समकालीन विचारधारा आणि डॉ. हेडगेवारांचा संघ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Mar-2018
Total Views |


डॉक्टरांनी रा. स्व. संघाची स्थापना केली, त्यावेळी देशात अन्यही काही विचारधारा अस्तित्वात होत्या. त्यावर आधारित काही संघटना स्थापन झाल्या होत्या तर काहींची स्थापना संघाबरोबर आणि संघानंतरही झाली. पण आज त्यापैकी काहींचे अस्तित्व असूनही नसल्यासारखे आहे, तर काही संपल्यात जमा आहेत. रा. स्व. संघाला समकालीन असलेल्या विचारधारा, त्यांचा उदय, कार्यपद्धती, त्यांची सध्याची स्थिती, समाजातील त्यांचे स्थान आणि डॉ. हेडगेवारांचा रा. स्व. संघ या मुद्द्यांची या लेखात सविस्तर चर्चा केली आहे.


डॉ. हेडगेवारांचा संघ म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. ही वर्तमानकाळातली अतिशय प्रभावी अशी हिंदू संघटना आहे हे सर्वांना ठाऊक असलेले सनातन सत्य आहे. या संघटनेची भारतातल्या इतर विचारधारांशी तुलना करणे निश्चितच अत्यंत प्रासंगिक असे कार्य आहे. भारताचा पिंड राजकीय वा व्यापारी हेतू बाळगून कार्य करण्याचा नाही. इथे जात्याच आध्यात्मिक वृत्ती नांदत आहे पण खेदाची गोष्ट अशी की, आपल्या या स्वाभाविक पिंड-प्रकृतीकडे दुर्लक्ष करून कॉंग्रेसी, समाजवादी व साम्यवादी विचारधारा मानणारी मंडळी राजकारणात अन् त्यातही पक्षीय राजकारणात अतिरिक्त रुची दाखवितात. परिणामम्हणजे या विचारधारा जो प्रभाव दर्शवितात तो अळवावरच्या पाण्याप्रमाणे अल्पजीवी, तात्पुरता ठरतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य मात्र देशात सर्वदूर मूळ धरण्यात सफल झाले आहे. सन १९२५ मध्ये डॉ. हेडगेवारांनी संघाचे रोपटे लावले. त्यानंतरच्या ९३ वर्षांमध्ये या रोपट्याचे एका विशाल वृक्षात रुपांतर झाले आहे. वटवृक्षाच्या पारंब्या पुन्हा नव्या वृक्षाच्या रूपात प्रकटतात. मग त्यातून फार मोठा भूभाग व्यापला जातो. नवनव्या पिढ्यांचे नवनवे घटक संघकार्य करण्यात सोत्साह सहभागी होतात. ते त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रांमधून संघाची विचारधारा रुजवितात. भिन्नभिन्न लोकांना संघविचाराशी जोडतात. कॉंग्रेसी विचारधारा असेल अथवा समाजवादी किंवा साम्यवादी विचारधारा असेल, नव्या पिढ्यांना प्रेरणा देण्यात अपयशी ठरल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपले प्रेरणापुरुष डॉ. हेडगेवार यांची स्मृती चिरंतन ताजीतवानी ठेवली आहे. इतर विचारधारांना आपापल्या प्रेरणापुरुषांचा विसर पडला आहे की, काय ही शंका आहे. संघाचे स्वयंसेवक तसेच संघप्रेरित संस्थांचे कार्यकर्ते डॉ. हेडगेवारांविषयी निर्भेळ कृतज्ञता बाळगतात. किंबहुना या महापुरुषाने प्रस्तुत केलेल्या वस्तुपाठांपासून आपण दूर तर गेलो नाही ना? या प्रश्नाच्या प्रकाशात आत्मपरीक्षण करणारे कार्यकर्ते हेच संघपरिवाराचे अनमोल मौलिक भांडवल आहे. या कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवर प्रकाश टाकणारा एक श्लोक इथे आठवतो.


