हिंदुत्व, विश्वबंधुत्व आणि डॉ. हेडगेवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Mar-2018
Total Views |



डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी हिंदू धर्माला ‘वे ऑफ लाईफ’ असे म्हटले आहे. रा. स्व. संघात कोणतीही धार्मिक कर्मकांडे केली जात नाहीत तर जीवन जगण्याची पद्धती म्हणून आपल्याला दिसत असलेल्या हिंदू धर्माची प्रचिती संघकार्यात येते. हिंदुत्व आणि विश्वबंधुत्व या संकल्पनाही त्यातच समाविष्ट आहेत. डॉ. हेडगेवार आणि संघकार्याच्या याच रूपाची चर्चा लेखात केली आहे.


राष्ट्राच्या उच्चतम महत्त्वाकांक्षेचे क्षण वारंवार येत नसतात. राष्ट्राची धुरा यशस्वीपणे वाहून राष्ट्राला उत्पन्न करणारे महापुरुष, तत्त्वज्ञानी, संघटक आणि पुढारी क्षणाक्षणाला जन्माला येत नसतात. कदाचित त्या राष्ट्राचे भाग्य असेल तर असले पुरुष त्या राष्ट्राला लाभतात आणि त्या राष्ट्राचा उद्धार होऊ शकतो. आजही योग्य तो मार्ग आपणास दाखवून दिला जात आहे. हाच मार्ग जर एकनिष्ठेने, जबाबदारीने व सातत्याने चोखाळला तर आपल्या राष्ट्राच्या भाग्योदयाचा क्षण निश्चितपणे जवळ येईल आणि जगाच्या नकाशात आवश्यक ते फेरबदल आपणास करता येतील.’’


हिंदुस्थानच्या पारतंत्र्याच्या काळात हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्राची घोषणा करणार्‍या व वैभवशाली हिंदू राष्ट्राचे लक्ष्य समोर ठेवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करणार्‍या डॉ. केशव बळीरामहेडगेवार यांचे हे वचन आहे. आपल्या राष्ट्राच्या भाग्योदयाबरोबरच जगाच्या नकाशात आवश्यक ते फेरबदल घडविण्याची विलक्षण महत्त्वाकांक्षा यात प्रकट होताना दिसते. ही महत्त्वाकांक्षा राजकीय नाही, तर विश्वाच्या कल्याणासाठी हिंदू राष्ट्राच्या उभारणीची आहे. कारण त्याचे अधिष्ठान हिंदुत्व आहे, हिंदू धर्म आहे.


हिंदू धर्म आणि हिंदू जीवनपद्धती

धर्माच्या संकल्पनेसंबंधी भल्या भल्या विचारवंतांमध्येसुद्धा संभ्रमअसलेला दिसून येतो. एक तर रुढ अर्थाने धर्माचा कोणी एक संस्थापक नाही. एकच एक आधारभूत ग्रंथ नाही. पंथ किंवा संप्रदायाचा कुणी एक प्रवर्तक असतो, त्या पंथाची उभारणी एका विशिष्ट ग्रंथावर आधारलेली असते. त्या प्रवर्तकाची शिकवण आणि त्या ग्रंथातील शब्द हा अंतिमनिर्णय असतो. इंग्रजीत अशा पंथ किंवा संप्रदायाला ’रिलिजन’ म्हटले जाते. धर्म या संकल्पनेशी रिलिजन ही संकल्पना जोडली गेली की अनेक चमत्कारिक संभ्रमनिर्माण होतात. त्यातून होणारा बुद्धिभेद समाजाला आणि राष्ट्राला घातक ठरतो.


