अभिनवतेचा ध्यास हाच पितांबरीचा श्वास!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018
Total Views |
 

 
 
जग जाईल त्याच मार्गाने जाणारे गतानुगतिक जगात असंख्य असतात. परंतु काही जण असे असतात की, जे स्वत:ची स्वतंत्र वाट तयार करतात आणि असंख्य जणांसाठी त्याचा मार्ग बनतो. अर्थात, त्यासाठी केवळ नाविन्याची ओढ असून चालत नाही. सखोल अभ्यास, निरंतर प्रयत्न, परिश्रमांची तयारी आणि आपल्यासोबत अनेकांना घेऊन जाण्याची क्षमता असे अनेक गुण असावे लागतात. अशा लोकोत्तर व्यक्तींमध्ये ज्यांचं नाव आदराने घेतलं ते म्हणजे पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई.
 
 
रवींद्र प्रभुदेसाई यांच्या वडिलांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय. या व्यवसायाच्या माध्यमातून विविध कंपन्यांना भेटी देण्याची संधी, नवीन काहीतरी करण्याची उमेद मनात होती, काहीतरी उद्योगधंदा उभा करावा, अशी कल्पना त्यांना यातूनच सुचली. शिक्षणापेक्षा खेळ आणि उद्योग यांची अधिक आवड असल्यामुळे केवळ पाच हजारांची गुंतवणूक करून पितांबरी, या तांबा-पितळ चमकविणार्‍या पावडरची निर्मिती केली. त्या इवल्याशा रोपट्याचं आता वटवृक्षात रूपांतर झालं. ’’पण त्याचं श्रेय मात्र मी ज्यांना दैवत मानतो ते माझे वडील व माझ्या असंख्य ग्राहकांना आहे,’’ असं रवींद्रजी आवर्जून आदराने सांगतात.
 
 
ठाणा कॉलेजमधून बी.एस्सी. करत असतानाच त्यांनी जिल्हा उद्योग केंद्रामधून विविध उत्पादनं तयार करण्यासंबंधीच्या कोर्सेसची माहिती मिळवली. त्यानुसार घरच्या घरीच लिक्विड सोप, सॉलिड फ्युअल अशी उत्पादनं तयार करत होते. बाजारात कपडे धुण्यासाठी साबण, पावडर, भांडी घासायची पावडर यांचे अनेक प्रकार होते. त्यामुळे यापेक्षा वेगळं काहीतरी करण्याचे प्रयत्न चालू होते. तेव्हाच तांबा-पितळ चमकवणारं एखादं उत्पादन तयार करावं अशी कल्पना डोक्यात आली आणि ‘कॉपशाइन’ नावाची एक पावडर तयार केली. मध्यंतरीच्या काळात त्यांनी मोझॅक टाइल्स बनवणारी एक कंपनी चालवायला घेतली होती. परंतु, मॅन्युफॅक्चरिंग आणि मॅनेजमेंट यांची काहीच माहिती नसल्याने त्यात नुकसान झालं आणि तो प्रयत्न अयशस्वी झाला. उद्योग करायचा असेल तर व्यवस्थापन अर्थात मॅनेजमेंट या विषयातलं ज्ञान आवश्यक आहे, याची जाणीव या अनुभवातून झाली आणि म्हणूनच ठाणा कॉलेजमधूनच ‘डिप्लोमा इन बिझनेसमेंट’च्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. त्यातूनच एफएमसीजी या संकल्पनेशी त्यांचा परिचय झाला. ‘कॉपशाइन’ला मोठ्या हॉटेलमधून घाऊक मागणी येत होती, परंतु व्यवसाय टिकवायचा आणि वाढवायचा असेल तर केवळ अशा घाऊक खरेदीवर अवलंबून न राहता ‘कॉपशाइन’ला