लाईट्‌स कॅमेरा ऍक्शन...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

‘लाईट्‌स, कॅमेरा, ऍक्शन’ हे शब्द कानावर पडले की आठवतो तो चित्रपट किंवा एखाद्या मालिकेचा भव्यदिव्य सेट आणि त्यावर वावरणारे नट. मात्र, या सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती म्हणजे दिग्दर्शकाची. असाचं पडद्यामागून कलाकारांच्या माध्यमातून प्रेक्षकांना हसवणारा दिग्दर्शक म्हणजे अमित दामले. ‘श्रीमान श्रीमती’, ‘सीआयडी’, ‘आर. के. लक्ष्मण की दुनिया’ अशा गाजलेल्या मालिकांसाठी सहाय्यक दिग्दर्शक ते सध्या ‘पार्टनर’ या मालिकेच्या दिग्दर्शनापर्यंत... अशा या अवलिया दिग्दर्शकाचा जीवनपट उलगडणारा हा लेख...


संस्कृती आणि परंपरा यांची उत्तम सांगड घातलेलं शहर म्हणजे डोंबिवली. अमित दामले हे व्यक्तिमत्त्व त्याच शहरातलं. लहानपणापासून अगदी याच सांस्कृतिक वातावरणात वाढलेल्या अमितचं शालेय शिक्षण डोंबिवलीच्या टिळकनगर विद्यामंदिरमध्ये झालं. त्यानंतर त्यांनी आपलं बी.कॉमपर्यंतच शिक्षण पूर्ण केलं. मध्यम वर्गातच लहानाचं मोठं झालेल्या अमितला पहिल्यापासून काहीतरी वेगळं करण्याची आवड होती. तासन्‌तास प्राणी, पक्षी, फुलपाखरं यांच्या निरीक्षणात गुंतून जातानाच त्यांच्यातलं वेगळेपण हुडकण्याची दृष्टीच जणू अमितला लाभलेली पण, अमितच्या आयुष्याला खरी कलाटणी मिळाली ती पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर...


सामान्य मध्यमवर्गातली सर्वसामान्य कल्पना म्हणजे पदवीचं शिक्षण घ्यायचं, त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून स्थिरस्थावर चांगली नोकरी मिळवायची. अशातच पदवीनंतर अमितनेही एम. कॉमसाठी प्रवेश घेतला परंतु, त्याचवेळी त्याच्या आईच्या एका मैत्रिणीने त्याला ‘पुढे काय करायचा विचार आहे?’ असा प्रश्न केला. काहीतरी वेगळं करण्याचं स्वप्न आपल्या उराशी बाळगून असलेल्या अमितने फिल्म डिव्हिजनमध्ये कार्यरत असणार्‍या त्या मावशींकडून दूरचित्रवाणी क्षेत्राविषयी माहिती मिळवली. त्यानंतर संपादनाच्या अभ्यासक्रमासाठी अमितने मुंबईतल्या झेव्हियर्स महाविद्यालयात प्रवेश घेण्याचं ठरवलं. पण, तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्याने अमितला रिकाम्या हाताने माघारी फिरावं लागलं. पण, तरीही झेव्हियर्समध्ये प्रवेश घेण्याची इच्छा मनात होतीच, म्हणून हिरमुसून न जाता, पुढच्या वर्षी तरी किमान त्या ठिकाणी पुन्हा प्रवेश घ्यायचाच, असा दृढ निश्चय अमितने मनाशी केला. या दरम्यान केवळ घरात बसण्यापेक्षा किमान स्वत:चा खर्च आणि फीचा प्रश्न सुटावा म्हणून अमितने घाटकोपरमधील एका कंपनीत अकाऊंटची नोकरी पत्करली. नोकरीच्या व्यापात बघता बघता वर्ष सरलं आणि अमितची पावलं पुन्हा झेव्हियर्सच्या दिशेने वळली. त्यातच झेव्हियर्सच्या ‘इंग्लिश स्पिकिंग क्राऊड’समोर आपला निभाव लागेल का? मुलाखतीत आपण उत्तीर्ण होऊ का? हा प्रश्न सतत त्यावेळी अमितला सतावत होता. असं तो हसून सांगतो पण, जिद्द आणि आपल्या इच्छेपुढे आभाळंही ठेंगण पडतं असं म्हणतात, तेच खरं. दिग्दर्शनाची ओढ खुणावत असल्यामुळे अमितला त्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला आणि इथूनच सर्वार्थाने एका दिग्दर्शकाचा अनन्यसाधारण प्रवास सुरू झाला.


