संडे सायन्स स्कूलचा जनक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018
Total Views |


शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान हा विषय पाठ्यपुस्तकात शिकून चांगले गुण मिळतीलही. परंतु, त्या वैज्ञानिक संकल्पना त्यांना समजल्याच नाहीत तर काय? नेमक्या याच विचाराने शालेय विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, तौलनिक विचारक्षमता, निर्णयक्षमता, निरीक्षण कौशल्य व कृतिशीलता वाढीस लागावी आणि वैज्ञानिक प्रयोगातून नवनिर्मितीचा आनंद मिळावा म्हणून दिनेश निसंग यांनी दर रविवारी सुरू केलेली संडे सायन्स स्कूलची संकल्पना खरंच कौतुकास्पद आहे. तेव्हा, दिनेश निसंग यांच्या व्यक्तिमत्त्वाबरोबरच त्यांच्या या अनोख्या वैज्ञानिक संकल्पनेचा आढावा घेणारा हा लेख...


अहमदनगर येथील दिनेश निसंग यांचे कार्य आगळेवेगळे आहे. दर रविवारी विज्ञान शाळा चालविण्याची संकल्पना त्यांनी राबविली आणि आता या उपक्रमाने मोठे स्वरूप धारण केले आहे. मुलांना विज्ञानाची आवड निर्माण करण्याबरोबरच विज्ञाननिष्ठ बनविणे हा त्यांचा त्यामागील हेतू. कारण, विज्ञानाचे औपचारिक शिक्षण ही काही जादूची कांडी नाही. त्यातही विज्ञानाचे शिक्षण घेणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे यांचे परस्पर नाते असतेच असे नाही. विज्ञान कशासाठी शिकायचे? या प्रश्नाचं उत्तर गुण मिळवून डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ बनण्यासाठी, असे साचेबद्ध नक्कीच नाही. विज्ञान शिकायचे, शिकवायचे ते विज्ञानाधिष्ठित समाजव्यवस्थेतील तर्कशुद्ध आणि तौलनिक विचार करण्याची क्षमता असणारे सुजाण नागरिक घडविण्यासाठी, असे निसंग यांना वाटते. दि. १० एप्रिल १९८१ रोजी शशिकांत आणि सुषमा निसंग यांच्या पोटी दिनेश यांचा जन्मझाला. त्यांचे शिक्षण नगरमधील रेखी गुरुजींच्या शाळेत आणि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. त्यांनी अहमदनगर महाविद्यालयातून २००१ मध्ये बीएस्सी (भौतिकशास्त्र) मध्ये पदवी मिळविली. बारावीत असताना त्यांनी भारतात नौदलासाठीची प्रवेश परीक्षाही दिली. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. त्यावेळी या परीक्षेस बसणारे बहुतेक म्हणजे ७० टक्के मेरीटधारक आणि परीक्षक बिहारी असल्याचे त्यांना आढळले. त्यानंतर शिक्षक बनणार नाही, असे मनोमन त्यांनी ठरवूनच टाकले. पण, नियतीचा खेळ म्हणा, पुढे त्यांना वेगळ्या प्रकारे का होईना, शिक्षकी पेशाच अंगिकारावा लागला. क्लासेसचे कौन्सिलर म्हणून संपूर्ण नगर जिल्ह्यात फिरत असताना विद्यार्थ्यांना कौन्सिलिंगची खूप गरज असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी स्वामी विवेकानंद स्टडी सेंटर सुरू केले. २००३ मध्ये पुण्यातील ‘आयुका’ या खगोलशास्त्र संस्थेला त्यांनी भेट दिली असता


