हार्मोनियमद्वारे संगीताचा अद्वितीय अनुभव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018
Total Views |




सध्याच्या काळात कलावंताचा मुलगा कलावंतच होईल असे नाही किंवा जर तो कलावंत झालाच तरी तो यशस्वी होईलच असेही नाही. पण, जेव्हा सुभाष दसककरांच्या घराण्याकडे आपण पाहतो, तेव्हा लक्षात येते की, साक्षात सरस्वती त्यांच्याकडे पिढ्यान्‌पिढ्या मुक्कामी आहे. तेव्हा, अशा या हार्मोनियमच्या माध्यमातून श्रोत्यांना संगीताचा अद्वितीय अनुभव प्रदान करणार्‍या सुभाष दसककरांची ही संगीतमय जीवनकहाणी....

जेव्हा माणसाचे मन प्रामाणिक, निरागस असते तेव्हाच त्या माणसांतल्या कलावंताचा जन्महोतो. गाण्यात गोडवा असतो, तोच गोडवा आपल्या संवादिनीच्या जादुई सुरांनी रसिकांना स्वर्गसुखाचा आनंद देणार्‍या आंतरराष्ट्रीय कीर्तीचे हार्मोनियमवादक पंडित सुभाष दसककर यांच्या जीवनातील संगीत जणू त्यांनी सर्व श्रोत्यांवर उधळले आहे. गाण्यातून जो अद्वितीय अनुभव येतो, तोच अनुभव आपण वादन-श्रवणातून देखील घेऊ शकतो, याचा वस्तुपाठ म्हणजे सुभाष दसककर.

सध्याच्या काळात कलावंताचा मुलगा कलावंतच होईल असे नाही किंवा जर तो कलावंत झाला तर तो यशस्वी होईलच असे नाही पण, आपण जेव्हा दसककरांच्या घराण्याकडे पाहतो, तेव्हा साक्षात सरस्वती त्यांच्याकडे पिढ्यान्‌पिढ्या मुक्कामी आहे. सुभाष जन्माने नाशिककर. घरातच संगीताचा वारसा. आजोबा ह. भ. प. गोविंदशास्त्री हे राष्ट्रीय कीर्तनकार, चुलत आजोबा पं. एकनाथ हे ग्वाल्हेर घराण्याचे पं. राजभैय्या पुंछवाले यांचे शिष्य व गायक वडील पं. प्रभाकर दसककर हे उत्तमगायक व हार्मोनियमवादक. सुभाषच्या घराण्यात संगीताचे वातावरण आहे. संगीताच्याच संस्कारांचे बाळकडू लहानपणापासूनच त्यांना मिळाले. घरच्या प्रतिकूल परिस्थितीतही वडील पं. प्रभाकर दसककर गुरुजी साथसंगत करण्यासाठी डोक्यावर हार्मोनियमघेऊन जात. त्यांना चार मुले आणि एक मुलगी असा परिवार. पंडित प्रभाकर दसककर यांचा स्वभाव प्रेमळ जसा आज आहे तसाच...

एखादा तपस्वी बघून जे सुख मिळते ते त्यांना पाहिल्यावर अनुभवता येते, याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. त्यांचाच पुत्र सुभाष त्यांच्याकडे बघून त्यांच्या सान्निध्यात राहून साक्षात सरस्वतीच्या भक्ताला भेटण्याची अनुभूती येते.

सुभाषजींचे संगीतातले गुरू, वडील पं. प्रभाकर दसककर व इटावा घराण्याचे आंतरराष्ट्रीय सितारवादक उस्ताद शाहिद परवेझ खॉं यांच्या घरी राहून त्याने शिक्षण घेतले.

घरात प्रतिकूल परिस्थितीमुळे त्या काळात अनेक कार्यक्रमांचे तिकीट त्याला परवडत नसे. उदाहरणच द्यायचे झाले तर नाशिकमध्ये होणारा पंडित पलुस्कर संगीत समारोह. अनेक दिग्गज त्या समारोहाला हजेरी लावून गेले पण, आपला सुभाष फक्त त्यांचे सूर कानी पडावे म्हणून बाहेर उभे राहून त्यांची गाणी ऐकायचा आणि येणार्‍या गायकांच्या चरणाला स्पर्श करण्यात समाधान मानायचा. कधी कधी द्वारपाल त्याला आत जाण्याची परवानगी द्यायचा, तो त्याच्यासाठी बोनस असे. सुभाषजी सितारही उत्तम वाजवतात, पण बोटाला झालेल्या दुखापतीमुळे त्याने सितार त्यांच्यापुरतीच मर्यादित ठेवली आणि हार्मोनियमकडे जास्त लक्ष दिले.