महाभारतात आलेली धर्माची व्याख्या अगदी स्पष्ट आहे. व्यक्तीची समाजाची सर्वार्थाने धारणा, व्यक्ती व समष्टीला समर्थपणे धारण करणारा तो धर्म अशी स्पष्ट निश्चयात्मक व सम्यक व्याख्या जगातल्या दुसर्‍या कोणी चिंतकाने आजपर्यंत केल्याचा दाखला नाही. व्यक्तीची व समष्टीची भौतिक आणि आध्यात्मिक उन्नती एकाच वेळी करू शकेल तो धर्म. ‘आचारसंभवो धर्मः’ ही व्याख्या तर नैतिकतेच्या अत्युच्च पातळीवर मानवाला घेऊन जाणारी व्याख्या आहे. त्यामुळेच हा ऐतिहासिक काळातील विकासक्रमात हिंदू हे नाव प्राप्त झालेला धर्म, संप्रदायातील असहिष्णुत्व, हिंसाचार, पोथीनिष्ठता, साचेबद्धपणा या दोषांपासून अलिप्त आहे.


मानवी जीवनाची उषा पाहणार्‍या ऋग्वेदात किमान आठ हजार वर्षांपूर्वी पन्नासहून अधिक वेळा ‘धर्म‘ हा शब्द आला आहे. बहुतेक सर्व ठिकाणी तो ऋत म्हणजे सत्य, आचार आणि कर्तव्य या अर्थाने आला आहे. विश्वाचा शाश्वत नियमम्हणजे ऋत. हिंदू धर्म शाश्वत का मानला जातो, सनातन धर्म का म्हणवला जातो याचे रहस्य त्यात आहे. ऋत म्हणजे शाश्वत मार्ग, सत्याचा मार्ग. त्याचा शोध घेण्याची प्रेरणा धर्म देतो. उपनिषदांनी ईश्वराचा शोध घेण्यासाठी जी दिशा व जो मार्ग स्वीकारला त्यात या ऋतचा म्हणजेच सत्याचा किंवा ब्रह्माचा शोध आहे. ‘ऋतं सत्यं परं ब्रह्म’ असे उपनिषदांनी म्हटले आहे. हे ’ब्रह्म’ अर्थात चैतन्यच सार्‍या विश्वाच्या मुळाशी आहे. त्या चैतन्यापासूनच विश्वाची निर्मिती झाल्यामुळे चराचर सृष्टीत ते भरलेले आहे. साक्षात चैतन्य असल्यामुळे त्याला मृत्यू नाही. त्याचे (चैतन्याचे, चैतन्यरूप आत्म्याचे) ज्ञान करून घेणे हे मानवी जीवनाचे सर्वश्रेष्ठ उद्दिष्ट. हे ज्ञान प्राप्त व्हावे, यासाठी सारा खटाटोप. त्यासाठी अनेकांनी विविध मार्गांचा शोध लावला. हे मार्ग म्हणजेच विविध उपासना पंथ. यात निर्गुण निराकाराची उपासना करणारे वा सगुण साकाररूपी भिन्न-भिन्न देवतांची उपासना करणारे, भक्तीमार्गाचा अवलंब करणारे, फार काय ईश्वराचे अस्तित्वच नाकारणारेसुद्धा समाविष्ट झाले.


व्यक्ती व समृद्धीचे जीवनाची धारणा करणारे मूळ तत्त्व एकच आहे. त्याचे पहिले प्रकटीकरण वेदात आहे. त्यानंतर हजारो वर्षांनी सतराव्या शतकात जगद्गुरू संत तुकारामांनी म्हटले,



धर्म रक्षावयासाठी, करणे आटी आम्हासी |
वाचा बोलो वेदनिती, करू संती केले ते ।।


धर्माचे रक्षण म्हणजे वेदनीतीचा उच्चार व ऋषींचा आचार ही धर्माची सलगता आणि सातत्य अभूतपूर्व आहे. १९ व्या शतकाच्या शेवटी स्वामी विवेकानंदांनी जेव्हा ‘‘हिंदू म्हणवून घेणे ही गौरवाची गोष्ट आहे,’’ असे म्हटले तेव्हाही या सातत्याचा आविष्कार प्रकट झाला. कारण हिंदू धर्म, हिंदू व्यक्ती व हिंदू समाज यांच्या अद्वैताबद्दल त्यांच्या मनात संभ्रम नव्हता.


