डॉ. केशव बळीराम हेडगेवार विचारप्रेरणा आणि सेवाधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Mar-2018   
Total Views |


रा. स्व. संघाच्या स्थापनेवेळचे संघाचे स्वरुप आणि आजचे स्वरुप अतिविशाल झाल्यासारखे दिसते. देशातील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात संघाच्या प्रेरणेने अनेकानेक संस्थांची स्थापना झाली आहे. समाजातील निरनिराळ्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी कार्य करणार्‍या या संस्था खर्‍या सेवाव्रती आहेत. यामागे अर्थातच डॉ. हेडगेवार हीच एकमेव प्रेरणा आहेत.

२०१४ सालचे सत्तांतर किंवा नुकतेच ईशान्य पूर्व भारतामध्ये झालेले सत्तांतर यामध्ये जगाने रा. स्व. संघाचे कौतुक केले. का? कारण एक बीज ज्याप्रमाणे स्वतःला मातीत गाडून घेते आणि स्वतःचे सृजनवैभव मातीबाहेर वृक्षराजींच्या रूपाने विस्तारते. तसेच रा.स्व. संघाने, त्यातल्या स्वयंसेवकांनी स्वतःसाठी अविरत सेवाव्रती अशी जणू शपथ घेतली. स्वतःला समाजाच्या कल्याण उत्थानासाठी अक्षरशः गाडून घेतले. शब्दातीत त्याग केला. पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी, चौथी पिढी, पाचवी पिढी.. पाच पिढ्यांचे ’नाही चिरा नाही पणती’चे जगणे स्वयंसेवक स्वर्गतुल्य मानून जगले. त्यामुळे देशात वेगळी चैतन्याची लाट उभी राहिली. ही लाट सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि याचबरोबर सामाजिक न्यायाचा वारसा सांगत राष्ट्राचे अखंड वैभव चिंतणारी आहे. काय बरं प्रेरणा असेल या सर्व बदलांची? हे सर्व निर्माण करणार्‍या स्वयंसेवकांचे काय बरं आत्मधन असेल? ही प्रेरणा, हे आत्मबल आहे, ’तेरा वैभव अमर रहे मॉं, हमदिन चार रहे ना रहे,’ राष्ट्रीय वृत्तीची. ही वृत्ती या सर्वांमध्ये पेरली कोणी? त्या विचारांना कृतीत उतरण्यासाठी त्याची मशागत केली कोणी? अर्थात संघ कुछ नही करता म्हणणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने.


संघाचे वैचारिक धन काय आहे? संघाची स्थापना करणारे डॉ. केशव बळीरामहेडगेवार यांचे जीवनचरित्र हेच संघपरिवाराशी नाते सांगणार्‍या लाखो सेवाकार्यांचे मूळ आहे. सूर्याच्या तेजाचा एक किरणही कालाच्या अंधकाराला चिरून प्रकाशाची गाथा गातो. विरांची थोरांची स्मृती इतिहासाच्या हजारो शलाका लांघून माणसाच्या निराश मनाला कर्तृत्वाची आस देते. त्याप्रमाणे नव्हे तसेच डॉ. केशव बळीरामहेडगेवारांच्या विचारांची अमृतगंगा आज समाजमनात वस्तीपातळीवर विचारांच्या अमूर्ततेला प्रत्यक्ष कर्तृत्वाचा साक्षात्कार घडवत आहे. विचारांचे काय आहे? आजही पाहतो की भारतमातेच्या उदरी जन्मघेतलेल्या कित्येकांचे विचार आजही समाजात अभ्यासरूपाने पारायणित केली जातात, घोकली जातात. पण विचार नुसते विचारच राहतात. त्या विचारांचे पुढे काय? डॉ. हेडगेवारांच्या विचारांचे मूल्य या सर्व पार्श्वभूमीवर अमूल्य आहे. आपल्या देशात प्रभू श्रीराम, भगवान श्रीकृष्ण त्यापुढे जाऊन तथागत गौतमबुद्धांनी आपल्या चरित्रातून, आपल्या जीवनशैलीतून विचार प्रकट केले. त्या त्या प्रसंगात त्यांनी जे निर्णय घेतले, जगले त्यालाच त्यांचे विचार म्हणून जगताने मान्य केले. या पार्श्वभूमीवर डॉ. हेडगेवारांच्या जीवनविचारांनाही वेगळे परिमाण लाभले आहे. त्यांनी त्यांच्या हयातीत कुठेही मी बोलतो म्हणून माझा हा विचार आहे, असे उद्धृत केले नाही, तर त्यांच्या वागण्यातूनच बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊलेचा समग्र अर्थ ध्वनित होत असे. त्या वागण्यातून विचार प्रकट होत असे आणि त्या विचारांतनू एक प्रेरणा निर्माण होत असे.