कश्चिन् नवम् पल्लवमाददाति |
कश्चित् प्रसूनानि फलानि कश्चित् |
परं करालेऽपि निदाघकाले |
मूले न दाता सलिलश्च कश्चित् ।।


हाच तो श्लोक आहे. या श्लोकाचा अर्थ असा—‘‘आता वृक्ष बहरलाय, फुललाय... कुणी एखादा या वृक्षाजवळ येतो व नवी पालवी काढून घेऊन जातो. दुसरा कुणी फुले (प्रसूनानि) तर तिसरा कुणी फळे तोडून नेतो. पण जेव्हा हा वृक्ष शैशवात होता व कराल म्हणजे भीषण ग्रीष्म ऋतुशी (निदाघकालाशी) झुंज देत होता, तेव्हा या रोपाच्या बुंध्याशी जलसिंचन करण्याची कुणालादेखील आठवण होत नव्हती.’’


संघस्वयंसेवक म्हणतात—‘‘हा श्लोककर्ता विसरतोय की, डॉ. हेडगेवारांना ही जाण होती, हे भान होते आणि म्हणूनच अक्षरार्थाने स्वतःच्या रक्ताचे पाणी करून या महापुरुषाने हे रोपटे वाढविले. आज या वृक्षाचे लाभ आम्ही मिळवत आहोत, पण आम्हा सर्वांना पुरते ठाऊक आहे की, डॉक्टरांनी कष्ट उपसले म्हणून आम्हाला या वृक्षाचे लाभ मिळताहेत. कॉंग्रेसी, समाजवादी व साम्यवादी विचारधारांचे पाईक अशी प्रांजल भूमिका बाळगतात का? उत्तर नकारार्थी आहे. गेल्या ९३ वर्षांत संघाचा विस्तार होत गेला. इतर विचारधारांना ओहोटी लागली हे कटू सत्य आहे. सारांश, इतर विचारधारा संकोचत गेल्या, संघाची विचारधारा विस्तारत गेली, इतर विचारधारा तरुणांना व बाल-शिशूंना आकृष्ट करण्यात असफल ठरल्या. संघात पाचवी पिढीच सहाव्या पिढीला घडविण्यात गर्क आहे. इतर विचारधारा निवडणूक काळात तरारून भूगर्भाच्या वर येतात, संघाची विचारधारा मात्र वर्षाचे बारा महिने व महिन्याचे तीस-एकतीस दिवस उत्साहाने मानवी भांडवलात गुंतवणूक करण्यात गर्क आहे. इतर विचारधारांना आपल्या संस्थापकांशी काही देणेघेणे नाही, राजापूरच्या गंगेला आपले अस्तित्व औट घटकेचे आहे ही जाणीव असते. हिमालयातून उतरून गंगासागराकडे अष्टौप्रहर धावणार्‍या गंगामैय्याला भगवान शंकराचे स्मरण सदैव प्रेरणादायी वाटते.


‘‘संघसरिता बह रही है|
उस भगीरथ की अनोखी विजय गाथा कह रही है|’’


