निरपेक्ष कार्याची 'भरारी'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018
Total Views |


सामूहिक प्रयत्नांनी अपंगत्वावर मात करून अधिक आत्मविश्वासाने आणि आनंदाने जगता येते, हे डोंबिवलीतील भरारी-अस्थिव्यंग विकलांग संस्थेने दाखवून दिले आहे. गेली २२ वर्षे ही संस्था कार्यरत आहे. या कार्याची मुहूर्तमेढ रोवणार्‍या डॉ. अंजली आपटे यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करून देणारा हा लेख...


अंजली आपटे यांचे शिक्षण डोंबिवलीतील स. वा. जोशी विद्यालयातील, तर प्राथमिक शिक्षण फणसेबाईंच्या शाळेत झाले. डॉ. अंजली आपटे यांचे वडील हे स्वयंसेवक होते. तसेच ते मुंबई महानगरपालिकेत उच्च पदावर कार्यरत होते. त्यामुळे उच्च शिक्षण घेण्याचे डॉ. अंजली आपटे यांनी आधीच ठरवले होते. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी झुनझुनवाला महाविद्यालयात इंटरसायन्सचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी फिजिओथेरपीमधील ‘ऑक्युपेशनल थेरपी’चे शिक्षण घेण्याचे ठरवले. या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षातील परीक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वीच त्यांच्याकडे रुग्ण येऊन उपचार घेत असत. त्या काळी ‘ऑक्युपेशनल थेरपी’ हे नवीन शास्त्र असल्याने याबाबतची तितकीशी माहिती लोकांमध्ये नसल्याचे डॉ.आपटे सांगतात. त्यानंतर त्यांनी हाजी अली येथे असलेल्या एका खाजगी महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण घेण्याचे ठरवले पण, जाण्या-येण्यात लागणारा वेळ आणि रुग्ण सेवा यांची सांगड जमत नसे. त्यातच १९७१ साली अंजली आपटे यांचे लग्न झाले. त्या दरम्यान त्यांनी ठाण्यात प्रॅक्टिस सुरू केली. पण, ही प्रॅक्टिस १० वर्षच करेन, या अटीवर त्यांनी सुरू केली. १९७३ साली त्यांनी ही प्रॅक्टिस सुरू केली आणि १९८२ साली ती बंद केली. याचदरम्यान १९८० साली त्यांना मुलगा झाला, तर २१ जून १९८५ साली त्यांना मणक्याची शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर मात्र डॉ. आपटे यांनी आपल्या कामांत भरारी घेतली. मणक्याच्या शस्त्रक्रियेमुळे बाह्य रुग्णसेवा त्यांना बंद करावी लागली. पण, डोंबिवलीत त्यांची प्रॅक्टिस सुरू झाली. दरम्यान, ‘रोट्रॅक्ट’च्या उपाध्यक्ष होण्याची संधी मिळाल्याने व्यापक कामकरता आल्याचे त्या सांगतात, तर जनसंघाची महिला युवक आघाडीची प्रमुख म्हणूनदेखील त्यांनी काही काळ कामकेले. नंतर साधारण १९९४ च्या सुमाराची गोष्ट. डोंबिवली शहरात रामनगर येथील एका दुर्लक्षित बागेत सहा-सात अपंग मित्र दर रविवारी भेटत असत. विजय प्रधान (भाऊ), दिलीप अढळीकर, संजीव मांद्रेकर, मंदार दीक्षित, चंद्रशेखर बेजकर, विनोद शहा अशी त्यांची नावे. एकत्र जमून सुख-दु:खाच्या गप्पागोष्टी, हास्यविनोद करणे हाच त्यांच्या या भेटीचा मुख्य उद्देश होता. या बागेजवळून येणारी-जाणारी माणसेही त्यांच्या आनंदात सहभागी होत असत.



