धान्य बँक - भूक शमवणारी समाधानाची साखळी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018
Total Views |
 
 
गेल्या काही वर्षांमध्ये ‘घरबसल्या उद्योजक व्हा’, ‘गृहिणींनो, घरबसल्या पैसे कमवा’, अशा प्रकारच्या कित्येक जाहिराती आपण पाहतो. कित्येक महिला या साखळी उद्योगाच्या सभासद होऊन, पैसे गुंतवून सौंदर्यप्रसाधने, बिछाने, नाना तर्‍हेची उत्पादने विकतात. ठाण्याच्या उज्ज्वला बागवाडे यांनीही अशीच एक साखळी सुरू केली. गृहिणींमध्ये आत्मविश्वास जागवून, गरजवंतांच्या अन्नाची सोय त्या धान्य बँकेच्या साखळीद्वारे करत आहेत. तेव्हा, उज्ज्वला यांच्या या अनोख्या बँकेच्या सेवेचा आढावा घेणारा हा लेख...
 
 
एखाद्या सामाजिक संस्थेच्या कामाविषयी काही छापून आलं की, उज्ज्वला यांना त्या संस्थेचा नाव, पत्ता आणि फोन नंबर आपल्या वहीत लिहिण्याची खूप जुनी सवय. असंच एकदा बीडच्या ‘शांतीवन’विषयी त्यांच्या वाचनात आलं. नागरगोजे दाम्पत्याने ऊसतोडणी कामगारांच्या मुलांकरिता ‘शांतीवन’ या नावाने २००० मध्ये शाळा आणि वसतिगृह सुरू केले. मग काय, उज्ज्वलाताईंना हा प्रकल्प प्रत्यक्ष जाऊन पाहावासा वाटला. पत्ता शोधत त्या बीडमधल्या ‘शांतीवन’मध्ये धडकल्या. तिथल्या दोन दिवसांच्या मुक्कामात प्रकल्पाबद्दल त्यांना प्रचंड आत्मीयता वाटली. मुलांचं नागरगोजे दाम्पत्याबरोबर खूप छान नातं निर्माण झाल्याचं त्यांना जाणवलं. प्रकल्पाला इमारत निधी, शालेय साहित्य अशा वेगवेगळ्या गोष्टींकरिता निधीही उपलब्ध होतो पण, मुख्य समस्या होती, अन्नधान्याकरिता लागणार्‍या निधीची. प्रकल्पाची बाकीची कामं निधी नसला, तर एकवेळ नंतरही करता येऊ शकतात किंवा त्यांना पर्यायही उपलब्ध होतात पण, अन्नाला मात्र पर्याय नाही, ही बाब उज्ज्वलाताईंच्या डोक्यात ठाण मांडून बसली. घरी परतल्यावरही आपण याकरिता काहीतरी केलं पाहिजे, हाच विचार त्यांच्या मनात सतत घोळत असायचा. नोकरी करत नसल्यामुळे त्यांच्याकडे बराचसा वेळ असायचा. त्यांनी त्यांच्यासारख्याच हाताशी वेळ असणार्‍या आणि गृहिणीच्याच भूमिकेत रमणार्‍या त्यांच्या मैत्रिणींना एकदा घरी बोलावलं. गप्पा मारता मारता त्यांनी त्यांच्या ‘शांतीवन’ भेटीविषयी सांगितलं. आपल्याकडे असणार्‍या फावल्या वेळेचा आपण सदुपयोग करूयात, यावर सगळ्या जणींचं एकमत झालं. पण, नेमकं काय आणि कसं करायचं हे मात्र त्यांना कळेना. काहींनी तर ‘आपण काही करू शकतो का?’ अशीही शंका उपस्थित केली. संस्थेकडचा निधी संपला की, मुलांच्या अन्नधान्याकरिता खूप धावपळ करावी लागते. मग आपण शिधेवरच काम करूयात, असं ठरलं आणि मग धान्य बँकेची कल्पना सुचली. आपल्या देशात तसंही अन्नदानाला खूप महत्त्व आहेच. मग काय, २ डिसेंबर २०१५ रोजी तेरा सखींच्या ‘ 'We, Together' या ग्रुपची स्थापना करण्यात आली.
 
 
धान्य बँकेद्वारे संस्थेला एका महिन्याकरिता लागणार्‍या घेण्याचं ठरविण्यात आलं. त्या अंतर्गत मग संस्थेला पैसे न देता थेट धान्यच द्यायचं, असं ठरलं. प्रत्येकी १ किलो धान्य आणि जमल्यास स्वयंपाकाकरिता लागणार्‍या इतर वस्तूंचा पुरवठा करायचं निश्चित झालं. या तेरा सख्यांनी साखळी पद्धतीने या कार्यात आपापल्या नात्यातल्या, परिचयातील लोकांना यात सामील करायचं. प्रत्येक सभासदाने किमान १ किलो धान्य दान करावं, असं ठरलं. साखळी पद्धतीने व्यापार करणार्‍या कंपन्यांच्या धोरणानुसार त्यांनीही काम अवलंबलं. म्हणजे, गटातील एकीने चार सभासद जोडले, तर ते तिच्या अंतर्गत राहणार आणि त्यांच्याशी तिने समन्वय साधायचा. त्या चार सभासदांनी मग आपल्या अंतर्गत आणखी सभासद जोडत राहून ही साखळी वाढवत न्यायची. अशी ही ‘अन्नसाखळी’ची एक आगळीवेगळी कल्पना आखली गेली. या साखळीतील सभासदांनी दिलेल्या कालावधीत धान्य बँकेत, धान्य आणि स्वयंपाकघरात लागणार्‍या इतर वस्तू दान कराव्यात. दरम्यानच्या काळात कर्जतमधील डॉ. भरत वाटवानी यांच्या मनोरुग्णांकरिता कामकरणार्‍या ‘श्रद्धा फाऊंडेशन’ शीही उज्ज्वलाताईंचा चांगला संपर्क झाला होता. मग ‘श्रद्धा फाऊंडेशन’ आणि ‘शांतीवन’ या दोन्ही संस्थांच्या महिन्याभराच्या अन्नधान्याची गरज धान्य बँकेद्वारे पुरविण्याचे ठरले.
 