हिंदुस्थान हे एक राष्ट्र आणि त्याचे अधिष्ठान हिंदुत्व या विषयावरही सारे सत्पुरुष, संत यांचे निःसंदिग्ध एकमत होते. योगी अरविंद उत्तरपाठाच्या व्याख्यानात म्हणाले होते, ‘‘ब्रिटिशांशी संघर्ष हा राष्ट्राच्या उत्थानासाठी आहे. हे उत्थानाचे आंदोलन राजकीय नाही, तर आध्यात्मिक, धार्मिक आहे. आमचे राष्ट्रीयत्व हे राजकारण नाही. ती श्रद्धा आहे, उपासना आहे. सनातन धर्म हेच आमचे राष्ट्रीयत्व आहे. या हिंदू राष्ट्राचा जन्मसनातन धर्मासहितच झाला. ही दोन्ही अभिन्न आहेत.’’


डॉक्टर हेडगेवारांचे चिंतन नेमके हेच होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याला त्यांनी ईश्वरी कार्य म्हटले. हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज याविषयी कुठलाही संभ्रमनव्हता. हिंदू समाज संघटित करणे हेच त्यांनी आपले जीवितकार्य ठरवले होते आणि हिंदू धर्म हे जीवितकार्याचे अधिष्ठान होते. ही हिंदूदृष्टी सम्यक, वैश्विक विचारांची सृष्टी आहे. त्यामुळेच हिंदू धर्माचे विश्लेषण करताना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी त्यांच्या ‘हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ’मध्ये हिंदुत्वाच्या स्वभावाचे योग्य विवरण केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, ‘‘जर आपण हिंदुत्वाच्या व्यावहारिक भागाकडे पाहिले, तर आपल्या लक्षात येईल की, ती एक जीवनपद्धती आहे. हिंदुत्व जेथे वैचारिक अभिव्यक्तीस स्वातंत्र्य देते, तेथेच ते व्यावहारिक नियमांचा सक्तीने अवलंब करण्यास सांगते. नास्तिक किंवा आस्तिक सारे हिंदू होऊ शकतात. मात्र, त्यांनी हिंदू संस्कृती आणि जीवन पद्धतीचा अंगीकार केला पाहिजे. हिंदुत्व धार्मिक एकरूपतेवर जोर देत नाही, तर आध्यात्मिक दृष्टिकोन स्वीकारते. हिंदुत्व सामाजिक जीवनावर भर देते आणि नीतिमान लोकांची सोबत करते. हिंदुत्व कोणताही संप्रदाय नाही, परंतु जे दृढतेने सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात, अशांचा तो समूह आहे.’’


हिंदुत्वाचे वैशिष्ट्यपूर्ण आयामहिंदुत्वाचे अनेक वैशिष्ट्यपूर्ण आयामआहेत. चराचरामध्ये एकाच चैतन्याचा अंश असतो. असा ठामविश्वास असल्यामुळे विश्वाकडे पाहण्याची हिंदू दृष्टी विश्वबंधुत्वाचा पुरस्कार करते. ऋग्वेदात सार्‍या मानवजातीला अमरत्वाचा संदेश देणारी ऋषींची वाणी आहे. एका ऋचेमध्ये मानवमात्राला उद्देशून जे विशेषण वापरलेले आहे ते आहे, ‘अमृतपुत्र’.


‘श्रृण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्राः’ हे विश्वातील अमृतपुत्रांनोे, आमची वाणी ऐका. जगातल्या सर्व मानवांची नगरवासी, ग्रामवासी, आदिवासी, जंगली, बर्बर, असभ्य, असंस्कृत अशी विभागणी करून केवळ स्वतःला सर्वश्रेष्ठ समजून कोणावर आक्रमण करणे, त्यांना नष्ट करणे अशी कल्पनाही हिंदू व्यक्तीच्या मनात येऊ शकत नाही. वास्तविक पाहता केवळ बाराशे वर्षांपूर्वीपर्यंत हिंदूंचे राष्ट्र संपन्न होते, सामर्थ्यवान होते. पण हिंदुस्थानने कुठल्याही देशावर कधी आक्रमण केले नाही.


