‘प्रदूषणमुक्त भारता’चे स्वप्न पाहणारा मुत्सद्दी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018   
Total Views |

गरीब किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातील मुले शिक्षण पूर्ण करून सरळ नोकरी करतात. फार कमी जण व्यवसायात उतरततात. त्यातही व्यवसाय सुरू केल्यानंतर फक्त स्वत:पुरता आणि उद्योग-नफ्याचा विचार केला जातो. पण, याला अपवाद ठरले आहेत मधुकर नाईक. आपल्या कामाचा देशाला काही फायदा होईल का, असा विचार करून कार्यशील जीवन जगणार्‍यांपैकी ते एक. त्यांनी आपला व्यवसाय सांभाळून भारत ‘प्रदूषणमुक्त’ करण्याचा विडा उचलला. त्यांचे हे राष्ट्रसमर्पित ध्येय, व्यवसायातील अडचणी, संस्था उभारणी, त्यामागील आव्हाने यांचा आढावा घेणारा हा लेख...


एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या मुलाकडून एक साधी अपेक्षा असते की, त्याने आपले शिक्षण पूर्ण करावे आणि चांगली नोकरी धरावी, व्यवसायाच्या भानगडीत पडू नये. असा एक ढोबळमानाने विचार प्रत्येक मध्यमवर्गीयाच्या मनात असतो. १९९१च्या उदारीकरणापूर्वी हा समज अधिकच दृढ होता, कारण नोकर्‍यांचे प्रमाण कमी होते आणि व्यवसाय करणे, ही फार दुर्लभ गोष्ट होती. पण या समजुतीला छेद देत मधुकर नाईक यांनी ’ऍक्वाकेमएनवायरो इंजिनिअर’ या संस्थेचा डोलारा उभा केला आहे. हा प्रवास साधासुधा नव्हता. भरपूर खाचखळग्यांनी भरलेला होता. अनेक संकटांवर मात करत ही संस्था उभी आहे. मधुकर नाईक मूळचे मराठवाड्यातील निलंग्याचे. शालेय शिक्षण त्यांनी तिथेच घेतले. पुढील शिक्षण आंबेजोगाईत पूर्ण केले आणि रासायनिक अभियांत्रिकीतील शिक्षण मुंबईतल्या ’इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’ या संस्थेतून पूर्ण केले. याच संस्थेतून रघुनाथ माशेलकर, अनिल अंबानी यांसारखे दिग्गज बाहेर पडले. महाविद्यालयातील त्यांच्याबरोबर शिकलेल्या काही लोकांनी परदेशात नोकरी केली आणि तिथेच ते स्थायिक झाले. नाईक यांनाही ती संधी होती, पण आपले ज्ञान देशाच्या उन्नतीसाठीच खर्च करायचे, असे मधुकर नाईक यांनी ठरवले होते. १९७६ साली शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीला नाईक यांनी प्रदूषण नियंत्रण क्षेत्रात सात वर्षे नोकरी केली. पण, शिक्षण घेत असतानाच त्यांनी आपला स्वतंत्र व्यवसाय असावा, असे मनोमन ठरवले होते. सात वर्षे नोकरी केल्यानंतरही त्यांनी हा निश्चय सोडला नव्हता. पण, व्यवसाय करण्यासाठी भांडवल आवश्यक होते आणि तेव्हा आजच्यासारख्या बँका स्टार्ट अपसाठी कर्ज देत नव्हत्या. रस्ता कठीण होता, पण निश्चय ठामहोता. नाईक यांनी या क्षेत्रात हळूहळू पावले टाकण्यास सुरुवात केली. व्यवसायाचा पहिला भाग म्हणून त्यांनी कन्सल्टन्सी फर्म सुरू केली. या फर्मनुसार एका विशिष्ट कंपनीला प्रदूषणाच्या बाबतीत सल्ले देणे आणि सूचना करणे, प्रदूषणाबाबत अहवाल तयार करणे, कोणत्याही कंपनीच्या प्लान्टमधील काही अडचणी असल्यास त्यांची सोडवणूक करणे अशी कार्य या फर्मच्या माध्यमातून नाईक यांनी केली. पहिली सेवा ही त्यांनी रिलायन्स कंपनीच्या पाताळगंगेच्या प्रकल्पास पुरवली. पहिले काममिळाले. त्यात नाईक आनंदी होते, पण अडचणीही भरपूर होत्या. तंत्रज्ञान कितीही आधुनिक असेल, पण ते चालवायला कुशल मनुष्यबळ नसेल तर सोपी कामेही होत नाहीत. हे कामत्यांनी घेतले आणि ते यशस्वी करून दाखवले. रिलायन्स कंपनीला हे कामआवडले. मिळालेल्या पहिल्या कामाची कागदपत्रे त्यांनी आजही सांभाळून ठेवली आहेत. तसेच नुकतीच पातळगंगेची सामाईक सांडपाणी नियंत्रण केंद्राची जबाबदारीही नाईक यांच्या फर्मकडे आहे.