डॉ. हेडगेवारांनी आत्मचरित्र लिहिले नाही की, आपल्या स्वतःच्या विचारांची माहिती देणारे, महत्त्व सांगणारे पुस्तकही लिहिले नाही. त्यांचे आयुष्य आणि आयुष्यातून प्रतीत होणारे विचारच एक खुले महाकाव्य होते. महाभारत, रामायणासारखे. ज्याला जो सद्विचार त्यातून घ्यायचा आहे, तो डॉ. हेडगेवारांच्या आयुष्य घटनाक्रमातून समाजाने घेतला. समाजातील सज्जनशक्तीने घेतला आणि त्यातून उभ्या राहिल्या अगणित सेवासंस्था, उभे राहिले अगणित प्रकल्प. हे सर्व प्रकल्प आकाशाला कवेत घेत आज देशाच्या मातीशी नाते सांगत राष्ट्रीयत्वाची भावना जोपासत आहेत. निंदा किंवा वंदा, आम्ही घेतलेले व्रत टाकणार नाही, अशी भावना हृदयात जागवत या संस्थांच्या कामाचा तेजोवृक्ष सामाजिक समस्यांचा तिमिरभेद करत आहेत. या सर्व संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मातृसंंस्था मानतात. जम्मू-काश्मीर स्टडी सेंटरच्या पदाधिकारी शक्ती मुन्शींनी ६ वर्षांपूर्वी सांगितलेला एक अनुभव आठवतो. त्या म्हणाल्या की, त्या काही दशकांपूर्वी ईशान्य भारतात गेल्या होत्या. त्यावेळी तिथले जनजीवन पाहून त्यांना वाटले की, इथल्या लोकांना भारतीयत्वाशी बांधून ठेवणार्‍या दोनच गोष्टी होत्या. त्या दोन गोष्टी म्हणजे एक भारतीय सैनिक जे त्यांचे संरक्षण करीत होते आणि दुसरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, जे भारतातून सुदर सुरक्षित प्रदेशातून येऊन इथे पूर्वेतर भारतात असंख्य हालअपेष्टांना तोंड देत लोकांची सेवा करत होते.


