हिंदूराष्ट्र ते एकात्ममानव दर्शन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Mar-2018
Total Views |


संघाची हिंदूराष्ट्राची संकल्पना, हिंदूराष्ट्र म्हणजे काय आणि पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानव दर्शनात सामाजिक कल्याणाच्या रूपात दिसत असलेले त्याचे प्रतिबिंब हे एकाच माळेत गुंफलेले मोती! या लेखातून हिंदूराष्ट्र आणि एकात्ममानव दर्शन या दोन्ही गोष्टींची नेमकेपणाने मांडणी केली आहे.


आजच्या शाळेत जाणार्‍या मुलाला विचारले की हिंदू काय आहे? तर तो काय उत्तर देईल? आधुनिक सेक्युलर प्रभावी पाठ्यपुस्तकातून तो आपले मत बनवित असेल तर त्यातली ‘‘हिंदू-मुस्लीम-शीख-इसाई आपस में है भाई-भाई’’ ही घोषणा वाचून तो सांगेल की, हिंदू एक धर्म आहे. जसा मुस्लीम एक धर्म आहे, इसाई एक धर्म आहे, तसा हिंदूसुद्धा एक धर्म आहे, असे तो सांगेल.


आपल्या देशात वैचारिक स्पष्टतांच्या अभावामुळे जे वैचारिक गोंधळ निर्माण झाले त्यातला हा सर्वात मोठा गोंधळ म्हणता येईल. स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदू-मुस्लीमएकतेशिवाय स्वातंत्र्य शक्य नाही, अशा धारणेपोटी कॉंग्रेसने हिंदू-मुस्लीम ऐक्याला प्राधान्य दिले. त्यामुळे ‘मुस्लीम हा एक धर्म आहे तसेच हिंदू हा एक धर्म आहे व या दोन्ही धर्मांमध्ये समानता आहे,’ अशा अर्थाचे वातावरण तयार झाले.


वास्तविक हिंदू काय आहे? तर हिंदू समाज आहे. हिंदू जीवनपद्धती आहे. त्यालाच आपण हिंदू संस्कृती आहे, असे म्हणूया. पण ‘हिंदू नावाचा कोणताही धर्म नाही’ असे म्हटले तर कसे वाटेल? काहीतरी भलतेच सांगतोय असे वाटेल. हे ‘भलतेच वाटणे’ हा त्या वैचारिक गोंधळाचा एक परिपाक आहे.


वास्तविक धर्म या संकल्पनेत हिंदू-मुस्लीम-पारशी-इसाई-ज्यू हे काहीही येत नाही. हिंदू सोडून यातील इतर सर्व संप्रदाय आहेत. मग धर्म म्हणजे काय तर धर्म म्हणजे ३ गोष्टी आहेत.


१) धारणा करणारी व्यवस्था
२) धर्म म्हणजे स्वभाव उदा. वाहणे हा पाण्याचा धर्म आहे
३) धर्म म्हणजे कर्तव्य उदा. अतिथी धर्म, सेवक धर्म इ.

यात कोठेही ईश्र्वर-अनुसंधान, पूजा-पाठ, कर्मकांड यांचा उल्लेख नाही. धर्माचा पूजापाठाशी संबध नाही. त्यामुळे हिंदू हा धर्म नाही. मग हिंदू हे काय आहे?


हिंदू देश

‘हिंदू ’ नावाचा देश आहे. त्यावर राहणार्‍या प्रजेला जगाने ‘हिंदू प्रजा’ हे नाव दिले. त्या प्रजेच्या मान्यता व मूल्यव्यवस्था याला ’हिंदू संस्कृती’ हे नाव मिळाले. बार्हस्पत्य शास्त्रात एक श्लोक आहे -


‘‘हिमालयात समारभ्य यावत् इन्दू सरोवरम्
तं देवनिर्मितं देशं हिन्दुस्थानाम् प्रचक्षते’’

म्हणजे, हिमालयापासून ‘हि’ शब्द व इन्दूसागरापासून ‘न्दु’ शब्द घेऊन हिंदू हा शब्द तयार झाला. इन्दूसागर म्हणजे आजचा हिंदी महासागर!


