शून्यातून ध्येयाकडे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


काहीतरी वेगळं करण्याची इच्छा प्रत्येकाच्याच मनात असते. पण, त्याला मेहनतीची जोड असावी लागते. त्यानंतरच सुरू होतो सामान्याकडून असामान्यत्वापर्यंतचा प्रवास... कृषी उद्योग विकास महामंडळातील अशाच एका अधिकार्‍याचा सुरू झालेला प्रवास आज उद्योजकापर्यंत येऊन पोहोचला आहे. रसायनशास्त्राचं उत्तम ज्ञान असलेलं हे व्यक्तिमत्त्व म्हणजे ‘केशवा ऑर्गेनिक्स’चे संस्थापकडी. के. राऊत. त्यांच्या जीवनपैलूंचं दर्शन घडविणारा हा लेख...


फार्मा उत्पादनांची निर्मिती करणार्‍या काही महत्त्वाच्या कंपन्यांच्या यादीत ‘केशवा ऑर्गेनिक्स’चं नाव आवर्जून घेतलं जातं. मुंबईपासून अंदाजे १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या बोईसरमधल्या एमआयडीसी परिसरात ‘केशवा ऑर्गेनिक’ ही कंपनी स्थित आहे. अपार मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर डी. के.राऊत आणि त्यांच्या बंधूंनी या कंपनीचा पाया रचला आणि अवघ्या काही वर्षांत या कंपनीने झेप घेत आपलं अस्तित्व निर्माण केलं. तिन्ही बंधूंनी नोकरी सोडून व्यवसायात पडणे यात मोठी जोखीमहोती. मात्र, राऊत यांच्या पत्नी अश्विनी राऊत या बँकेत नोकरी करत असल्यामुळे ही जोखीमउचलणे त्यांना सहज शक्य झालं. राऊत यांचं बालपण गेलं ते डहाणू तालुक्यातल्या वाडवण या गावी. तिथे साधी वीजही कधी नजरेस पडली नाही. अशा परिस्थितीत त्यांनी आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. टीव्ही, रेडिओ तर दूरच, पण ‘खेड्यांची राणी’ म्हणवली जाणारी एसटीदेखील त्या ठिकाणी फिरकली नव्हती. त्यातच कोणाकडे एखादी दुचाकी जर दिसली, तर त्याचंही सर्वांना भरपूर कौतुक. स्वत:ची शेती आणि वडिलांची नोकरी असली तरी परिस्थिती तशी बेताचीच. या सर्व परिस्थितीत राऊत आणि त्यांची तीन भावंडं लहानाची मोठी झाली. त्यानंतर राऊत यांनी शिक्षणानिमित्त मुंबई गाठली आणि बीएस्सी रसायनशास्त्रात आपलं शिक्षण पूर्ण केलं.


कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर राऊत यांनी डॉक्टरी पेशाचं शिक्षण घेण्याकडे आपला कल होता. मात्र, त्यावेळी खेड्यात राहत असल्यामुळे त्यांची गुणपत्रिका मिळण्यासही विलंब झाला आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रवेश तोपर्यंत बंद झाले होते. त्यामुळे त्यांची ती संधी हुकली परंतु, पुढे त्यांनी रसायनशास्त्राच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला आणि आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. महाविद्यालयीन काळातच ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडले गेले. पुढे त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. पण, घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांनी वडिलांच्या सांगण्यावरून नोकरी पत्करली. वडिलांच्याच मदतीने त्यांना निमसरकारी कृषी उद्योग विकास महामंडळात नोकरी मिळाली. नोकरीच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक चढउतार पाहिले. परंतु, आपल्या हिमतीवर काहीतरी नवीन करण्याची तीव्र इच्छाशक्ती त्यांना नोकरीतून उद्योगाच्या उंबरठ्यावर घेऊन आली. त्यातच राऊत यांचे धाकटे बंधू रवींद्र यांनी तेव्हा अभियांत्रिकीचं आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानंतर आपल्या धाकट्या बंधूंच्या मदतीने त्यांनी १९८६ साली आपल्या मूळ गावाच्या शेजारी इंजिनिअरिंगचा कारखाना सुरू केला. यातच त्यांचे लहान बंधू वसंत यांचीदेखील त्यांना साथ लाभली. त्यांनीही आपला नवखा व्यवसाय मोठा करण्यासाठी आपली नोकरी सोडून त्या व्यवसायात स्वत:ला झोकून दिलं.



