गाथा प्रामाणिक उद्योजकाची...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018
Total Views |
 

 
अडचणींच्या काळोखाला छेद देत पुढे जाण्याची जिद्द ज्या माणसात असते, त्या व्यक्तीच्या उमेदीसमोर अखेर संकटांनाही मान टाकावी लागते. प्रचंड प्रामाणिक प्रयत्न आणि ज्या समाजाच्या मातीतून संस्काराची बीजे रुजली, तसेच भल्याबुर्‍याची जाणीव झाली, त्या समाजाबद्दल कृतज्ञता ठेऊन असीम ध्येयाने प्रेरित होऊन एक यशोगाथा उदयास येते, जी समाजासाठी प्रेरक ठरते. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमधील सायगाव इथल्या काशीनाथ पवार यांच्या व्यावसायिक आणि सामाजिक जीवनप्रवासाची वाटचालही अशीच म्हणावी लागेल.
 
 
एका शेतकरी सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या काशीनाथ पवार यांचे शालेय शिक्षण चालू असतानाच वडिलांचे छत्र हरपले. त्यानंतर घरातील कर्त्या पुरुषाची जबाबदारी वयाच्या १२ व्या वर्षीच काशीनाथ यांच्या खांद्यावर पडली. लोकांच्या शेतात नांगर धरणे, झाडे लावण्याच्या कामासाठी खड्डे खोदणे, शेताला कुंपण घालणे, मजुरी करणे अशा प्रकारची कामे केवळ १० रु. मजुरीवर करत असताना ते शिकत होते. वडिलांच्या निधनाने त्यांची आई कोलमडून पडली. त्यांना मानसिक आजार झाला. आईची काळजी घेत, प्रसंगी पडेल ती लहानमोठी कामे करून ते कुठलीही तक्रार न करता पुढे जात राहिले. हे सर्व घडताना नियती त्यांची कसोटी पाहत होती. आपल्याला आपला जीवनसंघर्ष थांबविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, हे त्यांनी मनाशी पक्के ठरवले होते.
 
 
दहावीच्या शिक्षणासाठी, प्रवासासाठी पैसे नसल्याने ३ कि.मी.चा प्रवास पायी करून दहावीत ७८ टक्के गुण मिळवून ते केंद्रातून दुसरे आले. त्यानंतर त्यांनी अलिबागला डी.एड्. करण्याचे ठरवले. मात्र, हाती पैसे नसल्याने त्यांना ते स्वप्न पूर्ण करता आले नाही. मग एका मित्राच्या ओळखीने अलिबाग येथे एका वेल्डिंगच्या वर्कशॉपमध्ये कामकरण्यास त्यांनी सुरुवात केली. मात्र, त्या कामाचा प्रचंड त्रास त्यांना होऊ लागला. मग पुन्हा पोट भरण्यासाठी आलेल्या कुठल्याही जीवाला आईच्या मायेने पोटाशी धारणार्‍या मुंबईची त्यांनी वाट धरली. एका कपड्याच्या कंपनीत ५०० रु. पगारावर त्यांनी नोकरी पत्करली. मात्र, त्यांच्यासमोर राहण्याचा आणि खाण्यापिण्याचा प्रश्न ‘आ’ वासून उभा होता. अशावेळी रक्ताची नाती दुरावलेली असताना काशीनाथ पवार यांच्या निरागस आणि प्रामाणिक स्वभावामुळे जिवाभावाच्या माणसांनी त्यांना आधार दिला. सुधीर निगुडकर या त्यांच्या मित्राने त्याचा मोठा भाऊ सुहास (नाना) निगुडकर यांच्याकडे त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली. चांगल्या नोकरीसाठी काशीनाथ यांचे प्रयत्न चालू होतेच. अशावेळी त्यांची गावातील एका पोलीस निरीक्षकाशी भेट झाली. त्यांनी काशीनाथ यांना एका ओळखीतल्या व्यक्तीच्या लॉइड स्टील या कंपनीत कामासाठी जायला सांगितले. १९९४ साली ते नोकरीवर रुजू झाले. मुळात असलेला प्रामाणिकपणा कंपनीतल्या वरिष्ठांना भावायचा. त्यांच्यातली चुणूक, कामातली हुशारी कंपनीच्या जी.एम.च्या नजरेत भरली. काशीनाथ यांच्या कामाचे कौतुक होऊ लागले. अशातच डिसपॅच डिपार्टमेंटची चांगल्यापैकी माहिती केवळ काशीनाथ यांनाच असल्याने कंपनीच्या वरिष्ठांनी ती जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आणि त्यांचा पगार बाराशेवरून दोन हजार इतका केला. ही घटना त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पाईंट ठरली. या कामात ते इतके पारंगत झाले की, १९९६ साली कंपनीचे त्यांनी तब्बल १ लाख २२ हजार रुपयांची बचत केली. कंपनीसाठी ही मोठी गोष्ट होती आणि त्यांचे त्यावर्षी ‘बेस्ट परफॉर्मर’ म्हणून कौतुकही झाले.
 
