यशोगाथा ‘आरती ड्रग्ज’ची...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018
Total Views |



पालघर जिल्ह्यातील बोईसर रेल्वे स्थानकापासून दहा-पंधरा मिनिटांच्या अंतरावर एक औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीत प्रवेश केल्यावर सर्वप्रथमतारापूर दूरध्वनी केंद्र लागतं आणि त्याच्या थोडंसं पुढे गेल्यावर एक औषधनिर्मितीचा मोठा कारखाना दिसतो. ही आहे औषधनिर्माण क्षेत्रातली जगप्रसिद्ध ‘आरती ड्रग्ज’ कंपनी. त्या कारखान्याची भव्यता पाहिल्यावर प्रकाश पाटील या मराठी उद्योजकाच्या कर्तृत्वाची खात्री पटते. ‘मराठी माणसं उद्योजकतेच्या बाबतीत मागे पडतात’ हा समज किती चुकीचा आहे, हे मराठी उद्योजकांची यशोगाथा जाणून घेतल्यावरच कळेल.


प्रकाश पाटील हे मूळचे पालघर जिल्ह्यातल्या मासवण गावचे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रकाश पाटील यांचं प्राथमिक शिक्षण मुरबाव आणि जव्हार येथे झालं. त्यानंतर डहाणू येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आणि त्यानंतर भारतातल्या नामांकित ‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’ येथे १९६९ साली केमिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश मिळवला. त्यावेळी ते ‘युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’ (UDCT) या नावाने ओळखले जात होते. तेथे त्यावेळी फक्त ३२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत असे. प्रकाश पाटील यांच्या लहानपणापासूनच्या शिक्षणातल्या चमकदार कामगिरीमुळे त्यांना या महाविद्यालयात सहज प्रवेश मिळाला. केमिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केल्यानंतर त्यांचे कॉलेजचे मित्र अमेरिकेत नोकरीसाठी निघून गेले. मात्र, प्रकाश पाटील यांना अमेरिकेचं आकर्षण कधीच वाटलं नाही. त्यांनी भारतातच दहा वर्षे पाच-सहा ठिकाणी नोकरी केली. त्यांचे एक मित्र चंद्रकांत गोगरी यांना एक केमिकल फॅक्टरी सुरू करायची होती. त्यासाठी त्यांनी प्रकाश पाटील यांना पार्टनर होण्याची गळ घातली. तो पाटील यांच्या आयुष्यातला ‘टर्निंग पॉईंट’ ठरला. प्रकाश पाटील यांनी आपल्या मित्रांसमवेत सात लाख रुपये भांडवल गुंतवून १९८१ साली पहिली केमिकल कंपनी सुरू केली. त्यांनी तीन छोट्या कंपन्या सुरू केल्या होत्या. १९८६ साली या तिन्ही कंपन्यांचं एकत्रीकरण करून ‘आरती ड्रग्ज’ कंपनीची स्थापना झाली. ‘आरती ड्रग्ज’चा पहिला कारखाना गुजरातमध्ये सरिगामयेथे सुरू झाला. हा कारखाना सुरू करण्यासाठी ‘गुजरात स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन’ आणि ‘गुजरात इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन’ची आर्थिक मदत झाली. सरकारकडून मिळालेल्या आर्थिक मदतीचा आणि विक्री कर सवलतींचा कंपनीच्या स्थापनेत खूप फायदा झाला. स्थापनेच्या वेळी प्रायव्हेट लिमिटेड असलेली ही कंपनी १९९२ साली पब्लिक लिमिटेड झाली. तेव्हापासून या उद्योगाचा विस्तार सुरू झाला आणि आज त्याने भव्य रूप धारण केलं आहे. ‘आरती ड्रग्ज’ ही मुख्यत: ‘एपीआय’ मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. ‘एपीआय’ या शब्दाचा अर्थ होतो ‘ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडिएंट.’ जसा सरबतामध्ये साखर हा मुख्य घटक असतो, मिल्कशेकमध्ये दूध हा मुख्य घटक असतो, तसाच प्रत्येक औषधामध्ये एक मुख्य घटक असतो, त्याला ‘एपीआय’ म्हणतात.