‘हिंदू’ हे देशाचे नाव आहे, हे स्पष्ट झाले तर अनेक प्रश्र्न मिटतील. जपानमधे जपानी लोक राहतात, अमेरिकेमध्ये अमेरिकन लोक राहतात, जर्मनीमध्ये जर्मन लोक राहतात. तसे हिंदू देशामध्ये हिंदू लोक राहतात. हे समजायला सोपे जाईल. त्यामुळे मुस्लीम, इसाई यांना परकेपणा वाटण्याचा प्रश्र्न येणार नाही.


ज्याला आज लौकिकार्थाने हिंदू म्हणतात, त्या हिंदू समाजात कितीतरी उपासनापद्धती आहेत. मूर्तिपूजा करणारा पण हिंदू असू शकतो आणि मूर्तिपूजा न मानणारासुद्धा हिंदू असू शकतो. एवढचे काय, इस्लाम किंवा ईसाईयत याचा आधार आस्तिकता आहे. देवाला मानणे व देवपूजा पद्धतीला मानणे ही इस्लामी अथवा ईसाई होण्याची मुख्य अट आहे. अशी कोणतीही अट ‘हिंदू ’ होण्यासंबंधीची नाही. एखादा देवांना न मानणारा मनुष्यसुद्धा हिंदू असू शकतो.


थोडक्यात काय, तर ‘हिंदू’ हा शब्द या भौगोलिक रचनेशी अधिक संबंधित आहे. एनडीटीव्हीवरच्या मुलाखतीत बरखा दत्तने सद्गुरू वासुदेव जग्गी यांना प्रश्र्न विचारला की, ‘‘रा.स्व.संघ म्हणतो की, भारतात जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे. याबद्दल तुमचे मत काय आहे?’’ त्यांनी या प्रश्र्नाला विलक्षण उत्तर दिले. ‘‘मी तर रा. स्व. संघाच्या पुढे जाऊन म्हणेन की, भारतात जन्माला आलेला गांडूळ हासुद्धा हिंदू गांडूळ आहे. आफ्रिकेतील हत्तीला जर ‘आफ्रिकन हत्ती’ म्हणण्यात काही वावगे नसेल तर हिंदू देशातील गांडूळाला हिंदू गांडूळ म्हणण्यात काय चूक आहे?’’

हिंदू शब्दाबद्दल काहींचे मत असे की, हा परकीयांनी दिलेला शब्द आहे तर काहींचे मत असे की, हा तुच्छतादर्शक शब्द म्हणून वापरला जायचा. मग त्याचा एवढा आग्रह का धरावा? यावर स्वामी विवेकानंदांनी सुंदर उत्तर सांगितले आहे. ते म्हणतात की, ’’काही का असेना. या शब्दाचा उद्भव कसा झाला हे सोडा. आज हा शब्द तुमची ओळख झालीय ना. मग पुरुषार्थाने त्या ओळखीलाच नवा गौरव प्राप्त करून द्या.’’

हिंदूराष्ट्र

हिंदू देश, हिंदू समाज, हिंदू संस्कृती यांचा एकत्रित आविष्कार म्हणजे हिंदूराष्ट्र. राष्ट्र या शब्दाच्या व्याख्येनुसार ज्या भूमीला आज भारत म्हणून ओळखले जाते, ते हिंदूराष्ट्र आहे. अधिक व्यावहारिक शब्दात सांगायचे झाले तर आजचा भारत हे हिंदूराष्ट्राचे मुख्य अंग आहे. उदाहरणार्थ चाणक्य ज्या विश्वविद्यालयात आचार्य होते, ते तक्षशिला तुम्हाला आपले वाटते ना. ते कोठे आज भारताचा भाग आहे? ते तर पाकिस्तानात गेले. पण ते आमच्या श्रद्धेत कोठेतरी आहे. याचाच अर्थ राष्ट्र कोठे वसते या प्रश्र्नाचे उत्तर द्यायचे असेल तर ते भूमीत वसत नाही. समाजात वसत नाही तर राष्ट्र हे राष्ट्रीय समाजाच्या मनात वसते, असेच म्हणावे लागेल.


