पुरातन वास्तूंचे ‘ऐश्वर्य’ जपणारी वास्तूविशारद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018   
Total Views |
 
 
आपल्या पुरातन वास्तूंना ऐतिहासिक महत्त्व असते. अशा मोठमोठ्या वास्तूंनी देदीप्यमान असा इतिहास पाहिलेला असतो. काळानुरूप या ऐतिहासिक ठेव्याची पडझड होत असते. ती पडझड फक्त त्या भिंतीची नसते, तर ती त्या संस्कृतीची असते. अशा या ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन आणि पर्यायाने संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे ऐश्वर्या टिपणीस यांनी. टिपणीस यांचे हे कार्यक्षेत्र आहे म्हणून नव्हे, तर पुढच्या पिढीला आपण काही देणे लागतो, अशीही भावना त्यांच्या मनात आहे.
 
 
भारतात फ्रेंच, पोर्तुगीज आणि ब्रिटिश व्यापारी म्हणून आले आणि त्यांनी इथे आपली साम्राज्यं उभी केली. यात ब्रिटिश कमालीचे यशस्वी झाले. आजही आपल्या संस्कृतीत त्याचे पडसाद, त्यांची छाप आढळते. संस्कृती म्हणजे त्यात भाषा, कायदा, खाद्यशैली यांसारख्या अनेक गोष्टी येतात. पण, त्यात समावेश असतो प्रामुख्याने उभारलेल्या वास्तूंचा. कारण, त्या संस्कृती जगलेल्या असतात. त्या संस्कृतीची साक्ष देणारा आपला संपन्न ऐतिहासिक वारसा. फ्रेंच आणि पोर्तुगिजांनीही वास्तूरूपी आपल्या संस्कृतीची छाप मागे सोडलीच. गोव्यात पोर्तुगिजांनी आणि पॉंडिचेरीमध्ये फ्रेंचांनी उभारलेल्या वास्तू आजही पर्यटकांच्या आकर्षणास पात्र ठरत आहे. पॉंडिचेरीत जशा फ्रेंच वास्तू आहेत, तशाच भारतात इतर भागातही आहेत. त्यांचे जतन करण्याचा विडा उचलला आहे दिल्लीस्थित वास्तूविशारद ऐश्वर्या टिपणीस यांनी.
 
 

 
 
 
ऐश्वर्या या मूळच्या मुंबईच्या. त्यांचा जन्म कोल्हापूरचा. टिपणीस यांचे शिक्षण दिल्लीत झाले. दिल्लीतील ‘स्कूल ऑफ प्लॅनिंग ऍण्ड आर्किटेक्चर’ या संस्थेतून पदवी घेतल्यानंतर त्यांनी स्कॉटलंडच्या डँडी विद्यापीठातून युरोपीय शहर संवर्धन या विषयात पदव्युत्तर पदवी ग्रहण केली. वास्तुविशारद असलेल्या ऐश्वर्या यांना नवीन वास्तू बांधण्यापेक्षा जुन्या वास्तूंच्या संवर्धनात जास्त रस होता आणि त्यातून उभे राहिले वास्तू संवर्धनाचे महत्कार्य. टिपणीस यांनी देहरादून येथील ‘डून’ या शाळेचे संवर्धन केले असून मध्य प्रदेशमधील महिदपूर किल्ल्याचे केलेले संवर्धन हे उल्लेखनीय कार्य. पण, भारतातील फ्रेंच वास्तू जपण्यात टिपणीस यांचा वाटा सिंहाचा आहे. पॉंडिचेरीतील फ्रेंच वसाहत आणि तिथल्या फ्रेंच वास्तू या सर्वांनाच ज्ञात आहेत. पण, पश्चिम बंगालमधील कोलकात्यापासून ४० कि. मी. अंतरावर असलेल्या चंदन नगर इथेही फ्रेंच वसाहत होती. फ्रेंच भारतात आले ते १७ व्या शतकात आणि १९५४ साली भारतातील वसाहती त्यांनी भारत सरकारच्या हवाली केल्या. चंदननगर ही एक वसाहत त्यातलीच. ऐश्वर्या टिपणीस यांना फ्रेंच दूतावासाने भारतात फ्रेंच वसाहती कुठल्या आहेत आणि त्यांची अवस्था काय आहे याची माहिती घेण्याची जबाबदारी दिली. भारतातील २०० अज्ञात फ्रेंच वसाहती टिपणीस यांनी शोधून काढल्या. त्याबद्दल सर्व माहिती मिळवली. माहिती तर मिळवली, आता पुढे काय? असा प्रश्न टिपणीस यांना पडला. टिपणीस यांनी ९९ जागा शोधून काढल्या, त्यापैकी ७ जागांना भारतीय पुरातत्व भागाने ऐतिहासिक वारसास्थळांचा दर्जा बहाल केला.
 