‘आरती ड्रग्ज’ कंपनीमध्ये ऍन्टीफंगल, ऍन्टीइन्फ्लेमेटरी, ऍन्टीडायरियल, ऍन्टीआर्थ्रायटिस, ऍन्टीबायोटिक, ऍन्टीडायबेटिक असे गुणधर्म असलेले सुमारे ३३ ‘एपीआय’ बनवले जातात. याशिवाय इतर अनेक विशिष्ट प्रकारच्या केमिकल्सचं उत्पादन होतं. भारत आणि चीन हे जगातले सर्वांत मोठे ‘एपीआय’ उत्पादक देश आहेत. ‘एपीआय’ उत्पादनात भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. भारतात ‘ग्लॅक्सोस्मिथ’, ‘सिपला’, ‘ल्युपिन’, ‘सन फार्मा’ अशा सुमारे १६०० ‘एपीआय’ मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत, ज्यात ‘आरती ड्रग्ज’ही अग्रस्थानी आहे. ‘आरती ड्रग्ज’ या कंपनीची उत्पादने आज १०८ देशांमध्ये निर्यात होतात. यात प्रामुख्याने अमेरिका, युरोपीय देश आणि चीनचा समावेश आहे. आज भारताची बहुतांश बाजारपेठ चिनी वस्तूंनी भरलेली आहे परंतु, ‘आरती ड्रग्ज’ कंपनी भारतात उत्पादन करून चीनमध्ये निर्यात करते. तेही चीनमध्ये खूप औषधकंपन्या असताना! एवढंच नव्हे तर चीनमध्ये या कंपनीचे केमिकल प्लान्टस्‌ही आहेत. सध्या या कंपनीची उलाढाल सुमारे १४०० कोटी रुपयांची आहे. लवकरच ती २००० कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे ध्येय असल्याचे प्रकाश पाटील सांगतात. औषध उद्योग हा सर्वात जोखमीचा उद्योग. औषधांचा संबंध थेट लोकांच्या जीवाशी असतो. या उद्योगात उतरणं हे प्रकाश पाटील यांचं मोठं धाडस म्हणावं लागेल. औषधांची गुणवत्ता हा अत्यंत काळजीपूर्वक हाताळण्याचा विषय. अचूक गुणवत्ता राखल्यामुळेच आज ही कंपनी जागतिक पातळीवर यशस्वी ठरली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हे आपलं सर्वात मोठं सामर्थ्य असल्याचं प्रकाश पाटील सांगतात. ‘आरती ड्रग्ज’ला जागतिक आरोग्य संघटना तसेच अमेरिका, फ्रान्स, मेक्सिको या देशांकडून गुणवत्तेचं प्रमाणपत्रही मिळालं आहे. आत्तापर्यंतच्या उद्योजकीय वाटचालीत कोणकोणते बरे-वाईट अनुभव आले? असं विचारलं असता प्रकाश पाटील सांगतात की, ’’आजपर्यंत फारसे काही वाईट अनुभव आलेले नाहीत; किंबहुना वाईट अनुभव मी फारसे लक्षातच ठेवत नाही.’’ यावरून त्यांचा परिस्थितीकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन दिसून येतो. मात्र, भारतात उद्योगवाढीसाठी सरकारकडून खूप काही केलं जाणं आवश्यक असल्याचंही ते सांगतात. ‘‘उद्योजक हा धावणारा घोडा असतो. सरकारने त्याला लगामघालू नये. पर्यावरण आणि इतर कारणांसाठी उद्योगवाढीवर सरकारकडून हजारो अटी, शर्ती, नियमघातले जातात. यामुळे उद्योगांना स्पर्धेत टिकणं कठीण होतं. जागतिक बाजारपेठेत संधी सतत निर्माण होत असतात. परंतु, सरकारी निर्बंधांमुळे भारतीय उद्योजकाला उत्पादन करून बाजारपेठेपर्यंत पोहोचायलाच खूप उशीर होतो आणि तोपर्यंत स्पर्धकांनी बाजारपेठ काबीज केलेली असते. अशा परिस्थितीत भारतीय उद्योजक जागतिक स्पर्धेत कसा टिकणार?’’ असं प्रकाश पाटील सांगतात. अशा परिस्थितीतही ‘आरती ड्रग्ज’ची यशोगाथा कौतुकास्पद म्हणावी लागेल.


- हर्षद तुळपुळे
@@AUTHORINFO_V1@@