सांगीतिक प्रवासातील सुरेल मैत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018
Total Views |

प्रत्येक कलाकाराची कला ही त्याच्या हृदयाजवळ असते. संगीत क्षेत्राकडे वळताना घराणी, वारसा किंवा उपजत ज्ञान याची जोड असतेच यापलीकडे एखाद्याची तीव्र इच्छा आणि चिकाटी त्या-त्या व्यक्तीला कलेच्या क्षेत्रात घेऊन येते. एखादे गाणे ऐकणार्‍याला फार भावते. पण असे का होते? याचे कारण म्हणजे गायकाचा आवाज आणि गीतकाराचे शब्द यांची जुळलेली तार त्या गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. कलाकाराचाही हाच प्रयत्न असतो. प्रत्येक गाणं एक वेगळा अनुभव, एक वेगळे समाधान आणि एक वेगळा आनंद देणारे असते. त्या गाण्यासाठी प्रत्येक कलाकाराने जीव ओतून साथ केलेली असते आणि जेंव्हा या सगळ्याची लय जुळते तेव्हाच ‘कवितेचं गाण होतं...’


प्राधान्याने ध्वनि माध्यमातून इष्ट परिणाम वा कल्पनाबंध साधण्यासाठी स्वर व लय या अंगांनी ध्वनींची हेतुपूर्वक रचना करण्याची कला वा तसे करण्याचे साधन, अशी संगीताची ढोबळ व तात्पुरती व्याख्या करता येईल. पण, तरीही ती अपुरी पडण्याची शक्यता मान्य केली पाहिजे; इतक्या विविधतेने संगीत सादर होताना आढळते. ‘सं + गीत’ म्हणजे ‘पूर्णत्वास नेलेले गीत’ अशी संगीताची व्युत्पत्ती दिली जाते. संगीत क्षेत्रातील हा प्रवास आहे दोन तरुणांचा... एका संगीत संयोजकाचा आणि एका गीतकार आणि संगीतकाराचा. अनिकेत दामले आणि ओंकार जांभेकर हे आजच्या तरुण पिढीला नव्याने काहीतरी देण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहेत.


