विद्यार्थी, समाज आणि राष्ट्र घडविणारी संस्था

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018
Total Views |

‘सच्ची बातों को जान लेने का नामज्ञान हैं, जो अपनी मेहनत से कुछ कर दिखाएँ वही महान हैं...’ या उक्तीला पुरेपूर जगणारे रतन चावला आणि त्यांची शैक्षणिक संस्था. सध्या सर्वत्र इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाचे बाजारीकरण झालेले दिसते. पण, त्याला डॉ. गुजर सुभाष हायस्कूल मात्र अपवाद ठरले आहे. संस्थेने अल्पदरात उत्तम शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली असून त्याचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचविण्यात त्यांना यश आले आहे. तेव्हा, रतन चावला यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला हा आढावा...


भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. विविध प्रांतातील विविध समाजाची काही खास वैशिष्ट्ये आहेत. विशेष म्हणजे विविध प्रांतातील लोक व्यवसाय किंवा अन्य कारणाने दुसर्‍या प्रांतात जातात, तेव्हासुद्धा आपली संस्कृती जपण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतात. यापैकीच एक समाज म्हणजे सिंधी समाज. फाळणीनंतर सिंध प्रांतातून आल्यावर भारतातील विविध ठिकाणी वास्तव्य केलेल्या या समाजाने सर्व समाजाशी समरस होऊन गुण्यागोविंदाने आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. आता तर आपल्या मूळ व्यापारी पेशाव्यतिरिक्त राजकारण, प्रशासकीय क्षेत्र, शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र, उद्योग, अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रांत समाजाने काही कार्य करावे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत. नाशिकच्या देवळाली कॅम्प भागात डॉ. गुजर सुभाष हायस्कूलच्या माध्यमातून सुरू असलेल्या दीर्घकालीन व्यापक कार्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष नवीन गुरनानी व सेक्रेटरी रतन चावला यांच्याकडून घेतली असता, प्रगती आणि कर्तृत्वाचा नवा अध्याय पुढे आला. या संस्थेचा इतिहास प्रेरक आहे. फाळणीनंतर जेथे जेथे सिंधी समाज स्थायिक झाला तेथे त्यांनी प्रथमसमाजमंदिरे उभारली. या समाजमंदिरांचा उपयोग त्यांनी केवळ आपल्या सिंधी बांधवांसाठी न करता संपूर्ण समाजासाठी करण्याची पद्धत आहे. नाशिकमध्ये १९४८ मध्ये सिंधी समाजातील काही पुरोहितांनी शिक्षणसंस्था स्थापन केली. पुढे त्यातील मुख्य पुरोहित गुरू शंकर यांचे नाव संस्थेस देण्यात येऊन ‘शंकर एज्युकेशन सोसायटी’ असे नाव या संस्थेला देण्यात आले. याच संस्थेतर्फे प्रसिद्ध डॉ. गुजर सुभाष हायस्कूल चालविले जाते. दोन खोल्यांत सुरू झालेल्या या शाळेत सुरुवातीला फक्त १२ ते १५ विद्यार्थी होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा आदर्श समोर राहावा यासाठी शाळेला ‘सुभाष हायस्कूल’ असे नाव देण्यात आले. त्यानंतर दुसर्‍या ठिकाणी भाड्याने तीन-चार खोल्या घेऊन शाळा चालविली गेली. सध्या ज्या जागेत हायस्कूल आहे, ती सुमारे पाच एकर जागा डॉ. गुजर यांनी दिली. डॉ. गुजर यांनी जागा देणगीदाखल दिल्याने शाळेचे नामकरण ‘डॉ. गुजर सुभाष हायस्कूल’ असे झाले. १९७२ नंतर या शाळेने कात टाकली आणि आज जी भव्यता दिसते, त्याची सुरुवात झाली.


