नेत्ररोगतज्ज्ञतेचा व्यापक ‘दृष्टि’कोन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018
Total Views |
 

 
शालेय शिक्षण घेताना काहींचा आधीच निर्धार पक्का असतो, तर काही जणांच्या आयुष्यात कोणाचा तरी प्रभाव पडतो आणि त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळते. मग त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरू होते. त्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली जाते. अशीच मेहनत आणि अभ्यासाच्या जोरावर डॉ. अनघा हेरूर या नेत्ररोगतज्ज्ञ झाल्या आणि आज अनेकांना डोळस करण्याचे काम त्या आणि त्यांच्यासोबत असलेला महिला कर्मचारीवर्ग अनेक वर्ष करत आहे. अनघा हेरूर... डोंबिवलीत आज हे नाव सर्वांच्याच परिचयाचे झाले आहे. अनेकांना खर्‍या अर्थाने दृष्टी देणारं हे नाव.
 
 
अनघा हेरूर यांचे बालपण घाटकोपरमधील. विद्याविहारच्या फातिमा हायस्कूलमधून त्यांनी शिक्षण घेतले. आई-वडील दोघेही उच्चशिक्षित. डॉ. अनघा यांचे वडील विद्यापीठात ‘सेंटर ऑफ सोव्हिएत स्टडीज’ या विभागात डायरेक्टर पदी होते, तर आई ‘टेक्सटाईल कमिटीची डायरेक्टर होत्या. त्यामुळे त्यांच्यासारखेच उच्च शिक्षण घ्यायचे, हा निश्चय डॉ. अनघा यांनी आधीपासूनच केला होता. त्याप्रमाणे शालांत परीक्षेत त्यांनी सातत्याने चांगले गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. प्राथमिक शिक्षणाची वर्ष संपली आणि शैक्षणिक आयुष्यातील जडणघडणीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर त्यांचे आयुष्य येऊन ठेपले. याच दरम्यान बलराज साहनी यांचा रुग्णसेवेवर आणि वैद्यकीय क्षेत्रावर आधारित चित्रपट डॉ. अनघा यांनी पाहिला. हा चित्रपट पाहूनच त्यांनी सातवी, आठवीच्या शालेय वर्षात डॉक्टर व्हायचे ठरवले. या चित्रपटात रुग्णाची सेवा करून मिळालेला आनंद किती वेगळा असतो, हे त्यांना कळले आणि हाच आनंद आणि रुग्णाच्या चेहर्‍यावरील समाधान पाहण्यासाठी डॉक्टरच व्हायचा निर्णय डॉ. अनघा यांनी त्यावेळी घेतला. पुढे दहावी झाल्यानंतर डॉक्टर होण्यासाठी विज्ञान शाखेची निवड करणे आवश्यक होते. त्यादृष्टीने चांगले महाविद्यालय निवडण्याची गरज होती. अखेर माटुंग्याच्या डी. जी. रुपारेल महाविद्यालयात त्यांना प्रवेश मिळाला आणि डॉक्टरकीची पहिली पायरी सुरू झाली. महाविद्यालयात असतानाच वैद्यकीयविषयक बरीच पुस्तके वाचण्यास सुरू केल्याचे त्या सांगतात. प्रत्येक विषय वेगळा होता. घरी वैद्यकीय क्षेत्राशी कोणीच संबंधित नव्हते. त्यामुळे या क्षेत्राशी निगडित प्रत्येक छोट्या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या असल्याचे डॉ. अनघा सांगतात. रूपारेल महाविद्यालयातील विज्ञान शाखेतून पदवीधर झाल्यानंतर डॉ. अनघा यांच्या आईने त्यांना पुन्हा एकदा वैद्यकीय क्षेत्रातच करिअर करायचे आहे का? याबाबत विचारणा केली. त्यासाठी त्यांनी सायन रुग्णालयात असलेल्या त्यांच्याच मैत्रीतील डॉक्टरांची भेट अनघा यांच्याशी करून दिली. त्यांनी अनघा यांना प्रत्येक विभागात फिरवून त्याची माहिती दिली. त्यानंतर व्यक्तिगत सल्ला म्हणून डॉ. अनघा यांना त्यांनी डॉक्टर न होण्याचा सल्ला दिला. पण, डॉ. अनघा त्यांच्या निर्णयावर ठाम होत्या. त्यांनी तोच निर्णय कायम ठेवला आणि सायन वैद्यकीय रुग्णालयात वैद्यकीय शिक्षणाचा श्रीगणेशा केला. वैद्यकीय शिक्षणाची आवड आणि रुग्णसेवा करून मिळणारे आत्मिक समाधान या जोरावर त्यांचे एमबीबीएसचे शिक्षण सुरू झाले. त्यावेळी वैद्यकीय पुस्तकांचे आकारमान आणि वजन विचारात घेता ती बॅगेत घेऊन जाणे अशक्य होते. एमबीबीएसचे शिक्षण सुरू असतानाच पुढे नेत्ररोगतज्ज्ञ व्हायचे ध्येय त्यांनी आधीच निश्चित केले असल्याने आणि या विषयात विशेष रुची असल्याने डॉ. अनघा यांनी ‘एमएस’चा अभ्यास आवड म्हणून सुरू केला. यादरम्यान उत्तम शिक्षकांची साथ लाभली. त्यांच्या शिकवण्याची पद्धत, शंकांचे योग्य निरसन यामुळे आलेल्या अडचणींवर सहज मात करता आल्याचे त्या सांगतात. याच जोरावर एमबीबीएसमध्ये डॉ. अनघा या महाराष्ट्रातून त्यावर्षी प्रथम आल्या. एमबीबीएसच्या दुसर्‍या वर्षात डॉ. अनघा यांचा साखरपुडा कॅन्सरतज्ज्ञ डॉ. अनिल हेरूर यांच्याशी झाला. एमबीबीएसच्या तिसर्‍या वर्षात १८ गोल्ड मेडल मिळवत डॉ. अनघा यांनी प्राविण्य मिळवले. यासोबत ऑप्थॅमॉलॉजी अर्थात नेत्ररोगशास्त्र या वैद्यकीय शाखेचा अभ्यास त्यांनी सुरू केला. म्हणजेच डोळा व त्याला होणार्‍या रोगांचा अभ्यास करण्याचे त्यांनी ठरवले.
 