आपले घरदार त्यागून, सुखाचे आयुष्य सोडून जनभाषेत नस्ती उठाठेव हे स्वयंसेवक का करत होते? नुकताच शेतकर्‍यांच्या नावावर लोकांना आणि प्रत्यक्षात मोर्चात आलेल्या शेतमजुरांनाही फसवत लाल बावटावाल्यांनी एक मोर्चा काढला. मोर्चामध्ये जमलेले शेेतमजूर वनवासी बांधव ठराविक दोन तीन विभागातून आले होते. त्यांना सांगितले होते की, तुम्ही अतिक्रमण केलेली जंगलातली जमीन तुम्हाला मिळवून देणार. अर्थात गैरमार्गाने अतिक्रमण केलेली जमीन परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा दाखला देऊन कधीतरी शेतमजुरांच्या नावावर होईल का? पण तरीही घटना आणि कायदेबाह्य विचार भोळ्याभाबड्या वनवासींच्या मनात पेरून त्यांना इतर समाज, घटनेने चालणारे सरकार आणि प्रत्यक्ष देशाबद्दल दुही वाटावे, असे काहीतरी देशघातक कृत्य देशभरात वनवासी क्षेत्रात चालले आहे. या पार्श्वभूमीवर आधुनिक शेती करावी म्हणून चतुःसूत्री भाताची लागवड, आधुनिक बी-बियाणे, नैसर्गिक खते, पर्यावरणाशी अनुकूलन साधत पर्यावरणाचा वापर या सगळ्या गोष्टींबाबत वनवासी बांधवांना जागरूकता येईल यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी नाते सांगणार्‍या अनेक सेवाभावी संस्था कार्यरत आहेत. वनवासी बांधवांनी आपल्या सनातन धर्माशी फारकत न घेता आपल्या संस्कृतीच्या देदीप्यमान परंपरेला स्मरून जगाच्या प्रवाहात सामील व्हावेत म्हणून वनवासी कल्याण आश्रमआज रक्ताचे पाणी करते आहे. पूर्वेतर ते अगदी काश्मीरच्या काही फुटीरतावादी वस्त्यांमध्येही गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांनी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्यांना शिक्षणसुविधा, आरोग्य सेवा पुरविणार्‍या विद्या भारती, सेवा भारती यांच्या कार्याचा आढावा घेणारी एक मोठी कादंबरी होईल. संघाच्या वटवृक्षाला आज आसेतु हिमाचल व्यापणारी विविधांगी सेवाक्षेत्रे जनकल्याण सेवा समितीने विकसित केली आहेत. स्वदेशीसाठी, राष्ट्रीय चेतना देशभरात निर्माण होण्यासाठी, बालकांसाठी, महिलांसाठी, युवकांसाठी, वृद्धासाठी, वंचित समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी, शेतकर्‍यांसाठी, वनवासी बांधवांसाठी, मजदुरांसाठी, घरकामकरणार्‍या महिलांसाठी, दहशतवादाच्या शिकार बनलेल्यांसाठी म्हणजे त्यांच्या कल्याणासाठी कामकरणार्‍या संस्था आहेतच. मूलतः स्वदेशी, आत्मीयता, अनुशासन आणि निष्ठा भाव यावर आधारित लाखोंच्या वर सेवाकार्य सुरू आहेत. ती मानवाच्या सर्वांगीण आयुष्यात दिसणार्‍या प्रत्येक विवंचनेवर कामकरतात. धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, न्याय, हक्क, आरोग्य आणि या सर्वांना बांधणारा धागा म्हणजे समरसता. या समरसतेचा भाव जागवत ही सेवाकार्य प्रचंड ताकदीने उभी आहेत.


काही घटना मी स्वतः अनुभवलेल्या. एक तीन वर्षांपूर्वीची. भांडूपच्या वाल्मिकीनगरमधली. या सेवावस्तीमध्ये जाणे म्हणजे एक दिव्यच. कारण चहूबाजूचे सांडपाणी सोडाच, शौचालयाचे मलयुक्त घाणेरडे पाणी या वस्तीत सोडलेले. या वस्तीला शहर भागात असूनही बहिष्काराचे स्वरूपच. कारण वस्तीमध्ये भरल्या जाणार्‍या या शौचयुक्त सांडपाण्यामुळे अतिशय भयंकर दुर्गंधी यायची. या वस्तीत बाहेरून कुणीही यायचे नाही. अपवाद फक्त काही लोकांचा होता. कोण होते ते लोक? दर रविवारी यायचे, घरोघरी जायचे, मुलांना एकत्र करायचे आणि चांगल्या गोष्टी शिकवायचे, त्यांना नवीन माहिती द्यायचे, मुलांचे खेळ घ्यायचे. अर्थात हे येणारे लोक संघ स्वयंसेवक आहेत आणि तेे शाखा घेतात, हे सांगायलाच नको. दुसरी घटना मुलुंड डम्पिंग ग्राऊंडची. नावातच आले. या डम्पिंग ग्राऊंडवर तासाभरासाठीही कुणी बाहेरची व्यक्ती गेली की ती दीर्घ मुदतीचा आजार सोबत घेऊन आलीच समजा. पण, या कचर्‍याच्या डोंगरावर गुराढोरांपेक्षाही बत्तर आयुष्य जगणार्‍या लोकांना चांगल्या आयुष्याची प्रेरणा देण्यासाठी तिथे संघाचे प्रचारक वारंवार जातात. का? सगळ्या परिसराने टाळलेल्या या वस्तीत नियमित येणार्‍या या संघ स्वयंसेवकांची प्रेरणा काय? ही प्रेरणा नाना पालकरांच्या शब्दात आहे-