  एक नक्की, संघाव्यतिरिक्त ज्या इतर संघटना भारतात आढळतात त्यांना पक्षीय राजकारणात कमालीचे स्वारस्य आहे. पक्षीय राजकारण सत्तेच्या सारीपाटात रमते, खुर्चीभोवतीच पिंगा घालते. संघाने सुरुवातीपासूनच स्वतःचा आवाका मोठा ठेवलाय. भारतवर्षाचे पुनर्निर्माण हे आहे. रा. स्व. संघाचे जीवनोद्दिष्ट साहजिकच वेदोपनिषदांपासून प्रेरणा घ्यावी, उपनिषदकारांपासून थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत जेवढे महापुरुष व महान स्त्रिया आपल्या भारतवर्षाच्याच कल्याणासाठी झिजल्या व झुंजल्या, त्या सर्वांचे आपण ऋणको आहोत, हा भाव बाळगून संघकार्यकर्ते विविध कार्यांचे डोंगर उपसत आहेत. इतर विचारधारांचे कार्यकर्ते ‘पुरोगामित्वाच्या’ अभिनिवेशापोटी भारताच्या भूतकाळाला नावे ठेवण्यातच भूषण मानतात. ना त्यांना उपनिषदकार प्रेरणादायी, ना भागवतधर्मीय स्फूर्तिदायी. विवेकानंद, अरविंद, दयानंद, लाल, बाल, पाल यापैकी कुणापासूनही काही शिकण्याची या मंडळींची तयारी नाही. मताच्या पेटीशीच काय ती नाळ बांधलेली आहे. तेव्हा या पेटीत मते पडणार असतील तर कॉंग्रेसी व डाव्या विचारांचे पुढारी मनमंदिरांचे उंबरठेही झिजवायला तयार आहेत. गळ्यात यज्ञोपवित धारण करून व मंदिराच्या पुजार्‍याकडून तीर्थप्रसाद घेऊन ही मंडळी या सोहळ्यांच्या जाहिराती करण्यास सिद्ध आहेत. केरळातल्या कम्युनिस्टांना कळले की, संघवाले बाल गोकुळमचे कार्यक्रमकरून आबालवृद्धांना एकत्र जमवितात. मग लाल बावटेवाल्यांनाही मार्क्स-लेनिनच्या प्रतिमांच्या शेजारी कृष्ण व बलरामयांची चित्रे झळकावणे आवश्यक वाटले, पण मोराचे नृत्य व लांडोरीचा नाच यातला फरक भारतभूमीतल्या शाळकरी मुलालाही कळतो. परिणामतः लाल बावटेवाल्यांचा बेगडीपणा या बाळालाही संतापजनक वाटतो.


इतर विचारधारांचे पुढारी संघाच्या विरोधात तारस्वरांत बोलतात. राष्ट्र सेवा दलाचे पुढारी तर हमखास भाषणातून सांगतात. संघाने जातीयवाद पसरविला, अहिंदूंचा द्वेष भिनवण्यास सुरुवात केली. म्हणून साने गुरुजींनी सेवादलाची स्थापना केली. कॉंग्रेसी पुढारी, कम्युनिस्ट कॉम्रेडस यापेक्षा वेगळे काही सांगत नाहीत. उलटपक्षी संघातली बौद्धिक वर्ग देणारी मंडळी जाणीवपूर्वक ‘‘डॉक्टरांनी भारताच्या पुनर्निर्माणासाठी संघाची स्थापना केली.’’ अशी भावात्मक विधायक मांडणी करतात. अहिंदूंचा द्वेष करणे तर दूरच राहिले. ‘‘इथे जो जन्माला आला व भारतीय संस्कृतीवर प्रेमकरू लागला, तो जन्माने भले मुसलमान वा ख्रिश्चन असेल पण कर्माने हिंदूच आहे व म्हणून त्याच्याही साहाय्यासाठी धावून गेले पाहिजे ही आहे.’’—संघाची शिकवण. पंडित दीनदयाळ उपाध्याय मार्मिक शब्दांत संघाची भूमिका मांडत असत. ‘‘एकाशेजारी एक अंक लिहिला तर ११ आकडा उत्पन्न पावतो. हे डॉक्टर हेडगेवारांना नक्कीच ठाऊक होते व म्हणूनच हिंदूंच्या शेजारी अहिंदूंनाही उभे केले, तर भारताचे बळ वाढेल ही खात्री त्यांनीही बाळगली होती. पण एका अंकाशेजारी जो दुसरा एक अंक लिहायचा आहे तो मुळात पाव वा अर्धा आहे. तेव्हा जन्माला येणारा आकडा सव्वा वा दीड असेल हे विसरू नका. हे डॉक्टरांचे सांगणे असायचे.’’ संघाला विखुरलेल्या, आत्मविश्वासहीन झालेल्या हिंदू मानवाला संघटित व आत्मविश्वाससंपन्न बनवायचे आहे व असा सर्वार्थाने एकवटलेला हिंदू अहिंदूंच्या शेजारी उभा करायचा आहे. प्राधान्य हिंदू संघटनेला... पुढची पायरी भारतीय समाजाला संघटित करण्याची! म्हणजे संघाव्यतिरिक्त ज्या संघटना आहेत त्यांना संघाच्या विरोधात माणसे जमवायची आहेत. संघाला भारताचे पुनर्निर्माण करण्यासाठी हिंदूंना संघटित करायचे आहे व या संघटित हिंदू शक्तीच्या आधारे अहिंदूंनाही सुखसमृद्ध करायचे आहे.