ऑल इंडिया रेडिओच्या स्पर्धेत भारतात प्रथमयेऊन १९८४ साली डॉ. पाबळकर पुरस्कार मिळविणारा सुभाष पहिला नाशिककर. त्या काळात रेडिओ हेच प्रभावी माध्यम. त्यामुळे सुभाष घराघरात पोहोचला. अनेक वर्तमानपत्रांत सुभाषची बातमी झळकली पण, त्याच्यावर पहिला लेख विवेक गरुड यांनी लिहिला होता. आपले दैवत तात्यासाहेब शिरवाडकर यांचे सुभाषवर विशेष प्रेम. त्यामुळे त्याचा परिचय स्वतः तात्यासाहेबांनी लिहून दिला होता.

आयुष्यातला सर्वात पहिल्या मोठ्या कार्यक्रमासाठी पंडिता रोहिणी भाटे यांच्याबरोबर साथसंगत करण्यासाठी सुभाष दिल्लीला गेले. त्यांच्यासाठी दिल्ली म्हणजे अमेरिकाच होती. पडदा उघडला तो समोर प्रेक्षकांत पं. बिरजू महाराज, भारतरत्न पं. रविशंकरजी, पं. राजन पं. साजन मिश्रा, उ. अमजद अली खॉं साहेब. (ज्यांचे कार्यक्रम सुभाष बाहेर उभे राहून ऐकत होता) ते आज सुभाषजींचे हार्मोनियम ऐकत होते. कार्यक्रम संपल्यावर बिरजू महाराज बेबीताईंना म्हणाले, ‘‘रोहिणीजी, आप को बडे सुरेले साथीदार मिले.’’ त्यानंतर सुभाषने कधी मागे वळून पहिलेच नाही.

भारतातील नामवंत कलाकारांबरोबर साथसंगत करण्याची संधी सुभाषला मिळाली. यात पं. बाळासाहेब पुंछवाले, पं. धोंडुताई कुलकर्णी, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. राजन मिश्रा, पं. साजन मिश्रा, उ. झाकीर हुसैन, पं. पद्मा तळवलकर, तालयोगी पं. सुरेशदादा तळवलकर, पद्मविभूषण पं. बिरजू महाराज, तालसम्राट पं. किशन महाराज, पं सामता प्रसाद, पं. दुर्गालाल, पं. अनिन्दो चॅटर्जी, पं. कुमार बोस, पं. रोहिणी भाटे, पं. अलका देव मारुळकर, उ. राशीद खॉं, पं. उल्हास कशाळकर, पं. अजय चक्रवर्ती, पं. नयन घोष, पं. अश्विनी भिडे देशपांडे, पं. आरती अंकलीकर-टिकेकर, विदुषी देवकी पंडित, पं. आशा खाडिलकर, पं. राजेंद्र गंगानी, पं. व्यंकटेशकुमार, पं. रघुनंदन पणशीकर, पं. आनंद भाटे, पं. राहुल देशपांडे, पं. अरविंदकुमार आजाद, पं. रामदास पळसुले अशा अनेक दिग्गजांचा समावेश आहे. पं. रविशंकरजी, पं. भीमसेन जोशी, पं. शिवकुमारजी, पं. हरि प्रसादजी, उस्ताद अमजदअली खॉं, पं. प्रभा अत्रे अशा अनेक संगीतातल्या दैवतांसमोर वाजवायची व त्यांचे आशीर्वाद मिळण्याचे भाग्य त्यांना मिळाले.

पुण्यातील एका कार्यक्रमात पं. जसराजजी एकदा साथ ऐकून म्हणाले, ‘‘जीते रहो, तुम्हारे हाथ में शक्कर है.’’

भारतीय संगीताच्या कार्यक्रमात सुभाष यांनी बरेचदा परदेश दौरा केला. प्रामुख्याने जर्मनी, स्वित्झर्लंड रुमानिया, पोर्तुगाल, हंगेरी, स्पेन, बल्गेरिया, इटली, स्लोव्हेनिया, ऑस्ट्रिया, अमेरिका, कॅनडा इ. देशातील विविध शहरांमध्ये सोलो व साथसंगतीचे कार्यक्रम त्यांनी केले.

अमेरिकेत संसदेत कार्यक्रम झाल्यानंतर तिथल्या गव्हर्नरनी सुभाष यांच्याबरोबर फोटो काढून घेतला.इटलीत कार्निव्हलमध्ये आपल्या वादनातून २५ हजार रसिकांची मने जिंकणारा, तसेच जर्मनीत झालेल्या ‘वर्ल्ड म्युझिक फेस्टिव्हल’ मध्ये आपले वादन सादर करणार्‍या सुभाष यांचा नाशिककरांना खूप अभिमान वाटतो. सुभाष यांनी आपले हजारो शिष्य तयार केले आहेत. १९९५ पासून तो रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यादानाचे काम करतो आहे.



- अभय ओझरकर
@@AUTHORINFO_V1@@