तुझे तेज अंगी शंताशे जरीहि
उजाळूनि दे दिशा दाहि दाही


या सर्व सेवाभावी संस्था डॉ. हेडगेवारांच्या व्रतस्थ जीवनाचा आदर्श वस्तुतः डोळ्यासमोर ठेऊन काम करत आहेत. या सर्व संस्थांमध्ये किंवा दुर्गमभागात जाऊन हरवलेले आयुष्य घालवत तिथल्या जनमाणसांना ओळख करून देणारे स्वयंसेवक हे लौकिक अर्थाने सर्वच स्तरांवर सुस्थापित असतात. म्हणजे घरी राहायला जागा नाही किंवा खायला मिळत नाही म्हणून कोणी स्वयंसेवक होऊन घराबाहेर पडत समाजकार्य करत नाही तर हे सगळे उच्चशिक्षित आणि मनात आणले तर आपल्या शिक्षणाच्या जोरावर लाखो रुपये वेतन असलेली नोकरी मिळवू शकणारे असतात पण ते सर्व आर्थिक वैयक्तिक सुखलोलुपतेला अक्षरशः पायदळी तुडवून वाट ही बिकट वहिवाट करतात. एकात्मता मानववाद मांडणारे पंडित दीनदयाळ उपाध्यायजी असोत की चित्रकूटचा अद्भुत पसारा उभारणारे नानाजी देशमुख असोत की, कुष्ठरोग्यांसाठी आयुष्य घालवणारे कात्रे असोत की घरादारावर तुळशीपत्र ठेवऊ राष्ट्रचिंतन करणारे अगणित संघ प्रचारक असोत. यांची प्रेरणा नक्कीच असणार की, अत्यंत हलाखीची गरिबी असताना, मातृपितृ छत्र हरवले असताना कष्टाने शिक्षण घेत केशव बळीरामहेडगेवार हा गरीब मुलगा डॉक्टर झाला. त्यांचे भाऊ भिक्षुकी करत. त्या परिवाराला डॉक्टर मुलाकडून अपेक्षा असतीलच नव्हे खूपच इच्छा असतील, पण डॉक्टरांनी डॉक्टरकी केली नाही. त्यांनी समाजाची सेवा विनामूल्य केली. त्यामुळे समाजातले उच्चशिक्षित तरुणांमध्ये समाजाप्रती सेवामूल्य वाढले. संभाजीनगरातले डॉ. हेडगेवार रुग्णालय या कार्याची जिवंत साक्ष आहे.


विविध अंगांनी समाजामध्ये आरोग्याची सेवा पुरविणार्‍या या रुग्णालयात कित्येक सेवाव्रती समाजासाठी झटताना दिसतात पण त्यांची भूमिका काय असते? मी काही करत नाही सगळे संघ करतो. कारण त्या पाठीमागेही डॉ. केशव बळीरामहेडगेवारांची प्रेरणा आहे. आयुष्यभरच्या हलाखीला आणि त्यामध्येही समाजकल्याण आणि राष्ट्रचिंतन करणार्‍या डॉ. हेडगेवारांना कित्येक जण आर्थिक मदत देऊ पाहात, तेव्हा ते म्हणत,’’ मी म्हणजे संघ, संघ म्हणजे मी. संघ हीच संपत्ती.’’ आजही लाखो स्वयंसेवक देशात आणि देशाबाहेर ही संपत्ती जपत तिचे वैभव वाढवत कार्यरत आहेत. त्यांनी कितीही मोठा सेवाप्रकल्प निर्माण केला तरी ते स्वयंसेवक त्याचे प्रस्थापित मालक होत नाहीत, तर ते त्या प्रकल्पाचे सेवकच राहातात, शेवटपर्यंत संघ स्वयंसेवक. कारण डॉ. हेडगेवारांनी स्वयंसेवकांची व्याख्या प्रत्यक्ष गांधीजींना सांगितली ती अशी की, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी जो आत्मियतेने आपले सारे सर्वस्व अर्पण करण्यास सिद्ध होतो, अशा नेत्याला आम्ही स्वयंसेवक समजतो. त्यामुळे आपण कुणीही असलो तरी संघस्वयंसेवक म्हणून जगताना आपण कसे असलो पाहिजे, हे सगळ्या सेवाव्रती स्वयंसेवकांना, त्यांनी निर्माण केलेल्या संस्थांना चांगलेच माहिती आहे. होते काय की एखाद्या आदरणीय व्यक्तीचा विचार व्यक्ती आदर्शव्रत मानू शकते. पण डॉ. हेडगेवारांच्या विचारांची महानता अशी की व्यक्तींसोबतच त्यांच्या विचारांवर संस्थाही मार्गक्रमण करत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे चालणार्‍या कोणत्याही संस्था विचारांना आपण भेटलो. अगदी भटके विमुक्त परिषद, समरसता मंच ते राष्ट्र सेविका समिती किंवा विश्व हिंदू परिषद च्या उपक्रमांपासून इतर शेकडो संघटनांना भेटलो तर दिसते की, या सर्वच संघटनांमधील कार्यकर्त्यांनी समाजासाठी देशासाठी स्वतःला वाहून घेतलेले असते पण देशभरातल्या अशा कुठल्याही संघपरिवाराशी संबंधित व्यक्ती मग ती स्त्री असो की पुरुष, त्यांच्यासमोर त्यांच्या त्यागाचा, निष्ठेचा उच्चार जरी केला तरी तो विषय ते टाळतात. त्यांना भयंकर कानकोंडले वाटते. इतकेच काय? आपण केलेल्या कोणत्याही कामासंबंधी कोणताही प्रचार प्रसार न करण्याचाच आसेतू हिमाचल या सेवाभावी संस्थांचा आणि त्या सेवा करणार्‍या स्वयंसेवक व्यक्तीचा कल असतो. का? कारण डॉ. हेडगेवारांनी एका वक्तव्यात म्हटले होते की,’’मी व राष्ट्र हे दोन्ही एकच असे समजून राष्ट्र आणि समाज यांच्याशी जो तन्मय होतो तोच खरा राष्ट्रसेवक असतो.’’ राष्ट्राकरीता मी अमुक इतका स्वार्थत्याग केला असे काही लोक मोठ्या अभिमानाने सांगत असतात. पण हे सांगताना त्यांच्या असे लक्षात येत नाही की, असे म्हणण्यात मी राष्ट्रापेक्षा निराळा आहे, माझा माझ्या राष्ट्राशी संबंध नाही हे दाखवल्यासारखे होते. राष्ट्राकरिता खर्च करणे, झीज सोसणे हे त्यात राहणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे परमकर्तव्यच असते. त्यात स्वार्थत्याग कसला? डॉक्टरांचे हे म्हणणे जीवनसार समजून स्वयंसेवक जगत आहेत.