१९८४ साली भोपाळची वायु दुर्घटना घडली. यामुळे देशात प्रदूषणाबाबत लोकांमध्ये जनजागृती वाढली. १९९१ साली देशाने खाजगीकरण धोरण स्वीकारल्याने लायसन्स राज संपुष्टात येऊन नव्या व्यावसायिकांना संधी मिळाली तसेच देशाबाहेरील संस्थांना भारतात गुंतवणूक करण्यास वाव मिळाला. १९९८ साली उदारीकरण पुढे नेण्यात आल्याने नाईक यांचा व्यवसाय वृद्धिंगत होण्यास मदत झाली. सहा वर्षे कन्सल्टन्सी फर्म सुरू केल्यानंतर १९८९ साली ’ऍक्वाकेमएनवायरो इंजिनीअर’ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. नाईक यांनी एवढी वर्षे उरी बाळगलेले स्वप्न सत्यात उतरवले होते. प्रश्न असा होता की, जेव्हा नाईक कन्सल्टन्सी फर्म चालवत होते तेव्हा त्यांना प्लान्ट पाहून त्यावर सल्ले देऊन सूचना करण्याचे कार्य होते. पण आता ते सेवाक्षेत्रात उतरले होते. त्या काळात प्रदूषण नियंत्रणासाठी लागणारे तंत्रज्ञान भारतात पूर्णपणे विकसित झाले नव्हते. हे एक मोठे आव्हान त्यांच्यापुढे होते, पण नाईक बधले नाहीत. यावरही त्यांनी मात केली. हळूहळू ते तंत्रज्ञान त्यांनीच विकसित केले. ज्या कंपन्यांना पूर्वी नाईक फक्त कन्सल्टिंगची सेवा देत, आता त्यांच्या प्रदूषण नियंत्रणाच्या प्रकल्पाची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे. १९८३ साली झालेला हा प्रवास अखंडपणे सुरू आहे. कंपनीला ISO मानांकनही मिळालेले आहे. आज कंपनीचे ५०० हून अधिक क्लायंट आहेत. १७० प्रकल्प कार्यरत असून भविष्यात १२ प्रकल्पांवर कामसुरू आहे.


कन्सल्टिंग, पाणीप्रदूषण नियंत्रण, सांडपाण्याचा पुनर्वापर, सामाईक सांडपाणी नियंत्रणासह ११ प्रकारच्या सेवा नाईक यांच्या कंपनीकडून दिल्या जातात. यापुढे त्यांना सौरऊर्जेवर प्रकल्प निर्माण करण्याची इच्छा आहे. तसे त्यांनी प्रयत्नही केले आहेत. प्रदूषणमुक्त भारताचे त्यांचे स्वप्न आहे.


नाईक यांचा व्यवसाय सुरळीत चालू आहे, पण ते अस्वस्थ आहेत. त्याचे कारण असे की, दिवसेंदिवस शैक्षणिक संस्था आणि व्यावसायिक क्षेत्र यांतील दरी वाढत आहे. दरवर्षी शेकडो विद्यार्थी अभियांत्रिकी करून बाहेर पडतात. पण, फार कमी जणांना रोजगार उपलब्ध होतो. कारण विद्यार्थ्यांच्या अंगी नसलेले कौशल्य. यासाठी भारत सरकारने कौशल्य विकास योजना आणि त्याला अनुसरून नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी स्टार्टअप आणि मुद्रा योजना आणल्या आहेत. त्या योजनांना पूरक असे कार्य नाईक यांना करायचे आहे. मधुकर नाईक यांच्यासारख्या व्यावसायिकांची देशाला खरी गरज आहे.




- तुषार ओव्हाळ
@@AUTHORINFO_V1@@