पवारांच्या टाईमलाईनवर चक्क ‘गुढी’ ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Mar-2018
Total Views |

 
 
गुढी पाडव्याला विरोध करणाऱ्या काही कडव्या जातीवादी संघटना ज्यांना आपले दैवत मानतात असे समजले जाते अशा शरद पवारांच्या सोशल मिडिया टाईमलाईनवर आज चक्क गुढीचे चित्र बघून अनेकांचे डोळे विस्फारले. केवळ गुढीच नव्हे तर त्यासोबत एक संस्कृत श्लोक व सर्वांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देणारा संदेशही त्यात असल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. गुढी पाडवा हा आपला सणच नव्हे असा प्रचार करणाऱ्या संघटनांना यामुळे आपले तोंड कुठे लपवावे असे झाले. त्यामुळे बऱ्याच जणांनी यावर प्रतिक्रिया न देणेच पसंत केले तर काही जणांनी उसने अवसान आणून खुद्द शरद पवारांनाच अक्कल शिकवत गुढी उभी करणे कसे धर्माच्या विरोधात आहे, साडी-चोळी व उलटा तांब्या काढीवर लटकवणे कसे चुकीचे आहे हे सांगत ते पुरोगामी असल्याची आठवणही करून दिली आहे.
 
 
 
गेल्या काही वर्षांपासून विशेषतः महाराष्ट्रात गुढी पाडव्याला विरोध करण्याचा प्रघातच निघाला आहे. त्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या निर्घृण हत्येशीही त्याचा संबंध जोडायला ही मंडळी कमी करत नाहीत. तसेच देशभरातील सण साजऱ्या करण्याच्या पद्धतीशी तुलना करून महाराष्ट्रातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न या संघटना करताना दिसतात. या संघटनांच्या पाठीशी शरद पवार असल्याचा आरोप त्यांचे विरोधक करतात. तर सोशल मिडियामधूनही बऱ्याचदा या संघटनांच्या कुकृत्याशी शरद पवारांचा संबंध लोक जोडत असतात.
 
 
 
मात्र आज प्रत्यक्ष शरद पवारांनीच गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्यामुळे या संघटनांची चांगलीच पंचाईत झाली. तसेच शरद पवारांच्या या शुभेच्छांना जनमानसातूनही चांगलाच प्रतिसाद मिळाला. अनेकांनी त्यांच्या सोशलमिडिया टाईमलाईनवर गुढ्या व तोरणांची चित्रे शेअर करत त्यांनाही शुभेच्छा दिल्या. शरद पवारांच्या या कृतीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या नसत्या तरच नवल. देशात भाजपच्या वारंवार यशानंतर काँग्रेसने स्वीकारलेला सॉफ्ट हिंदुत्वाचा मार्ग आता शरद पवारही स्वीकारणार का असा सवाल दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. पण पवारांच्या या शुभेच्छांमुळे महाराष्ट्रात सामाजिक सलोखा वाढीस लागण्यास हातभारच लागेल हे मात्र नक्की.
@@AUTHORINFO_V1@@