मित्र बिबट्यांचा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018
Total Views |
 

 
मानव आणि वन्यजीव यांचा संबंध अभ्यासणे हेच आपलं आयुष्यभराचं ध्येय आणि करिअर असल्याचं निकीत सांगतो. याची दोन मुख्य कारणं म्हणजे, जंगलात भटकंती करून अभ्यास करण्यात एक आगळावेगळा मानसिक आनंद आहे आणि दुसरं म्हणजे माणूस आणि वन्यजीव संघर्ष कमी करून सहजीवन कसं प्रस्थापित करता येईल, यासाठी निकीत सुर्वे प्रयत्नशील आहे. पृथ्वीवर जागा मर्यादित आहे. वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक, माणूस या सगळ्यांनाच या मर्यादित जागेत राहायचं आहे. माणसाने जागा शेअर करायला शिकलं पाहिजे,’ असं निकीत सांगतो. तेव्हा, या व्याघ्रमित्राच्या प्रवासावर प्रकाश टाकणारा हा लेख...
 
 
भरताला राज्य द्या आणि रामाला वनवासात पाठवा,’’ हे कैकयीचं एक वाक्य अख्खं रामायण घडवून गेलं, तसंच संवेदनशील माणसांच्या आयुष्यातही कोणाचं तरी एखादं वाक्य खूप मोठा ’टर्निंग पॉईंट’ ठरू शकतं. ‘‘तुमच्यापैकी कोणीही एकाने बाहेर जाऊन खरंच पर्यावरणासाठी काही केलं, तर मला पर्यावरणाचा शिक्षक झाल्याचं समाधान मिळेल,’’ हे शाळेतल्या पर्यावरण शिक्षिकेचं वाक्य निकीतच्या आयुष्यातला ’टर्निंग पॉईंट’ ठरला. या वाक्याने भारावलेल्या निकीतने ‘वन्यजीव’ हाच आपल्या करिअरचा विषय निवडला आणि आज त्यात त्याने इतकी प्रगती केली आहे की, आज वयाच्या पंचविसाव्या वर्षी ’सँक्चुरी एशिया’ या जगप्रसिद्ध मासिकातर्फे दिल्या जाणार्‍या ’यंग नॅचरलिस्ट’ पुरस्काराचा तो २०१७ चा मानकरी ठरला आहे.
 
 
मुंबईत मीरारोड येथे राहणार्‍या निकीत सुर्वेला लहानपणापासूनच निसर्ग, पर्यावरण, वन्यजीव यांची आवड. आपल्या आवडत्या विषयात करिअर करण्याला त्याच्या आईवडिलांचा पूर्ण पाठिंबा होता. निकीतच्या पुढच्या सगळ्याच वाटचालीत त्याला योग्य मार्गदर्शन करणारी आणि मदत करणारी माणसं मिळत गेली. त्याने सेंट झेवियर्स महाविद्यालयातून वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र या विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर त्याने पर्यावरण आणि वन्यजीवविषयक अनेक संशोधन प्रकल्पांमध्ये सहभाग घेतला. अशाच एका प्रकल्पात काम करत असताना निकीतचा बिबट्यांविषयी संशोधन करणार्‍या डॉ. विद्या आथ्रेया यांच्याशी संपर्क आला. त्यांचं माणूस आणि बिबट्या यांच्या संबंधांविषयी असलेलं संशोधन पाहून निकीत प्रचंड भारावून गेला आणि त्याने ’बिबट्या आणि माणूस’ याच विषयावर सर्व लक्ष्य केंद्रित करायचं ठरवलं.
 
 
देहरादून येथील ‘वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ या अतिशय नामांकित अशा शिक्षणसंस्थेत निकीतला पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळाला. या संस्थेत प्रवेश मिळवणं हीच मोठी कौतुकाची गोष्ट असते. कारण, संपूर्ण भारतातून या संस्थेत फक्त १५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यामध्ये निकीतची निवड झाली. या संस्थेत शिकत असताना जवळजवळ भारतभर भ्रमंती करून पर्यावरण आणि वन्यजीव यांचा अभ्यास करण्याची त्याला संधी मिळाली.
 
