प्रेरणादायी आणि मार्गदर्शक सेवाव्रती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018
Total Views |

भारतीय नौदलात देशसेवेचे कर्तव्य बजावल्यानंतर जबाबदारीतून निवृत्त झाल्यावर आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून वयाच्या ६७व्या वर्षीही झपाटलेल्या व्यक्तीसारखे कार्य करणार्‍या गजानन माने यांनी आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांचे हे अतुलनीय कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक असेच आहे. तेव्हा, गजानन माने यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा हा लेख...


माने मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबव गावचे. तिथेच त्यांचा जन्मझाला आणि कोकणच्या मातीशी त्यांचे ऋणानुबंध जुळले. वयाच्या १४व्या वर्षी घरातील हलाखीची परिस्थिती पाहता, कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा, या अनुषंगाने सकाळची शाळा झाल्यावर दुपारी एका कारखान्यात हेल्परची नोकरी त्यांनी पत्करली. त्यावेळी त्यांना केवळ मासिक २५ रु. पगार मिळायचा. त्या दरम्यान १९६२ मध्ये झालेल्या भारत-चीन युद्धाचा परिणाममाने यांच्या मनावर झाला. १९६५ साली एकेदिवशी घरी काहीही न कळवताच या युद्धाने भारावलेले माने सैनिक म्हणून भारतीय नौदलात भरती झाले. भारत पारतंत्र्यात असताना घडलेल्या संग्रामाच्या कथा त्यांनी त्यांच्या वडिलांकडून ऐकल्या होत्या. त्यांचे वडील जगन्नाथ माने यांनाही स्वातंत्र्यलढ्यात तुरुंगवास भोगावा लागला होता. त्यामुळे माने यांचे वडील त्यांच्यासाठी एक प्रकारे प्रेरणास्थान होते. सन १९६५ ते १९७६ या सैनिकी कालावधीत माने यांनी आपले अपूर्ण शिक्षणही पूर्ण केले. तसेच त्यांच्या कार्यक्षेत्रातील बॉयलरसारख्या महत्त्वाच्या विषयाचा अभ्यास पूर्ण केला. १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धात सहभागी होऊन सैनिकी जीवनाचे सार्थक झाल्याचे माने अभिमानाने सांगतात. या विजयी युद्धातील सहभागाबाबत माने यांना ’संग्राम’ पदकाने गौरविण्यात आले. सैनिकी कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर १९७६ साली त्यांनी ठाणे येथील एका कंपनीत नोकरी पत्करली. या कंपनीच्या उत्कर्षातदेखील माने यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. अतिमहत्त्वाच्या सूचना सुचविल्या गेल्याने कंपनीला लाखो रुपयांचा फायदा झाला. याबाबत कंपनीने माने यांच्या कामाचा यथोचित गौरव केला. सन १९८५ मध्ये गजानन माने डोंबिवलीत राहायला आले. ते ज्या भागात राहत होते, तेथे पावसाळ्यात पाणी भरून पूरपरिस्थिती निर्माण व्हायची. त्यामुळे पावसाळ्यात अनेक कुटुंबांची परवड होत असे. यावर उपाययोजना म्हणून माने यांनीच पुढाकार घेतला. तत्कालीन माजी खासदार रामकापसे यांच्या सहकार्याने रेल्वे प्रशासन व कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांच्या माध्यमातून जलाराममंदिरासमोरील रेल्वे रूळाखालील नाला रुंद करून घेतला आणि पावसाळ्यात निर्माण होणार्‍या पूरस्थितीच्या त्रासातून नागरिकांची सुटका झाली. तशीच समस्या डोंबिवलीच्या रेल्वे रुळावरील क्रॉसिंगचीही होती. डोंबिवलीचे आराध्य दैवत असलेल्या गणेश मंदिरासमोरील रेल्वे रुळावर सातत्याने अपघात होत असे. हा विषयही माने यांनी लावून धरला. त्या ठिकाणी रेल्वेने पूल बांधावा, अशी मागणी करण्यात आली. मात्र, ती रेल्वेने नाकारली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने पुलासाठी खर्च करावा, असे पत्र माने यांना रेल्वेकडून देण्यात आले. त्यावेळीही माजी खासदार रामकापसे यांचे सहकार्य माने यांना लाभले. यामध्ये महापालिका आणि रेल्वे यांना पुलाचे महत्त्व पटवून दिल्यानंतर पालिकेने पुढाकार घेत १९९४ साली ४२ लाख रुपये खर्च करुन पादचार्‍यांसाठी एक चांगला पूल बांधून दिला.