सध्या हिंदी-इंग्रजी माध्यमाची शाळा आणि विज्ञान आणि वाणिज्य अकरावी, बारावीपर्यंत शिक्षणाची सुविधा शाळेत आणि महाविद्यालयात आहे. सर्व समाजातील तळागाळातील घटकांना शिक्षण मिळावे, या सरकारच्या धोरणानुसार अत्यंत कमी दरात दर्जेदार शिक्षण देण्याची व्यवस्था येथे आहे. सध्या इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाचे बाजारीकरण दिसते आहे, त्यास डॉ. गुजर सुभाष हायस्कूल अपवाद ठरले आहे. या शाळेत पहिलीसाठी वर्षाला फक्त दीडशे रुपये शुल्क आकारले जाते. दुसरी ते चौथी दरम्यान वर्षाला १८०० रु. शुल्क तर पाचवी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणासाठी वार्षिक फक्त २३०० रुपये शुल्क आकारले जाते. इतक्या कमी शुल्कात उत्कृष्ट शिक्षण देणारी नाशिकमधील ही एकमेव संस्था असावी. संस्थेत द्वारका, नाशिकरोड, उपनगर, देवळाली, भगूर भागातील सैनिकी पेशातील पालक तसेच विविध व्यवसायी, नोकरदार पालक हीच शाळा पसंत करतात. बालवाडी, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षणाचे वर्ग अत्यंत स्वच्छ आणि सुंदर आहेत. शाळेत प्रवेश करताक्षणी समाजातील विविध क्षेत्रांत कामकेलेल्या राष्ट्रपुरुषांची छायाचित्रांसह माहिती दिलेली आहे. त्यात स्वातंत्र्यलढ्यातील व महाराष्ट्रातील मान्यवरांचादेखील आवर्जून समावेश केलेला आहे. नर्सरी वर्गखोल्यांमधील रंगीबेरंगी सजावट व चित्रे नजर खिळवून ठेवतात. मुलांना मनोरंजन होईल, अशा पद्धतीने माहिती मिळत असल्याने त्यांचे मन रमेल, अशी व्यवस्था आहे. प्रयोगशाळा ते स्वच्छतालय सर्व रेखीव आणि स्वच्छ आहे. प्रत्येक वर्गाला समाजपुरुषांची नावे दिलेली आहेत. शाळेत प्रशस्त नाट्यगृहासारखे सुविधायुक्त सभागृह संस्थेने साकारले आहे. तिथे स्नेहसंमेलन आणि विविध विद्यार्थी उपयोगी उपक्रमसातत्याने राबविले जातात. शाळेला देशातील प्रथमक्रमांकाचे वकील ऍड. रामजेठमलानी, प्रसिद्ध उद्योगपती वासुदेव सराफ यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देऊन संस्थेच्या कामाची प्रशंसा केलेली आहे. ध्येयवादी नेतृत्व सिंधी संघ परिवारातीलच सदस्य असलेल्या देवळाली कॅम्प भागातील नवीन गुरनानी हे या संस्थेचे अध्यक्ष, तर रतन राजलदास चावला हे या संस्थेचे सेक्रेटरी आहेत. या दोघांचे नेतृत्व संस्थेला लाभदायक ठरले असून सिंधी समाज आणि अन्य समाजातील विविध घटक केवळ व्यापारातच नव्हे तर प्रशासकीय,राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, संशोधन, बँकिंग अशा विविध क्षेत्रात विद्यार्थी पुढे यावेत, या दिशेने संस्थेची वाटचाल असावी असे त्यांचे मत आहे. चावला यांचे औपचारिक शिक्षण अवघे दहावीपर्यंत झाले असले तरी व्यावहारिक अनुभव दांडगा असल्याने त्यांनी वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात चांगली प्रगती घडवून आणली आहे. कॅम्प येथील डॉ. सुभाष गुजर हायस्कूलमध्ये सिंधी माध्यमातून त्यांनी दहावी उत्तीर्ण केल्यानंतर भाजीपाला आणि भुसार मालाचा व्यवसाय करून रेल्वेच्या माध्यमातून भारतभर प्रवास केला. त्यानंतर २००५ मध्ये ‘झुळूक’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. यातील नायिका ऐश्वर्या नारकरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. विविध सामाजिक कार्यातील सहभाग पाहून शंकर एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारिणीत रतनजींना स्थान देण्यात आले. एखाद्या संस्थेत व शाळेत शिकलेला विद्यार्थी त्याच संस्थेच्या सेक्रेटरी पदावर विराजमान होतो, असे अपवादात्मकच पाहायला मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार हरिश्चंद्र चव्हाण आणि तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मध्य रेल्वे क्षेत्रीय उपभोक्ता समिती सदस्य म्हणून त्यांची नेमणूक केली आहे.