या उलट हिंदुत्वाच्याच प्रेरणेने केली गेलेली घोषणा होती, ‘कृण्वन्तो विश्वमार्यम्’ आम्ही सुसंस्कृत आहोत, आर्य आहोत, तर विश्वातील सर्व दुर्बल, अज्ञानी, असंस्कृत जनसमूहांनाही आम्ही आर्य म्हणजे सुसंस्कृत बनवू. ते आमचे उत्तरदायित्व आहे. अशी उच्चतम, उदात्त धारणा हिंदू जीवनाचा अविभाज्य भाग होती.



पंथ आणि संप्रदायांच्या अभिनिवेशाने मानवसमूह संघर्ष करीत होते. युद्धे होत होती. प्रेषितांच्या नावावर अन्य संप्रदायी समाजाला नष्ट करण्यासाठी अत्याचार आणि हिंसा होत होती. अशा कालखंडात विश्वाला शांतीचा संदेश आणि ज्ञान देण्याचे कार्य करण्याची, प्रेरणा देण्याची क्षमता हिंदुत्वातच होती. आध्यात्मिकदृष्ट्या विश्वाचे गुरूपद त्यातूनच हिंदू राष्ट्राला प्राप्त झाले होते. साधारणतः गेल्या दोन हजार सहाशे वर्षांत अनेक आक्रमकांनी हिंदू राष्ट्र नष्ट करण्याचा पराकोटीचा प्रयत्न केला. या काळात इराणबरोबर झालेला संघर्ष दोनशे वर्षांचा होता, तर ग्रीकांबरोबर झालेला संघर्ष तीनशे वर्षांचा होता. शक आक्रमक म्हणून आले. पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर ते हिंदू समाजात विरघळून गेले. वैभवशाली रोमन साम्राज्य नष्ट करणारे हूण हिंदुस्थान नष्ट करायला आले. त्यांच्या बरोबरही ७५ वर्षांचे प्रदीर्घ युद्ध झाले. हूण पराजित होऊन हिंदू समाजात मिसळून गेले. जगाच्या इतिहासातील सर्वात दीर्घ आणि भयंकर संघर्ष झाला तो इस्लामशी. सगळ्या जगाला इस्लामबनविण्याची दीक्षा घेतलेल्या इस्लामी आक्रमणाने पाच हजार वर्षांची संस्कृती असलेल्या इजिप्तची धूळधाण केली. त्याहूनही प्राचीन असलेल्या मेसापोटेमियाची सांस्कृतिक परंपरा पूर्ण नष्ट केली. इराक, सीरिया, तुर्कस्तान, अफगाणिस्तान, इराण यांची संस्कृती इतिहासजमा झाली आणि ते सारे मुस्लीमदेश बनले. केवळ पंधरा वर्षांत या घटना घडल्या पण एकदा अफगाणिस्तानच्या सीमेवर येताच इस्लामची गाठ पडली ती हिंदू राष्ट्राशी. एक हजार वर्षांहून अधिक काळ हा संघर्ष निरंतर आणि देशभर सर्वत्र चालू होता. अठराव्या शतकात या प्रदीर्घ संघर्षानंतर हिंदूंची सत्ता पुन्हा प्रस्थापित झाली. जगाच्या इतिहासातील हा अभूतपूर्व संघर्ष होता.


केवळ आध्यात्मिक गुरुत्व जरी टिकवायचे असेल तरी त्याच्या पाठिशी विजिगीषू समष्टीचे क्षात्र सामर्थ्य असावे लागते. हे हिंदू राष्ट्राने सिद्ध करून दाखविले. हिंदुत्व हीच यामागची प्रेरणा होती. ब्रिटिश शासकांच्या काळात डॉ. हेडगेवारांनी हिंदुत्वाच्या निहीत प्रेरणेचे हे आकलन करून घेतले. इतक्या प्रदीर्घ संघर्षानंतरही अखेर हिंदुत्वाची प्रेरणा आणि हिंदू समाजाचे संघटन हेच अंतिमलक्ष्यप्राप्तीचे साधन आहे, हे डॉक्टरांनी जाणले.