फिजिओथेरपिस्ट असलेल्या डॉ. अंजली आपटे अशाच मंडळींपैकी एक. शरीराने अपंग असतानाही सदैव प्रसन्न दिसणार्‍या या मित्रांबद्दल त्यांना खूप कुतूहल वाटे. मात्र, पावसाळ्यात एके दिवशी त्यांना ही मंडळी दिसली नाही. म्हणून डॉ. अंजली यांनी चौकशी केली असता पावसामुळे त्यांना बाहेर पडता येत नसल्याचे समजले. त्यांची ही अडचण पाहिल्यानंतर डॉ. अंजली यांनी या मित्रांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आणि त्यांच्या भेटीला विधायक स्वरूप देण्याचा सल्ला दिला. ‘‘एखादी संस्था सुरू करू या, जी फक्त अपंगांसाठी कार्य करेल. त्यांच्या समस्यांवर उत्तर शोधेल. तुमच्यासारख्या अन्य अपंग बांधवांनाही यामध्ये सामील करून घेता येईल. मी आणि माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते तुम्हाला सहकार्य करतील,’’ असे डॉ. अंजली यांनी सुचवले. या सूचनेवर मित्रमंडळींमध्ये विचार सुरू असतानाच आणखी एक घटना घडली. डोंबिवली नगरपालिकेजवळ असणारा एका अपंगाचा टेलिफोन बुथ हटविण्याचे आदेश पालिका अधिकार्‍यांनी दिले होते. या मंडळींनी यावर एकत्र येत तत्कालीन आयुक्त मदान यांच्या कार्यालयावर थेट धडक दिली आणि अपंगांच्या व्यथा मांडल्या. आयुक्तांनी पालिका अधिकार्‍यांचा आदेश रद्द करून अपंगांची बाजू योग्य असल्याचा निर्वाळा दिला. या घटनेनंतर विजय प्रधान यांनी अंपगांसाठी संस्था स्थापन करण्याचा निर्धार पक्का केला आणि दि. ३ डिसेंबर १९९६ या जागतिक अपंग दिनाच्या मुहूर्तावर भरारी अस्थिव्यंग विकलांग संस्था स्थापन झाली. भाषाप्रभू पु.भा.भावे यांच्या पत्नी प्रभावती भावे यांच्या हस्ते संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. संस्था सुरू केल्यावर सर्वप्रथमअपंगत्वाचा दाखला मिळवून देणार्‍या शिबिराचा कॅम्प आयोजित केला, तर डॉ. अंजली आपटे यांच्या स्नेही मीना विरकर यांच्यामुळे संस्थेला ‘भरारी’ हे नाव मिळाल्याची आठवण डॉ. आपट्यांनी सांगितली. डॉ. अंजली आपटे यांच्या आईनेदेखील आठ एकर जमीन या संस्थेसाठी दान केली. जागा मिळाली, पण त्यावर बांधकामकरण्यासाठी पुरेसा निधी कमी होता. त्यासाठी शंकर जयकिशन यांच्या गाण्यांचा कार्यक्रमकरण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, विजय प्रधान यांची एकमताने त्यावेळी अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि एका सेवाव्रती चळवळीने ‘भरारीच’ घेतली.