 
पदव्युत्तर शिक्षणाचाच एक भाग म्हणून त्याने मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांची जनगणना करण्याचं काम हाती घेतलं. बिबट्यांची संख्या, बिबट्यांचं भक्ष्य असणार्‍या इतर प्राण्यांची संख्या, बिबट्यांच्या शिकारीच्या तसंच खाण्यापिण्याच्या सवयी यांचा शास्त्रीय अभ्यास त्याने केला. जंगलांमध्ये भटकून, ठिकठिकाणी कॅमेरे बसवून त्याने बिबट्यांची येण्याजाण्याची, शिकारीची दृश्ये टिपून घेतली. असाच अभ्यास त्याने तुंगारेश्र्वर अभयारण्य, तसंच शिमला, हिमाचल प्रदेश या ठिकाणीही केला. अजूनही त्याचा हा अभ्यास चालू आहे. निकीतचा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या बिबट्यांचा अभ्यास २०१४ सालापासून सुरू आहे. पवईपासून वसईपर्यंत पसरलेल्या सुमारे १४० चौ.किमी.च्या या विस्तीर्ण प्रदेशात ५० मोक्याची ठिकाणं निवडून तिथे कॅमेरे बसवले आहेत. २०१५ साली केलेल्या सर्वेक्षणात ३५ बिबटे आढळले होते. २०१७ सालच्या सर्वेक्षणात ४१ बिबट्यांची नोंद झाली आहे. यापैकी १४ बिबटे २०१५ च्या सर्वेक्षणात नोंद केलेल्या बिबट्यांशी मिळतेजुळते आहेत. याचा अर्थ २०१५ नंतर २७ नवीन बिबट्यांची नोंद झाली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातली बिबट्यांची घनता भारतातली सर्वात जास्त आहे. हा अभ्यास करताना निकीतला आलेले अनुभव चित्तथरारक आहेतच, शिवाय बिबट्यांविषयी अनेक माहीत नसलेल्या गोष्टीही कळल्या आहेत. बिबट्याचं नाव ऐकलं की, सर्वसामान्य माणूस सावध होतो. ‘बिबट्या’ अथवा ‘वाघ’ हे लहान मुलांना घाबरविण्याचं साधन असतं. ४० बिबटे असलेल्या जंगलात फिरायची कोणाची हिंमत होईल? पण, पर्यावरण आणि वन्यजीवांचा शास्त्रीय अभ्यास करायचा असेल तर असे धाडस करावेच लागते. निकीतला मनापासून या सगळ्याची आवड आहे. अचूक ठिकाणी कॅमेरे लावणं हे हुशारीचं काम असतं. त्यासाठी जंगलात फिरून बिबट्यांच्या पायांचे ठसे आणि इतर खाणाखुणा शोधून बिबट्यांची राहुटी कुठे जास्त आहे ते शोधावं लागतं आणि तिथे कॅमेरा सेट करावा लागतो. स्थानिक लोकांना बिबट्यांच्या फिरण्याच्या आणि पाणी पिण्याच्या जागा माहीत असतात. त्यांनी दिलेली माहितीही कॅमेरा सेट करताना उपयोगी पडते. कॅमेरा किती उंचीवर बसवायचा, त्याचा कोन कसा ठेवायचा याचा सूक्ष्मविचार करावा लागतो. शिवाय कॅमेरे चोरीला जाणार नाहीत याचीही काळजी घ्यावी लागते. माणसांची जनगणना करणं सोपं असतं, पण जंगलातल्या प्राण्यांची, त्यातही बिबट्यांसारखे प्राणी ज्यांच्या जवळही जाणं शक्य नसतं. त्यांची गणना करणं हे मोठ्या कष्टाचं, मेहनतीचं आणि संयमाचं काम असतं. बिबटे जंगलभर फिरत असतात. जंगलात ठिकठिकाणी कॅमेरे लावलेले असल्यामुळे एकच बिबट्या अनेक कॅमेर्‍यांमध्ये टिपला जाऊ शकतो.
 