छोट्या छोट्या पॅकमधून कन्झ्युमर प्रॉडक्ट म्हणून बाजारात आणायचं, असं रवींद्रजींनी ठरवलं. डीबीएमच्या प्राचार्यांना ही कल्पना सांगितली, पण त्यांनी मात्र तांब्यापितळ्याला आता मागणी नसल्याने, असा निर्णय घेऊ नको, असा सल्ला दिला. पण, या सल्ल्याने रवींद्रजींचा विचार डगमगला नाही, उलट पक्का झाला. कारण, या विचारांमागचं गणित सोपं होतं. त्या वेळी महाराष्ट्राची लोकसंख्या होती ६ कोटी. प्रत्येक कुटुंबात सरासरी ५ माणसं धरली तर १ कोटी २० लाख कुटुंबं होतात. त्यापैकी पूजा करणार्‍यांची संख्या १० टक्के म्हणजे १२ लाख. या सर्व घरांमध्ये तांब्या-पितळ्याची उपकरणे निश्चितपणे वापरली जात होती आणि त्यापैकी निम्म्या कुटुंबांनी ही पावडर वापरली असती तरी ६० लाख हा आकडा सुरुवात करण्यासाठी काही थोडाथोडका नव्हता. ब्रॅण्डिंगचा असा नियम आहे की, ब्रॅण्डनेम म्हणजे उत्पादनाचं नाव हे छोटं, सोपं आणि त्या उत्पादनाची उपयुक्तता समजावणारं असावं. त्यात जोडाक्षरं नसावीत. त्यामुळे या प्रॉडक्टचं नावं काय ठेवावं यावर १५ दिवस विचार केल्यावर अचानक सुचलं की पितळ्याला संस्कृतमध्ये ‘पित’ असा शब्द आहे आणि तांब्यातला ‘तांबं.’ त्यामुळे ‘पित’ आणि ‘तांबं’ यांना ‘बरी’ करणारी पावडर म्हणून ‘पितांबरी’ (पित + तांब + बरी = पितांबरी) असा शब्द तयार झाला. केवळ पाच हजारांची गुंतवणूक केली. सुरुवातीला हे प्रॉडक्ट नातेवाईक, मित्रमंडळी, ओळखीची माणसं यांनाच सॅम्पल म्हणून वापरायला त्यांनी दिलं. त्यांना ते पसंत पडलं आणि त्यातूनच ऑर्डर मिळायला सुरुवात झाली. दुकानांमध्ये हे प्रॉडक्ट ठेवायचा प्रयत्न केला, पण दुकानदारांनी त्याला नकार दिला. मग काही मराठी तरुणांना हाताशी धरून ५० टक्के कमिशन बेसिसवर ठेवलं आणि गावोगावी जाऊन पितांबरीची फ्री सॅम्पल्स द्यायला आणि प्रात्यक्षिक करून दाखवायला सांगितलं. त्यामुळे ऑर्डर भराभर मिळू लागल्या. यामुळे वर्षभरात १ लाखाचा उत्पन्नाचा टप्पा गाठता आला. पण , फायदा केवळ दोन ते तीन हजार होत होता. रवीजींचं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर एकदा त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं होतं की, हे घर चांगल्या प्रकारे चालवायचं असेल तर दर महिना किमान १२ हजार रुपये मिळवायला हवेत. त्यामुळे व्यवसाय वाढविण्यासाठी २५ जणांची टीम तयार करून स्वत:च मार्केटिंग करायला सुरुवात केली. हळूहळू ग्राहकांकडूनच दुकानदारांकडे पितांबरीबाबत विचारणा होऊ लागल्यावर दुकानदार स्वत:हून फोन करून माल मागवू लागले. पुढे ठाण्यातला पितांबरीचा पहिला डिस्ट्रिब्युटर मिळाला. तिथून खर्‍या अर्थाने पितांबरी नावारूपाला आली, असं रवींद्र प्रभुदेसाई सांगतात.
 