‘सर्वेऽपि सुखिनः सन्तु’


जगातील आणि विशेषतः पाश्चात्त्य विचारवंतांनी जी विचारधारा प्रचलित केली ती, ‘मी आणि माझे’ या कल्पनेभोवती फिरते. त्यामुळे व्यक्ती-व्यक्तीतील संघर्षापासून समाजातील वर्गविग्रहापर्यंत मानवी जीवनाचा त्यांचा विचार संघर्षाभोवती फिरत राहिला. भौतिक दृष्टीने अधिकाधिक सुख मिळवणे हे मानवी जीवनाचे एकच एक लक्ष्य आहे. अशी समजूत त्यांनी करून घेतली. त्यातून समाजातही संघर्ष हाच समाजाच्या विकासाचा पाया त्यांनी मानला. वर्गविग्रहाच्या आणि ‘बळी तो कान पिळी’च्या सिद्धांतावर आधारित शासनव्यवस्थेतून त्यांनी राज्यव्यवस्थेचा विचार केला.


पण मनुष्य काही केवळ भौतिक गरजांचे गाठोडे नाही. त्याला मन आणि बुद्धी आहे. आहार, निद्रा, भय आणि मैथुन हे विकार सर्वच प्राण्यांची विशेषता असते पण मनुष्यप्राण्याला बुद्धी आहे. आपल्याला प्राप्त झालेला देह नाशवंत आहे. याची त्याला जाणीव असली पाहिजे. देहाचे (भौतिक) सुख अंतिममानले तर ते तात्कालिक आहे, क्षणभंगुर आहे. शाश्वत सुख हवे असेल तर मी कोण आहे? हा देह म्हणजेच मी आहे का? असा विचार हिंदू चिंतनात आला. मी या समग्र सृष्टीचाच एक भाग आहे. सृष्टी, समष्टी आणि व्यक्ती यांचे संबंध परस्परानुकूल आहेत. या तिघांंचाही संबंध परमेष्टीशी आहे. त्या परमेष्टीचा शोध हे मनुष्य जीवनाचे अंतिमलक्ष्य आहे. या शास्त्रशुद्ध विचारातून जे नवनीत बाहेर आले तो धर्म. धर्म ही मनुष्य जीवनाला परमेश्वराने दिलेली सर्वात महान गोष्ट आहे. कृतज्ञता, सहिष्णुता, करुणा, मैत्री, अहिंसा, परोपकार, संयमया व अशा सर्व गुणांची वृद्धी धर्माच्या अनुसरणातूनच होऊ शकते. हा हिंदू विचार आहे.


हा विचार येताक्षणीच प्राणीमात्रातील द्वैतभाव संपून जातो. गवतावरून चालणार्‍या गाईच्या खुरांचे व्रण स्वामी रामकृष्ण परमहंसांच्या शरीरावर कसे आले? थेट सृष्टीशी, पृथ्वीशी एकरूप होण्याची ही किमया हिंदुत्वाच्या साधन मार्गाची आहे. विश्वबंधुत्वाच्या उदात्त कल्पनेचा तो वास्तवातील आविष्कार आहे. विश्वातील सारी मानवजातीच नव्हे, तर सर्व प्राणिमात्र सुखी व्हावेत, सर्वांना निरामय आयुष्य लाभावे. सर्वांचे कल्याण व्हावे. ही कामना व्यक्त करणारे एक सुभाषित आहे.


सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः |
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग्भवेत् ।।

वर्तमान काळातील भाषेत सांगायचे तर हा हिंदू राष्ट्राचा जाहीरनामा आहे.