प्रत्येक बिबट्या वेगळा ओळखण्याची महत्त्वाची खूण म्हणजे त्यांच्या शरीरावर असलेले काळे ठसे वेगळे असतात. शिवाय, आपल्या डाव्या हाताच्या बोटांचे ठसे आणि उजव्या हाताच्या बोटांचे ठसे जसे वेगळे असतात तसेच बिबट्यांच्या डाव्या आणि उजव्या अंगावरचे ठसे वेगवेगळे असतात. दोन्ही बाजूंचे फोटो घेण्यासाठी एकाच स्पॉटवर फोकस करणारे दोन कॅमेरे विरुद्ध बाजूंनी बसवावे लागतात. म्हणजे त्या स्पॉटवर बिबट्या आला की, त्याच्या दोन्ही अंगांची छायाचित्रं मिळतात आणि त्याचा उपयोग बिबट्या ओळखण्यासाठी होतो. बिबट्याच्या शरीरावरच्या ठशांचं वेगळेपण ओळखण्यासाठी एक सॉफ्टवेअरही तयार केलं आहे. या अभ्यासातली फार मजेशीर गोष्ट म्हणजे बिबट्यांचं नामकरण! कॅमेर्‍यात दिसलेल्या बिबट्यांना निकीतने ’चांदनी’ , ’भुतिया ’, ’मस्तीखोर’ अशी नावे दिली आहेत. एका बिबट्याने कॅमेराच पंजाने खाली पाडून टाकला. म्हणून त्याला ’मस्तीखोर’ असं नाव दिलं. मानव आणि वन्यजीव यांचा संबंध अभ्यासणे हेच आपलं आयुष्यभराचं करिअर असल्याचं निकीत सांगतो. याची दोन मुख्य कारणं म्हणजे जंगलात भटकंती करून अभ्यास करण्यात एक आगळावेगळा मानसिक आनंद आहे आणि दुसरं म्हणजे माणूस आणि वन्यजीव संघर्ष कमी करून सहजीवन कसं प्रस्थापित करता येईल यासाठी निकीत प्रयत्नशील आहे. पृथ्वीवर जागा मर्यादित आहे. वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक, माणूस या सगळ्यांनाच या मर्यादित जागेत राहायचं आहे. ’माणसाने जागा शेअर करायला शिकलं पाहिजे,’ असं निकीत सांगतो. अभयारण्यातल्या बिबट्यांना अभयारण्याच्या सीमा माहीत नसतात. त्यांना सीमेबाहेर एखादं कुत्र्याचं पिल्लू दिसलं की, ते साहजिकच बाहेर पडतात. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेबाहेर कुत्रे, मांजरं, डुकरे जास्त प्रमाणात असल्याने बिबटे शिकार करायला बाहेर पडण्याची शक्यता असते. परंतु, अभयारण्यातच त्यांना पोटभर खाणं मिळालं की ते बाहेर येत नाहीत. वाघांना थेट शत्रू न समजता या सगळ्या गोष्टी माणसाने समजून घेतल्या पाहिजेत. निकीतचं आणखी एक महत्त्वाचं कार्य म्हणजे तो शाळा-कॉलेजांमधून कार्यशाळा घेऊन वन्यजीवांविषयी प्रबोधन करतो. बिबट्यांच्या आणि इतर वन्यजीवांच्या मजेशीर आणि चित्तथरारक गोष्टी विद्यार्थ्यांनाही आवडतात.
 
 
एखाद्या विषयाची नुसती आवड असणं वेगळं आणि त्या आवडीच्या विषयात काहीतरी भरीव कामगिरी करून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करणं वेगळं. त्यासाठी नुसती आवड पुरेशी नसते, तर एक झपाटलेपण लागतं. निकीतची ही कर्तृत्वाची गुढी पाहून त्याच्या त्या शाळेतल्या शिक्षिकेला आपल्या शिक्षकी पेशाचं सार्थक झाल्याचं नक्कीच वाटलं असेल...
 
 
 
- हर्षद तुळपुळे 
@@AUTHORINFO_V1@@