 
 
कंपनीत काम करणार्‍या एका सामान्य मुलाचे नाव कंपनीच्या संचालकांपर्यंत पोहोचले. मग त्यांनी काशीनाथ यांचे स्पेशल इन्क्रिमेंट करून ‘ऍडमिन असिस्टंट’ म्हणून प्रमोशन केले. ते राहत असलेल्या मित्राच्या भावाचे लग्न झाल्याने पुन्हा आता काशीनाथ यांना ते घर सोडणे भाग होते. मुंबईत चाळीत त्यांनी स्वत:चे घर घेतले. आधी राहत असलेल्या मित्राच्या भावाला, ज्यांना ते ‘नाना’ म्हणायचे, त्यांना ही गोष्ट सांगितली, तेव्हा नानांच्या पत्नीने त्यांच्या घर सोडून जाण्याला विरोध केला. काशीनाथ डोंबिवलीला स्वत:च्या घरात आले. गावावरून आईला आपल्यासोबत घेऊन आले. आता कुठे सुखाचे दिवस त्यांच्या आयुष्यात येत होते आणि अशावेळी ते कामकरत असलेली लॉइड स्टील कंपनी आर्थिक डबघाईला आली. कंपनीने तातडीने पावणे तीनशे माणसे कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यात त्यांचाही नंबर होता. पत्नी आई होणार होती, अशा परिस्थितीत त्यांची नोकरी गेली. त्यांच्यासमोर अंधार दिसू लागला. मात्र, हरायचे नाही, हे ठरवून पुन्हा नोकरीचा शोध सुरू झाला. पुन्हा हातात नोकरी नसल्याने सहा हजार रुपयांवर दुसरी नोकरी पत्करावी लागली. मात्र, नियतीने काहीतरी वेगळेच त्यांच्या भाळी लिहून ठेवले होते. त्या संकटातही त्यांच्या आयुष्यात आनंदाची बातमी मिळाली. त्यांना मुलगा झाला आणि त्यानंतर पाचव्या दिवशीच पूर्वी कामकरत असलेल्या लॉइड स्टील कंपनीचीच लाइड फायनान्स अशी देखील एक शाखा होती. त्या कंपनीचे संचालक झालेल्या पंकज देसाई यांनी पुन्हा काशीनाथ यांना बोलावले. यावेळी कंपनीवर एफ.डी. प्रकरणाच्या केसेस हाताळण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. मात्र, या कामाचे स्वरूप पुढे पुढे गंभीर होत गेले. कंपनीची अवस्था बिकट होत होती. २००५ साली त्यांना पुन्हा नोकरी सोडावी लागली. अशातच त्यांची पत्नी अक्षता यांनी एस.टी. महिला कंडक्टरसाठी अर्ज केला होता. त्यात त्यांची नियुक्ती झाली. काशीनाथ यांना काहीसा दिलासा मिळाला. मग पुन्हा नव्याने काशीनाथ यांनी नोकरीचा शोध सुरू केला. सुधीर निगुडकर हा मित्र त्यावेळी एका जाहिरात एजन्सीत कामाला होता. त्यांच्या एजन्सीत त्यांना क्रेडिट कंट्रोल रिकव्हरीसाठी नोकरी मिळाली. तिथे तब्बल दीड वर्ष अडकलेली ती ३२ लाखांची रिकव्हरी त्यांनी अवघ्या पंधरा दिवसांत केली. हे शक्य झाले ते त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे आणि सच्च्या स्वभावामुळे. कंपनीच्या एका कार्यक्रमात आतापर्यंतचा सर्वाधिक तब्बल एक लाख रुपयांची बोनस रक्कम या कामाबद्दल कंपनीने त्यांना देऊ केली. पण, पुढे या कंपनीच्या मालकाने काशीनाथ कामकरत असलेली शाखा सहा महिन्यांत बंद करण्याचा निर्णय घेतला. यावेळी या कामांतील दांडगा अनुभव असलेल्या काशीनाथ यांनी हिंमत करून ‘‘ही ब्रँच सहा महिने मी चालवायला घेतली तर चालेल का?’’ असे विचारले. त्या बॉसने ही संधी त्यांना देऊ केली. मग काशीनाथ यांनी खर्‍या अर्थाने स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सर्वस्व पणाला लावले. अनेक नावाजलेल्या कंपन्यांबरोबर पुन्हा नव्याने बिघडलेल्या व्यावसायिक संबंधांची घडी बांधत व्यवसायाची सुरुवात झाली. पण, इथेदेखील संधीबरोबर संकटेही त्यांच्या वाट्याला आधीच उभी असायची. एका गैरसमजुतीतून बॉस आणि काशीनाथ या दोघांमध्ये ठिणगी पेटली. स्वाभिमानी काशीनाथ यांना ही गोष्ट जिव्हारी लागली. त्यांनी तडकाफडकी नोकरी सोडली. अशातच काशीनाथ यांच्या आईचे निधन झाले. काशीनाथ यांच्यावर एकीकडे दु:खाचा डोंगर आणि दुसरीकडे नोकरी गमावल्याचे संकट. ते पार कोलमडून गेले. आता यापुढे नोकरी करायची नाही, करायचा तर स्वत:चा व्यवसायच हा निर्धार त्यांनी मनाशी ठामकेला. अशावेळी त्यांच्या गुणवत्तेवर, कर्तृत्वावर विश्वास असलेल्या पत्नीने मंगळसूत्र सोडून सगळे दागिने देऊन काशीनाथ यांच्या व्यवसायासाठी पैसे उभे केले. तरीही अपेक्षित रक्कमजमा होऊ शकली नाही. मग अशा वेळी काशीनाथ यांच्यासाठी उभी राहिली माणसांतली देवमाणसं. पनवेलकर ग्रुपच्या राहुल पनवेलकर यांनी त्यांच्या स्वत:ची कंपनी चालू करण्याच्या निर्णयाला प्रोत्साहन देत आर्थिक मदत देऊ केली. त्याचबरोबर मोहन ग्रुप कंपनीनेही त्यांच्यातल्या प्रामाणिकपणाची कदर करत एका प्रोजेक्टच्या कामाचे ऍडव्हान्सचे पैसे देऊ केले. कागदोपत्री कामात त्यांचे मित्र श्रीहरी धामणकर आणि अतुल जोशी यांनी मोलाची मदत केली. त्यावेळी संजीवनी जाहिरात एजन्सीच्या राम जाधव यांनीदेखील त्यांना सहकार्याचा हात दिला आणि दि. २१ एप्रिल २०१० रोजी उभी राहिली काशीनाथ पवार यांची स्वत:ची ‘ऐरीस मीडिया’ ही जाहिरात एजन्सी.
 
