महिलांना आत्मविश्वास देणारी ‘वॉकेथॉन’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018
Total Views |



नाशिकमधील महिलांची ‘वॉकेथॉन’ महिलांना आत्मविश्वास देणारी ठरली असून आपले आरोग्य जपणे आणि कुटुंबातील प्रमुख घटक म्हणून काम करताना ही ऊर्जा प्रेरक ठरते. विशेष म्हणजे, यातून नवनवे उपक्रम सुरू होत असून महिलांची आर्थिक स्थिती आणि साहस वाढविण्यासाठीदेखील पुढील काळात काम केले जाणार आहे.


घरातील कर्तापुरुष’ असे म्हणण्याची एक प्रथा आहे. मात्र, अनेक बाबी घरातील महिला सांभाळत असतात. त्या अर्थाने घरातील कर्ती स्त्रीच असते. मात्र, विविध जबाबदार्‍या सांभाळताना स्त्रीचे आपल्या आरोग्य, करिअर, स्वातंत्र्य, आवडीनिवडी जोपासणे याकडे दुर्लक्ष होत असते. विशेष म्हणजे आईच्या सवयी आणि काम करण्याची पद्धत यांचा सर्वाधिक प्रभाव मुलांवर होत असतो. अनेकदा तर तो वडिलांच्या प्रभावापेक्षा जास्त असतो. मुलांवर प्रत्यक्ष वागण्यातून आईकडून उत्तम संस्कार होण्यासाठी तिच्यात आत्मविश्वास असणे आवश्यक असते. त्यासाठी तिचे आरोग्य चांगले असायला हवे. या सर्व बाबींचा विचार नाशिकच्या सोनाली दाबक करू लागल्या. त्यासाठी कारणीभूत ठरले त्यांचे दुखणे. त्यांना दम्याचा आजार असल्याने एकेकाळी चार पावले टाकणेदेखील अशक्य होत असे. मग भरपूर फिरणे, जीना चढणे किती कठीण होत असेल याची कल्पनाच केलेली बरी! स्वतःच्या या आरोग्य समस्येतून त्यांनी मोठे सामाजिक कार्य उभे केले, हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल. सोनाली श्रीपाद दाबक यांनी सुरू केलेले ‘वुमेन्स वॉकेथॉन’चे कार्य कसे बहरले याची त्यांनी सांगितलेली कहाणी मोठी मनोरंजक आहे.



सोनाली दाबक या मूळच्या नाशिकच्याच. तळवेलकर हे त्यांचे माहेरचे आडनाव. शालेय शिक्षण, कॉलेज, लग्न, लग्नानंतर घरच्या उद्योगात प्रशासकीय जबाबदारी सांभाळणे, त्यानंतर फावल्या वेळेत स्विमिंग, कथक नृत्य शिकणे असे त्यांचे ठराविक रुटीन. २०१२ मध्ये त्यांना अस्थमाने ग्रासले. हा त्रास खूप वाढला. डॉक्टरांचे म्हणणे होते की, नाशिकच्या हवामानाचीच त्यांना ऍलर्जी आहे. होमिओपॅथी, आयुर्वेद, ऍलोपॅथी असे विविध उपचार त्यांनी केले. त्या काळात त्रास इतका बळावला की, थोडेसे चालले तरी धाप लागू लागली. याकाळात पती श्रीपाद यांनी त्यांना उभारी दिली. नुकतेच अनुक्रमे १०, २१, ४१ किमी मॅरेथॉन शर्यतीत भाग घेऊन आल्याने आपल्या पत्नीने चालायला हवे, असे त्यांना वाटत होते. तोंडाला मास्क लावून का होईना चालले पाहिजे, असे त्यांनी सोनाली यांना सांगितले. अस्थमा नियंत्रणात ठेवून मग चालण्याचा सराव सुरू झाला. पतीने दिलेली जिद्द आणि आत्मविश्वास यांचे टॉनिक कामी आले आणि सोनालीजी चालू लागल्या. सर्वप्रथम त्या जेव्हा एक किलोमीटर चालल्या, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास परतला. ऑगस्ट २०१६ मध्ये झालेल्या मॅरेथॉनमध्ये त्यांनी १० किलोमीटर चालून आपला आत्मविश्वास वाढविला. या सर्व अनुभवातून महिलांना आत्मविश्वास मिळण्यासाठी घरातून बाहेर काढून आपणदेखील काही करू शकतो, असे वाटावे यासाठी काहीतरी करावे असे त्यांना वाटू लागले. त्यातून ‘वुमेन्स वॉकेथॉन’चा जन्मझाला. चालणे हे नैसर्गिक व्यायामासारखे आहे. धावणे कठीण असले तरी कोणत्याही वयाचे स्त्री-पुरुष चालू शकतात. चालल्याने आरोग्य चांगले राहते. या विचारातून मार्च २०१६ मध्ये सकाळी माहिला दिनानिमित्त ‘वुमेन्स वॉकेथॉन’ आयोजित करण्यात आली. दोनशे-अडीचशे महिला त्यात सहभागी होतील, अशी अपेक्षा होती. व्हॉट्‌सऍपवर याबाबत संदेश देताच तब्बल १२०० महिलांनी नावे नोंदविली. अनेक महिलांना सहभागी होता येणार नाही, असे सांगावे लागले. जगात कुठेही नसलेली ‘महिला वॉकेथॉन’ अशा तर्‍हेने प्रचंड यशस्वी झाली. या ‘वॉकेथॉन’मध्ये अनेक महिलांनी सुंदर सुंदर संदेश देखील आणले होते. ‘वॉकेथॉन’मध्ये चालणे म्हणजे नेहमी आपण चालतो तसे नसते. त्यासाठी आधी वॉर्मिंग अप आणि नंतर शीण घालविण्यासाठी व्यायामअशी पद्धती आहे. ‘वॉकेथॉन’ची चळवळ गेली तीन वर्षे सुरू असून यंदा ४ मार्च रोजी झालेल्या या उपक्रमात २५०० महिला सहभागी झाल्या होत्या. सर्व जाती-धर्माच्या तसेच सर्व समाजघटकांचा सहभाग तर त्यात होतात. पण, लहान मुलींपासून ८५ वर्षांच्या आजीबाईदेखील उत्साहाने आल्या होत्या. महिलांचे पतीदेखील तसेच मुले देखील कुतुहलाने हे पाहण्यासाठी येत असतात. सध्या सोनाली दाबक यांना या आयोजनासाठी आणखी ६० महिला मदत करीत असतात.