 
प्रॉडक्टच्या निर्मितीच्या वेळी सुरुवातीस अडचणीही बर्‍याच आल्या. पितांबरी पावडरचा रंग उडत असल्याच्या कारणाने विक्रीवर परिणाम होऊ लागला होता. पण, योग्य वेळी आवश्यक ते बदल केले. गुणवत्ता जपण्याला नेहमीच महत्त्व दिलं. त्यानंतर जुन्या बेलापूर रोडवर गणपतीपाडा इथे फॅक्टरी सुरू केली, नवीन मशिनरीही खरेदी केली आणि पहिल्याच वर्षी कंपनीचा टर्नओव्हर १० लाखांच्या घरात गेला. त्यानंतर गोखले रोडवर वडिलांच्या मालकीचा असलेला एक हॉल ऑफिससाठी १० हजार रुपये भाड्याने घेतला. हळूहळू महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक असं करत करत पितांबरीचा व्यवसाय वाढत गेला. एकाच उत्पादनावर थांबणं हा रवींद्रजींचा पिंड नाही. बर्‍याच वेळा पितांबरी म्हटले की, डोळ्यासमोर येते ती तांब्या-पितळ्याला चमकवणारी पितांबरी शायनिंग पावडर. खरंतर पितांबरी ही ब्रॅण्ड अम्ब्रेला आहे. तिच्या अंतर्गत पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि. आज होमकेअर, हेल्थकेअर, ऍग्रिकेअर, फूडकेअर आणि अगरबत्ती अशा पाच विभागांतर्गत ५० हून अधिक उत्पादनांची विक्री करत आहे. तांब्या-पितळेनंतर चांदी चमकविण्यासाठी रूपेरी, मग पितांबरी डिशवॉश बार अशी हळूहळू गृहस्वच्छता क्षेत्रातली उत्पादने पितांबरीने बाजारात आणली. त्यानंतर या देशातल्या आयुर्वेदाच्या प्राचीन ज्ञानाच्या आधारे क्युअरऑन वेदनाशामक आयुर्वेदिक तेल, वसुंधरा बेबी मसाज ऑईल, पंचरस सुपारी विरहित पाचक मुखवास, राजकेशी नरिशिंग हेअर ऑईल उत्पादनांसह पितांबरीने आरोग्यक्षेत्रात प्रवेश केला. २९ राज्यांमध्ये व ५ केंद्रशासित प्रदेशात ७४० सुपरस्टॉकिस्ट, ३८१४ वितरक आणि ६ लाख ४३ हजार ८०३ दुकाने असा विस्तीर्ण पितांबरी परिवार आहे. केवळ देशातच नाही, तर दुबई, नेपाळ, हॉंगकॉंग, मलेशिया, मॉरिशस, सिंगापूर, कॅनडा या आणि अशा अनेक देशांतही पितांबरीच्या उत्पादनांची निर्यात केली जाते. पितांबरीच्या उत्पादन क्षमतेस ISO9001-2000 DNV हे प्रमाणपत्र या प्रतिष्ठित संस्थेकडून मिळाले आहे. आज कंपनीत १५०० कर्मचारी काम करीत असून कंपनीने १७५ कोटींच्या टर्नओव्हरचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. वयाच्या ५५ व्या वर्षीदेखील काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा प्रभुदेसाई बाळगतात. यातूनच त्यांची कार्यकुशलता लक्षात येते. कंपनीचा भार सांभाळताना प्रभुदेसाई यांनी मराठी तरुणांना आणि मराठी उद्योजकांना वाढविण्यासाठीदेखील मोलाचे योगदान दिले आहे. सॅटर्डे क्लबचे विश्वस्त, उद्योग अनुभव प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशा जबाबदार्‍या ते पार पाडत आहेत. उद्योगात येऊ इच्छिणार्‍या तरुणांना उद्योगधंद्याविषयी मार्गदर्शन करणे, त्यांना शक्य असेल त्या पद्धतीने मदतीचा हात पुढे करणे हे कार्य ते करत असतात. विविध सामाजिक उपक्रमात ते आपला सक्रिय आणि अर्थपूर्ण सहभाग देत असतात. नाटक, व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम, गतिमंद मुलांना मदत, पुस्तक प्रकाशन आदी विविध माध्यमांतून प्रभुदेसाई मदतीचा हात पुढे करताना जराही डळमळत नाहीत. तसेच संस्कार भारती, कोकण भारती, कोकण क्लब, कोकण भूमी प्रतिष्ठान आदींचे ते ट्रस्टी म्हणूनही काम पाहात आहेत. उद्योगाच्या आणि गुणवत्तेच्या जोरावर त्यांना आतापर्यंत विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये ‘उद्योगश्री’, ‘उद्योगरत्न’, ‘यशस्वी उद्योजक’, ‘इंडस्ट्री मॅन ऑफ दी इयर पुरस्कार’, जागतिक चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीजचा ‘उद्योगरत्न पुरस्कार’, कोकण आयडॉल पुरस्कार आदी पुरस्कारांचा समावेश आहे.
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झाल्याने सर्वच बाबतीत शिस्तीचे पालन करणे हा त्यांचा स्थायीभाव झाला आहे. त्याबरोबरच सनातन संस्थेच्या शिकवणुकीनुसार नाम, सत्संग, सत्सेवा, त्याग आणि प्रीती यांच्या माध्यमातून आध्यात्मिक उन्नतीसाठी ते सतत कार्यरत असतात. देवावर त्यांचा विश्वास आणि श्रद्धा असून आज जे काही आहे ते केवळ देवामुळेच आहे. परंतु, पितांबरीकरिता खरे दैवत हे ग्राहकच असून तो नाराज होणार नाही याची काळजी घेण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो, असेही ते सांगतात.
 
 
पितांबरीच्या या २५ वर्षांच्या वाटचालीत आता प्रभुदेसाई परिवाराची पुढची पिढीही तिक्याच सक्षमपणे कार्यरत झाली आहे. रवींद्रजींचा मुलगा परिक्षित याने बी. कॉमची पदवी घेतल्यानंतर त्याने वेलिंगकर इन्स्टिट्यूटमधून फॅमिली मॅनेज्ड बिझनेस (FMB) या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा पूर्ण केला. सध्या तोदेखील आता पितांबरीचा डायरेक्टर असून पितांबरीत मार्केटिंग डायरेक्टर म्हणून काम पाहात आहे. रवींद्रजींची सुकन्या प्रियांका हीदेखील पितांबरीच्या आर ऍण्ड डी विभागात स्वत:चं योगदान देत आहे.
 
 
अभिनवता, गुणवत्ता, निरंतर विकास, विस्तार, सुयोग्य नेतृत्व आणि सक्षम सहकारी यांच्या आधारावर पितांबरीची वाटचाल अशीच अविरत चालू राहील यात शंका नाही.
 
 
 
 
- उदय आगाशे

 
@@AUTHORINFO_V1@@