झोपडीतून इस्रोमध्ये...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018
Total Views |
 

जिद्द आणि अथक परिश्रम करण्याची तयारी असेल तर माणूस किती उंच भरारी घेऊ शकतो, हे मुंबईतील पवईच्या प्रथमेश हिरवे या तरुणाने दाखवून दिले आहे. प्रथमेशच्या यशाला एक वेगळी किनार आहे. पवईतील एका झोपडपट्टीत राहून कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याने भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’मध्ये शास्त्रज्ञ होण्याचा बहुमान मिळवला. त्याच्या आयुष्याची प्रेरणादायी यशोगाथा मांडणारा हा लेख...
 
 
गलिच्छ अशी दहा बाय दहाची खोली, कोंदट वातावरण, सतत कानावर पडणारी शिवराळ भाषा आणि नळावरच्या भांडणांचा कलकलाट असलेल्या मुंबईतील एका झोपडपट्टीत प्रथमेशचं बालपण गेलं. परंतु, त्याने तेथील वातावरणाचा परिणाम स्वतःवर होऊ दिला नाही, तर त्या ठिकाणी राहून थेट भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्रो) शास्त्रज्ञ होण्याचा मान मिळवला. म्हणूनच प्रथमेश हिरवे आज इतरांपेक्षा वेगळा ठरला आहे. त्याची डोळे दीपवणारी प्रगती आणि अचंबित करणारा प्रवास केवळ त्या वस्तीतीलच नव्हे, तर सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरला आहे. २५ वर्षांच्या प्रथमेशने अनेक अडचणींवर मात करत थेट ‘इस्रो’पर्यंत झेप घेतली. त्याच्या रूपाने मुंबईतील पहिल्या मराठी तरुणाने ‘इस्रो’त शास्त्रज्ञ म्हणून पाऊल टाकले आहे. चंदीगढ येथे ‘इस्रो’चा इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणून तो रुजू झाला.
 
 
पवईजवळील निटी परिसरातील झोपडपट्टीबहुल भागात प्रथमेशचे इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमात झाले. दहावीनंतर पुढे काय करायचे, याबाबत प्रथमेशने निश्चित काही ठरवले नव्हते. अभ्यासात हुशार असलेल्या प्रथमेशला दहावीत ७७ टक्के गुण मिळाले. तेव्हा प्रथमेशच्या वडिलांच्या कार्यालयातील एका मॅडमने त्यांना प्रथमेशची कलचाचणी करण्याचा सल्ला दिला. तशी प्रथमेशनही कलचाचणी करून घेतली. परंतु, त्याचा निकाल मात्र खराब आला. त्याने शिष्यवृत्तीची परीक्षाही दिली नव्हती. त्यात त्याला बर्‍याचशा शैक्षणिक क्षेत्रांविषयी पुरेशी माहिती नव्हती. चाचणीनंतर वडिलांना त्याने सांगितले की, ‘‘मी इंजिनिरिंग करू शकत नाही’’ आणि तेच शब्द प्रथमेशच्या जीवनाला एका अर्थाने कलाटणी देणारे ठरले. पण, फक्त अर्ध्या तासाच्या कलचाचणी परीक्षेत ‘मी आयुष्यात काय करू शकतो, हे कसे ठरु शकते?’ असा विचार त्याने केला. तेव्हा त्याने कष्ट करून कलचाचणीचा निकाल खोटा ठरविण्याचा निर्णय घेतला. वडिलांनी डिप्लोमा करण्यास सांगितले. त्यांना असे वाटले की, डिग्री नाही तर डिप्लोमा करून तरी प्रथमेश इंजिनिअर होईल. प्रथमेशने सन २००५ मध्ये विलेपार्ले येथील शुभा पॉलिटेक्निकमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. सन २०११ मध्ये त्याचा डिप्लोमा पूर्ण झाला. एल ऍण्ड टी आणि टाटा पॉवर या नामांकित कंपन्यांमध्ये सहा महिने त्याचे प्रशिक्षणही झाले. यानंतर त्याने अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचे ठरविले.
 