या उपक्रमात सहभागी महिलांना उत्कृष्ट वेशभूषा, उत्कृष्ट एनर्जी, उत्कृष्ट ग्रुप अशी विविध बक्षिसे तसेच सहभागी महिलांना लोगोदेखील दिले जातात. तसेच महिला फिटनेस प्रतिज्ञादेखील घेतली जाते. या उपक्रमातील महिला आता अन्य स्पर्धांतूनदेखील भाग घेऊ लागल्या आहेत. लोकमत आणि पोलिसांनी राबविलेल्या स्पर्धांत या ग्रुपमधील अनेक महिलांचा लक्षणीय सहभाग होता. महिला एकत्रीकरण, आत्मविश्वास जागृती, महिलांना व्यासपीठ, विधायक कार्य प्रेरणा यातून मिळते, असे सोनाली सांगतात. यातून महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या रविवारी ‘वॉकेथॉन’ आयोजित केली जाते. त्यात २५० हून अधिक महिलांनी नावे नोंदविली असून ५०-६० महिला सहभागी होत असतात. त्याबरोबरच ‘मूनवॉक’ देखील पौर्णिमेस आयोजित करण्यात आली होती. त्र्यंबक रोडवरील एबीबी सर्कलपासून ते त्र्यंबकेश्वरपर्यंत चालत जाण्यासाठी रात्री ९.३० नंतर सातजणी उपस्थित होत्या. पहाटे त्र्यंबक येथे पोहोचून त्या सकाळी परत बसने नाशिकला परतल्या. रात्री पायी प्रवास हा वेगळाच सुखद अनुभव होता. अशा उपक्रमांना नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघलदेखील सहकार्य करतात. या अत्यंत नावीन्यपूर्ण संकल्पना असून कुठेच त्या राबविल्या जात नाहीत. पुढील काळात ‘हेल्थ वेल्थ ऍडव्हेन्चर’ म्हणजे महिलांचे आरोग्य, त्यांची आर्थिक स्थिती सुधारणे आणि त्यांना साहसी बनविणे यासाठी आणखी उपक्रम राबविण्याचा मनोदय दाबक यांनी व्यक्त केला आहे. ऊर्जावान महिला शक्तीचे आगळे दर्शन या उपक्रमातून घडत असून भावी काळातदेखील त्याचा लाभ केवळ महिलांनाच नव्हे, तर संपूर्ण समाजाला होऊ शकेल.


- पद्माकर देशपांडे
@@AUTHORINFO_V1@@