समजा देशावर प्रेमकरणारा एखादा भारतीय मनुष्य अमेरिकेत नोकरी करू लागला तर तो भारतात राहत नसूनही भारतीय राहतो. कारण तो भारतात राहत नसला तरी त्याच्या मनात भारत राहतो. म्हणजे ‘राष्ट्र’ शब्दाची खरी कसोटी मनातल्या भावनेशी निगडित आहे.


या वर्षी सौंदर्यसम्राज्ञी झालेल्या हरियाणाच्या मुलीला विश्र्वसुंदरी स्पर्धेत प्रश्र्न विचारला की, ‘‘तुमच्यामते जगातला सर्वश्रेष्ठ व्यवसाय, ज्याला सर्वात अधिक पगार मिळाला पाहिजे, तो कोणता?’’ या प्रश्र्नाला तिने उत्तर दिले की, ’’‘आई’ हा सर्वश्रेष्ठ संबंध आहे आणि तिला पगार पैशाच्या स्वरूपात नाही पण प्रेमआणि आदराच्या स्वरूपात द्यायला हवा.’’


ही हिंदूराष्ट्राच्या स्वभावाची सहज अभिव्यक्ती आहे. रा. स्व. संघाची नि:संदिग्ध भूमिका आहे की, भारत हे हिंदू राष्ट्र आहे.

पं. दीनदयाळजींचे चिंतन

भारताच्या व्यक्तिमत्त्वाच्या संदर्भात दीनदयाळजींचे चिंतन अधिक व्यावहारिक होते. संप्रदाय व धर्म यांच्या चुकीच्या अर्थामुळे झालेला वैचारिक गोंधळ दूर करण्याच्या दृष्टीने दीनदयाळजींनी दोन संकल्पना मांडल्या होत्या. या संकल्पना सकृतदर्शनी पाहता पचायला जड जातील अशा आहेत. एक म्हणजे महंमदपंथी हिंदू व दुसरी ईसाईपंथी हिंदू!


विविध पूजा प्रकार असलेला आपला भारत देश आहे. हिंदू विचार म्हणजे विविध पूजापद्धतींचे एक संमेलन आहे. या देशावर आक्रमक म्हणून आलेले असो वा शरणार्थी म्हणून आलेले असो, सर्वांना आम्ही पूर्वीच्या काळी समान सांस्कृतिक प्रवाहात मिसळून टाकले. शक, हूण, कुशाण, पारसी हे भारताच्या प्रवाहात समरसून मिसळले. त्यात आणखी दोन पंथ अधिक वाढले तर काही हरकत नाही. हिंदू समाजातील कुणालाही त्यात काही अडचण वाटणार नाही. उलट वैचारिक स्पष्टता वाढेल व पूर्वी सांगितल्याप्रमाणे ‘हिंदू’ हे या देशाचे नाव असून वेगवेगळ्या उपासनापंथांचे हिंदू हे समान माहेरघर आहे, हा विचार अधिक मूळ पकडेल.

एकात्ममानव दर्शन

पं. दीनदयाळजींनी मांडलेला एकात्ममानव दर्शनाचा विचार हा मूळ भारतीय अध्यात्मिक चिंतनाचीच एक अभिव्यक्ती म्हणायला हवी. मानवी चैतन्याच्या अखंड मंडलाकार प्रकटीकरणाला त्यांनी क्रमाने व्यष्टी/समष्टी/सृष्टी/परमेष्टी असे नाव दिले. पाश्चिमात्त्य विश्र्वाने हे चार टप्पे मान्य करून त्यात परस्परभिन्नता दर्शवली. ती भिन्नता संतुलित करण्यासाठी कायदे व करार करण्यावर भर दिला. एकात्ममानव चिंतन या चारही अभिव्यक्तींना भिन्न न मानता एक दुसर्‍याशी भावनेने जोडते. परमेष्टी, सृष्टी, समष्टी, व्यष्टी ही क्रमानुसार पुढल्या संकल्पनेला समाहित करून विकसित झालेला आविष्कार आहे.