कॉंग्रेसी व अन्य विचारधारांना समाजवादाविषयी प्रेमआहे, जगात बोलबाला आहे. म्हणून हे प्रेमआहे. डॉक्टर लोहिया व जयप्रकाश नारायण यांची मुळे भारतात होती, त्यांना समाजवादी विचारसरणीच्या मर्यादा ठाऊक होत्या आणि म्हणूनच भारतातल्या आध्यात्मिकतेवर समाजवाद उभा करावा यासाठी हे दोघे खटपटत राहिले... या दोघांच्या वर्तमानातल्या वारसदारांनी तर अध्ययनापासूनच सुट्टी घेतली आहे. ना त्यांना रशियाची माहिती, ना चीनची जानकारी. मार्क्सवाद म्हणजे काय? असा प्रश्न विचारण्याच्या भानगडीत पळायचे नाही. हा या मंडळींचा वज्रनिश्चय आहे. संघाचे कार्यकर्ते समाजवाद-साम्यवाद याविषयी चर्चाविमर्श करण्यास भले तयार नसतील. कारण त्यांना माणसे जोडायची आहेत, मूर्तिपूजा करायची आहे व परिणामतः अमूर्ताचे चिंतन करण्यात भले त्यांना रुची वाटत नसेल, पण दीनदुबळ्या समाजघटकांची निरपेक्ष सेवा करण्यात हिंदूमात्राचे कल्याण आहे ही संघवाल्यांची श्रद्धा आहे. श्रीगुरुजी, दीनदयाळजी, ठेंगडीजी वगैरे तत्त्वचिंतकांकडून स्वयंसेवकांना समजले आहे की, झोपडपट्‌ट्यांमधून राहणार्‍या तळागाळातल्या मनुष्यमात्रांना दरिद्रीनारायण समजून त्यांना दुःखमुक्त करण्यातच तुमच्या आमच्या आयुष्यांची कृतार्थता आहे. अशीच शिकवण महात्मा गांधीजी व डॉक्टर आंबेडकर यांच्याकडून मिळाली म्हणून या दोन्ही महापुरुषांना तसेच लोहिया व जयप्रकाश नारायण यांच्याही स्मृतींना अभिवादन करणे संघकार्यकर्त्यांना औचित्याचे, अगत्याचे वाटते. ‘एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति’ हा आपला प्राचीन उद्घोष आहे. तेव्हा संघवाले सर्वसमावेशक बनले तर आश्चर्य कसले?


इतर विचारधारांच्या पुरस्कर्त्यांना फक्त आंदोलनात्मक उपक्रमठाऊक आहेत. हे उपक्रम‘हल्लाबोल’ शीर्षकाखाली वृत्तपत्रांतून झळकतात. शाब्दिक अथवा वाचिक हल्ला वृत्तपत्रातून झळकला की हे पुरस्कर्ते खुश! या उपक्रमांना विधायक कार्यक्रमांची जोड देणे ही अपेक्षा फार झाली. आंदोलनसुद्धा दीर्घकाळ चालवावे, सत्ताधार्‍यांना नामोहरमकरावे, हे उद्दिष्टही अधुरेच राहते. कार्यकर्त्यांची फळी ठिकठिकाणी उभी करावी, या इराद्याचा तर ठावठिकाणाही नाही! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सगळा भर संघटनात्मक उपक्रमांवर, पडद्याआड शांतपणे विविध कामे करण्यावर. साहजिकच कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, बैठकी, कार्यकर्त्यांचे अभ्यासवर्ग, गणवेषात स्वयंसेवकांनी यावे, विविध वस्त्यांमधून यावे. एकेका एकत्रीकरणाची पूर्वयोजना तसेच पूर्ण योजना करावी, प्रामाणिक प्रतिवृत्ते तयार करावीत, हे उद्योग संघाच्या पाचवीलाच पूजले आहेत. संघ व संघप्रेरित संस्था समाजाच्या विविध क्षेत्रांच्या समस्या सोडविण्यात व्यग्र आहेत. मग विद्यार्थी परिषदेकडून शिक्षणक्षेत्र, सहकार भारतीकडून सहकाराचे क्षेत्र, मजदूर संघाकडून गिरण्या-कारखान्यांचे क्षेत्र, विश्व हिंदू परिषदेकडून धर्मसंस्कृतीचे क्षेत्र तर भारतीय जनता पक्षाकडून राजकीय क्षेत्र. असे श्रमविभाजन झाल्यामुळे अवघ्या समाजपुरुषाला गवसणी घालण्याची खटपट संघकार्यकर्ते करीत आहेत. राजकीय क्षेत्र काही एकमेवाद्वितीयमनाही व वृत्तपत्रातून बातम्या झळकावणे हाही एकमेव छंद नाही. वरवर पाहता संघकार्य कासवाच्या गतीने चालू आहे. इतर विचारधारांचे कार्यकर्ते, सशाची चपळाई दाखवून अधूनमधून आपापली प्रसिद्धीची हौस भागवून घेतात. पण एकदा हल्लाबोल झाला की आपापल्या बिळांतून पहुडतात. कासव पुढे आगेकूच करीत राहते.