अपंगांचे पुनर्वसन, प्रशिक्षण आणि उपचार अशा अनेक अंगांनी संस्थेचे कार्य सुरू झाले. सर्वात आधी एक महत्त्वाची समस्या समोर आली ती म्हणजे, अपंगत्व दाखला मिळविण्यासाठी मुंबईला खेटे मारावे लागतात. सर्वच शासकीय व शैक्षणिक सवलती दाखल्यावर अवलंबून असल्या कारणाने ही वेळ अपंगांवर येऊ नये म्हणजे अपंगत्व दाखला शिबिराचे आयोजन करण्यात आले. आतापर्यंत शिबिरांच्या माध्यमातून पाच ते सहा हजारांहून अधिक दाखले देण्यात आले आहेत. गेल्या २२ वर्षांच्या कारकिर्दीत संस्थेने अपंगांसाठी अनेक कल्याणकारी उपक्रमराबविले. उदा. अपंगत्व दाखला, रेल्वे व एस.टी. प्रवास सवलतीचा लाभ अपंगांना मिळवून देणे, कॅलिपर्स, क्रचेस, व्हिलचेअर्स, श्रवणयंत्र इत्यादी उपकरणांचे वाटप करणे, अपंगांना व त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक व प्रासंगिक मदत करणे. त्यांच्या स्वावलंबित्वासाठी शिवणयंत्र, घरघंटी यांसारख्या उपयोगी वस्तूंचे वाटप करणे, अपंगांना स्टॉल्स मिळवून देणे, त्यांच्या नोकरीसाठी सहकार्य करणे असे अपंगांच्या हिताचे अनेक उपक्रमसंस्था राबवित आहे. शारीरिक विकलांग असलेल्यांना राज्य व केंद्र सरकारतर्फे कोणकोणत्या सुविधा मिळतात, याची माहिती देण्यात येते. तसेच ही माहिती अधिक अपंगांपर्यंत पोहोचविण्याचा व त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देण्याचा संस्थेचा मानस आहे. शारीरिक विकलांग असलेल्यांना विनामूल्य कायदेशीर सल्ला देण्याची योजनाही संस्थेने सुरू केली आहे. हे कार्य म्हणजे दिवंगत विजय प्रधान यांच्या वचनाची पूर्ती आहे. संस्थेतर्फे अपंगांसाठी वर्षा सहलीचे आयोजनही करण्यात येते. तसेच मकरसंक्रात, भजनसंध्या, नववर्ष स्वागत यात्रा आदी उपक्रमात ‘भरारी’ संस्थेचे सदस्य मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. डिसेंबर-जानेवारी महिन्यात घाटावर हुर्डा पार्ट्यांना सुरुवात होते. त्याचा कोकणी अवतार म्हणजे पोपटी. काहीशी विस्मरणात गेलेली व शहरातील लोकांना अजिबात माहिती नसलेली ही पोपटी डोंबिवलीत मात्र गेली अनेक वर्षं संस्थेतर्फे पारंपरिक पद्धतीने आवर्जून साजरी होते. त्यात डोंबिवलीतील सर्व स्तरातील नामवंत व्यक्ती सहभागी होतात. ‘भरारी तिमिरातूनी तेजाकडे’ हे पुस्तक १८ एप्रिल २०१० रोजी प्रकाशित झाले. तसेच संस्थेची माहिती सर्वांना व्हावी, या उद्देशाने एक माहितीपट बनविण्यात आला आहे. संस्थेचे स्वतंत्र संकेतस्थळही आहे. दरम्यान, २०१० साली अपंगालय साईधारा टॉवर येथे स्थलांतरित झाले. ’अपंगालय ज्येष्ठालय’ हा ‘भरारी’चा एक मुख्य प्रकल्प आहे. शारीरिक हालचालींवर खूपच मर्यादा आहेत, असे अपंग आणि वृद्धापकाळाने अंथरुणावर खिळलेल्या रुग्णांची देखभाल एखाद्या संस्थेच्या माध्यमातून होणे ही काळाची गरज बनली. या रुग्णांसाठी एक केंद्र असावे, अशी कल्पना प्रत्यक्षात साकारली ती २००५ साली. डॉ. तारा नाईक यांनी स्वत:च्या दोन खोल्या या अपंगालयासाठी सुरुवातीला दिल्या. परंतु, ती जागा अपुरी पडू लागल्याने १५ ऑगस्ट २०१० रोजी मानपाडा रोडलगत असलेल्या साईधारा सोसायटीत अपंगालय सुरू करण्यात आले. या ठिकाणी ३० ते ३५ अपंगांची व्यवस्था आहे. त्यांना तज्ज्ञांच्या सल्ल्याने आहार, वैद्यकीय सुविधा आणि मनोरंजनाची साधने येथे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मदतीस तत्पर असा सेवकवर्ग आहे. केवळ निवारा नव्हे, तर आत्मविश्र्वास निर्माण करणारे पुनर्वसन प्रकल्प राबविता येतील, असे अत्याधुनिक केंद्र संस्थेला उभारायचे आहे. त्यात मनोरंजन तसेच विरंगुळ्याची साधने, ऑडिटोरियम, संगणक कक्ष, संगीत कक्ष, बैठ्या खेळांची सुविधा असणार आहे. तसेच तज्ज्ञांद्वारे समुपदेशनाची व्यवस्था, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, तसेच अपंगांना त्यांच्या घरून नेण्या-आणण्याच्या सोयीसह डे-केअर सेंटर असेल. सुसज्ज व्यवसाय प्रशिक्षण केंद्र खाद्यपदार्थ, हस्तकलेच्या वस्तू, अन्य छोट्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी सुसज्ज कार्यशाळा, तसेच संस्थेच्या माध्यमातून उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी केंद्र असेल. संस्थेने गेल्या वर्षी डोंबिवलीजवळ तळोजा कॉंक्रीट रोडलगतच्या तलावाजवळ २० गुंठे जागा विकत घेतली आहे. यासाठी तहसीलदारांच्या भेटीगाठी सुरू असल्याचे डॉ.अंजली आपटे यांनी सांगितले.


- तन्मय टिल्लू
@@AUTHORINFO_V1@@