विज्ञाननिष्ठ समाज असला पाहिजे, असे त्यांच्या लक्षात आले. त्यातून त्यांचा पुढील प्रवास सुरू झाला. वैज्ञानिक आणि समाज एकत्र आल्याशिवाय विज्ञाननिष्ठ समाज घडणार नाही, हे त्यांच्या लक्षात आले. त्यातून त्यांनी २००४ मध्ये भास्कराचार्य रिसर्च सेंटर सुरू केले. नगरचे आनंद शहा, प्रसिद्ध वैज्ञानिक जयंत नारळीकर यांचे त्यांना याकामी प्रोत्साहन मिळाले. त्यातून निसंग यांचे कार्य उभे राहिले. आज भारतातील शाळा-महाविद्यालयातील बहुतांश प्रयोगशाळा या केवळ संग्रहालय झाल्या आहेत का? असा प्रश्न पडतो. शाळामंधून खडू-फळा जाऊन डिजिटल शिक्षणव्यवस्था आली. मात्र, या सर्वात कृतिशील अनुभवातून शिक्षण देणार्‍या शाळांची संख्या नाममात्रच आहे. केवळ हे चित्र बदलायला हवे, असा विचार न करता ‘आपण हे चित्र नक्की बदलू शकतो’ असा निर्धार करून २००८ साली दिनेश निसंग यांनी ‘संडे सायन्स स्कूल’ची स्थापना केली. हल्लीच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांचे गुण वाढत असले तरी त्यांची एकूणच गुणवत्ता मात्र ढासळत चालली आहे. विज्ञान हा विषय पाठ्यपुस्तकात शिकून चांगले गुण मिळतातही, परंतु त्या संकल्पना समजल्याच नाहीत तर काय? त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना विज्ञान कशासाठी शिकायचे? गुण मिळवण्यासाठी की शास्त्रज्ञ बनण्यासाठी? प्रयोग का करायचे? संकल्पना समजून घेण्यासाठी की त्यातून नवनिर्मितीसाठी? यासारखी प्रश्नांची उत्तरे शोधून, शालेय विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, तौलनिक विचारक्षमता, निर्णयक्षमता, निरीक्षण कौशल्य व कृतिशीलता वाढीस लागावी आणि वैज्ञानिक प्रयोगातून नवनिर्मितीचा आनंद मिळावा म्हणून ‘संडे सायन्स स्कूल’च्या वतीने रविवारी विशेष वर्ग घेतले जातात. ’मी केलं, मला समजलं’ या उक्तीप्रमाणे चालणार्‍या ‘संडे सायन्स स्कूल’मध्ये एरवी फक्त मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही या आभासी जगात फिरणारी बोटे प्रत्यक्ष कामकरतात, तेव्हाच त्यांना जगाची ओळख होते. तयार केलेले साहित्य मुलांना घरीच मिळते, ज्यातून त्यांची स्वत:ची प्रयोगशाळा घरच्या घरीच तयार होते. स्वतंत्रपणे प्रयोग करण्याचे आणि मनसोक्त चुका करून त्यातून शिकण्याचे स्वातंत्र्य मुलांना हवं असतं. दर रविवारी दोन तास हे स्वातंत्र्य मुलांना ‘संडे सायन्स स्कूल’मध्ये मिळतं. त्यामुळे नवनिर्माण आज नाही उद्या नक्की होईल, या भावनेने या रविवारी भरणार्‍या शाळेचे काम सुरु आहे. या वाटचालीत अनेकांचे सहकार्य आणि शुभेच्छा प्राप्त झाल्याचे निसंग आनंदाने सांगतात. २००७ मध्ये बारामती येथे आयोजित चिल्ड्रन्स सायन्स कॉंग्रेसमध्ये डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या भेटीचा निसंग यांना योग आला. कलाम हे निसंग यांचे आदर्श. ‘‘आज देशाला देशासाठी मरणार्‍यांऐवजी देशासाठी जगणार्‍यांची जास्त गरज आहे,’’ हा कलामयांचा विचार निसंग यांना भावतो. २००८ साली एका ठिकाणाहून सुरु झालेली ही विज्ञान चळवळ आज भारतात ६० हून अधिक ठिकाणी जाऊन पोहोचली आहे आणि भारताबाहेरही ही चळवळ भरारी घेणार आहे.


सायन्स स्कूलचा उपक्रम कुठेही खर्चिक नाही. त्याचे निसंग यांनी व्यापारीकरण होऊ दिले नाही. या कामासाठी खासगीकरण करून मोठी फी आकारण्याची आणि त्यासाठी मोठी आर्थिक मदत देण्याची तयारी देखील अनेकांनी दाखविली होती. मात्र, दिनेश निसंग यांनी कटाक्षाने त्यास नकार देऊन सर्वसामान्य मुलांसाठी हा उपक्रम राबविण्याचा निर्धार केला. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी आनंदी झाले पाहिजेत, हे त्यामागचे सूत्र. तसे नसेल तर विद्यार्थ्यांना विज्ञाननिष्ठ घडविण्याचा हेतू साध्य होणार नाही.


२०१० पर्यंत या संकल्पनेचा पुढे आणखीन विस्तार झाला. आज शेकडो मुले या शाळेत येऊन प्रयोग करीत आहेत. आता हे जाळे केवळ नगर जिल्ह्यातील गावांतच विखुरलेले नसून देशांत सर्वत्र विस्तारले आहे. २०११ पासून निसंग यांनी पुण्यातूनही या कार्याला सुरुवात केली. याच वर्षी नीलम धर्माधिकारी यांच्याशी दिनेश निसंग विवाहबद्ध झाले आणि त्यांच्या पत्नीची देखील या प्रयोगात त्यांना चांगली साथ मिळाली. जाता जाता दिनेश निसंग म्हणतात की, ‘‘दशकभराच्या प्रवासात आपल्या सर्वांच्या शुभेच्छा सोबत होत्या व भविष्यातही राहतील ही खात्री आहे. माध्यमांनीही या कामाची दखल घेतली आहे. ठरवलेल्या कामाची आता कुठे सुरुवात आहे, अजून खूप पल्ला गाठायचा आहे.’’


- पद्माकर देशपांडे
@@AUTHORINFO_V1@@