 
कोपरखैरणे येथे पदवीचे शिक्षण घेत असताना कॅम्पस प्लेसमेंट होती. परंतु, ती केवळ मार्केटिंगसाठी होती. तीन वर्ष पदविका आणि चार वर्ष पदवी घेतल्यानंतरही मार्केटिंग करू नये. त्यापेक्षा वेगळे काही करू; त्यासाठी कष्ट करावे लागले तरी करू, असा विचार प्रथमेशने केला. त्याने हैदराबादला इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये कोचिंग सुरू केले. स्पर्धा परीक्षा दिल्या. परंतु, त्यात त्याला यश मिळाले नाही. घरी त्याने स्पर्धा परीक्षांबाबत समजावून सांगून वेळ मागितला. घरच्यांनी पाठिंबाही दिला. दुसर्‍या वर्षी घरी राहून त्याने परीक्षेची तयारीही सुरू केली. दरम्यान, ‘महाडिस्कॉम’मध्ये त्याची निवड झाली. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला. नवी क्षितिजे त्याला खुणावत होती. ती नोकरी सोडून प्रथमेश पुन्हा परीक्षेकडे वळाला. बी. यूपीएसी इंजिनिअरिंग हे त्याचे लक्ष्य होते. त्याने त्याची तयारी केली. या कालावधीमध्ये तो अनेक परीक्षा उत्तरोत्तर उत्तीर्ण होत गेला. ‘इस्रो’च्या प्रतीक्षा यादीपर्यंत तो पोहोचलाही परंतु, त्याची अंतिम निवड झाली नव्हती. दुसर्‍या वर्षी ‘महाडिस्कॉम’, ‘ओएनजीसी’, ‘मुंबई मेट्रो’ या तीन परीक्षा तो उत्तीर्ण झाला. तिसर्‍या वर्षी मात्र, दिलेल्या सर्वच परीक्षेत त्याने उत्तम यश संपादन केले. ‘महाजेनको’, ‘महाट्रान्सको’, ‘महाट्रान्सकॉम’, ‘इस्रो’ मध्येही त्याची निवड झाली होती. आपल्या आयुष्यात आपण प्रेरणा घेऊन आपले लक्ष्य गाठत असतो परंतु, प्रथमेशचे याबाबत वेगळे मत आहे. इंजिनिअरिंगची परीक्षा देत असताना प्रश्नाखाली ‘हा प्रश्न सन १९९९, १९९६ साली विचारलेला प्रश्न आहे’ असे लिहिलेलं असायचे आणि ते प्रश्न प्रथमेशला अचूक यायचे. हळूहळू त्याला स्पर्धा परीक्षांबाबत उत्सुकता निर्माण झाली. त्यांनी इंटरनेटद्वारे माहिती मिळविली. त्यानंतर युपीएसी इंजिनिरिंग या परीक्षेला बसण्याचा त्याने निर्णय घेतला.
 
 
थोर शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना प्रथमेश आपला आदर्श मानतो. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एवढे यश मिळविले, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन वाटचाल सुरू असल्याचे प्रथमेश सांगतो.
 
 
परीक्षेत अनेकदा अपयश आल्यानंतर काही जण अपयशाने खचून जातात. अपयशातून पुन्हा उभे राहणे हे मोठे आव्हान असते. त्यासाठी मोठी मानसिक तयारी करावी लागते. २०१४ मध्ये पदवी मिळाल्यानंतर २०१५ साली प्रथमेशला नोकरी मिळाली नाही, तर २०१६ साली अखेरीस तो नोकरीमध्ये रुजू झाला. पदवीनंतर एक वर्षाने मिळालेली नोकरी सोडून स्पर्धा परीक्षेचा निर्णय घेणे कठीण होते. आरोग्य, आर्थिक परिस्थिती, उमेदवारांशी स्पर्धा अशा अनेक अडचणी समोर होत्या. बर्‍याचदा काही गोष्टी आपण आपल्या चुकांमधूनही शिकत नाही. त्या दुसर्‍यांच्या चुकांमधून शिकत असतो. त्याकडे प्रथमेशने लक्ष दिले. परीक्षकाला नेमकी काय अपेक्षा असते, हे समजण्यास पहिल्या वर्षी त्याला अपयश आले. काही गोष्टी ते जाणीवपूर्वक विचारतात, ते आपली क्षमता तपासतात, असा अनुभव प्रथमेशला आला.
 
 
 
 
जेव्हा पहिल्यांदा ’JEET' दिली, तेव्हा ’१११११’ हा रँक मिळाला होता. एखाद्या कार्याला वर्गणी करतात, असा हा आकडा होता. मेहनत करून आपण हा अंक बदलू, असा निर्धार प्रथमेशने केला. त्यातील चार १ कमी करून प्रथम क्रमांक मिळवू, असा विचार त्याने केला. त्यानंतर ओएनजीसीला डिप्लोमाच्या आधारे त्याने अर्ज केला. तेव्हा परीक्षकांनी सांगितले की, ‘‘पदवी घेऊन तू अर्ज कर.’’ त्यानंतर पदवी पूर्ण करून त्याने स्पर्धा परीक्षा दिल्या.
 
 
‘‘आयुष्यात सगळ्यात मोठी गोष्ट कोणती असेल, तर ती म्हणजे आपल्या आईवडिलांच्या डोळ्यात तरळणारे आनंदाश्रू आणि त्याचे कारण तुम्ही असता. तो अनुभव आयुष्यभर लक्षात राहील असा असतो,’’ असे प्रथमेश सांगतो. आज जरी ‘इस्रो’मध्ये निवड झाली असली तरी भविष्यात संधी शोधत राहणार असल्याचे प्रथमेश सांगतो. अणुऊर्जा, अंतराळ संशोधन, सुरक्षा या क्षेत्रात भविष्यात कामकरण्याची इच्छा असल्याचे तसेच पीएचडी करण्याचा मानस प्रथमेशने व्यक्त केला.
 
 
‘‘आयुष्यात आदर्श असावा परंतु, तुम्हाला स्वतःला तो ओळखता आला पाहिजे. त्यामुळे तुम्ही स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करा,’’ असा आयुष्याचा मूलमंत्र प्रथमेश देतो.
 
 
 
- नितीन जगताप 
@@AUTHORINFO_V1@@