आन्वीक्षिकी विद्यालयाचे शिल्पकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018
Total Views |




आजूबाजूच्या परिवर्तनशील परिस्थितीचे ज्यांना भान आहे, अशा तरुणांना ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे’ ही वृत्ती मुळात आवडत नाही. पुढच्या पिढीकडे आपण नेमका कोणता वारसा ठेवणार आहोत, वास्तुरूपातला की मौखिक रूपातला, याचा विचार आत्ताची संवेदनशील तरुणाई करू लागली आहे. इंग्रजी शिक्षणाने आपली प्रगती होत नसेल तर येणार्‍या भावी पिढीचेदेखील नुकसान होईल, हा विचार घेऊन गावातील काही कतृर्त्ववान तरुणांची अशीच ही पटकथा थक्क करणारी आहे.


शिक्षण असूनही आपलं इंग्रजी चांगलं नाही, ही निव्वळ न्यूनगंडाची भावना. हीच खंत मनात घेऊन मल्टिनॅशनल कंपनीमध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय, याची जाणीव काही तरुणांना झाली. पण, केवळ जाणिवेवर न थांबता आपल्या कृतीतून ही परिस्थिती बदलण्याचा त्यांनी निर्धार केला. गावामध्ये आधुनिक सोयी-सुविधांयुक्त एक इंग्रजी माध्यमाची पालकांना परवडणारी शाळा असावी आणि त्यामध्ये भावी पिढीने उज्ज्वल यश संपादन करून आधुनिक जगाशी स्पर्धा करावी, हा उदात्त हेतू मनात घेऊन पंढरीनाथ हिरू म्हात्रे यांनी संतोष भंडारी, प्रशांत धस, मधुसूदन पाटील यांसारख्या मित्रांना बरोबर घेऊन २००३ साली प्रगत शिक्षणसंस्थेच्या माध्यमातून ‘एचबीएम इंग्लिश स्कूल’ या नावाने शाळेची मुहूर्तमेढ रोवली. कल्याण-डोंबिवलीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आणि १५ कि.मी.वर नवनाथांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या श्रीमलंगगडाच्या निसर्गरम्य परिसरात ब्राह्मण करवले या गावी ही शाळा सुरु झाली. ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेलगतची ही शाळा... आसपास अजून १६ गावे आणि त्यात विद्यार्थीही वयाने लहान असल्यामुळे त्यांच्या दळणवळणाची सोय करणे अनिवार्य होते. पण, विद्यार्थी पटसंख्या कमी असल्याकारणाने बस विकत घेणे किंवा भाड्याने ठेवणे हेही शाळेला आणि पालकांनाही परवडणारे नव्हते. म्हणून २००३ मध्ये अगोदर टेम्पो, विक्रम, ऑटोरिक्षाचाच वापर स्कूलबससारखा केला गेला. पण, आज शाळेकडे तीन बस आणि एक इको व्हॅन अशा वाहतुकीसाठी चार गाड्या उपलब्ध आहेत. दुसरी अडचण म्हणजे शाळेसाठी जागा उपलब्ध करणे. पण, कालांतराने हे चित्र पालटले आणि आज या शाळेचे स्वत: चे प्रशस्त पटांगण आहे. मुबलक अशी स्वतः च्या मालकीची दोन एकर जागा आहे. त्याचप्रमाणे चालू वर्षी शाळेसाठी एक प्रशस्त इमारत उभारण्याचाही संस्थेचा मानस आहे.