लाख लाख कार्यकर्त्यांचे मेळावे भरविणे, या मेळाव्यांमधून अनुशासनबद्ध कार्यक्रमकरणे, सातत्याने आत्मपरिक्षणार्थ, झाडाझडती घेणे, उणिवा व त्रुटी ध्यानात घेऊन त्या दूर करण्यासाठी प्रयास करीत राहणे हा मुळी संघस्वयंसेवकांचा स्वभाव आहे. ‘‘मार्गाधारे वर्तावे | विश्व हे मोहोरे लावावे | अलौकिक नोहावे लोकांमती |’’ हा उपदेश ज्ञानेश्वर माऊलींनी केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, जीवनव्रती होऊन हाच उपदेश अमलात आणीत आहेत. भारतातल्या व जगातल्या ऋषीमुनींनी, साधुसंतांनी केलेल्या मार्गदर्शनाच्या प्रकाशात वर्तन करावे, एकेका माणसाला उन्नतीच्या शिखरावर पोहोचविण्याचा प्रयत्न करावा. पण असे प्रयत्न करताना ‘‘आपण कुणी अलौकिक कार्य करीत आहोत, असे समजू नये, लोकांवरही असे इम्प्रेशन मारू नये, हा आहे ज्ञानदेवांचा उपदेश. संघाचे प्रचारक तर या उपदेशाची कार्यवाही करतातच, पण त्यांच्या रिमोट कंट्रोलमुळे इतर गृहस्थाश्रमी कार्यकर्तेही आत्मविलोपी उपक्रमांतून गाडून घेण्यात कृतार्थता मानतात. निवडणुकीत यश मिळाले तर त्या यशाची नशा चढणार नाही, ही दक्षता घ्यायची. अपयश मिळाले तर खचून न जाता पुढल्या निवडणुकीच्या पूर्वतयारीला हात घालायचा, ही खासियत संघकार्यकर्त्यांना मुलखावेगळी ऊर्जा देते. अशी ऊर्जा असल्यामुळेच मानवी भांडवलात गुंतवणूक करीत राहणे हा नित्य कार्यक्रम, तर या गुंतवणुकीतून काही डिव्हिडंडची कमाई झालीच तर ती व्यक्तीमात्राच्या खात्यात जमा करायची नाही, ती कमाई संघटनेच्या खातेपुस्तकातच लिहिली जाईल, ही काळजी घ्यायची. म्हणजे डिव्हिडंडची कमाई हा जो नैमित्तिक लाभ आहे, त्यावरही हक्क संघटनेचा. इतर विचारधारांच्या कार्यकर्त्यांवर हे संस्कार करण्याची पुढारी मंडळींची मानसिकता नाही. अशी मानसिकता महत्त्वाची असते, किंबहुना मूलभूत असते याची जाणही नाही. तेव्हा ना खेद ना खंत.