एकात्ममानव दर्शन संकल्पनेत ‘राष्ट्र’ या मधल्या पायरीला मान्यता आहे. व्यष्टी, समष्टी नंतर ‘राष्ट्र’ ही सहज अभिव्यक्त आहे. त्याचे व्यक्तिमत्त्व स्वीकृत आहे. प्रत्येक राष्ट्राला त्याच्या स्वभावाप्रमाणे विकसित होण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. हे स्वातंत्र्य त्या राष्ट्राने पर्यावरणाचा म्हणजेच सृष्टीचा र्‍हास होऊ न देता सांभाळायचे आहे.


परिवारामध्ये जसे सक्षमघटक हा दुर्बल घटकांची चिंता वहन करतो. तसेेच सक्षमराष्ट्रांनी दुर्बल राष्ट्रांच्या विकासास हातभार लावावा, असे एकात्ममानव दर्शन सांगते.


पंडितजींनी सामाजिक क्षेत्रात विचार करताना अंत्योदयाची कल्पना मांडली. शेवटच्या रांगेत उभ्या असलेल्या शेवटच्या मनुष्यापर्यंत जर विकासाची गंगा पोहोचली तर मार्गात असलेल्या सर्वच घटकांना ती परिपोेषित करीत जाईल. शोषण आधारित नाही तर पोषण आधारित समाजव्यवस्था ही स्थायी व्यवस्था असेल, याच कल्पनेचा विश्र्वातील राष्ट्रांनी विचार केला तर सबल राष्ट्रे ही दुर्बल राष्ट्रांना शोषक अथवा जाचक न वाटता आधारवडासारखी भासतील.


फार पूर्वी तरुण अवस्थेत प्रचारक म्हणून काम करताना पंडित दीनदयाळजी व नानाजी देशमुख एकत्र जात होते. रस्त्यावर बाजूला एक खड्डा खणलेला होता. दीनदयाळजींचा पाय अचानक घसरला व ते खड्‌ड्यात पडले. थोडेफार खरचटल्यावर निभावले. तेथूनच त्यांनी टाचा उंच केल्या व हात वर करून ‘अरे! मला बाहेर काढा.’ असे ते ओरडले. त्यांच्या हाताचा पंजा नानाजींनी पकडला व त्यांना ओढून बाहेर काढले.


बाहेर आल्यानंतर कपड्यांवरील धूळ झटकून टाकीत सहज स्वरात पंडित दीनदयाळजी म्हणाले, ‘‘हे बघा खाली पडलेल्याला बाहेर काढण्याची ही पद्धत आहे. खाली पडलेल्याने टाचा वर कराव्या व त्याला काढण्यासाठी तयार असलेल्याने थोडे खाली वाकावे. सहज सक्षमसमाजबांधवांनी थोडे खाली वाकावे तर दुर्बल घटकाने थोड्या टाचा वर कराव्या, ही अंत्योदयाची व्यावहारिक पद्धत आहे.’’


काही लोक असे मानतात की, राष्ट्रवादी असण्यापेक्षा मानवतावादी असणे म्हणजे मोठ्या मनाचे लक्षण आहे. हिंदुत्व म्हणजे संकुचित विचार असून ‘मानवता’ हा खरा धर्म आहे.

वास्तविक पाहाता हिंदुत्व म्हणजे ‘हिंदू नावाच्या समूहाचा साम्राज्यवाद’ अशी चुकीची धारणा काही लोकांनी केलेली आहे. हिंदुत्वामध्ये मानवता तर अंतर्भूत आहेच. पर्यावरणाचे रक्षण आणि त्यानुरूप जीवनरचना हासुद्धा हिंदुत्वाचा भाग आहे. आजकाल सतत वापरले जाणारे शब्द अर्थात संतुलित विकास व अर्थात पर्यावरणीय जीवनरचना. ही मानसिकता निर्माण करण्यासाठीची व्यवस्था म्हणजे हिंदुत्व आहे.

अशी मानसिकता संपूर्ण जगाला देण्यासाठी ‘हिंदूराष्ट्र’ ही आदर्श व्यवस्था आहे. या दृष्टीने हिंदूराष्ट्र व पं. दीनदयाळजींचे एकात्ममानव दर्शन हे परस्परानुरूप आहेत.
- विनय पत्राळे
@@AUTHORINFO_V1@@