 
बरेच लोक असतात त्यांना अशा कामात रस असतो. पण, योग्य माहिती अभावी त्यांचे श्रम योग्य ठिकाणी वापरले जात नाही. हे लक्षात घेऊन त्यांनी एक संकेतस्थळ बनवले. त्या संकेतस्थळावर ही सगळी माहिती प्रकाशित केली गेली. नवीन माहिती जगभरातील लोकांपुढे गेल्याने उत्साही आणि या क्षेत्रात रस असणारे लोक ऐश्वर्या यांच्यासाठी काम करू लागले पण, त्यांचे कार्य यापलीकडचे आहे. या कामगिरीचा दुसरा भाग होता चंदननगरमधील वास्तूंकडे लक्ष देण्याचा. चंदननगरमधील ही वास्तू तिथल्या पालिकेने धोकादायक ठरवून तोडण्याची तयारी केली होती. अगदी तसा आदेशही काढला होता पण, तिथल्या वास्तूप्रेमींनी हा डाव हाणून पाडला. माहिती मिळवल्यानंतर चंदननगरमधील ही वास्तू प्रायोगिक तत्त्वावर दुरुस्त करण्याची जबाबदारी ऐश्वर्या टिपणीस यांनी स्वीकारली. या वास्तूचे नाव रजिस्ट्री बिल्डिंग. या कार्यात सध्या अडचण आहे ती आर्थिक बाबींची. सगळ्याच गोष्टी सरकारने करायच्या नसतात, याची पुरती जाणीव टिपणीस यांना आहे. म्हणून त्या लोकांकडून निधी गोळा करणार आहेत. ऐतिहासिक दर्जाच्या वास्तू या संग्रहालयाच्या स्वरूपातच किंवा मृत स्वरूपातच असल्या पाहिजे, असा चुकीचा समज असल्याचे टिपणीस सांगतात. त्या वास्तू जतन करून वापरताही येतात, हे त्यांच्या कामाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न त्या करतात. मध्य प्रदेशमधील किल्ल्याचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन ही टिपणीस यांच्यासाठी आव्हानात्मक बाब होती. मध्य प्रदेशात होळकर घराण्याचे राज्य होते. हा किल्ला त्यांच्याच ताब्यात होता. या किल्ल्याची अवस्था अतिशय वाईट होती. या किल्ल्याची पडझड झाली होती. न्यूयॉर्कच्या स्मारक जतन निधी आणि मध्य प्रदेश सरकारने यासाठी १ कोटी रुपयांचा निधी दिला. २०१२ ते २०१५ या तीन वर्षांत हे कार्य पार पाडले आणि हा किल्ला आज पुन्हा दिमाखात उभा आहे. त्याचे कारण ऐश्वर्या टिपणीस.
 
 
देहरादूनमधील डून शाळा ही १९३५ साली बांधलेली. याच शाळेत भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे शिक्षण झाले. एप्रिल २०१४ ते एप्रिल २०१६ या तीन वर्षांत या वास्तूवर काम केले गेले. तीन कोटी रुपये या कार्यासाठी खर्च झाले. या शाळेच्या विश्वस्तांनीच यासाठी निधी दिला. या दोन्ही प्रकल्पासाठी ‘युनेस्को’कडून ऐश्वर्या टिपणीस यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. वास्तूंच्या पुनरूज्जीवनाबद्दल टिपणीस म्हणतात की, ‘‘संवर्धनाचे हे कार्य महत्त्वाचे असून हे जीवन बदलणारी गोष्ट आहे.’’ हे कार्य जरी सोपे नसले तरी जुन्या आणि आधुनिक संस्कृतीचा आत्मा आपण एकरूप करत असल्याची भावना त्यांच्या मनात आहे.
यासंदर्भातील पुढील योजना काय असतील, असे विचारले असता त्यांनी सांगितले की, ‘‘संपूर्ण देशात जितक्या नसतील तितक्या पुरातन वास्तू महाराष्ट्रात असतील. सध्या आपल्याकडे फक्त पुणे आणि मुंबईतील वास्तू पाहण्यात आल्यात आणि त्यांचे संवर्धन केले जाते पण, राज्यातील इतर भागातही अनेक पुरातन वास्तू आहेत.’’ त्यांचे संवर्धन करण्याची त्यांची इच्छा आहे. या कामात अडचणी येतीलच, पण त्यावर मात करण्यासाठी टिपणीस सक्षम आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक वास्तू अशा आहेत, ज्यांना देदीप्यमान इतिहास आहे. पण, योग्य देखभालीअभावी त्या धूळ खात आहेत. त्या वास्तूही ऐश्वर्या टिपणीस यांच्या स्पर्शाने उजळून निघतील, ऐश्वर्यसंपन्न होतील, अशी आशा करूया.
 
 
 
- तुषार ओव्हाळ

 
 
@@AUTHORINFO_V1@@