देशाच्या वैभवासाठी, संरक्षणासाठी सेवा करणार्‍या जागृती करणार्‍या संस्थाही संघपरिवारात आहेत. नव्हे प्रामुख्याने राष्ट्रीयत्वाची भावना संपूर्ण देशात व्यापून राहावी म्हणून विविध पातळ्यांवर संघ स्वयंसेवक दक्ष आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही विद्यार्थ्यांची तर किसान मजदूर संघ ही मजदुरांची. संस्कार भारती ते संस्कृती संवर्धन या सर्व संघटना आपआपल्या आघाड्यांवर लढत आहेत.या सर्व स्तरांवर हल्ले काय होत नसतील? केरळ तर देशप्रेमी स्वयंसेवकांच्या रक्ताने लहूलुहान झाले आहे. पूर्वेतर राज्यांमध्येही परिस्थिती वेगळी नाही. पण तरीही संघपरिवाराच्या सेवासंस्था काश्मीर असू दे नाही तर केरळ कुठेही जिवाचा धोका पत्करूनही कामकरतात. याबाबत दयानंद सावंत या मुंबईकराचा अनुभव ताजा आहे. मणिपूरमध्ये हा स्वयंसेवक स्वेच्छेने समाजकार्य करतो. तिथल्या पारंपरिक उत्पादनांना बाजारपेठ मिळावी म्हणून कामकरतात. एके दिवशी त्यांची भेट अचानक तिथल्या फुटीरतावादी असलेल्या व्यक्तीशी झाली. दाट जंगल, किर्रर्र काळोख. समोर तो शस्त्रधारी आणि त्याचे तसेच सहकारी पण दयानंद म्हणतात, ’’मला जराही भीती वाटली नाही कारण परमपूज्य हेडगेवारांचे विचार मी जगतो आहे. त्यांनी बळाची पूजा करायला लावली होती. निर्भय जीवन जगायला लावले होते. ती निर्भयता त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात जोपासली होती तर मी तर स्वतंत्र भारतात होतो.’’ खरेच कुणाला काय प्रेरणा देते कुणाला काय? पण डॉक्टरांच्या निर्भय सेवाव्रती जगण्याची आठवण देणार्‍या घटना सर्वश्रुत आहेत. उदाहरणार्थ कोलकात्याचे मौलवी लियाकत अली हे देशप्रेमी नेते. स्वातंत्र्य चळवळीत त्यांचे योगदान.


