ताईच्या आकांक्षापुढे गगन ठेंगणे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018
Total Views |


मुलींसाठी तिला हरसूलवरून नाशिकला आणण्यात आले. कांदिवलीच्या स्पर्धेला जाताना ताईकडे पैसे नव्हते. तिच्या पालकांकडेही नव्हते म्हणा. येणार्‍या प्रत्येक गिर्‍हाईकाला ताईविषयी सांगून त्यांनी काही रक्कमगोळा केली आणि ताई स्पर्धांत भाग घेऊ लागली. वयाच्या नवव्या वर्षी अनवाणी धावणार्‍या ताईने महाराष्ट्र राज्य क्रीडा स्पर्धेत २०१३ साली ब्रॉंझ मिळवले. इतरांचे बूट आपल्या पायाला लागतील म्हणून तिने धावण्याचा वेग कमी केला होता.


गेल्या काही वर्षात ताई ब्राह्मणे विविध शर्यती जिंकत असल्याच्या बातम्या सतत कानावर पडत आहेत. असे म्हणतात की, ती हरणासारखी धावते. म्हणून एकदा एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी पहाटे एकदा भोसलाच्या मैदानावर गेलो तर ताई सराव करत होती. तिचे धावणे कलात्मक तर आहेच, हरणासारखा तिच्या धावण्यात चपळपणा आहे. त्याला शिस्त आहे. आत्मविश्वास आहे. ताईने केरळमधील राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर तिला त्याबाबत विचारले असता आपण सहज जिंकल्याचे तिने सांगितले. तिचा म्हणून काही आविर्भाव मुळातच नव्हता. आपलं कामपूर्ण केल्याचं समाधान होते. राष्ट्रीय स्तरावर यश मिळाले. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळण्यासाठी सराव सुरू असल्याचे ताई सांगते. क्रीडा मार्गदर्शकांच्या सूचनांचे पालन करून आपण यश मिळवू, असा तिला आत्मविश्वास आहे. एखाद्या क्षेत्रात यश मिळाल्यानंतर आकांक्षापुढती गगन ठेंगणे असे वाटू लागते. ताईच्या बाबतीत तर हे अगदीच पटते. हरसूलजवळ असलेले दलपतपूर हे ताईचे गाव. दुसरीत ताईने पहिले सुवर्णपदक जिंकले. ती बातमी चांगलीच गाजली होती. मुलींसाठी तिला हरसूलवरून नाशिकला आणण्यात आले. कांदिवलीच्या स्पर्धेला जाताना ताईकडे पैसे नव्हते. तिच्या पालकांकडेही नव्हते म्हणा. येणार्‍या प्रत्येक गिर्‍हाईकाला ताईविषयी सांगून त्यांनी काही रक्कमगोळा केली आणि ताई स्पर्धांत भाग घेऊ लागली. वयाच्या नवव्या वर्षी अनवाणी धावणार्‍या ताईने महाराष्ट्र राज्य क्रीडा स्पर्धेत २०१३ साली ब्रॉंझ मिळवले. इतरांचे बूट आपल्या पायाला लागतील म्हणून तिने धावण्याचा वेग कमी केला होता. सगळ्या स्टेडियमने उभे राहून ताईचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.


ताईचे गाव दलपतपूर. हरसूलपासून १० किमीच्या अंतरावर. वाट नागमोडी चढ-उताराची. गावात सिमेंटचे रस्ते आता झालेत. सभामंडपाजवळ गाडी थांबत गावाच्या एका बाजूला टेकाड उतरत गेलो. घरी गेलो. शेणाने सारवलेले घर. बसण्यासाठी ८ जण असल्यामुळे शेजारच्या घरातून एक मोठी सतरंजी आणण्यात आली. ताईचे शिक्षक सांगत होते. एकदा वर्गात खेळाचा आपल्या वाटेला आलेला तास घेताना हिरकुड सरांनी शर्यत लावली दुसरीच्या वर्गाची. ताईने सगळ्यांना निम्मे अंतर ठेवत शर्यत पूर्ण केली. हेच ती तिसरी, चौथी आणि पाचवीच्या मुलामुलींच्या शर्यतीच्या बाबतीत सहज करायची. एका शिक्षकाची नजर किती कामकरते हे पाहायचं झालं तर हिरकुड सर उल्लेखनीय आहेत.



गावापासून दोन-तीन किमी अंतरावर हरसूलच्या दिशेने असलेले रस्ता आणि शेतातील एक पट्टा ताईच्या सरावासाठी त्यांनी वापरायचा ठरवला. शाळेत एवढे मोठे मैदान नव्हतेच म्हणा. पहाटे पाचला ताईच्या काकांच्या मोबाईलवर मिसकॉल दिला की ताई नियमित सरावाला पोहोचायची. सात वर्षांची मुलगी एक स्वप्न मनाशी धरते, मला कवितादीदीसारखं व्हायचं. हा अंधार जरी इथल्या रोजच्या जीवनाचा भाग असला तरी हे वय कष्ट करण्यासाठी तयार होणं अप्रूप आहे. ताईचे हे धाडस आहे खरंतर. त्याला वनवासी आयुष्याची निर्मळता लाभली आहे. सायंकाळचा सराव येथेच पार पडायचा. ताई आज भोसलात आहे, पण या सरावात कुठेही खंड नाही. ताई अबोल, शांत स्वभावाची आणि तितकीच नम्र. भोसलाच्या विद्या प्रबोधिनी प्रशालेची आठवीची विद्यार्थिनी. तिचे जिंकणे हेही अगदी सहज आणि सोपे असते. स्पर्धा जिंकल्यानंतरसुद्धा ती सहज, साधी वावरत असते. शाळेतच अभ्यासात तितकेच काळजीपूर्वक लक्ष देणारी. ताईचे आजचे भोसलातील साईचे प्रशिक्षक विजेंद्रसिंह तेही सतत तिच्या पाठीशी असतात.


