पैशांपेक्षा ‘माणूसपण’ जपण्यावर भर!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Mar-2018
Total Views |
 



सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक राहुल पनवेलकर यांचे आज नाव एक प्रथितयश बांधकाम व्यावसायिक म्हणून घेतले जाते. कारण, बांधकाम क्षेत्राकडे त्यांनी केवळ व्यवसाय म्हणून पाहिले नाही, तर या व्यवसायातील उत्पन्नापेक्षा, नफ्यापेक्षा नेहमीच माणूसपण जपण्यावर अधिक भर दिला. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, ही उदात्त भावना कामाच्या केंद्रस्थानी ठेवली. बांधकामांच्या ठिकाणी ‘ग्रीन प्रोजेक्ट’ अमलात आणून पर्यावरण संतुलन राखण्यास प्राधान्य देणार्‍या मोजक्या बांधकाम व्यावसायिकांपैकी एक म्हणूनही पनवेलकर ग्रूपचे नाव घेतले जाते. त्यांच्याविषयी...


राहुल पनवेलकर गेली सहा वर्षे बांधकाम क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी मुलुंड येथील वझे-केळकर महाविद्यालयात पूर्ण केले. मुलुंडच्याच एम.सी.सी महाविद्यालयात मार्केटिंग व्यवस्थापन या विषयात त्यांनी पदवी संपादित केली, तर माटुंगा येथील वेलिंगकर महाविद्यालयात इंटरप्रिन्युअरशीप मॅनेजमेंटचे धडे घेतले. मायदेशात शिक्षण घेतल्यानंतर ट्रेकिंग आणि फोटोग्राफीची आवड असलेल्या राहुल यांनी विदेशातही भ्रमंती केली. वेलिंगकर महाविद्यालयात शिक्षण घेताना जपानला भेट देण्याचा योग आला. त्यात त्यांनी जपानची इंडस्ट्रियल टूर केली. त्यावेळी त्यांनी छोट्या, मध्यम स्वरूपाच्या कंपन्यांना भेटी दिल्या. जपानमधील टोकियो आणि नागोरा या शहरात फिरताना तेथील बांधकाम, पर्रावरणाचा समतोल, संस्कृती आणि मानवी स्वभावाचा त्यांनी जवळून अभ्यास केला आणि या वैशिष्ट्यांच्या स्वतः कडे ‘थिसिस’ स्वरूपात नोंदी ठेवल्या. विविध देशात फिरताना तेथील नवनवीन परंपरा शिकण्याचा प्रयत्न केल्याचे ते आवर्जून सांगतात. टोकियो आणि नागोरा येथे बुलेट ट्रेनचा प्रवास अनुभवल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाविषयी ते सार्थ अभिमान बाळगतात. तसेच अशा महत्त्वाकांशी प्रकल्पाला विरोध करणार्‍यांची कीव येते, असे ते सांगतात. लंडनसारख्या प्रगत शहराची संस्कृती त्यांनी संग्रहित केलेल्या जुन्या वस्तूंमधून आणि वास्तूंमधून जाणवत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

बांधकाम क्षेत्रात आजवर मिळालेल्या यशाचे सर्व श्रेय राहुल आपल्या कुटुंबीयांना देतात. उद्योगपती होण्यासाठी सर्व ऊर्जा मला माझ्या आजीकडून मिळाल्याचे ते आवर्जून सांगतात. त्यांची आजी एक दुकान चालवायची. तिच्या नंतर तिच्या मुलांनी म्हणजेच, राहुल यांच्या वडिलांनी आणि काकांनी उद्योगक्षेत्रातच कार्यरत राहणे पसंत केले. बांधकाम क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी पनवेलकर कुटुंबाचा विटांचा व्यवसाय होता. त्यांची एकत्र कुटुंबपद्धती असल्याने नेहमी घरात होणार्‍या चर्चांचा राहुल यांच्यावर प्रभाव पडत गेला आणि त्यातूनच त्यांची जडणघडण होत गेली आणि उद्योगपतीच व्हायचं, असा पक्का निर्धार त्यांनी मनाशी केला.

कुटुंबाविषयी बोलताना राहुल म्हणाले की, “आमचे कुटुंब हे तब्बल ३५ जणांचे. पूर्वी आम्ही एकाच इमारतीमध्ये राहायचो. त्यामुळे आम्हाला जागेच्या समस्या उद्भवू लागल्या. मग नवीन बांधकाम करण्याचा निर्णर घेतला. जेव्हा हे नवीन बांधकाम उभे राहिले, तेव्हा त्याला ‘साई’ हे नाव देण्याचा विचार झाला. पण, हे नाव सर्वत्र प्रचलित असल्याने ते नाव बदलून ‘पनवेलकर ग्रुप’ असे ठेवण्यात आले.”