अनिकेतला लहानपणापासून संगीताची आवड. पण, घरात कुठलीही सांगीतिक पार्श्वभूमी नाही. तरीही संगीत क्षेत्रात यायचा विचार त्याने बारावी नंतर केला. संगीतकार व संगीत संयोजक कमलेश भडकमकर यांच्या मार्गदर्शनामुळे या क्षेत्राकडे तो वळला. त्यानंतर त्याला संगीत संयोजनात गोडी निर्माण झाली. पुढे जाऊन साऊंड इंजिनिअरिंगमध्ये रस निर्माण झाला. वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केल्यानंतर साऊंड इंजिनिअरिंगचा एक विशेष कोर्स अनिकेतने केला आणि याचदरम्यान गीतकार, संगीतकार ओंकार जांभेकर याच्याशी त्याची नव्याने ओळख झाली. खरेतर पहिली ते दहावी दोघे एकाच शाळेत, पण ‘संगीता’ने या दोघांना आयुष्याच्या या टप्प्यावर एकत्र आणले आणि पुढचा प्रवास सुरू झाला. दरम्यान, कोर्स सुरू असतानाच काही गाण्यांचे संगीत संयोजन करायची संधी अनिकेतला मिळाली. मोडकंतोडकं का होईना, संगीत संयोजन जमतंय याचे फार समाधान वाटले. तेव्हापासून संगीतसंयोजन करावे हे त्याने मनाशी पक्के केले. ओंकारचे शब्द, संगीत आणि अनिकेतचे संगीत संयोजन याची लय जुळली. साऊंड इंजिनिअरिंगचा कोर्स पूर्ण झाला. त्यानंतर दोघांचा सांगीतिक प्रवास सुरू झाला. या प्रवासात सुदैवाने चांगले वादक आणि गायकांची साथही त्यांना लाभली. गाणी सतत होत राहिली. त्याचबरोबर एकांकिका, नाटक, लघुपट, माहितीपट यांचं पार्श्वसंगीत देण्यासाठी या जोडीला विचारण्यात येऊ लागलं. याचदरम्यान काही मोठ्या नामवंत कलाकारांसोबत काम करण्याची संधीही त्यांना मिळाली. उदा- पंडित उल्हास बापट (संतूर), प्रदीप्तो सेनगुप्ता (मेंडोलिन), भूपाल पणशीकर (सतार), विजू तांबे (बासरी), महेश खानोलकर (व्हॉयलिन), मनीष पिंगळे (मोहनवीणा), मंदार आपटे, आदर्श शिंदे, श्रीरंग भावे, धनंजय म्हसकर आदी दिग्गज कलाकारांसोबत दोघांनी काम केले. यानंतर ‘चालल्या मुशाफिरा’ हा संपूर्ण नवीन गाण्यांचा कार्यक्रमकरण्यात आला. आजही हा कार्यक्रम करण्यात येतो. या कार्यक्रमात वेगवेगळ्या संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली आणि अनिकेतचे संगीत संयोजन असलेली गाणी सादर केली जातात. जवळपास २० गाणी पूर्ण कार्यक्रमात सादर होतात. या कार्यक्रमाचा मूळ हेतू हा नवीन गायकांना संधी देण्याचा असतो. दरम्यान, तू अचानक संगीत क्षेत्राकडे कसा काय वळलास? असा प्रश्न बर्‍याचदा ओंकारलाही लोक विचारतात. घरात सांगीतिक वारसा नाही, पण संगीताची आवड आणि लेखणीतून उमटणारे शब्द यांचं नातं ओंकारला या क्षेत्राकडे घेऊन आलं. ‘‘एखादी चाल सुचते तेव्हा नेमकं काय होतं, तेव्हा ती कशी सुचते, तेव्हा मनात काय विचार चाललेले असतात, डोळ्यासमोर कोणते चित्रं दिसत असते? असे असंख्य प्रश्न गाणं ऐकल्यावर पडतात. पण, हे प्रश्न ती चाल करून झाल्यानंतर तितक्या ठळकपणे आठवतीलच असे नाही. पण, जेव्हा ती चाल आकार घेत असते तेव्हा फक्त ती चाल आणि आपण एवढ्या दोनच गोष्टी असतात; बाकी सगळ्याचा पूर्ण विसर पडलेला असतो,’’असे ओंकार सांगतो.