खुद्द पंतप्रधानांनीदेखील रतन चावला यांच्या रेल्वेबाबतच्या नवनवीन कल्पनांना दाद देऊन सुधारणेच्या सूचना रेल्वे मंत्रालयाला दिल्या आहेत. या सर्व कार्याचा व ओळखीचा फायदा शंकर एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. गुजर सुभाष हायस्कूलला नावारूपाला आणण्यासाठी मोठ्या खुबीने रतन चावला यांनी करून घेतला. यामुळे देशसेवेसाठी सुसज्ज विद्यार्थी, समाज आणि राष्ट्र घडविणारी संस्था म्हणून कर्तृत्वाची गुढी उभारण्यात संस्थेचे अध्यक्ष, सेक्रेटरी व संचालक मंडळ यशस्वी झाले आहे.


अशिक्षित को शिक्षा दो, अज्ञानी को ज्ञान शिक्षा से ही बन सकता हैं, भारत देश महान...


फाळणीनंतर सिंध प्रांतातून आल्यावर भारतातील विविध ठिकाणी वास्तव्य केलेल्या सिंधी समाजाने सर्व समाजाशी समरस होऊन गुण्यागोविंदाने आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. आता तर आपल्या मूळ व्यापारी पेशाव्यतिरिक्त राजकारण, प्रशासकीय क्षेत्र, शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र, उद्योग, अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रात समाजाने काही कार्य करावे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत. चाहता हूँ कोई नेक कामहो जाए,
मेरी हर सॉंस देश के नामहो जाए,
- रतन चावला, सेक्रेटरी,
शंकर एज्युकेशन सोसायटी,
देवळाली कॅम्प


राज्यस्तरीय विविध क्षेत्रांत शाळेचे नाव उज्ज्वल करणारे विद्यार्थी
* सारिका गोडसे - युपीएससी, आयकर आयुक्त *कोमल सचदे (डॉक्टर), प्रशांत पाटील (प्राध्यापक), दीपक मिश्रा (सैन्यात लेफ्टनंट), रोहित मोजाड (हवाई दलामध्ये राष्ट्रपतीपदक विजेता), राहुल गोडसे (सैन्य), प्रवीण बोराडे (बंगळुरूमध्ये शास्त्रज्ञ), राजेश ठाकोर (सीए), किरण चौधरी (बी. ई. डिझाईन), सोनमलीपाणे (स्टेट बँकेत अधिकारी), रश्मी हवालदार (आयसीआयसीआय बँकेत मॅनेजर), प्रवीण गोडसे (आर्टलरी सेंटर), गणेश गोडसे (संशोधक, पिलानी), आदर्श पांडे (संगणकतज्ज्ञ), मयूर पाटील (कलाकार), संदीप पाटील (एमपीएससी), वर्षा लालवानी (प्राध्यापक), गुलशन लालवानी (स्टेट बँकेत अधिकारी), कविता चावला (सीए), भाग्यलक्ष्मी (आयसीआयसीआयमध्ये अधिकारी), तारुण्या (नृत्यांगना), विजय ससाणे (हवाई दल), अमिताभ शर्मा (एलएनटीमध्ये अधिकारी), समरीन खान (ऍक्सिस बँक अधिकारी), नितीन सोनांबे (इव्हेंट मॅनेजर), रमेश थरवानी (हृदयविकारतज्ज्ञ बंगळुरू), अडवाणी (कर्करोगतज्ज्ञ), प्रकाश गिडवानी (अमेरिकेत स्थायिक), जयंत भाटिया, नवीन भाटिया (दुबईत स्थायिक) दीपा अमेसर (मास्टर्स इन कॉम्युटर सायन्स), उत्कृष्ट क्रीडापटू, रोहित सुरेश मोजाड (फुटबॉल), हंसिका सुरेश पंडित (कराटे), आदित्य सुरेश पंडित (कराटे), आदित्य उदय जाधव (तायक्वोन्दो), किरण बहादूर चंद (तायक्वोन्दो), करिष्मा सुधाकर गोडसे, उदय लक्ष्मण कुसळे, कीर्ती गोडसे, उदय मुसळे, किशोर पेटारे (सर्व फुटबॉलमध्ये राज्यस्तरावर गाजलेले), नरेश कारडा (उद्योजक)



- पद्माकर देशपांडे
@@AUTHORINFO_V1@@