हिंदू राष्ट्राची संकल्पना
पाश्चात्त्य विचारवंतांनी राज्य आणि राष्ट्र या दोन कल्पना एकच मानल्या. राज्य ही केवळ प्रशासन व्यवस्था असते. पण एक राज्य, एक रिलिजन आणि एक भाषा असणारे ते राष्ट्र अशी राष्ट्राची व्याख्या त्यांच्या कल्पनेत होती. विशेषतः फ्रान्सच्या १७८९ च्या क्रांतीनंतर राष्ट्र आणि राष्ट्रीयत्व यांचा विचार त्यांना आवश्यक वाटू लागला. इटली व जर्मनीसारख्या राष्ट्रांचे संघटन व निर्मिती हा युरोपियन साम्राज्यशाहीला बसलेला मोठा धक्का होता. सारे युरोपियन देश भूप्रदेशाचे वांशिक आधारावर संघटन व विघटन, व्यापारी व भूप्रदेशीय स्पर्धा आणि सततच्या लढाया यांच्या आहारी गेले. दोन्ही जागतिक महायुद्धे हाही त्याचाच स्वाभाविक परिणामहोता. ब्रिटिश हिंदुस्थानवर शासन करू लागले, तेव्हा भारत हे अनेक राष्ट्रांचे कडबोळे समजून ‘इंडियन सबकॉंटिनल’ ही संज्ञा दिली. हे अत्यंत प्राचीन संस्कृती, परंपरा व इतिहास असलेले राष्ट्र आहे आणि राष्ट्राविषयीचे आपले चिंतन पूर्णपणे अशास्त्रीय व चुकीचे आहे, याची त्यांना जाणीव झाली तेव्हा ती जाणीव स्वीकारण्याची त्यांची मानसिकता नव्हती. शिवाय हे एकसंघ हिंदूंचे राष्ट्र आहे, असे मानण्यात त्यांची राजकीय अडचण होती. त्यांचा स्वार्थ आणि वांशिक श्रेष्ठत्वाची मिथ्या भावना आडवी येत होती.
हिंदू तत्त्वज्ञानाने राज्य व राष्ट्र यांची कधीच गल्लत केली नाही. राज्य व शासनयंत्रणा ही व्यवस्था आहे. ती समाजाने स्वतःसाठी निर्माण केलेली भौतिक व्यवस्था आहे. राज्य म्हणजे समाज नव्हे. राज्य बदलते, शासन बदलते पण समाज कायमअसतो. येथील समाज हिंदू समाज आहे. हा समाज या भूमीला पुण्यभूमी मानतो. मातृस्वरूपात पाहतो. हजारो वर्षांची सांस्कृतिक परंपरा व इतिहास या समाजाचा आहे. अशा हिंदू समाजाचे राष्ट्र म्हणून हे हिंदू राष्ट्र आहे.


डॉ. हेडगेवारांनी अशा हिंदू समाजाचे संघटन व हिंदू राष्ट्राचे पुनरुत्थान हे एकमेव लक्ष्य मानले. याचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे.


विश्वकल्याणासाठी हिंदू राष्ट्र

जागतिक ऐक्य व विश्वकल्याण या भूमिकेतून विचार करणारे आधुनिक विचारवंत हेच काही पहिले विचारवंत नाहीत. आजच्या तथाकथित आधुनिक युगाचा उदय होण्यापूर्वी कितीतरी काळ आधी द्रष्ट्या ऋषीमुनींनी या महत्त्वाच्या प्रश्नांचा खूप खोलवर विचार केलेला आहे. पू. गुरुजी म्हणत असत, ‘‘संपूर्ण मानवजातीच्या ऐक्याची, संघर्षविरहीत आणि दुःखविहीन अशा आदर्श जगताची कल्पना अतिप्राचीन काळापासून आमच्या अंतःकरणात झंकारलेली आहे.’’


‘‘जगातील राष्ट्रे मानवजातीच्या कल्याणासाठी सौहार्दपूर्ण भावनेने एकत्र येण्यास मुळीच तयार नाहीत. इतकेच नव्हे, तर राष्ट्रभावना अधिकाधिक एकांतिक होत चालली आहे. राष्ट्रांच्या महत्त्वाकांक्षा दिवसेंदिवस बलवत्तर होत चालल्या आहेत. राष्ट्राराष्ट्रांच्या आकांक्षांमध्ये सुसंवाद निर्माण करण्याचे आजवरचे सर्व प्रयत्नही निष्फळ झाले आहेत. अशा परिस्थितीत मानवजातीचा उद्धार कोणत्या मार्गाने होऊ शकेल?’’


संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या वैभवसंपन्न हिंदू राष्ट्राचाच विचार पुढे पू. गुरुजींनी स्पष्ट केला आहे.


‘‘आपल्यापाशी असलेले अद्वितीय ज्ञान समस्त मानवजातीला देता यावे आणि स्वतःचे अस्तित्व कायमटिकवून जागतिक ऐक्यासाठी, जगाच्या कल्याणासाठी चाललेल्या प्रयत्नातील आपला वाटा उचलणे शक्य व्हावे, यासाठी सर्वप्रथमआवश्यक गोष्ट कोणती असेल? तर ती ही की, आपण सार्‍या जगासमोर आत्मविश्वासयुक्त सामर्थ्यसंपन्न आणि विजिगीषू राष्ट्र म्हणून उभे ठाकले पाहिजे.’’


पू. गुरुजींनी डॉक्टरांच्या ‘हिंदू राष्ट्र’ या संकल्पनेवरच केलेले हे भाष्य आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जागतिक कार्याची ही दिशा आहे. हिंदुत्वाचे प्रगमनशील प्रकटीकरण-


संघ स्थापनेनंतर डॉक्टरांनी हिंदुत्व, हिंदू राष्ट्र आणि हिंदू समाजाचे संघटन याचाच सातत्याने उच्चार केला. जगाच्या कल्याणासाठी संघकार्य, विश्वबंधुत्व, मानवता, जागतिक ऐक्य असे कोणतेही शब्द वापरले नाहीत पण त्यांच्या हिंदुत्वाच्या संकल्पनेत हे सारे काही येते. संघामध्ये हिंदू जीवनपद्धतीनुसार विचार करण्याची एक पद्धत आहे. संपूर्ण विचार जरी मनासमोर उभा असला तरी प्रत्यक्ष तो विचार बोलताना त्यातील आवश्यक तेवढाच भाग प्रकट केला जातो. सर्वच्या सर्व विचार प्रगट करण्याची आवश्यकता किंवा औचित्य नसते. आपली क्षमता व ऐकणार्‍यांची ग्रहणशक्ती या दोन्ही गोष्टींचा विचार करून मूलभूत विचार प्रकट केला जातो. दत्तोपंत ठेंगडी यांनी या संदर्भातील सुरेख उदाहरण दिले होते. त्यांनी या विचारप्रक्रियेला ‘प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट’ म्हटले आहे.


‘‘समजा, पहाटे चार वाजता मी खिडकीत उभा राहून बघतो आहे. तेव्हा समोर एका वृक्षाचे दर्शन होते. त्यावेळेस ते थोडेसे धूसर असते. याचा अर्थ तो वृक्ष आपणास दिसत नाही, असा नसतो. तर त्याचे स्पष्ट दर्शन होऊ शकत नाही. एका तासाने मी त्याच खिडकीत उभा राहून तो वृक्ष पाहतो तेव्हा तो पहिल्यापेक्षा अधिक स्पष्टपणे दिसतो आणि अगदी सात-आठच्या सुमारास मात्र तो वृक्ष त्याच्या समग्र अंगोपांगांसह अत्यंत स्पष्ट स्वरूपात मी पाहू शकतो. चार वाजता होणारे दर्शन, पाच वाजता होणारे दर्शन आणि सात वाजता होणारे दर्शन यात खूप फरक असतो.’’


डॉ. हेडगेवारांनी हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र यांचा उच्चार केला. त्यावेळी विश्वबंधुत्व आणि विश्वकल्याण त्या उच्चारात स्वाभाविकपणे समाविष्ट होते पण, त्याचे स्पष्टीकरण वा त्यावरील भाष्य करण्यात त्यावेळी औचित्य नव्हते इतकेच.

- शरद हेबाळकर
@@AUTHORINFO_V1@@