 
डोळा... माणसाला द्रष्टेपण देणारा अविभाज्य अवयव. ऑप्थॅलचे शिक्षण सुरू झाल्यावर वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण घेत असताना दिवसाला २०-२० सर्जरी सुरू असायच्या, असे डॉ. अनघा सांगतात. यादरम्यान, ‘आरएमओ’ म्हणून काम करणं किती कष्टप्रद आहे, याची जाणीव झाली. ‘आरएमओ’ म्हणून काम करताना आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळायची याची शिकवणही मिळाली. अपघातात दृष्टी गमावलेले, डोळ्यावर मार लागलेले बरेच रुग्ण यादरम्यान सायन रुग्णालयात येत असल्याची आठवण डॉ. अनघा यांनी सांगितली. अखेर १९९७ साली त्यांचे एमएसचे शिक्षण पूर्ण झाले. एमएसचे शिक्षण पूर्ण होताच त्यांनी प्रॅक्टिसला सुरुवात केली. याच दरम्यान कॅन्सरतज्ज्ञ डॉ. अनिल हेरूर यांच्याशी विवाह झाला आणि डॉ. अनघा डोंबिवलीत आल्या. त्यांच्या सासूबाई या स्वतः ऑप्थॅल सर्जन होत्या. डोंबिवली, कल्याण आणि आसपासच्या शहरातील रुग्ण त्याकाळी सासूबाई डॉ. उमा हेरूर यांच्या क्लिनिकमध्ये तपासणीसाठी येत असत. डॉ. उमा हेरूर यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य सातत्याने लाभल्याचे डॉ. अनघा सांगतात. त्यानंतर आज ४५ वर्षं डोंबिवलीतील ’अनिल आय केअर’ रुग्णसेवा देत आहे. ‘अनिल आय हॉस्पिटल’ हे जगभरातील अतिउच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाने परिपूर्ण असे डोळ्यांचे क्लिनिक आहे. तसेच संपुर्ण महिला कर्मचारी वर्ग असलेले डोंबिवलीतील एकमेव असे क्लिनिक आहे. अनिल आय केअर हे एनएबीएच, आएसओ ९००१-२०१५ मानांकित आहे. एएसएनएच ने देखील प्रमाणित आहे. आगामी काळात तंत्रज्ञानाच्या जोरावर अधिक परिपूर्ण बदल करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. २० वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये अनेक रुग्णांना दृष्टी देण्याचे काम डॉ. अनघा यांनी केले आहे. दरम्यान, या काळात मूकबधिर रुग्णांवर करण्यात आलेली लॅसिक सर्जरी कायम लक्षात राहील, असे त्या सांगतात. लॅसिक सर्जरी ही एकदाच होते. या दरम्यान रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील समन्वय फार महत्त्वाचा असतो. या उपचारात केवळ डोळ्यांत ड्रॉप टाकून रुग्णाच्या चष्म्याचा नंबर कमी करण्यात येतो. पण, यासाठी ऑपरेशन सुरू असतानाच रुग्णाला सूचना देण्यात येतात. त्याचे योग्य पालन त्या रुग्णाने करायचे असते. पण, मूकबधिर रुग्ण असल्याने सूचना देणार तरी कशा? हा मोठा पेच डॉ. अनघा यांच्यासमोर होता. अखेर स्पर्शज्ञानाने त्या रुग्णाला डोळ्यांच्या हालचाली करण्यासाठी डेमो ट्रेनिंग देण्यात आले. त्यानंतर प्रत्येक स्पर्शाला काय हालचाल करायची हे समजविण्यात आले आणि अशाप्रकारे ही अतिशय आव्हानात्मक सर्जरी यशस्वीरित्या पूर्ण झाली. ही सर्जरी कायम लक्षात राहील, असे डॉ. अनघा सांगतात.
 