सन १९२५ पासून आजतागायत डॉक्टर हेडगेवारांचा संघ केवळ भारतातच नव्हे, तर जगाच्या पाठीवर अन्य देशांतूनही विविध उलाढाली करतोय, माणसे जोडतोय. आता माणसांमाणसांमध्ये मतभिन्नता असतेच. ती स्वाभाविक आहे पण नाराज झालेला कार्यकर्ता हिंदुत्व विचाराविषयी तसेच संघनेत्यांविषयी अद्वातद्वा बोलत नाही, कुणाचेही सार्वजनिक पंचनामे करीत नाही की स्वतःची वेगळी चूल मांडत नाही. बाळाजी हुद्दार असतील, वसंतराव ओक असतील वा मधुकर देवल अथवा आप्पा पेंडसे असतील... यापैकी कुणाही व्यक्तीने कसलीही पत्रकबाजी केली नाही. वेळ आली तर संघविचाराचे समर्थनच केले. गजाननराव गोखले हे दत्तोपंत ठेंगडींना मौलिक सहकार्य देऊन भारतीय मजदूर संघाचे कार्य वाढविण्यात धन्यता मानत असत पण का कोण जाणे? गोखले भारतीय मजदूर संघापासून दूर गेले. आश्चर्य म्हणजे चातुर्वर्ण्य उल्लेखावरून गोळवलकर गुरुजींवर प्रसारमाध्यमांनी गदारोळ उठविला तेव्हा गजाननराव गोखले नेमक्या या उल्लेखाचे समर्थन करण्यासाठी स्वयंघोषित अधिवक्ता म्हणून पुढे आले. ‘असुं आम्ही सुखाने पत्थर पायांतील’—हे संघगीत केवढे अर्थगर्भ आहे. ‘‘आम्हास नको मुळी मानमरातब काही | किर्तीची आम्हा चाड मुळीही नाही |’’—या ओळी तर मंत्रसदृश आहेत. खरा संघकार्यकर्ता या अशा ओळी केवळ म्हणत नाही, या ओळींची कार्यवाही करतो. स्वतःचे देव्हारे माजविण्याचा उद्योग त्याला रुचत नाही. संघाव्यतिरिक्त विचारधारांचे कार्यकर्ते कुठल्या उद्योगातून रमतात, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. समाजवादी व साम्यवादी कार्यकर्त्यांची वर्तन सूत्रे एका संस्कृत सुभाषितात अक्षरबद्ध झाली आहेत. या सूत्रांची परिणतीही या सुभाषितात वाचण्यास मिळते.


‘‘सर्वे यत्र विनेतारः | सर्वे पंडित मानिनः |
सर्वे महत्वमिच्छन्ति | कुलं तदवसीदति ।।’’


ज्या कुळातले कार्यकर्ते केवळ नेताजी असतात, स्वतःची पंडित म्हणून जाहिरात करतात, अचाट महत्त्वाकांक्षा बाळगतात त्या कुळाचे दिवाळे निघते. हा अर्थ सांगणारे हे सुभाषित भारतभूमीतल्या समाजवादी, साम्यवादी पक्षांचीच ओळख करून देते. आता तर दिवाळखोरीचेही कुणाला सोयरसुतक नाही. शोक करण्यासाठी, अश्रू ढाळण्यासाठीही माणसे नाहीत.



डॉ. हेडगेवारांनी स्थापलेल्या रा.स्व. संघाने स्वतःची सात वैशिष्ट्ये प्राणपणाने जपली आहेत. ही वैशिष्ट्ये समजून घेतली पाहिजेत.


