित करून महिलांची एक संस्था स्थापन करण्याचा विचार पुढे आला. यावर डोंबिवली ग्राहक कल्याणकारी संस्थेच्या १६ शाखांमधून कार्यरत असलेल्या महिला कार्यकर्त्यांना एकत्र करून सभासद जमविण्याच्या कामाला सुरुवात झाली. यामध्ये इंदूताई बापट आणि मीरा भागवत यांचे विशेष योगदान राहिले. यावेळी पार पडलेल्या बैठकांमधून पतपेढी स्थापन करण्याचा विचार पक्का झाला आणि २ मे १९८२ या अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर ’कांचनगौरी महिला पतपेढी’ची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि महिलांनी महिलांसाठी महिलांद्वारे चालविलेल्या या कारभाराची सुरुवात झाली. प्रारंभीच्या काळात फळं आणि भाजीविक्रेत्या महिलांकडे लक्ष केंद्रित करण्यात आले. त्यांच्याकडून फळं-भाजी खरेदीही करण्यात आली आणि त्यांना मिळणार्‍या पैशांची बचत कशी करायची, याचे धडे त्या कष्टकरी महिलांना देण्यात आले. त्यांचे पतपेढीमध्ये खाते उघडून बचतीचा शुभारंभ करण्यात आला. सुरुवातीला ११ जणींचे संचालक मंडळ पदावर आरूढ झाले. इंदूताई बापट यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे हे कामधडाडीने सुरू राहिले. पतपेढीचे कामशिस्तीत कसे चालेल, याला विशेष प्राधान्य देण्यात आले. कुठल्याही राजकीय किंवा सत्ताधार्‍यांच्या हस्तक्षेपाशिवाय नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. आजवर पतपेढी कायमआपला ‘अ’ वर्ग दर्जा टिकवून आहे. अशा या कांचनगौरी पतपेढीने सर्वसामान्यांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. येथे कामकरणारे कर्मचारी हे कायमस्वरूपी असून संचालक मंडळात कामकरणार्‍या महिलांचे कर्तृत्व वाखाणण्याजोगे आहे. कांचनगौरी पतपेढी हे एक कुटुंब आहे, हीच भावना सुरुवातीपासून संचालक मंडळाकडून जोपासण्यात आल्याचे प्रभूघाटे सांगतात. सर्व कर्मचारी, सल्लागार आणि हितचिंतकांनी वेळोवेळी केलेल्या सहकारावर पतपेढीचा आलेख नेहमीच चढता राहिला आहे. आजघडीला पतपेढीचे १८ हजारांपर्यंत सभासद असून त्याचबरोबर २१ हजार पुरुष नाममात्र सभासद आहेत. त्यांनाही कांचनगौरी कर्ज देते. आजमितीला कांचनगौरीच्या मुख्य कार्यालयाशिवाय अजून १२ शाखांमध्ये ही पतपेढी कार्यान्वित आहे. डोंबिवली पूर्व, विष्णूनगर, गांधीनगर, उमेशनगर, एमआयडीसी, कोपर, ठाकुर्ली, निळजे, टिटवाळा, घोट्‌सई, वाशिंद, बदलापूर या भागांमध्ये पतपेढीचा कार्यविस्तार झाला आहे. वेळेवर कर्जाची उपलब्धी, पात्र व गरजू व्यक्तींना शिक्षण, घरखरेदी, व्यवसायासाठी वेळेवर कर्ज देणे, वृक्षारोपण, ऊर्जा संरक्षण, पावसाच्या पाण्याची साठवण अशा सामजिक कार्यासाठी आर्थिक साहाय्य करण्यामध्येही पतपेढी अग्रेसर आहे. आदिवासी कल्याणकारी कार्य या माध्यमातून आदिवासी समाजातील लोकांना एकत्र करून त्यांना शिक्षणाच्या साहाय्याने व आर्थिक मदतीने सक्षमकरून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कामही पतपेढी करत असल्याकडे प्रभूघाटे लक्ष वेधतात. संपूर्ण महाराष्ट्रभर शाखा उघडून स्वच्छ कार्यपद्धती, उत्तमग्राहक सेवा व आधुनिक तंत्रज्ञान ही पतपेढीची उद्दिष्टे असल्याचे उर्मिला प्रभूघाटे सांगतात. गावागावात जाऊन महिलांसाठी आरोग्य तपासणी केली जाते, त्यांना औद्योगिक प्रशिक्षण दिले जाते. तसेच, ठाणे जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव केला जातो. कोकण महिला संस्था फेडरेशनची निर्मिती करण्यात आली असून महिला पतसंस्थांना मदत करण्याच्या अनुषंगाने आर्थिक सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील असल्याचेही प्रभूघाटे म्हणाल्या. पतपेढीच्या आजवरच्या वाटचालीबद्दल ‘आदर्श डोंबिवलीकर’ व ‘सहकार भारती’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे, तर ‘फेसकॉम’ कडून ‘आदर्श पतपेढी’ असा सन्मान प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर गणेश मंदिर संस्थानाच्या वतीने आयोजित नववर्ष स्वागतयात्रेतही पतपेढीच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. तसेच संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत शाखांव्यतिरिक्त भागात जाऊन दानाचे महत्त्व समजावणे व त्यांना दान करायला लावत ‘संक्रात दान पात्र’ हा अभिनव उपक्रमहाती घेण्यात येतो. या जमा झालेल्या दानातून सार्वजनिक विवाहांचे आयोजन तसेच नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत पुरवली जाते. त्याचबरोबर पतपेढीच्या वार्षिक नफ्यातून ठराविक रक्कम‘धर्मादाय निधी’ म्हणून काढला जातो व या निधीतून महिलांसाठी, लहान मुलांसाठी कामकरणार्‍या संस्थांना दरवर्षी तो दिला जातो. तसेच समाजातील वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी ‘पुस्तक पेढी दाना’चेही कार्य कांचनगौरी पतपेढीच्या वतीने केले जाते. ‘‘मी अध्यक्षपदी असली तरी उपाध्यक्षा रेखा दुधे आणि सविता कुलकर्णी तसेच संयुक्त चिटणीस म्हणून उषा बोबडे, लक्ष्मी अय्यर, संगीता ताम्हणकर यांच्यासह संचालिका शैलजा खंदारे, सीमा पाटणकर, माधुरी जोगी, दिपाली गोडबोले, विनया करंबेळकर, अंजली गोरे, अपर्णा पाठक, संगीता पाठक, सुधा व अन्य पदाधिकार्‍यांच्या सहकार्याने पतपेढीचा कारभार समर्थपणे सांभाळत आहेत आणि याच कर्तृत्ववान महिलांच्या पुढाकाराने डोंबिवलीसारख्या सुसंस्कृत शहरात कांचनगौरी महिला पतपेढी अभिमानाने आणि विश्वासाने सुरू असल्याचे प्रभूघाटे सांगतात.


तेव्हा, प्रभूघाटे यांच्या मेहनतीला, कर्तृत्वाला सलाम आणि कांचनगौरी पतपेढीच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा!


- रोशनी खोत
@@AUTHORINFO_V1@@