ताईचा नुकताच एक स्पर्धा जिंकलेला व्हिडिओ पाहताना तिच्या आईबाबांच्या डोळ्यातील पाणी थांबता थांबत नव्हते. ताईला मिळवलेली पदके पाहायची म्हणून घरात गेलो. शोकेसच्या एका कप्प्यात सगळी पदके आणि वर स्मृतिचिन्हे होती. ही सगळी पदके आतापर्यंत कुणी मोजलेली नाहीत. त्यात सुवर्णपदकांची भर जास्त. मग रौप्यपदके. ६४ व्या राष्ट्रीय स्पर्धेत मिळालेले स्मृतिचिन्ह पाहत होतो तर आजूबाजूला ६२ व्या राष्ट्रीय स्पर्धेचे दिसत होते. देशभरातल्या, राज्यातील अनेक स्पर्धा ताईने जिंकल्याचे ही पदके, स्मृतिचिन्हे सांगत होती. ताईचा बायोडेटा नाही केलेला अजून. तिचे वय हे इतकं लक्षात येण्यासारखे नाही. एका मुलाखतीत ताईला सगळ्या स्पर्धा आठवायला कष्ट पडत होते. इतकं यश तिने आतापर्यंत मिळवले आहे. ती सगळी पदके शंभरपेक्षा जास्त आहेत.


या प्रत्येक पदकाची प्रवासाची आगळीवेगळी गोष्ट आहे. ताईचे वडील रोजंदारीचे कामकरतात. पावसाळा सोडला की रोजगारासाठी या भागातील सगळी माणसे रोजंदारीवर मिळेल ते काम करत असतात. ताई पळत पळत सगळी कामे करायची. अगदी दुकानात गेली, शाळेत गेली तरी. घरी आली की आईला कामात सगळी मदत करते. भांडी घासते. स्वयंपाकात मदत करते.


ताई गेल्या वर्षापासून १७ वर्षांखालील गटातून ४०० मीटर आणि ८०० मीटर या दोन स्पर्धांवर भर देत आहे. एनवायसीएसच्या माध्यमातून प्रसिद्ध गेल इंडिया या कंपनीने ताईस २०२० ऑलिम्पिक तयारीसाठी दत्तक घेतले आहे. वर्षभरापूर्वी थायलंडमधील एशियन स्कूल स्पर्धेसाठी तर नैरोबीत होणार्‍या वर्ल्ड स्कूल स्पर्धेसाठी देखील तिची निवड झाली होती. यावर्षी ‘खेलो इंडिया’ या स्पर्धेनंतर लगेच महिन्याभराच्या जमेका येथे होणार्‍या उसेन बोल्ट क्लब येथे प्रशिक्षणासाठी तिची निवड झाली आहे. गेल्या चार वर्षात ताईने थेट आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत धडक घेतलेली आहे. कालच जमैका ऍथलेटिक्समध्ये ८०० मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. कविता राऊतच्या यशाने हरसूलसारख्या वनवासी भागात आंतरराष्ट्रीय स्तरावर जिंकण्याचा एक आत्मविश्वास आणि इतिहास निर्माण केला आहे. तीच प्रेरणा ताईने आपण देशासाठी काही करू शकतो ही तिच्या कृतीतून जागवली आहे. कविता, ताई आज घराघरात पोहोचल्या आहेत. आपापल्या गाव, तालुका, नाशिक या ओळखीबरोबर त्यांची ओळख राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर होते आहे.


कविता, ताई, किसन हे आजच्या घडीतील भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणारे खेळाडू नाशिकच्या वनवासी भागातील. वनवासी कल्याण आश्रमाच्या ‘एकलव्य खेलकूद स्पर्धे’तील अनेक खेळाडूंची सुरुवात आज त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत घेऊन गेली आहे. आजपर्यंतच्या त्यांच्या या प्रवासात अनेक अनामिक वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्यांनी हातभार लावलेला. कार्यकर्त्यांच्या वनवासी भागातील अनेक कि.मी. चालण्याचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे


ही गोष्ट यासाठी महत्त्वाची आहे. परिस्थितीची कुठलीही सकारात्मकता वाटेला आली नसताना ध्येयाची आणि कष्टाची वाट ताईने स्वतःसाठी तयार केली आहे. समाज पाठीशी उभा राहिला आहे. गावकरी, प्रशिक्षक, भोसलाच्या माध्यमातून ही यशोगाथा आकाराला येते आहे. कविता, ताईच्या या यशोगाथेच्या परंपरेतून अजूनही काही जण येत्या काळात आपल्या नजरेस पडणार, हे नक्की. सुदैवाने भोसलात माझ्या नजरेसमोर असे काही प्रवास आले. कालौघात ते शब्दरूप होतीलच. भोसलाचे मैदान जसे प्रत्येकाला देशप्रेमाचे साक्ष देणारे आहे, तसे ते बांधिलकीची, आत्मविश्वासाची जडणघडण करणारे आहे.




- संजय साळवे
@@AUTHORINFO_V1@@