लोकांच्या नागरी समस्या सोडविण्याबरोबरच माने यांचे कुष्ठरुग्ण सेवा आणि त्यांचे पुनर्वसन यामध्ये मोलाचे योगदान आहे. केवळ कल्याण-डोंबिवली किंवा ठाणे जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी कुष्ठरुग्णांच्या वसाहती आहेत, त्या सर्व वसाहती, शासकीय कार्यालय या ठिकाणी कुष्ठरुग्णांचा एक सच्चा मित्र म्हणून माने यांना ओळखले जाते. गेली अनेक वर्षे त्यांचे हे कामसुरू असून ‘‘हे माझे घरचे कार्य आहे, माझी जबाबदारी आहे,’’ असे माने ठामपणे सांगतात. कुष्ठरुग्णांना रोगमुक्त करणे, त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणे, त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे, रुग्णांच्या मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे, त्यासाठी मदत करणे हे ध्येय समोर ठेवून माने यांचा आजवरचा प्रवास राहिलेला आहे. कल्याण येथील हनुमाननगर कुष्ठवसाहतीमधील कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनाची जबाबदारी माने यांनी खांद्यावर घेतली आणि त्यात त्यांना यशही आले. या रुग्णांना औषधोपचार, मलमपट्टी वेळेवर मिळाली पाहिजे, याकरिता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून रुग्णांच्या वसाहतीमध्येच स्वतंत्र दवाखाना सुरू केला. दवाखाना आणि प्रभावी औषधामुळे रोगाला बर्‍यापैकी नियंत्रणात ठेवण्यात यश आल्याचे माने सांगतात. या रुग्णांच्या कुटुंबांना रोजगार मिळावा, एक उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठीही माने यांनी पुढाकार घेतला. रुग्णांच्या कुटुंबातील २५ ते ३० जणांना कल्याण-डोंबिवलीत त्यांनी नोकरी मिळवून दिली, तर महिलांना स्वबळावर अर्थार्जन करता यावे म्हणून शिवणकामाचे शिक्षण दिले. यासाठी त्यांना शिलाई मशीन मिळवून दिल्या आहेत. माने यांच्या कार्याची जपानच्या ‘सासाकावा लेप्रसी फाऊंडेशन’नेही विशेष दखल घेतली. त्यांनी केलेल्या अर्थसाहाय्यातून वसाहतीमध्ये दुग्धव्यवसाय सुरू करण्यात आला आणि त्याला उत्कृष्ट उपक्रमाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही मिळाले. या प्रकल्पाला जोडून बायोगॅस प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. यातून कुष्ठरुग्णांना स्वावलंबनाचे धडे देण्यात आले.


कुष्ठरुग्णांना त्यांना असलेल्या व्याधीमुळे कधीही सर्वसामान्यांच्या मंदिरात प्रवेश दिला जात नाही, म्हणून रुग्णांच्या ईश्वर भक्तीपोटी वसाहतीच्या आवारातच राधाकृष्णाचे मंदिर बांधण्यात आले. माने यांच्या कुष्ठरुग्ण सेवा योगदानात त्यांची पत्नी स्मिता, मुलगा देवेंद्र आणि योगेंद्र सुना आर्या आणि रवी यांचे मोलाचे योगदान आहे. कुष्ठरुग्णांसाठी माने यांनी केलेल्या कामाची दखल घेत त्यांना ’पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी शिफारस कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने राज्यशासनाकडे विशेष ठरावाच्या माध्यमातून केली आहे. कुष्ठरुग्णांची सेवा करण्याबरोबरच अनेक सामाजिक विषय समाजासमोर प्रकर्षाने मांडण्याचा माने यांचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. डोंबिवली ते रत्नागिरी अशी ४०० किलोमीटरची पदयात्रा करून त्यांनी मार्गावरील विविध ठिकाणी चालण्याचे फायदे पटवून दिले. माने यांची स्वतःची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून यातील ’पावलीची पावली’ यातून त्यांचा जीवनपट आणि ’सावली’ या कुष्ठरुग्णांवर आधारित असलेल्या पुस्तकांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे, माने यांच्या कार्याची दखल त्यांच्या मित्रपरिवाराने घेत त्यांच्यावर ’एकला चलो रे’ हे पुस्तक लिहिले. त्याचे प्रकाशन २०१६ साली आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. माने यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळावा म्हणून शिफारस झाली असली तरी त्यांना २०१६ साली शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने कुष्ठरोग निर्मूलन आणि पुनर्वसन सेवा पुरस्कार, तर २०१७ साली शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजोत्थान पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ‘‘कुष्ठरुग्णांना जातपात नसते. ज्या दिवशी त्याला रोगाची लागण होते, त्या दिवसापासून तो एक ‘कुष्ठरुग्ण’ म्हणून ओळखला जातो. हा कलंक त्याच्या मृत्यूपर्यंत कायमराहतो,’’ असे माने दुःखाने सांगतात. हनुमान नगर कुष्ठरुग्ण वसाहत ही नोंदणीकृत वसाहत आहे. महाराष्ट्रातील सर्व रुग्ण वसाहतींमध्ये शासकीय सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, हे माने यांचे स्वप्न आहे. प्रत्येक रुग्णास त्याचे स्वतःचे घर नोकरी/ योग्य अनुदान औषधोपचार, मुलांना उच्च शिक्षणात साहाय्य प्रत्येक घरात रोजगारासाठी एक रिक्षा परवाना या प्रकरणी माने यांचा पाठपुरावा शासनदरबारी सुरू आहे.तेव्हा, गजानन माने यांच्या सामाजिक कार्याला मानाचा मुजरा आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.


- रोशनी खोत
@@AUTHORINFO_V1@@