एका सभेमध्ये त्यांनी पाहिले की, व्यासपीठावर एक वक्ता विनाकारण लोकमान्य टिळकांवर टीका करू लागला, निंदा करू लागला. अतिशय असभ्य भाषा वापरू लागला. काही केल्या तो थांबायला तयारच नव्हता. एवढा मोठा श्रोतृसमुदाय चुळबुळ करू लागला. काय करावे? थांबवूनही ऐकायला तयार नाही. हे पाहताच श्रोत्यांमधील एक युवक उठला. त्याने सरळ त्या वक्त्याचा कान पकडला आणि मोजून तीन फटके त्याच्या गालावर रंगवले. सगळे थक्क झाले. त्या युवकाने कोणत्याही परिणामांची पर्वा न करता आपल्या देशभक्तावर निंदा करणार्‍याचे थोबाड बंद केले होते. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी आपले कौतुक करावे, अशी त्याची अपेक्षाही नव्हती. कारण त्याला मारून तो युवक व्यासपीठावरून खाली उतरून आपल्या जागेवर जाऊन बसला. कोण होता हा तरुण. ते होते युवा केशव हेडगेवार. हीच निर्भयता आज प्रतिकूल परिस्थितीत देशनिर्माणासाठी कामकरणार्‍या केरळ आणि पूर्वोत्तर भागातील स्वयंसेवकांमध्ये आढळते. डॉक्टरांच्या जीवनातील दुसरा एक प्रसंग. त्यांच्या मित्रांची भाची, मातृपितृविहीन. तिचा काका तिचेे लग्न जख्खड म्हातार्‍याशी लावून द्यायचे ठरवतो. त्या अनाथ लाचार मुलीचा कैवार कोण घेणार? तिचे मामा हेडगेवारांना हे सांगतात. स्वातंत्र्यपूर्व काळ. समाजजीवन अतिशय बंदिस्त. त्यावेळी मुलीला तेही अनाथ मुलीला काय स्वातंत्र्य असेल? तिच्या हक्कासाठी कोण लढणार? पण त्यावेळीही हेडगेवार आपल्या मित्राला सांगून त्या मुलीला त्या परिस्थितीतून वाचवतात. पुढे तिचा सुस्थळी विवाह झाला. पुरुषांबरोबरच स्त्रियांनाही माणसासारखे जगण्याचा हक्क आहे, हा मूलभूत मानवी विचार जागवणारा प्रसंग. या प्रसंगातूनच प्रेरणा घेऊन आज संघपरिवारात कितीतरी संघटना महिलांच्या कल्याणासाठी कार्यरत आहेत. महिलांनी माणसासारखे जीवन जगताना राष्ट्रीयत्व जपावे, संस्कार आणि संस्कृती तर महिलांनी काय पुरुषांनीही जपावी यासाठी या संघटना कामकरतात. भारतीय स्त्री शक्ती, दुर्गा वाहिनी वगैरेंचा उल्लेख करायलाच हवा.