१) भारताचे प्राचीनत्व आणि वर्तमानाचे अर्वाचीनत्व यांच्यात समन्वय साधणे. म्हणजे आपल्या प्राचीन इतिहासात जे काही शाश्वत आहे त्याला वर्तमानकाळाशी जुळवून घेणे, तर वर्तमानाच्या अर्वाचीनत्वाला भारतभूमीशी अनुरूप करवून स्वीकारणे.
२) अध्यात्माचे तत्त्वज्ञान वैयक्तिक व सार्वजनिक व्यवहारात उतरविणे. उदा. माणसामाणसात परमेश्वर आहे. हे आहे आपले तत्त्वज्ञान. मग अस्पृश्यता निर्मूलन, उच्चनीचतेचे उच्चाटन हे वर्तन स्वाभाविकच म्हटले पाहिजे. बंधुभावाचा व्यवहार हाच अध्यात्मविचाराचा खरा आविष्कार आहे.
३) भावात्मक, रचनात्मक चिंतन व या चिंतनाला साजेसे वर्तन ही संघाची बैठक आहे. तात्पर्य, कुणाच्या तरी विरोधात प्रतिक्रिया म्हणून संघ जन्मला नाही. जन्मल्यानंतर विकसला नाही. ही एकेक स्वयंसेवकाची खूणगाठ आहे. आपल्या प्रिय भारतवर्षाचे पुनर्निर्माण हेच विधायक उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून जीवनभर कार्य करीत राहायचे. ‘भारतीय भुत्वा, भारतं भजेत’ हाच तर डॉक्टरांचा व गुरुजींचा मौलिक उपदेश आहे. याहून भव्य, याहून दिव्य असे उद्दिष्ट जगात आहे का?
४) व्यष्टी, समष्टी, सृष्टी व परमेष्टी यांच्यात एकात्मता आहे. म्हणून संघर्ष नव्हे, तर सहकार्य हेच जीवनसूत्र आहे. अर्थात अन्यायाविरुद्ध संघर्ष केलाच पाहिजे. पण तो आपत्‌धर्म आहे. सनातन धर्म समन्वयाचा, सामंजस्याचा आणि सहकार्याचा.
५) समग्रता हे पाचवे वैशिष्ट्य संघकार्यकर्त्याला सांगते की, ‘एकोऽहं, बहुस्याम’ हाच मूलमंत्र आहे. वाढत्या वयाबरोबर मनाने, वर्तनाने समग्रतेचा आग्रह धरायचा, व्यापक व विशाल व्हायचे.
६) संस्थात्मक परिवर्तनाचे मानसिक परिवर्तन हे अधिष्ठान आहे. समाज बदलतो पण या बदलासाठी Wholesale transaction ची Retail transaction जोड दिली पाहिजे. घाऊक व्यवहारांना किरकोळीच्या व्यवहाराची सांगड घातली तरच व्यवसाय वधारतो हे लक्षात ठेवले पाहिजे. माणसामाणसाचे परिवर्तन महत्त्वाचे!
७) ‘हे किंवा ते’ याऐवजी ‘हे तसेच ते’ हे सूत्र मूलभूत आहे. म्हणजे गांधीजी व नेहरूजी यांच्यापासूनही शिकण्याची आपली सिद्धता हवी. ‘जे जे उन्नत, उदात्त, मंगल ते ते मला ग्राह्यही’—ही पंक्ती केवढे श्रेष्ठ मार्गदर्शन करणारी आहे.


अन्य विचारधारांमध्ये ही वैशिष्ट्ये आहेत का? धीरगंभीर प्रवृत्तीची माणसे घडवायची गरज आहे. याचे भान तिथे आहे का? प्रदीर्घ काळ आपापसातले मतभेद विसरून शांतपणे कार्य करण्याची गरज आहे. सर्वांना बरोबर घेऊन मार्गक्रमणा करायची आहे. या भूमिकेची अन्य संस्था-संघटनांना जाण आहे का? राजकारण म्हणजे काही सर्वस्व नव्हे, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उठाठेवी केल्या पाहिजेत, निर्लेप वृत्तीची माणसे या उठाठेवी करण्यासाठी ठिकठिकाणी उभी केली पाहिजेत. या निश्चयाचीच तर वानवा आहे. ‘गगनं गगनाकारम्’ असे म्हणतात. संघासारखा संघच अन्य संघटना, संस्थांशी तुलना तरी कशी करायची रा. स्व. संघाची?


- डॉ. अशोक मोडक
@@AUTHORINFO_V1@@