आपल्या रसायनशास्त्राच्या शिक्षणाचा काही उपयोग व्हावा, या दृष्टीने राऊत यांना एखादी रसायनांची कंपनी स्थापन करण्याची कल्पना सुचली. सुरुवातीच्या काळात त्यांच्यासमोर मात्र मोठा प्रश्न उभा ठाकला तो कंपनी उभारण्यासाठी लागणार्‍या भूखंडाचा आणि त्यासाठी लागणार्‍या भांडवलाचा. भूखंडासाठी त्यांनी त्यांनी अनेकदा एमआयडीसीकडे मागणी केली. त्यानंतर दीड वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांना एक भूखंड मिळाला आणि ‘केशवा केमिकल्स’चा शुभारंभ झाला. कालांतराने या कंपनीचे नाव बदलून ‘केशवा ऑर्गेनिक्स प्रायव्हेट लिमिटेड’ असे करण्यात आले आणि दोन्ही बंधूंचाही त्यात समावेश करण्यात आला. यापूर्वीच्या कालावधीत ‘डीसी मोटर्स’च्या महत्त्वाच्या भागांचं उत्पादन करण्यासाठी ‘राऊत इलेक्ट्रोमेक इंडस्ट्रीज आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्स’ अशी दोन युनिट डहाणू येथे सुरू करण्यात आली होती. ‘केशवा केमिकल्स’च्या सुरुवातीच्या काळात त्यांनी मित्राच्या सांगण्यावरून २ टक्के ‘बेझिल पेरिडाईन’ या रसायनाचं उत्पादन करण्यास सुरुवात केली. मात्र, तीन वर्षं उलटल्यानंतरही त्यांना त्यात यश मिळालं नाही पण, जिद्द न हरता मनात असलेला विश्वास आणि मेहनत करण्याची तयारी या जोरावर त्यांनी न डगमगता आपली वाटचाल सुरूच ठेवली. या वाटचालीत त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. त्यात सर्वात महत्त्वाचं आव्हान होतं ते कंपनीसाठीच्या भूखंडाचं, वीजपुरवठा आणि भांडवलाचं. यातून मार्ग काढून ऑक्टोबर १९९२ रोजी बोईसरमधल्या ‘केशवा ऑर्गेनिक’च्या युनिटची सुरुवात झाली. त्यातच राऊत यांनी निवडलेल्या उत्पादनाचा वापर केवळ जगात एकच कंपनी करत असे. त्यामुळे त्या कंपनीकडून ते उत्पादन तयार करण्याची ऑर्डर मिळवणं हे सर्वात मोठं आव्हान त्यांच्यासमोर होतं. केवळ एकाच उत्पादनावर आपल्याला तग धरता येणार नाही, हे लक्षात आल्यावर राऊत यांनी इतर उत्पादनांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. इथेही आव्हानांनी त्यांचा पिच्छा काही सोडला नाहीच, पण तरीही आव्हानांचा सामना करत नवीन ऑर्डर मिळवण्यात राऊत यशस्वी झाले.