माणसाबरोबरच देशाचे पर्यावरण, संस्कृती आणि प्रतीक चिन्हांसाठी काम करणार्‍या सेवा संघटनाही राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी संबंधित आहेत. गाईला पवित्र मानणे आणि गंगानदीला माता मानणे याही संकल्पनाच. या संकल्पना हिंदू समाजाशी निगडित. आज आपण बघतो की गोरक्षेसाठी कितीतरी सेवाभावी संस्था पुढे सरसावल्या आहेत. त्यांची प्रेरणा काय असावी? अर्थात पारंपरिक पद्धतीने मनात रूजवलेले संस्कार असतीलच. पण यावरच डॉ. हेडगेवारांची एक घटना सांगावीशी वाटते. स्वातंत्र्यापूर्वीचा काळ. डॉक्टर एका सत्याग्रहासाठी जंगल भागातल्या गावात येतात. सकाळी नदीवरून स्नान करून येताना त्यांना दिसते की, एक मुस्लीममाणूस एका अतिशय तरुण गाईला हिसके देत ओढत नेत असतो. ती गाय अत्यंत करुण मुद्रेने डोळ्यांत पाणी आणून पाय ओढत चाललेली असते. डॉक्टर त्या माणसाला म्हणतात, ’’या गाईला सोड. मी तिची काय किंमत असेल ती देतो.’’ हे ऐकून आणखी दोन-चार मुस्लीमभाई त्या व्यक्तीच्या मदतीला येतात आणि डॉक्टरांना सुनावतात, ’’या गाईची कुर्बानी द्यायची आहे आणि ती पण इथे रस्त्यावर द्यायची वहिवाट आहे.’’ डॉक्टर म्हणतात, ‘‘ठीक आहे. गाईच्या मांसाची काय किंमत येईल तितके पैसे मी देईन पण सोडा गाईला.’’ यावर आणखी चेकाळत समोरचे संघटितपणे म्हणतात, ’’कितीही पैसे दिले तरी गाईला सोडणार नाही. या भरवस्तीतल्या रस्त्यावरच गाईची कुर्बानी देणार.’’ दिवसाढवळ्या हिंदूबहुल वस्तीत चार-पाच जण मुक्या गाईला कापणार होते, चिरणार होते पण जमलेले आणि वस्तीतले हिंदूही ब्र काढायला तयार नव्हते. उलट काही हिंदू बांधव साळसूदपणे डॉक्टरांना सांगू लागले. ’’अहो, जाऊ द्या. तुम्ही सत्याग्रहासाठी आलात ना? मग कशाला फंदात पडता? करू द्या त्यांना काय करायचे ते? यावर दुसरा कोणी असता तर विषय नक्कीच सोडून दिला असता पण डॉक्टरांनी शेवटचा निर्वाणीचा प्रश्न त्या कसायांना विचारला की, ’’गाईला सोडता की नाही? मी तुमचा झालेला खर्च द्यायला तयार आहे.’’ वास्तविक पाहता डॉक्टरांना आमदनी नव्हती किंवा गाय त्यांच्या घरची तर सोडाच गावची पण नव्हती. पहिल्यांदा त्यांनी त्या गाईला पाहिले होते पण तरीही ते सारखे त्या कसायांना गाईला सोडण्यासंबंधी सांगत होते. गावातल्या हिंदूंनीही जेव्हा हेडगेवारांना समजवायचा प्रयत्न केला तेव्हा कसायांना चेव आला. त्यांनी जोरात कुर्बानीची तयारी केली. त्यावेळी एकट्या हेडगेवारांनी गाईला बांधून चालविणार्‍या त्या कसायाची धुलाई करण्यास सुरुवात केली. त्याला वाचविण्यासाठी मध्ये पडणार्‍यांनादेखील धुलाईचा प्रसाद दिला. शेवटी ती गाय त्या कसायांच्या कचाट्यातून मुक्त झाली. काय मिळाले असेल डॉक्टरांना? डॉक्टरांना त्यातून इतकेच मिळाले की त्या गावातले ते हिंदू आपल्या धार्मिक पवित्र संकल्पनेच्या रक्षणाचा विचार तरी करू लागले होते. आज त्याचे मूर्त स्वरूप देशभर दिसते. मग ते गाईच्या स्वरूपात असो की, गंगा-यमुना-सरस्वती अगदी नर्मदा नदीच्या संदर्भात असो की रामलल्लांच्या अयोध्येतल्या जन्मस्थानाचे असू दे, त्या पवित्र संस्कृती संकल्पनेसाठी देशभरातील राष्ट्रनिष्ठ हिंदू सेवा, संस्कार माध्यमातून पुढे सरसावला आहे. त्याला दिशादर्शक म्हणून दीपस्तंभ आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू समाजाचे सुख हेच माझे सुख आहे, हिंदू समाजावर येणारे महासंकट माझ्यावरचे संकट आहे आणि हिंदू समाजाचा अपमान हा माझा अपमान आहे, हा राष्ट्रधर्माचा मूलमंत्र आहे असे सांगणारे डॉ. केशव बळीराम हेडगेवार.!