शाळेच्या जागेबरोबरच अजून एक मोठी समस्या होती, ती म्हणजे चांगल्या शिक्षकांची. मग पंढरीनाथ म्हात्रे यांच्या पत्नी पूनम म्हात्रे यांनी डी.एड् आणि बी.एड् पूर्ण केले. तसेच त्यावेळी कल्याणहून बस असल्यामुळे डोंबिवलीहून कोणीही शिक्षक शाळेत येण्यास तयार होत नसे. पण, आज शाळेकडे ३४ उच्चशिक्षित आणि अनुभवी लोकांचा स्टाफ आहे. शाळेची फी ही खूपच माफक असल्यामुळे शिक्षकांचा पगार, वाहतुकीचा खर्च, नवीन बससाठी डाऊन पेमेंट्‌स यासाठी निधी उभा करण्याचीही मोठी अडचण समोर होती. त्यावर उपाय म्हणून स्वतः पंढरीनाथ म्हात्रे यांनी कर्ज काढून हा खर्च भागविण्याचा प्रयत्न केला. त्यातच त्यांच्या पत्नी पूनम म्हात्रे यांनी गेली १३ वर्षं शाळेकडून कोणत्याही प्रकारचा मोबदला घेतलेला नाही. पुढे जागेची अडचण असल्यामुळे स्वतःच्या मालकीची लाखो रुपयांची ८४ गुंठे जमीन ही शाळेसाठी देण्यात आली आणि हे कामफक्त आणि फक्त एखादा ध्येयवेडाच करू शकतो. जरी जागा ही स्वतःच्या मालकीची असली तरी शाळेच्या मान्यतेसाठी ती संस्थेच्या नावे करणे गरजेचे होते. त्यासाठी लागणारी स्टॅम्प ड्युटी असो वा इमारतबांधणीचा खर्च असो, आपली नोकरी सांभाळून करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला म्हात्रे यांनी केला. मोठे भाऊ रामदास म्हात्रे आणि मधुकर म्हात्रे यांच्याशी चर्चा करुन जागेचा कोणताही मोबदला न घेता जागा शाळेला भाडेतत्त्वावर ३० वर्षांसाठी देण्यात आली. कोणतेही डोनेशन न घेता आज शाळेमध्ये ऑडिओ-व्हिडिओ रूम, इंटरनेट, आधुनिक प्रयोगशाळा, संगणक लॅब उपलब्ध आहेत. शिक्षक-पालक संवादासाठी ‘कार्निव्हल’चे नियमित आयोजन केले जाते. शाळेमध्ये हिंदू संस्कृती जपली जावी म्हणून पसायदान, मनाचे श्लोक, संस्कृत सुभाषिते यांच्याबरोबर नृत्य, योगा, कराटेचेही प्रशिक्षणही दिले जाते. शाळेच्या आवारात जंक फूड आणि प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी आहे. चालू वर्षी एचबीएमस्कूलने डोंबिवलीमधील अग्रगण्य असलेल्या वर्षा शाह आणि संजय शाह यांच्या रेनबो किड्‌स कॅम्पस या शाळेला बरोबर घेऊन ’आन्वीक्षिकी विद्यालय’ या नावाने ‘डे स्कूल’ चालू करण्याचे ठरविले आहे. आन्वीक्षिकी विद्यालय, गावामधील एक गुरुकुल शाळा असणार आहे, जिथे एक जागतिक दर्जाचे शिक्षण पारंपरिक पद्धतीने दिले जाईल. तसेच विद्यार्थ्यांना भौतिक, मानसिक आणि शारीरिकरित्या सक्षमबनवून त्यांचा सर्वांगीण विकास करूनच त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर घडविण्याचा संस्थेचा मानस आहे. लवकरच शाळा सीबीएसई बोर्डाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करणार आहे. जेणेकरून पुढची पिढी देशातच नव्हे, तर परदेशातही शिक्षणाच्या संधींपासून दुरावली जाऊ नये. आन्वीक्षिकी विद्यालयमध्ये समतोल शिक्षण, संतुलित मन आणि निरोगी शरीर ठेवण्याचा प्रयत्न असेल. शाळेत स्वतःचे असे स्वयंपाकघर असेल, जेणेकरून मुलांना निरोगी आणि सकस आहाराबरोबर दूध आणि नाश्ता दिला जाईल. आन्वीक्षिकी विद्यालयाचे ध्येय शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांना सक्षमकरणे, हे आहे, जेणेकरून एक सक्षमसमाज आणि सक्षमपिढी घडली जाईल. तेव्हा, पंढरीनाथ म्हात्रे आणि त्यांच्या साथीदारांना केलेले हे कार्य खरंच कौतुकास्पद आहे. शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचविण्यासाठी, तळागाळात रुजविण्यासाठी म्हात्रे कष्ट उपसून केलेल्या प्रयत्नांना विद्यार्थ्यांच्या यशोकीर्तीने फळे आलीच आहेत. त्यांच्या शाळेची अशीच उत्तरोत्तर प्रगतो होवो, ही सदेच्छा.
 
 
 
- नरेंद्र थोरावडे 
@@AUTHORINFO_V1@@