झेव्हियर्स महाविद्यालयातलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अमितची ओळख झाली ती हिंदीतले नावाजलेले दिग्दर्शक राजन वाघधरे यांच्याशी. दिग्दर्शनातलं पहिलं पाऊलं टाकण्यास त्यांनी अमितला मोलाची मदत केली. अगदी बोट धरून दिग्दर्शनाचे धडे गिरवायला त्यांच्यापासूनच अमितने सुरुवात केली. एखाद्या मालिकेचा सेट, कॅमेरा आणि कलाकारांकडून कामकरवून घेण्याची वृत्ती अमितने वाघधरे यांच्याकडूनच आत्मसात केली. १९९९ साली अमितने पहिल्यावहिल्या मालिकेत वाघधरे यांच्यासोबत सहायक दिग्दर्शक म्हणून कामकेलं आणि ती मालिका म्हणजे तुमच्या-आमच्या सर्वांच्याच परिचयाची, गाजलेली अशी ‘श्रीमान श्रीमती.’ असा हा १९९९ ते २०१८ पर्यंतचा प्रवास अमितसाठी अनेक नवनव्या अनुभवांनी आणि चढउतारांनी भरलेला होता. मात्र, पालक जसे आपल्या मुलाला सांभाळून घेतात, अगदी तसेच दिग्दर्शनाचे धडे गिरवताना राजन वाघधरे यांनी आपल्याला प्रशिक्षित केल्याचे अमित आवर्जून सांगतो. क्लॅपबॉयपासून अगदी मुख्य सहायक दिग्दर्शक ते दुसर्‍या युनिटच्या दिग्दर्शकापर्यंतचा त्या दोघांचा प्रवास अगदी ११-१२ वर्षांपर्यंत सुरू राहिला. मेहनतीबरोबरच आई-वडिलांचे आशीर्वाद आणि भावाची साथ कायमच होती. त्यामुळेच आज यशाची शिडी अमितला आज चढता आली.


दिग्दर्शनाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना शेखर सुमन, सतीश शाह, लक्ष्मीकांत बेर्डे, स्वरूप संपत, आसावरी जोशी अशा दिग्गज कलाकारांना दिग्दर्शित करायची संधी अमितला मिळाली. दिग्गज कलाकारांसोबत कामकरताना दडपण तर होतंच, पण गुरूंची साथ कायमच अमितला पथदर्शक ठरत होती. कोणतंही क्षेत्र म्हटलं की स्पर्धा ही आलीच. चार ते पाच सहायक दिग्दर्शकांच्या फळीत आपली एक विशिष्ट ओळख निर्माण करणं, स्पर्धेत स्वत:ला सिद्ध करणं अशी अनेक आव्हानं अमितसमोर होती. पण, आपल्या कामाच्या आणि मेहनतीच्या जोरावर आपली ओळख, आपलं नावं अमितने मोठं केलं. असा एकंदरीत प्रवास सुरू असताना त्याला साथ लाभली ती पत्नी हेमांगीची. मालिका म्हटली की रोजचं कामआलंच. दिवसातून १३-१४ तास कामसुरू असतानाही कोणतीही तक्रार न करता त्याच्या पत्नीने त्याची साथ दिली. अगदी नवं लग्न झालं असतानाही कामासाठी रात्रंदिवस बाहेर राहावं लागत असतानाही त्याची पत्नी अगदी पाठीच्या कण्यासारखी ताठ अमितच्या मागे उभी राहिली. ‘‘आणि आज त्यामुळेच घरातली प्रत्येक हवी नको ती गोष्ट ती पाहत असल्याने कोणताही विचार न करता अगदी निश्चिंत मनाने आपण घराबाहेर प़डू शकतो,’’ असे अमित न विसरता सांगतो. ‘‘इथे रोजचं कामरोजच पूर्ण करावं लागतं. त्यामुळे अनेकदा कौटुंबिक सण-समारंभात कायमच सहभागी होता येतं असं नाही. एकीकडे आपलं कुटुंब एखाद्या ठिकाणी जायच्या तयारीत असतं, मात्र आपण त्यांच्यासोबत त्या ठिकाणी जाऊ शकतोच असं नाही. किंबहुना, शंभरातल्या नव्वद वेळा तरी जाणं शक्य होत नाही,’’ ही खंतही त्याने बोलताना व्यक्त केली. अशातच दोन महिन्यांपूर्वी मोठ्या भावाचं छत्र अमितच्या डोक्यावरून हरपलं पण, आयुष्य हे चालतंच राहायला पाहिजे असं म्हणत हे दु:ख आपल्या मनाच्या एका कोपर्‍यात लपवून ठेवून अमितने आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.


‘श्रीमान श्रीमती,’ ‘सीआयडी,’ ‘हमपाच,’ ‘आर.के. लक्ष्मण की दुनिया,’ ‘अकबर बिरबल’ असा सुरू झालेला अमितचा प्रवास आज ‘पार्टनर’सारख्या मालिकेपर्यंत येऊन ठेपला आहे. ‘अकबर बिरबल’ या मालिकेतून दिग्गज दिग्दर्शकांच्या यादीत आलेल्या अमितच्या दिग्दर्शनावर जॉनी लिवर यांच्यासारखा मोठा कलाकारही आपली कला सादर करत आहे. ‘‘बाहेरून सोनेरी दिसणारी ही झगमगती दुनिया जितकी चांगली आहे, तितकीच वाईटही... मृगजळाप्रमाणे अनेक तरुण तरुणी या क्षेत्राकडे आकर्षित होतात. मात्र, या क्षेत्रातलं नेमकं काय चांगलं, काय वाईट हे आपण आपलं ठरवलं पाहिजे. हातात पैसा आल्यावर त्याचा उपयोग कोणत्या कामासाठी करायचा आणि कशापासून चार हात दूर राहायचं, यावर आपलंच नियंत्रण असलं पाहिजे,’’ असा मोठ्या भावासमसल्ला अमित या मनोरंजन क्षेत्राकडे वळणार्‍या इच्छुकांना देतात.


- जयदीप दाभोळकर
@@AUTHORINFO_V1@@