 
'vision is taken for granted ’ असे म्हणत त्यांनी नेत्रदान का आवश्यक आहे, याची जाणीव एकाच वाक्यात करून दिली. त्या म्हणाल्या की, ‘‘आज ज्यांना दृष्टी आहे ते या दृष्टीला, डोळ्यांना फार महत्त्व देत नाहीत. पण, ज्यांना हे विश्वच दिसत नाही त्यांचा विचार दोन मिनिटे डोळे बंद करून जरी केला तरी लक्षात येईल आणि यासाठीच नेत्रदान करण्याची गरज आहे. एका व्यक्तीने केलेले नेत्रदान दोन व्यक्तींना दृष्टी देऊ शकते.’’ त्यांनी नेत्रदानाची महती सांगितली. डॉ. अनघा यांची पुढील पिढी देखील वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत आहे. मुलगा अनिरूद्ध हा एमबीबीएसच्या तिसर्‍या वर्षात केईएम येथे असून मकरंद हा सायन वैद्यकीय रुग्णालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षात आहे. आज वैद्यकीय क्षेत्रात बरेच सकारात्मक बदल होत असल्याचेही त्या म्हणाल्या आणि ‘अनिल आय हॉस्पिटल’ अशाच सकारात्मक बदलासह आणखी टेक्नोसॅव्ही होत आहे. डॉ. अनघा हेरूर यांना २०१२ साली ब्राह्मण सभेतर्फे ‘भीषगौर्‍या पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. तसेच अनेक संस्थांकडून कर्तृत्ववान महिला म्हणूनही पुरस्कार मिळाले. गोपाळकृष्ण चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातूनही डॉ. अनघा हेरूर यांचे काम चालते. ठाणे जिल्ह्यातील गावपाड्यात फिरून तेथील नागरिकांची मोफत नेत्रतपासणी केली जाते. तसेच माफक दरात इलाजही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉक्टर असलेल्या अनघा हेरूर कवयित्रीही आहेत. त्या म्हणतात, ’’कर्म की हर ज्योत यूँ रोशन सदा करती रहें, प्रेरणा बनकर दिलों मै लॉ सदा जलती रहैं.’
 
 
 
- तन्मय टिल्लू 
 
@@AUTHORINFO_V1@@