 
पहिल्या खेपेला दोन्ही संस्थांनी आपापल्या गाड्या ठाण्यात पाठवल्या आणि ते सामान घेऊन गेले. हा प्रयत्न तर चांगला होता, पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करताना त्यातील त्रुटी लक्षात आल्या. बीडमधून वाहन ठाण्यात येऊन, परत सामान घेऊन जाण्याचा वाहनखर्चच खूप आला. गव्हाला पोरकीड लागली. या अनुभवातून धडा घेत मग त्यावर उपाय काढण्यात आले. 'We, Together' च्या तेरा जणींनी दर शुक्रवारी भेटायचं ठरवलं. आपली बँक अधिकाधिक सक्षम कशी होईल, तिचा विस्तार कसा होईल, याकडे लक्ष द्यायचं ठरलं. या बँकेत सभासद तांदूळ, डाळी, कडधान्य, तेल, मीठ आणि स्वयंपाकघरात लागणारे इतर जिन्नस देऊ शकतात. मात्र, गहू, ज्वारी, बाजरी नको. धान्य बँकेत धान्यासोबतच रोख रक्कमही जमा करता येते. आपल्याला हवा तो पर्याय निवडा किंवा दोन्ही पर्यायही निवडता येतात. अंतरामुळे इच्छा असूनही एखाद्याला धान्य देता येत नाही, त्यांच्याकरिता रोख रक्कम हा पर्याय चांगला. किमान ५० रुपये आणि धान्य देत असाल, तर किमान १ किलो अशी आखणी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व थरातील लोकांना या अनोख्या उपक्रमामध्ये सामील होता येत आहे. उज्ज्वलाताईंच्या सोसायटीतील घरकाम करणार्‍या २ मैत्रिणीही या साखळीत सामील आहेत. मात्र, जमा झालेली रोख रक्कम थेट संस्थेला दिली जात नाही. जमा झालेल्या एकूण रकमेचं धान्य विकत घेऊन दिलं जातं. सभासदांना ‘श्रद्धा फाऊंडेशन’ आणि ‘शांतीवन’ या दोन्ही संस्थांकडून दिलेल्या दानाची पावती दिली जाते. त्यामुळे आपण दिलेलं धान्य आणि दान योग्य त्या ठिकाणी पोहोचत असल्याची खात्री सभासदांना मिळते. दर तीन महिन्यांतून एकदा या बँकेत धान्य आणि रोख रक्कम जमा करायची असते. साधारण आठवड्याभराचा अवधी दिला जातो. मुख्य सभासद आपल्या साखळीतील लोकांना डिपॉझिट करण्याचा कालावधी कळवते आणि हा निरोप साखळीतल्या शेवटच्या सभासदापर्यंत पोहोचवला जातो. जमा झालेलं सर्व धान्य कर्जतच्या ‘श्रद्धा फाऊंडेशन’ला दिलं जातं. जमा झालेल्या रकमेतून घाऊक बाजारातून संस्थांच्या गरजेनुसार धान्य, साबण आणि इतर जिन्नस खरेदी केले जातात. जमा रकमेतील ४० टक्के रकमेचं सामान ‘श्रद्धा फाऊंडेशन’ला दिलं जातं. ‘श्रद्धा फाऊंडेशन’ची गाडी येऊन त्यांचं सामान घेऊन जाते. पहिल्या अनुभवातून शहाणं झाल्यावर ‘शांतीवन’करिता नगरच्या एका होलसेल व्यापार्‍याकडून सामानाची खरेदी करण्यात येऊ लागली. त्या त्या चक्राला ‘शांतीवन’च्या वाट्याची ६० टक्के रक्कम किती आहे, हे त्यांना कळविण्यात येते. त्या रकमेचे सामान संस्था दुकानात जाऊन घेऊन येते आणि मग धान्य बँक सामानाचे पैसे भरतात.
 
 
'We, Together' प्रत्येक चक्राला ही साखळी वाढतेच आहे. आज या साखळीच्या माध्यमातून जगभरातील साडेचारशे जण या बँकेचे सभासद आहेत. हे सभासद या दोन संस्थांच्या किमान पाच महिन्यांच्या अन्नधान्याची गरज भागवत आहेत. तुम्ही एकदा का सभासद झालात की, तुम्ही या बँकेच्या साखळीचे आजीव सभासद होता. कारण, आपल्या अन्नधान्याच्या गरजेची कायम काळजी घेतली जाईल, हा विश्वास संस्थेला वाटला पाहिजे. पुढच्या काही दिवसांमध्ये ही टीम शाळांनाही या साखळीमध्ये जोडण्याचा प्रयत्न करणार आहे. आतापर्यंत धान्य बँकेने १६ हजार किलोपेक्षा जास्त धान्य या संस्थांना पोहोचविले आहे.
धान्य बँक संपर्क : उज्ज्वला बागवाडे - ९७६९१२५१४८ साधना दातार - ९८७००७६२७१
 
 
 
 
- साधना तिप्पनाकजे

 
 
@@AUTHORINFO_V1@@