आज या बांधकाम व्यवसायाची व्याप्ती पाहता, कर्जतनजीक अंबरनाथ, बदलापूर, नेरळ तर कसारा मार्गावरील वाशिंद आणि आसनगाव या पाच ठिकाणी पनवेलकर ग्रुपचे मोठे बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. बांधकाम क्षेत्रात काम करताना चांगली सेवा आणि गरजवंतांना रोजगार, हे उद्दिष्ट समोर ठेवून कामाला सुरुवात केल्याचे राहुल सांगतात. चाळकरी मुंबईकरांना घर विकत घेणे परवडत नसल्याने अनधिकृतपणे शहरांत वास्तव्य करणाऱ्यांना एक स्वतः चे हक्काचे घर मिळवून देणे, हे ‘पनवेलकर ग्रुप’चे ध्येय आहे. राहुल म्हणतात, “माझ्यासाठी पैशापेक्षा माणूस महत्त्वाचा असल्यांने मी लोकांना स्वस्त दरात घर देण्याचा  प्रयत्न करतो आणि ते किफारतशीर दरात कसे उपलब्ध होईल, यावर आमचा कटाक्ष असतो. जेव्हा आपण शाळेत जायचो, तेव्हा आपल्या सर्वांना शिकवले जाते की, माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत. अन्न, वस्त्र आणि निवारा. या व्यवसायाच्या निमित्ताने मी माणसांची तिसरी महत्त्वाची गरज पूर्ण करण्याचे काम करत असल्याचा मला सार्थ अभिमान आहे,” असे राहुल अभिमानाने सांगतात.

सरकारच्या ‘रेरा’ कायद्यामुळे बांधकाम क्षेत्रात मंदी आली, असे जरी अनेक व्यावसायिक बोलत असले तरी त्या काळात ‘पनवेलकर ग्रुप’ने या कायद्याला एक आव्हान म्हणून स्वीकारले आणि आज याच कायद्याअंतर्गत ‘पनवेलकर ग्रुप’च्या सर्व ग्राहकांना घरं उपलब्ध करून दिली जात आहेत.

सुरुवातीच्या काळात प्राथमिक स्तरावर १६ फ्लॅटची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर गृहसंकुल उभारणीस प्रारंभ झाला. सद्यस्थितीला ‘पनवेलकर ग्रुप’च्या वतीने परवडणारी घरे देताना वन रूम किचन साडेसोळा लाख, १ बीएचकेचे घर २२ लाख, २ बीएचकेचे घर ३५ लाखांपर्यंत उपलब्ध करून दिले जाते. यामध्ये सरकारच्या सर्व करांचा अंतर्भाव असतो.

आजचा काळ हा डिजिटायझेशनचा आहे पण, हे डिजिटायझेशन सर्वसमावेशक शासकीय धोरणांसाठी लागू होणे गरजेचे असल्याचे मत राहुल यांनी व्यक्त केले. या डिजिटायझेशनच्या माध्यमातून बांधकाम परवानगी, ना हरकत दाखला व पर्रावरण ना हरकत दाखला देण्याची सोय व्हावी, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

‘पनवेलकर ग्रुप’चे कार्य केवळ बांधकाम व्यवसायापुरतेच मर्यादित नसून सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. ज्या ठिकाणी बांधकाम उभे करायचे, त्या ठिकाणी पर्यावरणाला महत्त्व देत ‘ग्रीन प्रोजेक्ट’ अमलात आणला जातो. रामध्ये रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वृक्षलागवड करून त्या परिसराचे सौंदर्य खुलविण्याचा व जपण्याचा प्रयत्न केला जातो. स्वच्छतेचा ध्यास घेतलेल्या ‘पनवेलकर ग्रुप’च्या वतीने स्वच्छता अभियानात अंबरनाथ रेल्वेस्थानकात साफसफाई करून आणि सभोवताली वृक्षारोपण करून स्थानकाचा कायापालट करण्यात आला. या उपक्रमाबाबत मध्य रेल्वेच्या वतीने ‘पनवेलकर ग्रुप’ला प्रशस्तिपत्रक देण्यात आले. दि. १४ नोव्हेंबरला सर्वत्र साजरा होणारा बालदिनदेखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिला जातो.


- रोशनी खोत
@@AUTHORINFO_V1@@