याच कालावधीत त्यांनी ‘ऍक्टिव्ह फार्मा इनग्रेडिअंट’ (बेसिक ड्रग्स) आणि अन्य उत्पादनांच्या निर्मितीत उतरण्याचा निर्णय घेतला. त्यातच १९९८ साली त्यांच्याकडे एक मोठी संधी चालून आली. स्वित्झर्लंडमधल्या एका कंपनीकडून त्यांच्या उत्पादनासाठी मोठी मागणी होती. त्यात ‘केशवा ऑर्गेनिक्स’ला मोठा नफा मिळाला. त्यातूनच कंपनीची वाटचाल पुढच्या दिशेने सुरू झाली. आज राऊत यांच्या कंपनीत ८० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. अनेक कर्मचारी तर कंपनीच्या पायाभरणीपासून त्यांच्यासोबत आहे. याला महत्त्वाचं एक कारणही आहे. ते म्हणजे राऊत आणि त्यांच्या बंधूंची कंपनीच्या कर्मचार्‍यांबद्दल असलेली आत्मियता आणि जिव्हाळ्याचे संबंध. कंपनीने मोठी वाटचाल केल्यानंतर नफाही अधिक मिळत असताना राऊत आणि त्यांच्या बंधूंनी श्रीमंतीचा आव न आणता अगदी साधेपणानेच राहणं पसंत केलं. ‘कर्मचारी प्रथम’ या नात्याने कर्मचार्‍यांपर्यंत या सर्व गोष्टी त्यांनी पोहोचविण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक कर्मचार्‍याला भविष्य निर्वाह निधीचा लाभ देण्यापासून अन्य लाभ देण्यासही त्यांनी सुरुवात केली. कर्मचारी आणि त्यांच्यात एक आपुलकीचं कौटुंबिक नातं तयार झालं आणि हेच नातं आज कंपनीचा पाया बनून अगदी मजबूत उभं आहे. याचंच फलित म्हणून राऊत बंधूंंनी एमआयडीसी तारापूरमध्येच ‘डीआरव्ही ऑर्गेनिक्स’ आणि ‘राऊत युनिटेक प्रायव्हेट लिमिटेड’ या दोन कंपन्यांची स्थापना केली. ‘राऊत युनिटेक प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीची खास बाब म्हणजे, ‘सुखोई’ या लढाऊ विमानासाठी लागणार्‍या काही महत्त्वाच्या भागांचं उत्पादन करून ही कंपनी ते भाग ‘हिंदुस्तान एअरोनॉटिकल लिमिटेड’ या कंपनीला देत असते. या सर्व प्रवासात राऊत हे ‘टिमा’ या संस्थेशी जोडले गेले. एमआयडीसीमधील उद्योगांचे प्रश्न सोडविण्यासाठी अग्रेसर असलेल्या ‘टिमा’ या संस्थेचे अध्यक्ष म्हणून राऊत गेली आठ वर्षं कामपाहत आहेत. त्यांनी आपल्या आठ वर्षांच्या या कार्यकाळात अनेक कंपन्यांचे लहानसहान असो किंवा मोठ्यात मोठे प्रश्न असो, अगदी सुलभतेने सोडवले आहेत. उद्योगदक्ष दिनकर राऊत हे सामाजिक कार्यामध्येदेखील सक्रिय आहेत. खेडेगावातल्या विद्यार्थ्यांनाही शिक्षणाची आवड आहे आणि त्यांना योग्य दिशा मिळाली, तर ते विद्यार्थीही खूप पुढे जाऊ शकतात, असा विचार करून राऊत यांनी ज्या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवले, त्या शाळेच्या संस्थेशी ते जोडले गेले. त्यांनी तब्बल अकरा वर्षं त्या संस्थेचं अध्यक्षपद भूषवलं. आपल्या कार्यकाळात त्यांनी शाळेला असलेली मोठ्या इमारतीची गरज लक्षात घेता, इमारत उभारण्यास मदत केली तर विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात मदत करून त्यांनी दहावीचा १०० टक्के निकाल लावण्याचीही परंपरा सुरू केली. त्यांचं हे मोलाचं कार्य आजही निरंतर सुरू आहे.


उद्योग-व्यवसायात असलेली काहीशी निराशाजनक परिस्थिती आज बदलली आहे. आज अनेक बँका, संस्था उद्योगांना कर्ज देण्यासाठी इच्छुक आहेत.त्यामुळे तरुण-तरुणींनी कोणतीही भीती न बाळगता आत्मविश्वासाच्या जोरावर योग्य ते नियोजन करून उद्योगक्षेत्रात उतरावं. यश-अपयश हे येतच राहतं. पण, पुढे जाताना अपयश आलं तर खचून न जाता त्याचा स्वीकार करून नवा मार्ग शोधला पाहिजे, असा सल्ला ते उद्योजकतेकडे वळणार्‍या तरुणाईला देतात. राऊत यांचा उद्यमशील प्रवास असाच पुढे सुरू राहावा, यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा!


- जयदीप दाभोळकर
@@AUTHORINFO_V1@@