सेवाक्षेत्रात विश्वासार्ह स्थान निर्माण करणारा उद्योजक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018
Total Views |
 

 
उद्योग निर्माण करणारे आणि रोजगार देणारे हात निर्माण झाल्यास देशाच्या अर्थकारणाला गती मिळते. या उक्तीनुसार आपणही उद्योजक बनावे, रोजगार निर्माण करावेत, असे मुंबई महानगरपालिकेचे ‘एम’ पश्चिमप्रभाग समितीचे अध्यक्ष आणि उद्योजक सुषम सावंत या तरुणाला वाटले. त्यानुसार त्यांनी वाटचाल सुरू केली आणि अनेक अडीअडचणींवर मात करत आपल्या व्यवसायात ते स्थिरावले. तेव्हा, सुषम सावंत यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा हा लेख...
 
 
उद्योजक बनण्याचा निश्चय करण्यासाठीच मोठी हिंमत, बळ मनोमन एकवटावे लागते. नेमका कसला उद्योग सुरु करावा? उद्योगाची सुरुवात कशी करावी? बाजाराची काय स्थिती आहे? आजच्या स्पर्धेच्या युगात आपण टिकू का? गुंतवलेल्या भांडवलाच्या बदल्यात मोबदला मिळेल का? नुकसान झाले तर काय? या आणि अशा अनेक बाबी उद्योग सुरु करण्यापूर्वी प्रत्येक उद्योजकाला अस्वस्थ करुन जातात. उद्योजक सुषम सावंत यांनाही या चिंतांचा सामना करावा लागला. पण, मोठ्या हिकमतीने त्यांनी या उद्योजकीय आव्हानांना तोंड दिले आणि यशस्वी असा उद्योजकीय प्रवास यशस्वी करुन दाख़विला. त्यांनी सुरक्षारक्षक पुरविणे आणि हाऊस किपिंग सेवा देण्याचा व्यवसाय सुरू केला आणि आज त्यांच्या कंपनीने ग्राहकांच्या मनात मानाचे स्थान निर्माण केले.
 
 
सुषम सावंत हे अखिल भारतीय परिषदेचे कार्यकर्ते. परिषदेचे पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यामुळे नेतृत्व, जिद्द, निर्भीडपणा, निस्वार्थीपणा, परोपकारी वृत्ती, आणि अहर्निश कार्य करणे हे गुण त्यांच्या अंगी अगदी स्वाभाविकपणे दिसतात. याच गुणांचा फायदा त्यांना व्यवसाय सुरू करताना झाला आणि आजही या गुणांच्या, कौशल्याच्या बळावरच त्यांच्या उद्योगाची भरभराट झाली आहे. कोकणातील कुडाळमधील गिरलोक गावी सुषम यांचे पाचवीपर्यंतचे शिक्षण झाले. उर्वरित शिक्षण मुंबईत झाले. त्यांनी कीर्ती महाविद्यालयातून कला शाखेची पदवी घेतली आहे. १९९९ साली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून सुषम सावंत यांनी कार्य थांबवले. घरी परतल्यानंतर त्यांच्यासमोर अनेक पर्याय होते. परंतु, नोकरी करायचीच नाही, असा पणच त्यांनी केला होता. करायचा तर व्यवसायच, असा ठाम निर्धार सावंत यांनी केला होता. यानंतर काय करता येऊ शकेल याचा शोध सुषम घेऊ लागले. बाजार परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर त्यांना काही पर्याय सापडले. त्यापैकी गिफ्ट आर्टिकलच्या व्यवसायात ते उतरले. हे त्यांनी टाकलेले पहिले उद्योजकीय पाऊल. जिद्दीच्या जोरावर अत्यंत कमी वेळात त्यांनी या व्यवसायात यश मिळविले. त्यांना यश मिळाले खरे, पण त्यात सुषम यांचे मन समाधानी नव्हते. त्यामुळे नवीन व्यवसाय करता येईल का, याची चाचपणी त्यांनी सुरु केली. याच दरम्यान स्वदेशी मार्केटिंगशी ते जोडले गेले. स्वदेशी मार्केटिंगच्या निमित्ताने मुंबई आणि महाराष्ट्रभर त्यांचा प्रवास सुरू झाला. यासोबतच त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचं काम सुरू केलं. या प्रवासात अनेक माणसे त्यांच्याशी जोडली गेली. त्यांना अनेक नव्या गोष्टी शिकता आल्या. मार्केटिंगशी संबंधित अनेक सूक्ष्मबाबीं त्यांना समजू लागल्या.
 