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या समरस भावाच्या कामाची प्रेरणा काय? अर्थात डॉ. हेडगेवार! त्यांच्या जीवनातला छान प्रसंग. संघाचा वार्षीक उत्सव होता. दुरदूरहून स्वयंसेवक आले होते. जेवणाची पंगत बसणार इतक्यात १०-१२ जण बिचकत डॉक्टरांकडे आले आणि म्हणाले, ’’आम्ही पंगतीत बसणार नाही. अठरापगड जातीचे लोक भोजन पंगतीत आहेत.’’ यावर डॉक्टरांनी शांतपणे म्हटले, ’’ठीक आहे.’’ त्या रात्री त्या दहा-बारा जणांसाठी वेगळी पंगत बसली पण डॉक्टर सर्वांच्या पगंतीसोबतच भोजनाला बसले. कुणीही काहीही बोलले नाही. एका बाजूला ते दहा-बाराजण आणि दुसर्‍या बाजूला २५० जण आणि डॉक्टरांची पंगत. दुसर्‍या दिवशी मात्र ते दहा-बाराजण पुन्हा डॉक्टरांकडे आले आणि म्हणाले, ’’आम्हाला सगळ्यांसोबतच भोजन करायचे आहे.’’ डॉक्टरांनी त्यांच्यावर आपले मत लादले नव्हते. तर कृतीतून आपल्या सकारात्मक मताचे समर्थन केले होते. हेच आज सर्वत्र आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून होत आहे. समरस भाव ही डॉक्टरांनी दिलेली प्रेरणा आहे.


जातीयतेची तेढ आपल्याकडे वाढती समस्या आहे. समरस भावाने सर्व समाज एकसंघ राहावा ही काळाची गरज आहे. त्या दृष्टिने आज देशभर प्रयत्नही सुरु आहेत. राष्ट्रीय स्वंसेवक संघाने तर आपली भूमिकाच ठरविली आहे. ’एक गाव-एक मंदिर-एक पाणवठा-एक स्मशान.’ त्या दृष्टिने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे व्यापक स्वयंप्रेरीत नित्य उपक्रमही सुरु आहेत.


‘‘मानव तितुका एकची आहे
उच्च न कुणी नीच न कोणी
हाच आपला धर्म खरोखर
हीच आपली शाश्वत वाणी’’

या मंत्राला आपल्या आयुष्यात जागृत करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या छायेखाली कितीतरी संघटना जातीभेदाच्या राक्षसाशी कधी लढत तर कधी समन्वय साधत भेदाला दूर सारत आहेत. यामध्ये समरसता मंच, भटके विमुक्त विकास परिषद यांचे नाव अग्रणी येईल. यमगरवाडीचा प्रकल्प याचे उदाहरण देता येईल. समाजात विद्वेष पसरवण्यामध्ये तथाकथित सेक्युलर आणि स्वतःच स्वत:ला विद्वान समजणारेही आहेत. खोटा इतिहास रचून त्याचा प्रसार करणे, महापुरुषांची निंदा किंवा त्यांच्या कहाणीचा विपर्यास करणे, जाती-जातीमध्ये संघर्ष निर्माण होईल किंवा शुद्ध भारतीय व्यक्तिलाही आपल्या इतिहासाची-परंपरेची लाज वाटेल, असे साहित्य निर्माण करणे, ही कामे हे लोक करत असतात. दुर्दैवाने त्याचे विध्वसंक परिणामसमाजावर होतात. या सर्वांना पुरुन उरत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ’इतिहास संकलन विभाग’ किंवा ’समरसता साहित्य परिषद’ समाजाला जागृतीचा वास्तव आयामदेण्याचा प्रयत्न करते. हे सगळे कशासाठी? तर देशात सर्व जातींमध्ये सलोखा राहावा, संघर्ष-भेद नको म्हणून. यावरच नाशिकमध्ये धर्मजागरण मंच आणि शंकराचार्य न्यास एक अद्भूतपूर्ण उपक्रमकरते. ब्राह्मणेतर समाजासाठी ‘पौरोहित्या’चा वर्ग हा. या वर्गामधून ब्राह्मणेतर समाजातले युवक पौरोहित्य शिकतात, देवळात पौरोहित्य कामही करतात. अमूक एक कामएक जातीचेच का? असे म्हणून कित्येक शतके समाजात फुट पाडण्याचे कामकाही नादान लोक करत होते. त्यांना संघाने कामातून दिलेले हे उत्तरच होय.

म्हणूनच...
संघे शक्ति इति ज्ञात्वा लोककल्याणकारक:
येन संघ कृतस्तस्मै केशवाय: नमो नम:



अर्थातच संघटनेमध्ये सामर्थ्य असते, हे ओळखून लोकांचे कल्याण करणारा संघ ज्यांनी स्थापन केला, अशा त्या केशवांना पुन्हा पुन्हा नमस्कार केला.


- योगिता साळवी
@@AUTHORINFO_V1@@