संवेदनशील भातृभावाची समरस गाथा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018   
Total Views |

भटक्या-विमुक्त विकास परिषदेतर्फे पालावरच्या शाळेत नोकरी करताना भटक्या-विमुक्त बांधवांचे पशुपेक्षाही बत्तर जीवन उमाकांत मिटकर यांनी पाहिले. त्यांच्या दुःखाने उमाकांत मिटकरांच्या मनात दैवी अंशाचे सत्व जागले. पालावरच्या दु:खाला दूर सारता सारता त्यांचे जगणे स्वत:च एक कल्याणाचा मार्ग बनला. उमाकांत यांचे जगणे म्हणजे संवेदनशील भातृभावाची समरस गाथाच आहे.


गुरूजी डुकराचं मटण आन मागून आणलेल्या भाकरी खाताव का? दिवाळीचा दिवस होता... माझ्यावर उमरग्याच्या पालावरच्या मसणजोगी समाजाच्या शाळेची जबाबदारी आली होती. समाज नीट समजावा म्हणून मी पालावरच राहात होतो पण, सुरुवातीला माझ्याशी कुणीही बोलायला तयार नसे. कामाला सुरुवात करायला अडचण येत होती. ती अडचण म्हणजे समाजाचा विश्वास कसा संपादन करायचा? कुणी बोलायलाच तयार नसे. या आत्यंतिक निराशेतून दु:खी होऊन भर दिवाळीत पालावरच्या अंधाराला झेलत मी अस्वस्थ बसलो होतो. रात्र झाली होती. निराशेने मी दिवसभर काहीच खाल्लेही नव्हते. या दुर्गमभागात रात्री अन्न मिळणेही दुरापास्तच. आत्यंतिक निराशेत असतानाच गंगारामआला होता. त्याने डुकराचे मटण आणि मागून आणलेल्या भाकरी खाणार का, म्हणून विचारले होते. भुकेची जाणीव झाली... पण डुकराचे मटण? पण, पहिल्यादंाच पालावरचे कुणीतरी माझ्याशी आपुलकीने बोलले होते. काही एक विचार न करता गच्च डोळे मिटून मी तो पहिला घास खाल्ला आणि तिथूनच माझे ऋणानुबंध पालावरच्या बांधवांशी जुळले...’’


नळदुर्गच्या सुशिक्षित माळकरी समाजातले युवक उमाकांत मिटकर. अर्थाजनाचा स्त्रोत म्हणून उमाकांत पहिल्यांदा उमरग्याच्या पालावर कामाला रूजू झाले. तिथल्या मसणजोगी समाजाला त्यांनी आपलेसे केले. भटके-विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून त्यांनी कामाला सुरुवात केली. यमगरवाडी प्रकल्प उमरगा, बीड, किल्लारी या भागामध्ये मसणजोगी वस्तीत राहून समाजसेवेला त्यांनी वाहून घेतले. त्याचबरोबर निवट, धार्मबाद नांदेढ भागातील भिल्ल, आंध्र, कोलामसमाजावर त्यांनी कामकेले. चंदनाला आपल्या सुवासिकतेची जाहिरात करावी लागत नाही, तसेच उमाकांत यांना आपल्या सेवाभावी व्रतस्थ जीवनाची जाहिरात करावी लागली नाही. उमरग्याच्या पालावरच्या भटक्या समाजबांधवांमध्ये झालेला कल्याणकारी आमूलाग्र बदल उमाकांतच्या ध्येयवादी जगण्याची साक्ष देऊ लागला. भटक्या विमुक्त समाजाच्या उत्थानासाठी पालावरची शाळा चालवताना या समाजबांधवांचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल, याबाबत उमाकांत अहोरात्र विचार करीत, अभ्यास करीत, योजना ठरवित आणि त्याची अंमलबजावणीही करीत. त्यातूनच मग त्यांच्या कामाच्या चाकोरीबाहेरचे कामही ते तन्मयतेने करायचे. पालावरच्या बांधवांसाठी जाणीवजागृती शिबीर, आरोग्य शिबीर, त्यांनी स्वावलंबी व्हावे, आत्मनिर्भर व्हावे यासाठी वेगवेगळे सामाजिक प्रयोग करू लागले.


हे करताना कित्येक दिवस उमाकांतना पार्लेजी बिस्कीट खाऊन राहावे लागले. पालावर पाण्याचे दुर्भिक्ष्य म्हणून १५-१५ दिवस आंघोळीविना राहावे लागले. पण, सुरुवातीला नोकरी म्हणून उमरग्याला आलेले उमाकांत आता अंतर्बाह्य बदलून गेले होते. ‘बुडिते हे जन देखवे ना डोळा’ ची अनुभूती या पालावरच्या समाजबांधवांच्या जगण्यातून त्यांच्या अंत:करणात उमलली. ‘न हिंदू पतितो भव’चे स्फुल्लिंग त्यांच्या मनात स्फुरले होते. त्यामुळे उमाकांत यांच्या मनातील आपपर भाव जाऊन केवळ भटके- विमुक्त बांधवांचे जगणे माणसासारखे कसे होईल, यासाठीचा भावच जागृत होता.


हे सगळे करत असताना उमाकांत बीएड् करण्यासाठी पुण्याच्या स्पायसर मेमोरियल कॉलेजमध्ये शिकले. २००७ साली १५०० देशी-विदेशी विद्यार्थ्यांमधून त्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार घेाषित झाला. त्यामुळेच की काय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पॅट्रिक मॅन्यो यांनी उमाकांत यांना महाविद्यालयात प्राध्यापकी करण्याची संधी देऊ केली गेली पण, उमाकांत यांनी ती संधी चक्क नाकारली. अशक्य केवळ अशक्य.. नळदुर्गच्या निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातल्या तरुणाला चालून आलेली संधी. पण त्याने ती का नाकारली? यावर उमाकांत म्हणतात की, ‘‘हो, माझ्या कुटुबीयांनासुद्धा मी ही संधी नाकारू नये असेच वाटत होते पण, पालावरच्या शाळेचे कामआता कुठे सुरू झाले होते. माझ्या बांधवांसाठी सुरू झालेले काममी असे अर्धवट टाकून कसे जाऊ शकणार होतो? त्यांच्या जीवनाला आता कुठे मी समजू शकलो होतो, त्यानुसार आता कुठे कामकरू लागलो होतो. पालावरच्या समाजबांधवांच्या माझ्याकडून अपेक्षा-आशा नव्हत्या, पण त्यांचे प्रेम, त्यांचा विश्वास यांच्याशी माझे युगायुगाचे नाते जोडले गेले होते. ते मी कसे तोडू शकत होतो?’’


- योगिता साळवी
@@AUTHORINFO_V1@@