 
आज डोंबिवलीत एकमजली असलेल्या त्यांच्या दिमाखदार कार्यालयात आता २० कामगार कार्यरत आहेत. ‘‘मी या कंपनीचा मालक नाही, मी फक्त ट्रस्टी आहे. मालक आपण सर्व आहोत,’’ या तत्त्वावर ही कंपनी कोटींची उलाढाल करत आहे. गावातल्या अडल्या-नडल्या लोकांसाठी त्यांच्यात सलोखा घडवत एक फंड चालू केला आहे. गावातील मुलांना वाचनालय आणि संगणक प्रशिक्षण केंद्र चालू करून दिले आहे. गावातील विजेची समस्या लक्षात घेऊन गावातील प्रत्येक घरात सौरदिव्यांचे वाटप केले आहे. त्यांच्या पडत्या काळात ज्या सुहास निगुडकरने त्यांना मदत केली, त्यांचेही ऋण ते विसरले नाहीत. त्यांच्या मुलाच्या इंजिनिअरिंगसाठी त्यांनी आर्थिक हातभार लावला.
 
 
कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमधील सायगावसारख्या छोट्याशा खेड्यातून आलेल्या आणि ५०० रुपयांच्या नोकरीपासून सुरुवात केलेल्या काशीनाथ पवार यांची आता कोटींच्या घरात उलाढाल असली तरीही व्यावसायिक स्पर्धा करतानाही आपला प्रामाणिकपणा त्यांनी आजही सोडलेला नाही. जगण्याचे भान आणि समाजाची जाण असलेल्या काशीनाथ यांच्या या कारकिर्दीत त्यांच्यात असलेला प्रचंड आत्मविश्वास आणि परमेश्वरावर असलेली दृढ श्रद्धा या गोष्टी अजूनही तेवढ्याच ठामआहेत. समाजाला प्रेरणा देता येईल, अशी ऐरीस मीडिया जाहिरात एजन्सी कंपनीच्या रूपाने त्यांच्या कर्तृत्वाची गुढी याच तत्त्वांवर दिमाखात उभी आहे.
 
 
 
 
- अजय शेलार 
 
@@AUTHORINFO_V1@@