बर्‍याचदा चाल आधी का शब्द आधी? असाही एक प्रश्न असतो आणि त्याचं उत्तर शक्यतो शब्द आधी आणि मग त्या शब्दांना केलेली चाल असेच असते. पण, ओंकारच्या बाबतीत नेमके हे उलटे आहे. म्हणजे सुरुवातीच्या काळात सुचलेल्या चालींना नुसतंच गुणगुणणं मनाला पटायचं नाही म्हणून मग त्याला साजेसे शब्द असावे या विचाराने ओंकारने कविता लिहिण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याने कवितांचा मीटर, त्यांची शब्दरचना यावर कधीच फारसा विचार केला नव्हता. चालीचा आणि शब्दांचा भाव जुळतोय ना? त्यातून तयार होणार्‍या गाण्याचा, त्याचा-त्याचा एक स्वभाव आपल्याला कळतोय ना? याकडेच लक्ष दिले जायचे. कारण या चाली घडायच्या आधी समोर जे असायचे ते फक्त एक गाणे होते, त्यातली कविता, किंवा त्याची चाल असा वेगळा विचार कधी केला नाही, असे ओंकार सांगतो. पण, सुरुवातीचा काळ लोटला आणि आता मात्र प्रत्येक कविता लिहिताना चालही महत्त्वाची असल्याचे जाणवते आणि त्यानुसार लेखन सुरू असते. त्यातूनही एक वेगळे समाधान मिळत असल्याची भावना ओंकारने व्यक्त केली. संगीतक्षेत्रातील प्रवासाच्या सुरुवातीच्या काळात जे पहिलं गाणं केलं ते दिवस आजही आठवत असल्याचे तो सांगतोे. ओंकार तबला आणि गिटारही शिकतो. याचे शिक्षण घेत असताना त्याच्या गिटार क्लासमध्ये आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकणारा मित्र योगेश चिंचोलीया याच्या बरोबर ’चल... काहीतरी नवीन, वेगळं करूया!’ अशा विचाराने गिटारच्या तारा छेडायला सुरुवात केली. असे बरेच दिवस चालू होतं, पण त्यातून काही घडत नव्हतं. योगेश गिटार वाजवायचा आणि त्याने वाजवलेल्या कॉर्डस्‌मध्ये काहीतरी बसवायचा प्रयत्न ओंकार करत असे. असे काही सेशन्स गेल्यानंतर, काहीतरी घडतंय, असं वाटलं. मग ते तयार झालेलं गाणं फक्त गिटारवरच कसं ठेवणार! म्हणून मग त्याला पियानोची पण जोड हवी, असे वाटू लागले. यावेळी आठवण झाली ती अनिकेत दामले याची. या गाण्याच्या निमित्ताने दोघांची नव्याने मैत्री झाली आणि चाराचे सहा हात झाले. दोन-तीन दिवस उलटले आणि अखेर अनिकेत एका संध्याकाळी गाण्याचा ट्रॅक घेऊन घरी आला आणि त्याने ते ट्रॅक ऐकवले. गाण्यासाठी केले जाणारे संयोजन हे किती महत्त्वाचे असते याचे महत्त्व ओंकारच्या लक्षात आले. मग जवळच्याच ग्रुपमधला हौशी गायक आणि हौशी गायिका यांच्याकडून गाणं बसवून घेतलं. अनिकेत तेव्हा साऊंड इंजिनिअरिंग करत असल्याने त्याच्या स्टुडिओमध्ये जाऊन पहिलंवहिलं गाणं तयार झालं. ऐकणार्‍यांसाठी ते केवळ एक चार-पाच मिनिटांचं गाणं असेलही कदाचित, पण ते पहिलं गाणं सगळ्यांसाठी अगदी हृदयाजवळची आठवण असल्याचे दोघेही सांगतात.


यानंतर एक-एक करता करता दोघांच्या जोडीने १७ गाणी तयार केली. पुढे ओंकारने साऊंड इंजिनिअरिंगच्या कोर्ससाठी ऍडमिशन घेतली. दरम्यानच्या काळात ओंकार, अनिकेत आणि बासरीवादक मित्र ओंकार भिडे; या तिघांनी मिळून ’आरोह म्युझिक’ या म्युझिकल ग्रुपची सुरुवात केली. त्याअंतर्गत त्यांनी आत्तापर्यंत १४ मराठी नवीन गाणी केली आहेत जी SOUNDCLOUD.COM वर ऐकायला मिळतात. ’आरोह म्युझिक’ने दोन वर्षांपूर्वी ‘गाऊ कविता’ हा उपक्रमसुद्धा केला होता. या उपक्रमांतर्गत शालेय मराठी पुस्तकातील काही निवडक कवितांना चाली लावून त्या लहान मुलांनीच दि. २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सादर केल्या होत्या. ‘आरोह म्युझिक’ ने ’चालल्या मुशाफिरा’ या संपूर्ण नवीन गाण्यांच्या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. या वर्षात आणखी नवीन गाणी करण्याचा प्रयत्न ‘आरोह म्युझिक’ ची टीम करणार आहे.


आजही या दोघांसारखे बरेच संगीतकार खूप चांगल्या चांगल्या गाण्यांची निर्मिती करत आहेत. पण, ती सुजाण श्रोत्यांपर्यंत पोहोचू शकत नाहीत याची खंत वाटत असल्याचे अनिकेत आणि ओंकारने सांगितले.


- तन्मय टिल्लू
@@AUTHORINFO_V1@@