 
तरीही सुषम यांचे ध्येय वेगळे होते. आपली स्वप्न पूर्ण होण्यासाठी सर्वच जण झटतात, ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. परंतु, सुषम यांना तसे करायचे नव्हते. त्यांना सभोवताली असलेल्या प्रत्येकाचे स्वप्न आपल्या माध्यमातून पूर्ण झाले पाहिजे, असे वाटत होते. या दृष्टिकोनातून त्यांच्या व्यावसायिक आयुष्याला एक कलाटणी मिळाली. बाजारात सध्या कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज आहे, याचा अभ्यास सुरू असतानाच त्यांना जाणवले की, सेवाक्षेत्रात मोठी मागणी आहे. यानंतर त्यांनी कर्मचार्‍यांची जुळवाजुळव सुरू केली आणि सुरक्षारक्षकांची आणि हाऊसकिपिंग सेवा पुरवणे या व्यवसायात प्रवेश केला. मोठमोठ्या कंपन्यांना सुरक्षारक्षक आणि हाऊसकिपिंगला माणसे हवी असतात. परंतु, ती विश्वासार्ह असावी लागतात. अशा कामगारांची जुळवाजुळव करणे हे मोठे आव्हान असते. हे आव्हानही सुषम यांनी समर्थपणे पार पाडले. त्यासाठी त्यांनी स्वतःची अशी खास पद्धतही विकसित केली. ग्राहक कंपन्यांच्या अपेक्षा, कामगारांच्या अडचणी, कागदपत्रांची जोडणी अशा अनेक आघाड्यांवर एकाचवेळी लढायचं असतं. पण, विद्यार्थी परिषदेच्या अनेक मित्रांची मदत, पूनम महाजन यांचे पाठबळ, त्यांनी ठेवलेला विश्वास ही आव्हाने पेलण्यासाठी समर्थ ठरल्याचे सुषम सावंत सांगतात.
 
 
 
‘‘या क्षेत्रात प्रवेश केला म्हणजे सर्व मिळाले किंवा आपण सहज यशस्वी होऊ असे नाही. हे क्षेत्र असे आहे की, जिथे फक्त माणसांचं काम असतं आणि जिथे रोज एक नवीन आव्हाने तुमची वाट पाहत असतात,’’ असे सुषम सांगतात. दोन ते तीन हाऊसकिपरची एक साईट अशी सुरुवात त्यांनी केली. आज ३०० हून अधिक लोक त्यांच्यासोबत काम करत आहेत. आज हिरानंदानी, शापूरजी पालनजी, युरेका कॉल सेंटर सारख्या कंपन्या आज त्यांच्या ग्राहक यादीमध्ये आहेत. आज त्यांच्या कंपनीला ISO मानांकन तसेच OHS­S certification मिळालेलं आहे. ‘‘ग्राहक कंपन्यांकडून पैसे मिळोत किंवा नाही, परंतु गार्ड आणि हाऊसकिपिंगमध्ये काम करणार्‍या प्रत्येक माणसाला दर महिन्याला वेतन मिळतेच. वेतन हातात मिळाल्यानंतर जो आनंद त्यांच्या डोळ्यात दिसतो तोच खरंतर माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण असतो,’’ असे सुषम सांगतात.
 
 
 
एमसी सेवा
 
 
­गृहनिर्माण सोसायट्यांसाठी सुषम यांनी एमसी ही नवीन सेवा आणली आहे. तुम्ही जर एखाद्या सोसायटीचे पदाधिकारी असाल, तर तुम्हाला ही सेवा किती महत्त्वाची आहे ते कळेल. कारण, या एमसीमध्ये सावंत यांनी सहा महत्त्वाच्या सेवा सहभागी केल्या आहेत. यामुळे इमारतीच्या देखभालीच्या चिंता दूर होणार आहेत.
 
 
 
२०२० पर्यंत पाच हजार जणांना रोजगार
 
 
२०२० पर्यंत पाच हजार जणांच्या घरी आपल्या माध्यमातून चुली पेटल्या पाहिजे, हा संकल्प सुषम यांनी केला आहे. त्यानुसार त्यांनी नियोजनही केले आहे. रोजगार निर्माण करणे हे त्यांचे ध्येय आहे. रोजगारामुळे अनेक संधी निर्माण होतात. अनेक हातांना काम मिळते आणि देशाची अर्थव्यवस्था सुदृढ बनते, असे सुषम सांगतात.
 
 
त्यामुळे सुषम सावंत यांचा उद्योजकीय प्रवास हा निश्चितच पथदर्शक असून आजच्या तरुणांनीही उद्योग सुरु करण्याचा विचार करताना नवनवीन क्षेत्रांचा विचार जरुर करावा. सुषम सावंत यांना महा एमटीबीच्या परिवाराकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
 
 
 
- नितीन जगताप

 
@@AUTHORINFO_V1@@