राज्यात भाजपची सत्ता स्वबळावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Mar-2018
Total Views |

जळगावात पक्षाच्या कार्यक्रमात ना. गिरीश महाजन यांनी व्यक्त केला विश्‍वास


 
 
जळगाव १७ मार्च :
महाराष्ट्रात भाजपने मोठ्या भावाच्या भूमिकेतून युतीचा चांगला विचार मांडला. पण म्हणून आम्ही घाबरलो आहोत, असा चुकीचा अर्थ कुणी काढू नये. उलट पक्ष कार्यकर्त्यांची अजोड मेहनत आणि उत्कृष्ट संघटन यांच्या जोरावर राज्यात भाजपची स्वबळावर सत्ता येऊ शकते, असा ठाम विश्‍वास राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात व्यक्त केला. त्यांनी शिवसेनेचे प्रत्यक्ष नाव न घेता एकप्रकारे गर्भित इशारा देण्याचे कामच केले. तसेच भविष्यातील भाजपच्या वाटचालीची दिशाही स्पष्ट केली.
 
 
पक्षाचा स्थापना दिन शुक्रवार, ६ एप्रिल रोजी मुंबईतील बीकेसी मैदानात साजरा होत असून, त्याच्या पूर्वतयारीसाठी आयोजित खान्देशातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ना. महाजन बोलत होते.
 
 
लष्करी जवानांना कायम युध्दसज्ज ठेवण्यासाठी त्यांचे प्रशिक्षण व सराव यावर देशाला मोठा खर्च करावा लागतो. पण म्हणून लगेच युध्द होत नाही. भाजपचे कार्यकर्तेही देशासाठी लढणारे सैनिकच आहेत. त्यांचेही नियमित प्रशिक्षण व उजळणी झाली पाहिजे. मुंबईतील वर्धापनदिन मेळाव्यात पुढील वर्षभराचे नियोजन केले जाणार आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात १०० टक्के बूथरचना मजबूत असेल तर आमदारकी आणि खासदारकीच्या सर्वच जागा पक्ष जिंकू शकेल, असेही ना. महाजन यांनी सांगितले.
 

‘उंदरांना चिंधीचा आधार’ - उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीत दोन जागा विरोधकांनी मिळवल्या तेवढ्यात विरोधकांची गत ‘उंदरांना चिंधीचा आधार’ अशी झाली आहे. त्यांच्याच सुरात सूर मिळवत शिवसेनादेखील आम्हाला डरकाळी दाखवत आहे. मात्र, आम्ही राज्यात स्वबळावर सत्ता मिळवू, असेही गिरीश महाजन म्हणाले.

 
२१ राज्यात भाजपचे सरकार
उत्तर प्रदेश विधानसभेतील दोन तृतीयांश जागा भाजपने मिळविल्या. मेघालय, त्रिपुरा, नागालॅण्ड येथे विजय संपादन केला. देशातील २१ राज्यात भाजपचे मुख्यमंत्री आहेत. जनतेचा पक्ष नेतृत्त्वावर विश्‍वास असल्याचे हे द्योतक आहे. दुसरीकडे कॉंग्रेसची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. केवळ चार राज्यांत त्यांचे मुख्यमंत्री आहेत.
 
 
महाराष्ट्रात जलस्वराज्य, मेक इन महाराष्ट्र, शेतकर्‍यांना सुरळीत वीजपुरवठा यासारख्या जनहिताच्या अनेक योजना सरकारने राबविल्या आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्त्वात रस्त्यांची असंख्य कामे सुरू आहेत. नैसर्गिक आपत्ती आपण थांबवू शकत नाही. मात्र, या आपत्तीत भाजप सरकारने सर्वाधिक मदत नुकसानग्रस्तांना दिली. मोठ्या प्रमाणात तूर खरेदी केली. शेतकरी व जनतेच्या हिताचे हे सर्व निर्णय त्यांच्यापर्यंत पोहोचवा. त्यासाठी अधिक जोमाने कामाला लागाल, असे आवाहन ना. महाजन यांनी कार्यकर्त्यांना केले.
@@AUTHORINFO_V1@@